माझा चौथीतला मुलगा त्याला गर्लफ्रेंड नाही म्हणून दु:खी आहे. त्याची समजूत कशी काढू?
– शीतल जगताप, भोसरी
त्याच्या बाबांशी बोलणं करून देऊ नका… (बाबांच्या आठवणी जाग्या झाल्या तर त्याला स्वत:ला स्वत:चं तोंड दाबावं लागेल आणि बुक्क्याचा मार लेकाला खावा लागेल.)
थंड हवेच्या ठिकाणी एसी रूम्स का असतात?
– सेबॅस्टियन परेरा, बोरिवली
तिथे जाणारी माणसं गरम रक्ताची असतील म्हणून.
राज्यातील महाराष्ट्रद्रोही सरकारमुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास, आदर्श व परंपरेची पायमल्ली होतेय. हा संविधानासोबत, जनमतासोबत धोका नाही का?
– विशाल बन्सवाल, संभाजीनगर
माझ्या नावाने एफआयआर करायला लावायचीय काय पोलिसांना?.. त्याकरताच सरकारविरुद्ध लिहायला लावताय का मला? लब्बाऽऽड!
प्रेमात मुली मुलांपेक्षा आठपट फॉरवर्ड असतात म्हणे… तुमचा काय अनुभव?
– नवनीत शिंदे, खालापूर
मला फक्त मुलींचा अनुभव आहे. तो सांगू का? की तुम्हाला मुलांचाच अनुभव हवाय? तो मला नाहीय…
कुणी आपल्याला कॉल केला तर कॉलवर एकटा तोच बोलतोय की त्याने इतर कुणाला कॉन्फरन्स कॉलमध्ये घेतलेलं आहे, तिसराच कोणी हा कॉल ऐकतोय, हे मला कसे ओळखता येईल?
– सावनी पुणतांबेकर, अहमदनगर
जो ऐकतोय असा संशय असेल, त्याचा उद्धार सुरू करा.. तो तुमच्या खानदानाचा जीर्णोद्धार सुरू केला की ओळखा काय ओळखायचंय ते!
माझ्याकडे तीन लाख रुपये आहेत. या पैशातून मी काय केले तर ४ ते ५ वर्षांत त्यातूनच करोडपती होईन?
– शरद गोडे, अमरावती
करोडपती होण्यासाठी काय करावं एवढं मला कळलं असतं, तर मीच करोडपती झालो असतो… पण तुमच्या तीन लाखाचे बारा हजार होऊ नये म्हणून काय करू नये ते सांगू शकतो… चहाचे स्टॉल सुरू करू नका.. त्यांना पास्ट होता, फ्युचर आहे की नाही ते माहित नाही.
आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याऐवजी मी पॅन कार्ड आधार कार्डाला जोडलं तर चालेल का?
– विश्वास काळे, शिरोळ
कोणाचं कोणाशी जोडायचंय (कार्ड हो…)? अर्धवट बोललात तर असं होतं, म्हणून पूर्ण बोलत जा… मग कोणाचं कोणाशीही जोडा (कार्ड) ते जुळेल किंवा जुळणार नाही… या व्यतिरिक्त तिसरं काही घडत नाही.
राहू काळ चांगला कधी असतो?
– अप्पा कुंडले, कोल्हापूर
‘अहो ‘राहू’ द्या काम… मी करते,’ असं जेव्हा बायको बोलते, तेव्हा आपला राहू काळ चांगला असतो, असा स्वानुभव आहे.
अनेक अब्जाधीश सेलिब्रिटी आपल्या स्ट्रगलच्या काळातल्या मित्रांना कसे चाळीत जाऊन भेटलो, वगैरे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात; हे एवढे श्रीमंत झाल्यानंतर पण यांचे मित्र गरीब कसे राहतात? हे मित्रांना मदत का नाही करत श्रीमंत व्हायला?
– प्रवीण मांडरे, जळगाव
अशा श्रीमंतांचे आणि सेलिब्रेटीचे चाळीतले धंदे, उपद्व्याप, पराक्रम चाळीतल्या मित्रानी व्हायरल करू नये म्हणून… आणि दुसर्याने सांगितलेलं आपण किती ऐकतो, हा प्रश्न स्वतःला विचारा… मग कळेल श्रीमंत मित्र श्रीमंत व्हायची टीप आपल्याला का देत नाहीत ते!
क्रिकेट हा आपल्या देशाचा धर्म असेल, तर आयपीएल काय आहे?
– अद्वैत वाघे, श्रीगोंदा
धर्माचा व्यवसाय!
विशिष्ट प्रकारचे कपडे घातलेला माणूस दिसला की लोक थेट त्याच्या पाया पडायला जातात, त्याला महाराज म्हणतात; कपड्यांवरून त्याची योग्यता कशी कळते?
– जयवंत नवरे
कारण कपड्यांच्या आत सगळेच सारखे असतात आणि माणूस आपल्यापेक्षा काही वेगळं असेल, त्यालाच नमस्कार करतो. त्यामुळेच आतून बदलता न येणारी माणसं दिवसाला लाखो रुपयांचे कपडे चार चार वेळा बदलतात. मग एवढे भारी कपडे न परवडणारी माणसं त्या कपड्याच्या आतल्या माणसाला नमस्कार करतात आणि योग्य-अयोग्य न ठरवता येणारे त्यालाच योग्य ठरवतात!