माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने नुकत्याच गोहाटीला झालेल्या भाजपनेत्यांच्या गुप्त बैठकीचा वृत्तांत गुपचूप टेप करून आणला. तो ऐका आता…
– मित्रों, इतना बडा सदमा इससे पहले कभी नहीं लगा था। ये कर्नाटक ने हमारा करना नाकाम कर दिया। मेरी और पार्टी की सारी ताकत दांव पे लगा दी थी मैंने, लेकिन कमल मुरझाया। किती मोठ्या मिरवणुका, किती मोठ्या सभा, किती मोठी पुष्पवृष्टी. शेवटी सारे मातीत गेलं. काँग्रेस ने हमारी सारी इज्जत मिट्टी में मिला दी। मिस्टर अमितलाल, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ?
– मुझे इसमें कुछ काला लगता है।
– सबकी पीली हो गई और तुम्हे काला लगता है?
– साब, यात निश्चित पाकचा किंवा चीनचा हात आहे. त्याशिवाय आपण हरूच शकत नाही.
– मलाही तसंच वाटतं. मी तर यावेळी घसा फोडून ‘मन की बात’ सार्या देशाला समारंभाचा थाटमाट करून ऐकवली होती. तरीही असं घडावं? जरा त्या आव्हाडांना फोन करून खरं काय ते विचारा.
– अहो, साहेब ते तर आपणच कालाकांडी करून काँग्रेसला मुद्दाम जिंकवून दिलं, असं म्हणताहेत. म्हणजे पुढच्या वेळी काँग्रेस गाफील राहील आणि भाजपच्या हातात लोकसभेचा लोण्याचा गोळा येईल.
– तुम्ही या मतदानयंत्रांची सीबीआय चौकशी लावा. मग मी घोडे कुठल्या शर्यतीत लावायचे ते बघतो. मला उद्या अयोध्येत जाऊन श्रीरामाला जाब विचारायचाय की तू असं कसं केलंस? बजरंग बलीचं मी समजू शकतो. तो रामाशिवाय कुणाच्याच आज्ञेचं पालन करीत नाही. नितीनजी, तुम्हाला काय वाटतं?
– मला वाटतं, सर्व मतदारसंघांत पुरेशा प्रमाणात साड्यावाटप झालं नाही. स्त्रियांबरोबर आता पुरुषांचाही विचार करायला हवा. त्यांनाही शर्ट पीस, पॅण्ट पीस, रेडिमेड जीन्सवाटपाची पद्धत सुरू व्हायला हवी. बजरंग बलीच्या मानाने श्रीरामाचा हवा तसा गजर प्रचारात झाला नाही. त्यामुळे त्या दैवतांचा कोप झाला असावा. या देशाला मोठे पूल, महामार्ग यांची आवश्यकता नसून देवालयांची गरज आहे. भक्तीमार्ग मोठ्या प्रमाणात अनुसरला तर पक्षाचं आणि देशाचं महाकल्याण होऊ शकतं, असा माझा कयास आहे.
– मी पुन्हा येईन, असं मी नेहमी सांगत असतो. कर्नाटकात जरी काँग्रेस आता आली असली तरी तिथेही भाजपा पुन्हा येईल, पुन्हा येईल, लोकसभेत पुन्हा येईल. आताही भाजपा तिथे हरलेली नाही. भाजपा कधीच हरत नसते. कमळ कधीही गळून पडत नसतं. लोकांच्या हृदयात, काळजात, मनात भाजपाच आहे हे मी खात्रीने सांगतो. मतदानयंत्राला चुकीच्या सूचना दिल्या गेल्यामुळे कदाचित हा पराभव झाला असावा. यासाठी मी आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करीत असल्याची घोषणा करतो. आता पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करतील.
– ‘नड्डा तिथे खड्डा’ असं आता कोणीतरी कुजबुजत होतं. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराला मोदीसाब, शहासाब पुढे असतात. विजय झाला की त्यांचा जयजयकार आणि पराभव झाला की आमचा धिक्कार, हे आता चालणार नाही. तरी कर्नाटकातील दारूण पराभवाची जबाबदारी मी स्वत: घेतो. त्यामुळे तरी माझी किंमत वाढेल आणि वरिष्ठ नेत्यांना दोषमुक्त केल्याचं समाधान मला लाभेल.
– मी कोल्हापुरी पाटील. आदरणीय फादरणीय व मदरणीय नेते मंडळींनो, आपला बालेकिल्ला असलेल्या पुण्यात आपल्या पक्षाचा दणदणीत पराभव होऊ शकतो, तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे! आपल्याला आता यापुढे अशा दारूण, मानहानीकारक, लज्जास्पद, खतरनाक पराभवांची सवय व्हायला हवी. आपण पक्षाची बॉडी मजबूत करायला पाहिजे. मल्ल म्हणून आपल्याला देशात अजिंक्य राहायचे असेल तर नेहमी पांढरा आणि तांबडा रस्सा चापून गिळला पाहिजे. पक्षाची बॉडी खंगत चालली आहे. तिला कोणतं सलाईन लावायचं ते तुम्ही ठरवा. नेहमी विजयी रथाबरोबर एक अॅम्ब्युलन्सही ठेवावी, अशी माझी वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे.
– माझ्या नावाच्या स्पेलिंगप्रमाणे कृपया मला हाक मारू नये, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. मी बावनकुळे, कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव झाला, त्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उभा आहे.
– अहो, ही शोकसभा नाहीए.
– तरी पण गेलेला विजय आता परत येणार नाही. आपण सर्वशक्तीनिशी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण शेवटी तो आपल्या हातून निसटलाच. श्रीरामाला प्रिय झाला. जय राम श्रीराम.
– अहो, हे काय, कुणाला काय वाटेल हे ऐकून. भाजपा काही इतकी लेचीपेची पार्टी नाही. कोणीतरी बजरंग बलीच्या रूपात येऊन तिला संजीवनी पाजेल हे मी मुनगंटीवार तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. पुढच्या निवडणुकीत भाजपाच्या पैकीच्या पैकी जागा निवडून आल्या नाहीत तर मी मिशी कापून देईन.
– पण तुम्हाला कुठे मिशी आहे? नेहमी सफाचट करून येता.
– माझ्या दाढीमिशा काढू नका. नाहीतर तुमच्या दाढीमिशा उपटेन.
– शांत व्हा, शांत व्हा. आपण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी जमलो आहोत. एकमेकांच्या दाढीमिशा उपटून पक्षाचं केशकर्तनालय बनवू नका. थोडीतरी शिस्त पाळा. मी सरसंघचालक मोहन भागवत सर्वांना शांततेचं आवाहन करत आहे. आपलं आचरण चांगलं ठेवा. स्वच्छ ठेवा. जनतेला मूर्ख समजू नका. ती योग्य न्याय करते. जैसी करनी वैसी भरनी. सामान्य लोकांना त्रास देऊ नका. त्यांचे शाप घेऊ नका. नाहीतर पुढे कठीण आहे. विनोद तावडेजी, बोला आता…
– मी तर दोन महिन्यांपूर्वीच निवडणूकपूर्व गुप्त अहवालात हे भविष्य वर्तवलं होतं. तो अहवाल फुटला आणि त्यातील सत्य विरोधकांच्या हाती लागलं. यात मी जनतेचा पक्षाबद्दल वाढत चाललेला रोष आणि त्याचा पक्षावर आणि येत्या काळात येणार्या निवडणुकांवर अनिष्ट परिणाम होईल, असं स्पष्ट भाकित केलं होतं. शेवटी वरून दबाव आल्यावर विरोधकांच्या हाती माझा खरा अहवाल लागलेलाच नाही, ते बनाव रचत आहेत, अशी सारवासारव मला करावी लागली. शेवटी, सत्याला मरण नाही हे सिद्ध झालंच ना!