मी निवडणुकीला उभा राहणार आहे. काय तयारी केली पाहिजे त्यासाठी?
– संपत पोकळे, आष्टी
काय वाटेल ते करा. पण तुमच्या आडनावाप्रमाणे करा. भरीव काही करू नका. तोंडावर पडाल.
आजच्या काळात निष्ठा या शब्दाला काही किंमत राहिली आहे का?
– संदीप गोजरे, पवई
असं कसं विचारता? विष्ठा या शब्दाला तरी कुठे किंमत आहे?
‘धुमधडाका’ सिनेमाचा कोणी रिमेक केला आणि तुम्हाला त्यात रोल ऑफर केला तर तुम्हाला कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल. ती व्यक्तिरेखा करायला मला आवडेल.
– किरण पाताडे, देवनार
मूळ ‘धुमधडाका’मधील कुठली व्यक्तिरेखा तुम्हाला आवडली नाही, ते सांगा. तीच व्यक्तिरेखा करायला मला आवडेल.
विनाशकारी प्रकल्प कोकणातच उभारण्याविषयी सरकार इतके आग्रही का? असले प्रकल्प महाबळेश्वर, नागपूर किंवा थेट गुजरातमध्येच का बरे उभारले जात नाहीत?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
आपल्या शेठच्या गावाचा विकास करण्यासाठी जे स्वतःला शेठचा माणूस म्हणवतात त्यांचा गाव भकास करण्याची परंपरा आहे. स्वतःला हवी तीच परंपरा पाळणारे ही परंपरा कशी सोडतील.
संतोष नावाचे गृहस्थ संतोषाने का जगत नाहीत?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
कारण सगळ्याच संतोष नावाच्या गृहस्थांचं आडनाव पवार नसतं.
मी यूट्युब चॅनल सुरू केलंय. पण, त्यावर रोज फक्त एक-दोन व्ह्यूज दिसतात. माझ्या चॅनलवरचा व्हिडीओ व्हायरल कसा होईल?
– प्रतीक मोरे, कणकवली
कोणाची तरी भक्ती करा… कोणाला तरी शिव्या द्या… (अध्यात्माला चांगले दिवस आलेयत. लोक लाईक करतील म्हणून बघतील. विरोध करतील म्हणूनही बघतील. आपोआप व्हायरल होईल. शिवाय पर व्हिडीओ किंवा पर पोस्ट ४० पैसे मिळतील. शिवाय त्यातून ४० टक्के कमिशन कापले जाणार नाहीत याची ग्यारंटी.)
संतोषजी, तुम्ही ड्रीम इलेव्हन टीम निवडली तर कोणाला घ्याल?
– रोहित सिद्धये, विलेपार्ले
महागडे प्लेयर न घेता… जितके म्हणून पप्पू बनवले गेलेले असतील, त्या सगळ्यांना घेऊन ड्रीम इलेव्हन टीम बनवेन. कारण सध्या पप्पूंना चांगले दिवस आलेयत असं वाटतंय.
लोखंडाला एवढी डिमांड असतानाही रेल्वेचे रूळ का चोरी होत नाहीत?
– मोहन पोरवाल, दादर
चोरून नेण्यासाठी ट्रेनच लागणार.. ती चालणार कुठल्या रुळावरून. दुसरा व्यवसाय शोधा (भंगाराचा नको.)
प्रारंभ आणि आरंभ यात काय फरक सांगू शकाल?
– वैदेही ठाकरे, पनवेल
एकाला रफार आहे. एकाला रफार नाही आहे. बाकी त्या दोघांना कधी मला भेटवलंत तर शेवटी शेवटी तरी आणखीन फरक शोधू शकेन.
सर्वोच्च न्यायालयाने इतके फटके मारल्यानंतरही हसत हसत व्ही फॉर व्हिक्टरीची खूण करण्याइतका निगरगट्टपणा कुठून येतो?
– विलास पारपल्लीवार, भंडारा
जग आपल्याकडे बोटं दाखवत असताना, आपण जगाकडे बोट दाखवतो. पण त्याचवेळी आपलीच उरलेली बोटं आपल्याकडेच बोट दाखवत असतात. पण व्हिक्ट्रीची खूण केल्यानंतर उरलेली आपलीच बोटे तरी आपल्याकडे बोट दाखवत नाहीत नाही, याच समाधानातून हा निगरगट्टपणा येत असावा.
कर्नाटकातल्या लोकांनी बजरंगबलीचा जयजयकार करून काँग्रेसी कशिदा का काढला असेल?
– सत्यवान टोपणे, जालना
त्यांना झगमगीत जरतारी जास्तच टोचल्याने नाचरा मोर नको झाला असेल.
त्याने तिला पसंत केले आणि नंतर तिची मैत्रीण त्याला अधिक आवडली… आता काय करायचं?
– गौरीश सावंत, महाड
जे होईल त्याला आपण नाव ठेवायचं (म्हणजे वर्षभराने बारसं करायचं.)