संतोष एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतो. त्याला गाण्याची आवड असल्याने अलीकडे त्याने एक कराओके म्युझिकचा ग्रुप जॉईन केला आहे. कराओके म्युझिकच्या अनेक कार्यक्रमात तो या मंडळींना भेटतो. या ग्रुपशी त्याची नवी नवी ओळख आहे.
या मंडळींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकदा एकाने मेसेज टाकला की मी माझ्यासाठी ‘कडकनाथ’ कोंबडी मागवत आहे. नामांकित पोल्ट्री आहे. चांगल्या मोठ्या मोठ्या कोंबड्या आहेत. तुम्हाला कुणाला हवी असेल तर सांगा. किंमत चार हजार रुपये आहे. काही वेळातच त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या सदस्यांकडून ‘मला पण हवी’ असा मेसेज अन ऑनलाइन चार हजार रुपये पे केल्याचा स्क्रीन शॉर्ट पाठवला जाऊ लागला. संतोषची आर्थिक स्थिती फारशी बरी नव्हती. कोचिंग क्लासमध्ये शिकवण्यातून मिळणार्या तुटपुंज्या पगारात त्याला भागवावं लागायचं. त्याची बायको तब्येतीच्या काही तक्रारी असल्याने सध्या नोकरी करत नव्हती. चार हजार रुपयाची कोंबडी मागवणे संतोषला शक्य नव्हतं. संतोषने ग्रुपवरच्या त्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं. पण त्या मेसेज टाकणार्या व्यक्तीने ‘संतोष सर, तुम्हीच एकटे राहिलात. चला पटकन गुगल पे करा’ असा मेसेज केला. संतोषची मोठी अडचण झाली. त्याने थोडा वेळ विचार केला आणि मग ‘लाजेकाजेस्तव’ चार हजार रुपये ट्रान्स्फर केले.
संतोषने चार हजार ट्रान्स्फर केले खरे, पण आता घर खर्च कसा रेटायचा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. शिवाय बायकोला काय सांगायचं? कडकनाथ कोंबडी काही कुणी फुकट भेट देत नाही. आपण त्यासाठी चार हजार पे केले आहेत ते तिला कळणारच. झालंही तसच. सगळा प्रकार कळल्यावर संतोषची बायको खूप भडकली. ही आता त्या कराओकेवाल्यांशी भांडायला जाते की काय अशी संतोषला भीती वाटू लागली. झक मारली आणि कडकीमध्ये कडकनाथ ऑर्डर केली असं संतोषला झालं.
कोंबडी आली. बनवली. पण अपराधीपणाच्या जाणीवेत आणि बायकोच्या कटकटीत त्याला त्या कोंबडीचा आस्वादही घेता येईना. एकतर एक मोठी कोंबडी त्या दोघांना जास्त झाली. नातेवाईक किंवा शेजार्यांना थोडं चिकन द्यावं, तर एरव्ही पैसे नाही म्हणून रडतात आणि कडकनाथ कोंबडी खातात अशी लोक चर्चा करणार. म्हणून दोन तीन दिवस दोघांना ती कोंबडी संपवावी लागली. ती संपेपर्यंत संतोषच्या डोक्याला खूप ताप झाला.
संतोषने चार हजार रुपये किंमत असलेली कडकनाथ कोंबडी का मागवली? कारण कोंबडीखरेदीवर एवढे पैसे खर्च करण्याची माझी ऐपत नाही हे त्याला त्या ग्रुपला कळू देण्याची लाज वाटत होती. आपण एकटे ‘मला नको’ म्हणालो, तर ते लोक नाराज होतील. त्याच्यासमोर आपली लायकी जाहीर होईल अन् तसं होता कामा नये असं संतोषला वाटलं.
आपण ज्यांच्यासोबत वावरतो, काम करतो त्यांच्याशी आपले संबंध बरे असायला हवे असं वाटण्यात काही गैर नाही. पण आपली आर्थिक स्थिती फारशी बरी नाही हे लपवण्याची काय गरज आहे? कडकनाथ कोंबडीची किंमत आपल्याला परवडणारी नाही असं सांगता यायला हवं. कडकनाथ कोंबडीचं मांस वजनावरही मिळतं. वाटल्यास कधीतरी ते थोडंसं आणून खाऊ, पण त्या लोकांना काय वाटेल, ते लोक काय विचार करतील याचा विचार करून खिशाला एवढी मोठी चाट लावून घेण्याची संतोषला गरज नव्हती. या प्रसंगानंतर मात्र संतोषने ही अशी चूक पुन्हा केली नाही. त्या ग्रुपवर जेव्हा हापूस आंबे, काजूगर अशा महागड्या गोष्टी मागवण्याबद्दल विचारणा होई तेव्हा संतोष स्पष्टपणे ‘मला नको’ किंवा ‘बजेट नाही’ असा रिप्लाय द्यायला कचरत नसे. त्याच्या या रिप्लायमुळे त्याला वाटत होतं तसं कुणी त्याच्यावर नाराज होत होतं किंवा त्यांच्या संतोषशी वागण्या बोलण्यात काही फरक पडला होता असं नाही. अन् समजा कुणी काही म्हटलं असतं तर संतोषवर काय मोठं आभाळ कोसळणार होतं?
लोक काय म्हणतील, याचा विचार फक्त संतोषने केला असं नाही. आमचे केळुसकर काकाही हा विचार करतात. त्याच्या वस्तीत एक पॉश सलून झालं आहे. काका येता जाताना या सलूनकडे पाहतात. या सलूनमध्ये जुन्या सलूनमध्ये असतात तशा जुन्या पद्धतीच्या खुर्च्या नाहीत.नव्या स्टाइलच्या, नव्या पद्धतींच्या खुर्च्या आहेत. हे सलून महागडे असेल असं आधी काकांना वाटलं होतं. पण सर्वसाधारण सलूनचे जे रेट आहेत तेच या सलूनचे रेट आहेत हेही काकांच्या कानावर आलं होतं. आपण केस कापून घ्यायला तिथे का जाऊ नये असा विचार काकांच्या मनात आला पण त्या सलूनमध्ये तरुण पोरं जातात. तिथले कामगारही तरुण आणि स्टायलिश दिसतायत. आपल्याला ते हसतील. तिथे आपण शोभणार नाही असं काकांना वाटायचं. पुढे मग काकांना केस कापून घ्यायचे होते, तेव्हा नेमका सोमवार होता अन् इतर सगळी सलून बंद होती. नेमकं हे सलून उघडं होतं. दुपारची वेळ असल्याने सलूनमध्ये गर्दी दिसत नव्हती. काकांनी सलूनमध्ये डोकावलं तर आतला मुलगा दाराशी येऊन काकांना म्हणाला, आईये सर! त्याने सर म्हटल्यावर काका आत गेले. त्या सलूनमध्ये काकांना खूप छान वाटलं. तिथल्या कुणी त्यांना वेगळ्या नजरेने पाहिलं नाही की तिथून बाहेर पडताना कुणी त्यांना नखशिखांत न्याहाळलं नाही. आणि न्याहळलं असतं तरी काकांनी त्याला महत्त्व देण्याची काय गरज होती? पैसे देऊन सेवा घेण्यात कुणाला कशाला लाजायचं?
काकांना तर तिथे पैसे देऊन सेवा घ्यायची होती, पण काही ठिकाणे अशी असतात की तिथे तुम्ही खरेदी केलीच पाहिजे असं काही नसतं. उदाहरणार्थ मॉल किंवा ग्राहक पेठ. अगदी एखाद्या दुकानात तुम्ही शिरता तिथे मनासारखी वस्तू नाही मिळाली तर तुम्ही खरेदी न करताच बाहेर येण्यात काय चूक आहे? पण त्याने आपल्याला इतक्या वस्तू दाखवल्या, आपण त्याचा इतका वेळ खाल्ला तर असंच काही न घेता कसं बाहेर पडायचं, असा संकोच करणारेही लोक असतात.
लेखक आणि गंमत शाळावाल्या राजू तांबेशी बोलताना ते एकदा मला म्हणाले, काही घ्यायचं असेल नसेल तरी फिरावं. मॉल बिलमध्ये जावं. सगळ्या वस्तू बघाव्या. नवनव्या इलेक्ट्रोनिक वस्तू किंवा तत्सम गोष्टींबद्दल सेल्समन वा सर्ल्सगर्लला प्रश्न विचारावेत. उपकरणे वगैरेबद्दल डेमो दाखवायला सांगावा. आपल्या हाताने ऑपरेट करून बघावं. विकत घ्यायचं नाहीय तरी शिकून, समजून घ्यावं. हा माणूस अनेकदा येतो पण घेत नाही हे लक्षात आलं तर पुढच्या वेळी ते आपल्याकडे दुर्लक्ष करतील. हाकलून तर देणार नाहीत? दिलं तर दिलं. आपण दुसर्या मॉलमधे जायचं. लाजायचं नाही!
मी पूर्वी सामाजिक चळवळीत सक्रिय होतो तेव्हा अनेक कार्यकर्ते भेटत. आम्हाला गप्पा मारत कुठेतरी बसायचं असायचं. सगळे कार्यकर्ते कडके असत. आम्ही हॉटेलमधे अर्धा अर्धा चहा घेऊन खूप वेळ बसायचो. काऊंटरवरचा मालक ‘आता उठा’ हे सुचवण्यासाठी पोर्याला दोन तीन वेळा आमच्या टेबलावर फडका मरायला लावायचा. आम्ही आमची पुस्तके वगैरे उचलून त्याला पुन्हा पुन्हा फडका मारायला जागा करून द्यायचो. शेवटी कंटाळून आमच्या डोक्यावरचा पंखा बंद केला जायचा. पुढे माझा नाटकाचा नाद बळावल्यानंतर अनेक स्किट, एकांकिका, नाटक यांचे वाचन आम्ही काहीही न खाता पिता ‘मॅक डी’मधे (एसीमधे) बसून केलं आहे.
अमेरिकेतील थोर मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांच्या बाबतीतले किस्सेही महत्वाचे आहेत. आर्थिक प्रतिकूलतेच्या काळात जेव्हा त्यांना मित्रांसोबत मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जावं लागे, असे तेव्हा तिथे मित्र खात पीत आणि ते परवडत नसताना एलिस खाण्यापिण्यावर खर्च करत, ज्याची त्यांच्या मनाला नंतर टोचणी लागत असे. परवडत नसताना उगीच मित्रांच्या नादाला लागून आपला खर्च होतो हे टाळण्यासाठी त्यांनी मित्रासोबत जायचं पण खर्च करायचा नाही असं ठरवलं. मित्र काय म्हणतील, रेस्टॉरंटवाले काय म्हणतील, याचा विचार करायचा नाही. लोक आपल्याबद्दल काही विचार करोत, त्यावरून आपली योग्यता ठरतं नाही हा दृष्टिकोन स्वतःमध्ये रुजवण्यासाठी डॉ. अल्बर्ट एलिस यांनी स्वत:वर थक्क करणारे अनेक उद्योग केले. त्यांना जिथे कोण ओळखत नाही अशा ठिकाणी रस्त्यात लोकांना थांबवून ते त्यांना सांगू लागले की मी आताच मेंटल हॉस्पिटलमधून बाहेर आलो आहे. त्यामुळे मला सध्या कोणता महिना सुरू आहे ते माहित नाही. प्लीज सांगता का?
डॉ. एलिस यांनी असे जे प्रयोग केले त्यांना त्यांनी ‘शेम अटॅकिंग एक्सरसाईजेस’ असं नाव दिलं. अशा प्रकारचे प्रयोग (एक्सरसाईजेस) करताना सामाजिक नीतीनियमांचा भंग होणार नाही. कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची मात्र एलिस काळजी घेत. आपण देखील भान राखून ‘शेम अटॅकिंग एक्सरसाईजेस’ करायला हवे! आपल्याला जेव्हा लाज वाटते तेव्हा मुळात लाज वाटायची गरज आहे का; लाज वाटावी असं आपण काही केलं आहे का, हे नीट तपासून पहावे. (केले असेल तरी ते आपले वर्तन आहे. ते पुढे घडणार नाही याची काळजी घेता येईल.)
लोकांनी आपली चेष्टा, टवाळी केली म्हणून आपण तुच्छ ठरत नाही. लोक आपल्याला हसले ते आपल्या कृतीला, आपल्या वर्तनाला हसले; आपल्या संपूर्ण अस्तित्वाला, आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला हसले असा त्याचा अर्थ नाही. आपलं वागणं हास्यास्पद असू शकतं परंतु आपण संपूर्ण हास्यस्पद आहोत, असा त्याचा अर्थ होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे! लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमधून आपण स्वतःला अलगद बाहेर काढले पाहिजे.