अलादीनला सापडलेला जादुई चिराग. तो घासला की त्यातून निघणारा जिनी. मराठमोळ्या भाषेतला राक्षस. अलादीनकडे असो वा इतर कोणाकडे, हा दिवा घासला की हा हरकाम्या जिनी त्यातून बाहेर पडतो आणि मालक सांगेल ते काम करतो. मागणी वाढल्याने आता जादूचा दिवा प्रत्येकाकडे उपलब्ध झाला आहे आणि त्यातून निघणारा जिनी म्हणजे पोलीस हवालदार खरा-खोटा सलाम मारून प्रत्येकाच्याच मदतीला धावून जातो. नगण्य पगार आणि २४ तास राबवणूक. बोनस म्हणून शिव्या. जनतेकडून आणि वरिष्ठांकडून. वरिष्ठांचे छान बंगले, रोकड, जमिनी होतात. मुले परदेशात शिकून मोठी होतात. याच्या नशिबाला झोपडपट्टी वजा गळकी पोलीस कॉलनी.
भिकारी असो वा भाजीविक्या गुंड असो वा चोरटा भामटा. मध्यमवर्गीय वा करोडपती… मंत्री असो वा पुढारी… वा ब्युरोक्रेट. थोडक्यात समस्त मानव जातीला मदतीला येणारा हा एकमेव महापुरुष म्हणजे पोलीस हवालदार! देवाला सर्वांवर माया करता येईना म्हणून त्याने आई निर्माण केली आणि रक्षणासाठी हा हवालदार! त्याच्याकडून कोणतेही भले बुरे काम करून घ्या. मात्र त्याआधी हातावर मामुली दक्षिणा टेकवायची इतकेच. त्याच्या भ्रष्टाचाराच्या नावाने सगळेच ओरडतात. उरलेले भारतातले १३० कोटी लोक जणू अत्यंत सज्जन प्रामाणिक आहेत. त्यात सरकारी अधिकारी, मंत्री, त्यांचे पीए, सरकारी ठेकेदार, बिल्डर्स हे तर अधिकच प्रामाणिक म्हणून मानले जातात.
हा पोलीस दिवस-रात्र राबत असतो. त्याला एकट्याला गणवेशाची सक्ती आहे. बुटांना पॉलिश लागतेच. मात्र इतर सरकारी कर्मचार्यांना तो नियम नाही. अस्वच्छ कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, दिवसभर टवाळक्या करणारे, बसल्या जागी ऑफिसमध्ये झोपा काढणारे, टेबलावर वजन ठेवले तरच फाईल काढून देणारे, फक्त आठ तास ऑफिसमध्ये रडत कुढत येऊन टाईमपास करतात. त्यांची आवकही छान असते. याउलट पोलीस दादाला लोक, मंत्री, तंत्री, त्याचे वरिष्ठ हे सतत झापत असतात. दिवस-रात्र पळवत राहतात.
काड्या करायचे काम मीडियाचे. शेकडो चॅनल्स हे काम प्रामाणिकपणाने करत असतातच. घटनास्थळी पोलीस उशिरा का आले? पोलीस झोपा काढतायेत का? गर्दी त्यांनी कंट्रोल का केली नाही? पोलिसांनी लाठीमार का केला? हे जाब मीडियाचे पत्रकार लोकांपुढे माईक धरून गर्दीतल्या तुम्हा-आम्हा विचारत असतात आणि या चिथावणीखोरांना खूश करण्यासाठी अहोरात्र राबणार्या हवालदारांना सस्पेंड केले जाते.
यावरच एक किस्सा आठवला.
एका तडीपार कैद्याला दूर सरहद्दीबाहेर नेऊन सोडायला कैदी व बंदूकधारी पोलीस चालला होता. रस्ता काट्याकुट्यांचा खड्ड्याखुड्यांचा होताच, वरून पाऊस पडत होता. चिखल झाला होता. दलदलीत पाय रुतत होते. चोर वैतागून म्हणाला, ‘पोलीसदादा, तुमच्याकडे बंदूक आहे. पुढचा रस्ता पार करायचे माझ्यात त्राण शिल्लक नाही. येथेच गोळी घालून मला ठार करून टाका की एकदाचे…’ हवालदार शांतपणे म्हणाला, ‘बाबा रे, तुला तर फक्त सोडायचे आहे. मला तर याच रस्त्याने पुन्हा परत जाऊन साहेबाला रिपोर्ट करायचा आहे.’
८०-९०च्या दशकात पोलीस खात्यासाठी मी प्रचंड काम केले. हवालदारापासून तर कमिशनरपर्यंत सगळी माझी स्नेहाची मंडळी होती. पोलिसांच्या विविध योजनांसाठी मी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज करून दिली. रिफ्रेशर कोर्सेससाठी पोलीस अधिकार्यांसमोर सचित्र व्याख्याने दिली. नाशिकच्या पोलीस अकॅडमीमध्ये, म्युझियममध्ये माझी हास्यचित्रे आहेत. त्यावेळचे पी.टी.सी.चे प्राचार्य अरविंद इनामदार माझे चांगले स्नेही झाले. ते जेथे जेथे बदलीनिमित्त गेले, नागपूर, मुंबई, सोलापूर- तेथे अधिकार्यांपुढे माझा व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम ठेवला होता. कश्यप साहेब, व्ही. डी. मिश्रा, प्रकाश पवार साहेब, यांच्यासारखे कमिशनर व बरेचसे पोलीस इन्स्पेक्टर्स यांना माझी भरपूर मदत होई. पिढी बदलली आणि आता… असो!
शिक्षक, सरकारी कर्मचारी, प्रोफेसर, चार वर्षाची डिग्री मिळवलेले मुले मुली यांचे वेतन साठ हजारापुढे पुढे तर हवालदाराचे पंचवीस-तीस हजारांच्या अलीकडे पलीकडचे. इतरांना आठ तास ड्युटी, तर यांना २४ तास. कारण देशभर सकाळ-संध्याकाळ मंत्री आले गेले, मोर्चे, मोठमोठ्या लाखा लाखातल्या सभा, धरणे आंदोलन, नेत्यांच्या पदयात्रा, छोटे-मोठे घात अपघात खून मारामार्या, दंगली, ट्रॅफिक कंट्रोल हे सगळं पोलिसांनी हॅण्डल करायचं. समाजधुरीणांनी, मीडियाने फक्त विमुक्त जिव्हाविलास करायचा. हवालदार हा जनमानसात वावरणारा सामान्यजनच आहे. त्यालाही दयामाया आहे. कुटुंब आहे. या ड्युटीपायी अनेकांना त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नालासुद्धा हजर राहता येत नाही.
एक हृदयस्पर्शी किस्सा सांगावासा वाटतो.
एका चौफुलीवर पोलीस ट्रॅफिक कंट्रोल करीत होता. आजूबाजूला भिकार्याची पोरं भीक मागताना छोट्या मोठ्या वस्तू, गजरे विकताना दिसत होती. नेहमीप्रमाणे ट्रॅफिक जाम होताच ती संधी पाहून एक दहा-बारा वर्षाच्या गोर्यागोमट्या पोरीच्या हातात बोर्ड होता. ‘मला कॅन्सर झालाय. मदत करा!’ चार चाकी गाड्यावाल्यांनी पोलिसाला जाब विचारला, हिला हुसकून का देत नाही? सारखी मध्ये मध्ये येते. पोलिसाने बर्याच वेळा दुर्लक्ष केले. त्याच्या मनात कणव निर्माण झाली होती. उलट जाता जाता पगारातले पाचशे रुपये त्याने तिला दिले. घरी गेल्यावर बायकोला सांगितले, गोड पोरगी आहे. बिचारी कॅन्सरग्रस्त आहे बघ? मुलगा व बायकोने त्याला खूप झापले व म्हणाले, खोटीनाटी कारणे सांगून ही भिकारडी मुले लोकांना लुबाडत असतात. त्याने पाचशे रुपयांची मदत केली हे कळलं तेव्हा दोघांचाही तीळपापड झाला. दोन-चार दिवसांनी पेपरातून कळलं, त्या मुलीला कॅन्सर नव्हता. हे बायको मुलाला कळले तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा खूप झापला. मात्र त्याला त्यातलं काहीच ऐकू गेलं नाही… तो मनोमन खूश होता. पोरीला कॅन्सर निघाले नाही फारच बरं झालं. ही बातमी खोटी निघाली ही तर आणखी चांगली गोष्ट. तिला खरेच कॅन्सर असता तर त्या पोरीचे किती हालहाल झाले असते!
दिवस-रात्र अशा अनेक प्रसंगांना पोलिसांना तोंड द्यावे लागत असेल. कधी चांगले कधी वाईट, कधी मायेचे कधी दुःखाचे. त्यांना खरी खोटी माणसे अगदी सहज ओळखू येतात. कपटीपणाने काही लोक निरापराधी लोकांवर गुन्हे दाखल करतात. एका श्रीमंत आडदांड महिलेने शेजारच्या पोरावर खोटे आरोप करून अडकवायचा प्रयत्न केला. पोलिसांना त्याच्याविरुद्ध आरोपपत्र लिहायला भाग पाडले. पोलिसांनी कोर्टाच्या आवारातच तिला हवे तसे पत्र लिहिले. तिचा सही अंगठा घेतला. एक कॉन्स्टेबल ते पत्र घेऊन कोर्टात गेला… बाईचे समाधान झाले. पोलिसांनी जीपमधून तिला घरी सोडले. आता दोन वर्षे झाली, बाई दिवसाआड पोलिसांना येऊन तक्रारीचे काय झाले हे विचारते. इन्स्पेक्टर शांतपणे सांगतात, ‘कोर्टात हजारो केसेस असतात. तुमचा नंबर लागेल तेव्हा लागेल. आम्ही कोर्टाला त्याचा जाब विचारू शकत नाही? तुमचा नंबर लागला की अवश्य कळवू!’