प्रबोधनकारांच्या हुंडा विध्वंसक संघाने मोठी जनजागृती केली. कायस्थ प्रभू समाजातून हुंड्याची चाल मोडून काढण्यात या चळवळीचं मोठं योगदान होतं.
– – –
चीफ कंट्रोलर असणार्या प्रबोधनकारांच्या नेतृत्वात हुंडा विध्वंसक संघाचं काम जोरात सुरू होतं. डेप्युटी कंट्रोलर असणार्या भार्गव कोर्लेकर यांनी लिहिलेला भिसे-कर्णिक लग्नातल्या गाढवाच्या मिरवणुकीचा सविस्तर वृत्तांत प्रबोधनमध्ये प्रसिद्ध झालाच. ती या संघाची पहिली सलामी होती. तिला रोखण्यासाठी भिसेंनी वशिला लावून पोलिसही आणले होते. पोलिसांना बघून प्रबोधनकारांचे स्वयंसेवक घाबरतील आणि पळून जातील असं त्यांना वाटलं होतं. प्रबोधनकारांनी प्रबोधनमधून या वरातीत पोलिस आलेच कसे, असा सडेतोड मुद्दा मांडला. त्याची दखल मुंबई पोलिसानी घेतली. डेप्युटी कमिशनर कॉटी यांनी बोलावून घेतलं आणि लिहिलेल्या दाव्याचा पुरावा मागितला. प्रबोधनकारांनी वरातीत हजर असणार्या पोलिसांचे बिल्ला नंबर आधीच नोंदवून घेतले होते. ते देताच कॉटी साहेबाने चौकशी केली. प्रबोधनकारांचे परिचित पोलिस अधिकारीच अडचणीत आले. त्यांनी काकुळतीला येऊन विनंती केल्यावर प्रबोधनकारांनी कारवाईची मागणी सोडून दिली. कॉटी साहेबाच्या मध्यस्थीने तोंडी जरब देऊन प्रकरण मिटवण्यात आलं. पण असं असूनही कायस्थ समाजातल्या हुंडासमर्थकांचा प्रबोधनकारांना पोलिसी दट्ट्या दाखवण्याचा उत्साह संपला नव्हता. त्यांनी समाजातल्या जवळपास शंभरेक लोकांच्या सह्या गोळा करून पोलिसांना तक्रार अर्ज केला की ठाकरे बदनामी करतात आणि शुभकार्यात अडथळा आणतात. पोलीस सुपरिटेंडण्ट स्मिथ यांनी प्रबोधनकारांना बोलावून या तक्रारीची माहिती दिली. त्या अर्जावरचा कॉटीचा शेरा आवर्जून दाखवला. त्यात इंग्रजीत लिहिलं होतं की `ठाकरे हे हिंदू सामाजिक सुधारणांसाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य करत आहेत. जर अर्जदारांनी कारवाईसाठी आग्रहच केला, तर त्यांच्यापैकी एकादोघांना आणून त्यांच्यावरच कारवाई करावी.` पुढच्या काळात पोलिसांनी हुंडा विध्वंसक संघाच्या कार्याला मदतच केली.
हुंडासमर्थकांनी केलेल्या आणखी एका प्रयत्नाची माहिती प्रबोधनकारांनी दिलीय. पण ते प्रयत्नही प्रबोधनकारांनी खमकेपणाने उधळून लावला. हुंड्यांचा व्यवहार झालेलं एक बिर्हाड जाणीवपूर्वक प्रबोधन कचेरी असणार्या इमारतीच्या तळमजल्यावर उतरलं होतं. एका जबरदस्त वकिलाने पाठीशी उभं राहून त्यांना असं करण्यासाठी उचकवलं होतं. प्रबोधनकारांनी स्वतः या बिर्हाडाला विनंती केली की संघाच्या हद्दीबाहेर जाऊन लग्न करा. पण त्यावर उर्मट उत्तर आलं, जा तुम्हाला काय करायचं असेल ते करा. त्यावर प्रबोधनकार गरजले, आता दाखवतो संघाचा हिसका. पेट्रोल ओतून मांडव जाळून टाकतो. मग काय व्हायचं असेल ते होईल.` असं सांगत प्रबोधनकारांनी वरच्या मजल्यावरच्या प्रबोधनच्या म्हणजे हुंडा विध्वंसक संघाच्या कचेरीतून पेट्रोलचा डबा मागवला. खरं तर तो रिकामाच होता, पण आणणार्याने तो असा वाकत वाकत आणला की जणू भरलेलाच असावा. पुढचे संवादही ठरलेले होते, `नुसता डबा काय आणलास? काड्याची पेटी आण.` ठाकरे मांडव पेटवताहेत ही माहिती कळताच मोठी गर्दी गोळा झाली होती. प्रबोधनकारांनी पुढचं आव्हान दिलं, `जा जा, तुमच्या पोलीस बापांना बोलावून आणा. त्यांच्यासमक्ष आग भडकावतो.` बिर्हाडात गदारोळ झाला होता. दोघे तिघे हात जोडत बाहेर आले. हात जोडून विनंती करू लागले, `आम्ही इथून जातो. पण हा अतिप्रसंग करू नका. दुसर्याच्या बिर्हाडात आम्ही जानवसा दिलेला आहे. त्यांना कशाला आमच्यापायी त्रास.` त्यावर प्रबोधनकार गरजले, `ही अक्कल आधी का नाही सुचली? चला आताच्या आता आमच्या समोर निघून जा.` अवघ्या एका तासाच्या आत सगळं वर्हाड तिथून निघून गेलं. प्रबोधनकार सांगतात, `खरे म्हटले तर सत्याग्रह शब्द त्यावेळी फारसा चलनी झाला नव्हता, तरी आम्ही सर्व संघीय पडेल त्या संकटाला बिनशर्थ तोंड द्यायच्या निर्धाराने फुरफुरलेले होतो. अगदी तुरुंगात जाण्याचीही आम्हा सर्वांची तयारी होती.`
हुंडा विध्वंसक संघाबरोबर हातात हात घालून प्रबोधन ही चळवळ चालवत होता. प्रबोधनने संघाला आर्थिक मदत तर केलीच, पण चळवळीचा विचार आणि बित्तंबातमी प्रबोधनने जवळपास दीड वर्षं सविस्तरपणे मांडली. प्रबोधन हे हुंडाविरोधी चळवळीचं प्रेरणास्थान तर होतंच, पण ते पुढे मुखपत्रही बनलं. लग्नात हुंडा न घेतलेल्या वरांच्या नावांच्या याद्या प्रबोधनमध्ये `हुंडा न घेता झालेले अभिनंदनीय विवाह` या मथळ्याने प्रसिद्ध होत असत. हुंडा न घेता लग्न करायला तयार असणार्या तरुणांच्या वधूसाठीच्या जाहिरातवजा घोषणाही प्रसिद्ध होत होत्या. मध्य भारत आणि गुजरातमधल्या सीकेपी समाजातल्या हुंड्यांचे बाजारभाव प्रबोधनमध्ये छापले आहेत. गो. मा. चिपळूणकर, कृ. भा. बाबर, भारतभृत्य यांचे वैचारिक लेखही प्रसिद्ध झालेत. भारतभृत्य यांच्या लेखात वाल्मिकी रामायणापासून हुंडेबाजांचा सार्वजनिक निषेध करण्याची परंपरा असल्याचा दाखला दिला आहे.
`हुंड्याची रक्तपिती` या प्रबोधनकारांनी लिहिलेल्या स्फुटाने हुंडासमर्थकांच्या वर्मी घाव घातला होता. त्याची बरीच चर्चा झालेली दिसते. प्रबोधनकारांनी या स्पुâटात लिहिलंय, `हुंडाविध्वंसक संघाने उघड माथ्याने हुंड्याविरुद्ध बंडाचे निशाण उभारल्या दिवसापासून हिंदुसमाजातील प्रत्येक जातीत ही चळवळ थोड्या फार प्रमाणांत प्रादुर्भूत होऊन बरेच विवेकी स्त्रीपुरुष हुंडानिषेधाची भाषा स्पष्ट बोलू लागले आहेत, हे सुदैव होय. आघातामुळे प्रत्याघात होणे हे साहजिक असले, तरी हुंड्याचे रक्त पिण्यास लालचटलेल्या अधमांच्या सर्वांगावर नैतिक रक्तपिती उमटलेली असल्यामुळे, त्यांना उघडाउघड प्रतिकार करण्याचे तोंडच नाही, ते फार फार तर हुंडा विध्वंसकांची मनमुराद निंदा करतील, त्यांना कचाट्यांत आणण्यासाठी गुप्त कारस्थाने करतील.`
असंच एक कारस्थान प्रबोधनकारांच्या विरोधात पण रचण्यात आलं. ‘सातारच्या पापग्रहाचे प्रबोधनावर कायस्थी गंडांतर` या नावाने विशेष लेखांची पुरवणी काढून प्रबोधनकारांनी हा प्रकार उघड केला. सातारा येथील दत्तोपंत कारखानीस यांच्या दोन तरुण मुलांनी प्रबोधनच्या कचेरीत येऊन प्रबोधनकारांना असभ्य शब्दांत शिविगाळ आणि दमदाटी केली. खरंतर हल्लाच केला. ऐतिहासिक कागदपत्रं चोरल्याचा आरोप केला. प्रबोधन बंद पाडण्याच्या आणि इतरही धमक्या दिल्या. धक्काबुक्कीही झाला. या मुलांपैकी थोरला विष्णू याने लग्न करताना २१०० रुपये हुंडा घेतल्याचा दावा प्रबोधनकारांनी सातारातल्या शिवजयंतीच्या गाजलेल्या व्याख्यानातच केली होती. दत्तोपंत कारखानीसांनी या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला असहकार्य आणि आडकाठी केली होती.
या प्रकरणावर प्रबोधनमध्ये पुढच्या काही अंकांमध्ये पत्रं छापून आली आहेत. त्यात प्रख्यात इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे हेही आहेत. प्रबोधनकारांना उद्देशून ते लिहितात, `आपण हुंडानिषेधक चळवळीने आपल्या ज्ञातीला व इतरही ज्ञातींना कायमचे ऋणी करून ठेवणार, यात शंका नाही. कारखानीसांचा धुडगूस प्रबोधनात प्रसिद्ध झालेल्या `हुंडाशायलॉकांच्या जंत्री`मुळेच घडून आला आणि त्याला आपण सार्वजनिक स्वरूप दिले, हे एकार्थी ठीकच झाले.` याशिवाय याच काळात प्रबोधनमध्ये इंदूर, देवास, महाड, बडोदा अशा हुंडा विध्वंसक संघाचं कार्यक्षेत्र नसलेल्या भागातही पसरलेल्या हुंडाविरोधी चळवळीच्या काही नोंदीही वाचता येतात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, लालबाग यांनी हुंड्याचा निषेध करणारं पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्याचा १६ मुद्द्यांमध्ये लिहिलेला मजकूरही प्रबोधनमध्ये आहे. त्यावर प्रबोधनकारांच्या विचारांचा आणि शैलीचा थेट प्रभाव दिसून येतो. या पत्रकातले काही लक्षवेधी मुद्दे असे,
– हुंडा देणे व घेणे हा अधर्म आहे.
– हुंड्याने पवित्र विवाहविधीला मनुष्याच्या क्रयविक्रयाचे अपवित्र स्वरूप दिले आहे.
– हुंड्याने पुरुषत्वापेक्षा पुरुषपणालाच अधिक महत्त्व आणून दिले आहे.
– हुंड्याने पुरुषांचा लिलाव पुकारला आहे.
– हुंड्याने पुरुषांना बाजारबसवे (मेल प्रॉस्टिट्युट) बनविले आहे.
– हुंड्याने सच्छील कुमारिकांना वाकडे पाऊल टाकावयास लावले आहे.
– हुंड्याने असंख्य निर्दोष तरुणींच्या संसारसुखाची राखरांगोळी केली आहे.
– हुंड्याने तरुण, सुशील, सद्गुणी, सुंदर कुमारिकांना आसन्नमरण वृद्धांच्या, दुराचारी नराधमांच्या, अठराविश्वे कंगालांच्या, अशिक्षित अजागळांच्या नावाने केवळ जबरदस्तीने गळ्यात (अ)मंगळसूत्र बांधावयास लावले आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागातल्या वर्तमानपत्रांनी या चळवळीची दखल घेतलेली दिसते. मालवणपासून देवासपर्यंतच्या वाचकांनी या विषयावर मतं पत्रातून मांडली आहेत. संघाच्या कामाचं कौतुक करणारी शेकडो पत्रं आली असल्याचंही प्रबोधनकारांनी एका ठिकाणी लिहिलं आहे. विशेष म्हणजे ही पत्रं सर्व समाजांतून आल्याचं दिसतं.
हुंडाविध्वंसनाची चळवळ इतरही समाजांमध्ये पोहोचावी अशी प्रबोधनकारांची इच्छा होती. प्रबोधनकार लिहितात, `हुंडा विध्वंसक संघाची स्थापना अखिल हिंदू समाजासाठीच केलेली आहे आणि संघाच्या स्वयंसेवकांत कायस्थ प्रभू तरुणांचा भरणा जरी बराच असला तरी सारस्वत, ब्राह्मण, मराठे, भंडारी वगैरे अनेक जातींच्या तरुणांचा यांत प्रथमप्रासूनच समावेश करण्यात आलेला आहे. संघाच्या कामगिरीविषयी लागणारी माहिती वाटेल त्या जातीच्या सुधारणेच्छूला पुरवण्यात आली व येईल. सारांश, संघाने आपल्या कार्याची व्याप्ती एका जातीपुरतीच आकुंचित ठेवलेली नाही. मात्र आपल्या जातीत ही चळवळ धिटाईने चालविणारे मर्द तरुण पुढे येतील आणि तिला आमचे सर्व व्यवसायबंधू उत्साहाने हातभार लावतील, तर हुंडाविध्वंसनाचे कार्य बोलताबोलता यशस्वी होईल.`
या चळवळीचा प्रभाव कसा पडत होता हेही प्रबोधनकारांनी नोंदवलं आहे, `हुंडाविध्वंसक संघाचा जन्म झाल्यापासून
हुंडाशायलॉकांच्या चळवळीने निराळेंच धोरण पत्करले आहे. पूर्वी लग्नसराईत ठरणार्या सोयरिकी व हुंड्याचे आकडे भराभर प्रसिद्ध होत असत, पण आता हे सर्व व्यवहार अगदी गुपचूप बुरख्यांतल्या बुरख्यात होऊ लागले आहेत. सभ्य दारूबाज जसे गुप्तपणे दारूं ढोसून तोंडाची घाण लपविण्यासाठी धणे राजीन्याची फक्की मारतात. किंवा रंडीबाज मला कोणी पाहत तर नाही ना, या चिंतेने कावरेबावरे होऊन कुंठणखान्याच्या चोरदेवडीत घुसतात, तसलाच काहींसा प्रकार… निःशब्द परंतु सक्रिय प्रतिकाराच्या व असहकारितेच्या चळवळीमुळे हुंडेबाज अधम गुपचूप हुंडा घेऊ लागले, तरीही ही काय थोडीथोडकी सुधारणा झाली?`
प्रबोधनकार लिहितात १९२२-२३च्या लग्नसराईत अंदाजे २०-२५ हुंडेबाजांच्या लग्नमंडपांवर संघाने स्वार्या केल्या होत्या. भार्गव कोर्लेकर यांनी लग्नसराईच्या शेवटी म्हणजे १९२३च्या मे महिन्यात संघाचा अहवाल मांडताना सांगितलं आहे की यंदा विवेकाला चिमटा घेऊन जागृत करणे, एवढीच चळवळीची दिशा राहिली आहे. त्यामुळे अनेक लग्नं संघाच्या कार्यक्षेत्राबाहेर म्हणजे मुंबईबाहेर पुण्यात झाली. पुणे हे हुंडेबाज लग्नांचे पांजरापोळ बनल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या हंगामात अनेक लग्नं हुंड्याशिवाय झाली आणि त्यातली अनेक लग्नं सघानेच खटपट करून लावली होती, असं कोर्लेकरांनी नोंदवलं आहे. बिनहुंड्यांच्या लग्नांमध्ये संघाचे स्वयंसेवक अभिनंदनाची गाणी गात वरवधूचा सन्मान करत.