प्रबोधनकारांचा स्वभाव संस्थात्मक उभारणी करण्याचा नव्हता. त्यामुळे ते संस्था संघटनाची पदं स्वीकारणाच्या फारशा भानगडीत पडलेले दिसत नाहीत. पण हुंडाविध्वंसक संघाचं चीफ कंट्रोलर हे पद त्यांच्याकडे स्वतःहूनच आलेलं दिसतं.
– – –
`प्रबोधन आणि स्वाध्यायाश्रम या प्रबोधनकारांच्या सभोवती उभ्या राहिलेल्या दोन उपक्रमांमधूनच हुंडाविध्वंसक संघ उभा राहिला. हुंडाविरोध हा प्रबोधनकारांसाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे ते या चळवळीच्या अग्रभागी राहिलेले दिसतात. एरव्ही चळवळी आणि संघटनांमध्ये इतरांच्या पाठीशी उभं राहून पडद्यामागून काम करणं त्यांना आवडत होतं. संसारातली ओढाताण आणि व्यासंग यामुळे त्यांना अशा पदांसाठी वेळ देणं शक्यही होत नसावं. पण हुंडाविध्वंसक संघ त्याला अपवाद ठरला.
दुसर्या वर्षाच्या पहिल्या म्हणजे १६ ऑक्टोबर १९२२च्या अंकात हुंडा विध्वंसक संघाचं एक आवाहन प्रसिद्ध झालंय. त्याचा मजकूर असा आहे, चां. का. प्रभू हुंडा-विध्वंसक संघ, मुंबई.
(१) यंदापासून हुंड्याच्या चालीविरुद्ध पद्धतशीर निकराचा हल्ला चढविण्यासाठी प्रस्तुत संघाची घटना करण्यांत आली आहे व ठिकठिकाणी संघाच्या शाखा स्थापन करावयाच्या आहेत. हुंडाप्रतिकाराचे व विध्वंसनाचे पुण्यकार्य करणार्या उत्साही तरुणांनी संघाच्या कार्यपद्धतीचे नियम मागवून आपापल्या शाखा सत्वर रजिस्टर करून घ्यावा, म्हणजे कार्यपद्धतीत सर्वत्र एकशिस्त व एकतानता राहील. (२) हुंड्याचे रक्त न पितां स्वतःचा विवाह करूं इच्छिणार्या तरुणांनी आपापली नांवे संघाला त्वरीत कळवावी. (३) स्वयंसेवकाचे व गुप्तहेरांचे काम करू इच्छिणार्या तरुण तरुणींनी आपली नांवे त्वरीत नोंदवावी. (४) हुंडाविरोधाचे कार्य करणार्या इतर जातीय बांधवांना संघाकडून शक्य ती माहिती पुरविण्यांत येईल. (५) हुंडाविध्वंसक कार्याबद्दल सहानुभूती असणार्या भाग्यवान धनिकांनी सांपत्तिक मदत केल्यास आभारी होऊ. (६) सर्व पत्रव्यवहार जनरल सेक्रेटरीच्या नावाने करावा.
केशव सीताराम ठाकरे, चीफ कंट्रोलर. भार्गव वामन कोर्लेकर, बीए., एलएल.बी., डेप्युटी कंट्रोलर. मोरेश्वर बाळकृष्ण देशमुख, बी.ए. जनरल सेक्रेटरी. शंकर शांताराम गुप्ते, मुंबई सेंटरचे सेक्रेटरी. पत्ता. चां. का. प्रभू हुंडा-विध्वंसन संघ, ६-३० खांडके बिल्डिंग, दादर, (मुंबई १४).
या आवाहनावरून आढळून येतं की १९२२च्या दिवाळीनंतरच्या लग्नसराईत हुंडाविध्वंसक संघाचं काम सुरू झालं. प्रबोधनकार त्याचे चीफ कंट्रोलर होते. त्याचा पत्ता म्हणजे प्रबोधन कचेरी अर्थात स्वाध्यायाश्रम हाच होता. थोडक्यात ही स्वाध्यायाश्रमातल्या तरुणांनी हाती घेतलेली चळवळ होती. समाजसुधारणेसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांची निंदानालस्ती जवळचे लोकच करतात, याचं भान ठेवून शक्य तितक्या हिरीरीने हुंडाविध्वंसक संघाचं काम करण्याची प्रतिज्ञा स्वाध्यायाश्रमाच्या तरुणांनी घेतल्या. या संघटनेला कोणीही पाठबळ देणार नाही, हे गृहित धरून प्रबोधनचे व्यवस्थापक सुळेमास्तर आणि मार्तंड शृंगारपुरे यांनी प्रबोधनमधून गोळा झालेली एक हजारांची मोठी रक्कम संघाच्या कामासाठी उपलब्ध करून दिली. रंगो बापूजींचे भाचे काका वैद्य यांनीही १० रुपये देऊन आशीर्वाद दिले.
प्रबोधनकारांनी ‘माझी जीवनगाथा’मध्ये लिहिलं आहे, `आमची संख्या ७०-८० स्वयंसेवकांची होती आणि तीत सर्व जातीचे तरूण सरसावलेले होते.` असं असलं तरी हुंडाविध्वंसक संघ ही प्रामुख्याने चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातल्या हुंड्याच्या प्रथेविरुद्ध समाजातल्याच तरुणांनी उभी केलेली चळवळ होती, असं तिच्या `प्रबोधन`मध्ये प्रकाशित झालेल्या आवाहनावरून स्पष्ट दिसतं. तिचं नावच मुळात `चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हुंडा-विध्वंसन संघ` असंच होतं. आवाहनात नमूद केलेले चारही पदाधिकारी हे याच समाजातले होते. हे सगळं त्या काळातल्या संस्थात्मक कार्यपद्धतीला अनुसरूनच होतं. आधी आपल्या समाजातले दोष घालवावेत आणि नंतर इतर समाजातले, अशी पद्धत रूढ होती. अगदी स्वतःला अखिल भारतीय किंवा राष्ट्रीय म्हणवून घेणार्या आणि नावात महाराष्ट्रव्यापी असल्याचा दावा करणार्या संघटनाही प्रामुख्याने एकेका जातीच्याच असत. सगळी तयारी झाल्यानंतर आधी संस्थेची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून कामाचा तपशील लिहिलेली हँडबिलं वाटण्यात आल्या. मुंबईपासून अंधेरी आणि ठाणे या परिसरात किमान चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात हुंडा घेऊन लग्न लावल्यास लग्नाच्या मंडपातच निषेध करण्यात येईल, अशी धमकीच त्यात असावी. कारण तोच संघाचा मुख्य अजेंडा होता. चोरून घेतलेल्या हुंड्याच्या बातम्या मिळवण्यासाठी हेर नेमण्यात आले. स्वयंसेवकांचा युनिफॉर्म ठरला. त्यात चार इंच रूंदींचा काळा पट्टा खांद्यापासून खाली छातीवर गोल गुंडाळण्यात येत असे. त्यावर अँटी हुंडा लीग आणि हुंडा विध्वंसक संघ असं लिहिलेले बदामी बिल्ले असत. हुंडा घेतल्याची बातमी मिळताच एक गणवेशधारी स्वयंसेवक वर आणि वधू पित्यांना संघाची नोटीस देई. सहा तासांच्या आत हुंडा परत करून संघाची तशी खात्री पटवावी, नाहीतर लग्नाच्या प्रसंगी निषेधाला तोंड देण्यासाठी तयार राहावं, असं त्यात लिहिलेलं असे. नोटीस मिळताच वर आणि वधूपिते एखाद्या मध्यस्थाला घेऊन प्रबोधनकारांच्या भेटीला येत. तेव्हा प्रबोधनकार वधूपित्याला विचारत, `हुंडा मुळीच दिलेला नाही किंवा देणारही नाही, अशी वधूच्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगता का?` हा प्रश्न वर्मी घाव घाली. त्यामुळे सगळे शांत होऊन जात. हुंडा परत दिला तर उत्तम. नाहीतर प्रबोधनकारांचे स्वयंसेवक लग्नाच्या मंडपात कडकडीत निषेध नोंदवण्यासाठी गाढवाच्या वरातीसह हजर रहात.
ही निषेधाची वरात कशी असायची, याचा वृत्तांत हुंडाविध्वंसक संघाचे डेप्युटी कंट्रोलर भार्गव वामन कोर्लेकर यांनी ‘प्रबोधन’च्या १६ फेब्रुवारी १९२३च्या अंकात सविस्तर दिला आहे. त्यावरून या चळवळीचं स्वरूप सहज लक्षात येतं. या वृत्तांताचा हा संपादित भाग…
`संघाच्या हुंडानिषेधक कार्याची पहिली सलामी ता. ७ फेब्रुवारी बुधवारी झडली. या दिवशी दादर येथील चुन्याचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री. मल्हार आबाजी भिसे यांच्या चिरंजिवांचें (८०० रुपये हुंडा व २०० रुपये पोषाखाचे) लग्न झालें. हा लग्नाचा सट्टा पूर्वीच संघाच्या दप्तरी नमूद होता. परंतु नियमाप्रमाणे खर्याखोट्याचा प्रत्यक्ष खुलासा करून घेण्यासाठी श्री. भिसे यांना पत्राद्वारे प्रार्थना करण्यात आली. एक दोन दिवसांतच त्यांचे व त्यांच्या व्याह्यांची नन्नाच्या पाढ्याची दोन पत्रे एकाच पाकिटांतून आली, हुंडा घेतला ही बातमी फोडाल तर तुमचे आमचें जुळणार नाही अशा सभ्य पोलीशी समजुतीवरच ठरलेल्या या सौद्याचा हा नन्नाचा पाढा केव्हाही अविश्वसनीयच. पण सभ्य गृहस्थांच्या लेखी जबानीवर संघाला विश्वास ठेवणे प्राप्त होते.
अखेर श्री. भिशांचे जावई श्री. गोविंदराव कर्णिक सोमवार सकाळी ५ मे रोजी सकाळी दिघ्यांकडून हुंड्याची रकम (शंभराच्या ८ नोटा) खणपटीस बसून गुपचूप घेऊन गेले. कर्णिक वकील असल्यामुळे त्यांनी गुप्तपणाची शिकस्त पुष्कळ केली, पण एकदोन तासांतच ही बातमी संघाच्या कचेरीत दाखल झाली. मंगळवारी रात्री सीमांत पूजनाच्या वेळी पोशाखाच्या कांही भानगडीमुळे ही हुंड्याची गुपित गोष्ट वर-वधुपक्षांच्या बाचाबाचीत स्पष्ट प्रगट झाली. तेव्हा बुधवारी १२ वाजता श्री. भिशांना संघाने शेवटचा निर्वाणीचा खलिता रवाना केला व स्वयंसेवकांना ५ वाजता हजर रहाण्याबद्दल निरोप जासूद व टेलीफोन यांच्याद्वारे भडाभड धाडले. यावर भिशांच्या वतीने श्री. गोविंदराव कर्णिक, वधूचे चुलते श्री. त्रिंबकराव दिघे यांनी संघाच्या कचेरीत निरनिराळे येऊन स्पष्ट खुलासे केले. श्री. कर्णिक हे धंदेवाईक वकील असल्यामुळे हुंड्याची व्याख्या ठरविण्यांत त्यांनी शब्दांचा बराच कीस काढला; पण त्या किसांत हुंडा अझून (सायंकाळी ५ वाजतां बुधवार) घेतला नसला तरी घेणार, ही त्यांची कबुली स्पष्ट बाहेर पडली. दिघ्यांचा स्पष्ट खुलासा व कर्णिकांची वकीली यांचा खरा निष्कर्ष तेव्हांच निघाला.
ठरल्यावेळी स्वयंसेवक संघाच्या कचेरीत हजर झाले. ५ वाजता श्री. ठाकरे मुंबईहून येतांच कार्याची दिशा ठरली व डेप्युटी कंट्रोलरला शिस्तीचा हुकूम मिळाला. परंतु त्यावेळी भिसे पक्षाकडून आणखी एक डाव लढविण्यात आला. कर्णिक वकील श्री. ठाकर्यांच्या खास भेटीसाठी गडकरी वकिलांच्या बिर्हाडी आले व तेथे ठाकर्यांना बोलत ठेवून परस्पर मिरवणूक जाऊ देण्याची योजना केली. नवरदेवाची मिरवणूक निघाली; परंतु चीफ कंट्रोलर ठाकरे कोठे आहेत? स्वयंसेवक स्वस्थ उभे. अखेर ठाकर्यांना तांतडीने बोलावतांच त्यांनी एकदम `क्विक मार्च-प्रोसेशनप्रâंट-डेडसैलेन्स` असा हुकूम फर्मावला व स्वयंसेवक भराभर धावत जाऊन मिरवणुकांच्या अग्रभागी शांत मूक वृत्तीनें शिस्तवार चालू लागले. सर्वच धांदल झाल्यामुळे स्वयंसेवकांना संघाचा युनिफॉर्म पोशाख घालता आला नाही. प्रत्येकानें `हुंडाविध्वंसक संघ, दादर-मुंबई` हा बदामी आकाराचा बिल्ला मात्र छातीवर लटकविला. मिरवणुकीत हुंडानिषेधक हस्तपत्रिकांचा सर्वत्र पाऊस पाडण्यात आला.
मिरवणुकीत श्री. भिशांनी पोलीस पार्टीचा बंदोबस्त जय्यत ठेवला होता. वधुमंडपाजवळ हुंडाविध्वंसक स्वयंसेवक शिस्तीनें एक रांग करून उभे राहिले व सर्व स्त्रीपुरुष वर्हाडी मंडपांत गेल्यावर मुकाट्यानें परत फिरले. कोणीही स्वयंसेवकाने तोडांतून एक अक्षरही काढावयाचे नाही, अशी संघाची आज्ञा आहे. नि:शब्द निषेध व शांत वृत्ती हीच दोन शस्त्रे संघाने सध्या पाजळून घरली आहेत. श्री. भिशांनी पोलिसांचा जय्यत बंदोबस्त ठेवला, पण त्यांना काहींचे काम पडले नाही.
स्वयंसेवक परत येताच चीफ कंट्रोलर यांनी हुंडानिषेधक मिरवणुकीचा हुकूम सोडला. एक गाढव आणून त्याला मुंडावळी बांधल्या व पाठीवर हुंडे निषेधक वाक्यांची पाटी बांधली. अग्रभागी स्वयंसेवक जोडीजोडीनें चालत आहेत, अशी ही निःशब्द मूक निषेधाची मिरवणूक सर्व दादरभर फिरली आणि साडेसातच्या सुमारास लग्नमंडपाच्या शेजारी सडकेवर येऊन शिस्तीनें उभी राहिली. वर्हाडी मंडळी पानसुपारी हारतुरे घेऊन परत जात असताना, या स्तब्ध व मुक्या फलटणीचा व गर्दभाच्या देखाव्याचा मूक संदेश त्यांना हजारों व्याख्यानांपेक्षां अधिक तीव्रतेनें जाणवला, यांत संदेह नाहीं. सर्व मोटारवाले, टांगेवाले व पादचारी स्त्रीपुरुष वर्हाडी गेल्यानंतर स्वयंसेवक परत फिरले व डिस्पर्सचा हुकूम होतांच घरोघर व गांवोगांव ९ वाजतां निघून गेले. संघाच्या या पुण्यकार्यासाठीं मुंबई शहर, परळ, माटुंगा, कुर्ला, ठाणा, कल्याण येथून आलेल्या सर्व बांधवांचे संघाच्या वतीने आम्ही आभार मानतो.`