आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत ‘स्त्री’ ही कायमच गुलाम ठरली आहे. केवळ एक ‘हक्काची उपभोग्य वस्तू’ म्हणूनच तिच्याकडे समाजाने आजवर बघितले. काळानुरूप स्त्रियांची अवस्था बदलली. जीवनशैलीत नवी समीकरणे आली. काही संदर्भ बदलले, तरीही पाचशे वर्षांपूर्वी धर्माच्या आडून ‘गणिका’ दिसल्या आणि आज खुलेआम शरीरसुखासाठी बाजार मांडला गेलाय. एसी बारपासून ते भररस्त्यावर, स्टेशनवर ‘वेश्या’ पोहोचल्या. एकेकाळची ‘गणिका’ आणि आजची देहविक्री करणारी ‘धंदेवाली’. या दोघींची परिस्थिती कायम आहे. समान आहे. भूतकाळ हा वर्तमानकाळ झाला, पण तिला सामोर्या येणार्या पुरुषी प्रवृत्तीत बदल झालेला नाही. ‘ती’ त्याची शिकार बनलीय…
मराठी रंगभूमीवर आजवर अशा विषयांना स्पर्श करणारी शेकडो नाटके आलीत. पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक सत्यकथा, यावर नाटककारांनी कथानके बेतली. संगीत नाटकांपासून गद्य नाटकांपर्यंत तसेच व्यावसायिक ते प्रायोगिक नाटकापर्यंतचा त्याचा आवाका आहे. जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’मधली मावशी किंवा राधाक्का, ‘पुरुष’मधली अंबिका, विजय तेंडुलकर यांची कमला, ‘संध्या छाया’तली नानी, दुर्गीतली दुर्गा, अनिल बर्वे यांच्या ‘पुत्रकामेष्टी’तली उर्मिला, रत्नाकर मतकरी यांच्या ‘स्पर्श अमृताचा’यातली रोहिणी, गुणी, प्रशांत दळवी यांच्या ‘चारचौघी’तल्या चारचौघी, प्रा. दिलीप जगताप यांच्या ‘काठपदर’मधल्या दोघीजणी, तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’मधली चंपा, वसु भगत यांच्या ‘जंगली कबूतर’ची गुल, ही यादी अपूर्ण राहील. एवढ्या स्त्री व्यक्तिरेखा मराठी रसिकांच्या मनात घर करून बसल्यात. त्याच वाटेवर यंदा हर्षदा संजय बोरकर लिखित-दिग्दर्शित ‘जन्मवारी’ हे नाटक स्त्रीप्रश्नांचा शोध-वेध घेतंय. ‘जन्मवारी’चा रंगमंचीय आविष्कार गंभीरपणे विचार व्यक्त करतोय. ‘जन्म’ आणि ‘वारी’चा आध्यात्मिक ‘मार्ग’ आणि ‘अर्थ’ शोधताना दिसतोय.
‘जन्मवारी’चे कथानक दोन पदरी आहे. एकीकडे शहरातलं वेगवान जीवन. रेल्वे स्टेशनातील एका प्रसंगातून नाट्य सुरू होते. मध्यरात्र उलटली आहे. शेवटची लोकलही गेलीय. वृंदा ही तरुणी तिथे अडकलीय. पहिल्या ट्रेनशिवाय तिची इथून आता सुटका नाही. दारुडे, चोर यांचा वावर. वृंदा धर्माने मुस्लिम, पण एका आश्रमात साफसफाईचं काम करतेय. त्यात ती समाधानी आहे. तिथे दुसरी तरुणी पोहोचते. मंजू तिचं नाव. बिनधास्त स्वभाव. रेल्वे फलाटावरच ती वेश्याव्यवसाय करतेय. गिर्हाईक शोधतेय. तोच तिचा मध्यरात्रीचा धंदा. अशा या दोघीजणी. सर्वार्थाने परस्परविरुद्ध. विचार आणि वर्तन वेगळं. त्यांचं जगणं अलगद उलगडत जाते.
दुसरीकडे सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा काळ. राजदरबारात महाराज आणि राजगणिका शामा यांच्यातला प्रसंग. नृत्याची मैफल आणि राजे धुंद झालेले. शामा वयोमानानुसार थकत चाललेली. एकेकाळची तिचं सौंदर्य उतरत चाललेलं. पण तिची वयात आलेली मुलगी कान्होपात्रा. तिच्यावर सर्वांची नजर. मुलीने यापुढे आपली गादी चालवावी, ही शामाची इच्छा. विठा या दासीतर्पेâ नाचगाण्याची शिकवणी सुरू आहे. पण कान्होपात्रेला श्रीकृष्णभक्तीची ओढ, तर दासी विठा पंढरीच्या विठोबाच्या सेवेत मग्न. ‘कान्हो’ला गणिका करण्याचे बेत ठरतात. एक परंपरा पुढे चालविण्यासाठी तयारी होते. एका निर्णायक क्षणी सैनिकांना विनवणी करून कान्होपात्रा आणि विठा तिथून सटकतात आणि वारीत सामील होतात.
या नाट्यातले हे दोन मध्यवर्ती ठळक प्रसंग आणि त्याभोवती नाट्य मजबुतीने गुंफले आहे. दोघीजणींचा प्रवास खूप काही सांगतो. परिस्थितीशी संघर्ष, वाद-विवाद, पुरुषी प्रवृत्ती आणि अखेरीस जगण्याचं तत्वज्ञान हे सारं काही त्यातून डोकावते. आजची मंजू आणि पाचशे वर्षांपूर्वीची कान्होपात्रा. एक देहविक्री करणारी आणि दुसरी गणिका म्हणून माथी टिळा असलेली. दोघींच्या जन्मदात्या आई या त्यांचा ‘धंदा’ जगण्यासाठी, अस्तित्वासाठी आग्रही आहेत. अशी ही दोन काळातली दोघांची समांतर वाटेवरील कथानके.
नाटककार आणि दिग्दर्शक एक महिलाच आहे. त्यामुळे भावनिक प्रसंग पकड घेतात. हर्षदा संजय बोरकर यांनी दोन्ही जबाबदार्या कल्पकतेने सांभाळल्या आहेत. रेल्वे फलाटावरल्या प्रसंगासारखे काही प्रसंग मात्र अनावश्यक लांबले आहेत. बोजड विषय मांडताना त्यात सहजता जरुरीची वाटते. पण वेगळ्या वळणावरली संहिता तसेच सादरीकरण म्हणून या निर्मितीची निश्चित नोंद होईल, यात शंका नाही.
कलाकार आणि तंत्रज्ञांची अचूक निवड ही एक जमेची बाजू ठरावी. संपदा जोगळेकर-कुलकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुलकर्णी-बोरकर या दोन्ही मायलेकी या नाटकात प्रथमच स्वतंत्रपणे भूमिका करताहेत. रेल्वे फलाटावर रात्रीच्या अंधारात देहविक्री करणारी ‘बोल्ड’ भूमिका संपदाची आहे. बेधडक भाषा आणि त्याला साजेशी देहबोली चांगली जुळून आलीय. भक्ती बर्वे यांची फुलराणी, लालन सारंग यांनी रंगविलेली चंपा किंवा जंगली कबूतरमधली ‘ती’ यांची आठवण आल्याखेरीज राहणार नाही.
‘शर्वरी’ने केलेली कान्होपात्रा. साधेपणा, भोळेपणा, श्रद्धाळूपणा… हे सारं काही तिने उभं केलंय. भूमिकेतली परिपक्वता लक्षवेधी ठरते. गाणं, नृत्य, अभिनय यातून ‘कान्होपात्रा’ चांगली सामोरी येते. कान्हा ते कान्होपात्रा हा प्रवासही एका उंचीवर नेतो. संपदा जोगळेकर लिखित दिग्दर्शित ‘संगीत चि.सौ.का. रंगभूमी’ यात मराठी रंगभूमीचा प्रवास यापूर्वी उलगडून दाखविला होता. त्यानंतर एका मध्यंतरानंतर या नाट्यातून या दोघीजणी वेगळ्यात अंतरंगात शिरून आपलं रंगकौशल्य सिद्ध करीत आहेत. ‘मन उडू उडू’ या चॅनलवरल्या मालिकेत शर्वरी चमकली होती.
‘कॅमेरा’ आणि ‘स्टेज’ या दोन्ही माध्यमात तिची चांगली जाण व पकड आहे. सोबत असलेली वृंदा (कविता जोशी), शामा (अमृता मोडक), विठा (शुभांगी भुजबळ) यासह दहाएक जणांचा समूह हा ‘वारी’सह सहभागी होतो. टीमवर्क उत्तमच.
सचिन गावकर यांची नेपथ्यरचना नाट्याला पूरक आहे. महत्त्वाची दोन स्थळे ही प्रतीकात्मक नेपथ्यातून उभी केलीत. रेल्वे स्टेशन आणि कान्होपात्राचं घर. कमीतकमी रचनेत समर्थपणे आभास निर्माण होतो. वारीसाठी आवश्यक वाटही नजरेत भरते. प्रकाशयोजना आणि ध्वनीसंकेत यातून रेल्वे फलाटावरले वातावरण तसेच मैफलही सुरेख रंगली आहे. मंदार देशपांडे याचे संगीत आणि अमोघ फडके यांची प्रकाशयोजना यांच्यातलं ‘ट्युनिंग’ चांगले आहे. त्यातून प्रत्येक प्रसंग फुलविण्याचा प्रयत्न दिसतोय. तांत्रिक बाजूंवर प्राधान्य न देता विषयावर भर आहे. संत कान्होपात्रा आणि संत नामदेव महाराज यांचे अभंग वैचारिक मंथन करतात. नेहा जगताप यांची रंगभूषा तसेच वेशभूषा उत्तमच. हर्षदा बोरकरांच्या दिग्दर्शनाला शर्वरी कुलकर्णीने सहाय्य केलंय. पडद्यामागे सारी भट्टी उत्तम जमली आहे.
‘कान्होपात्रा’ या संतकवियत्रीवर मराठी रंगभूमीवर काही नाटके यापूर्वी आली आहेत. नारायण कुलकर्णी यांचे तिच्या जीवनकार्यावर आधारित ठळक प्रसंगांचे चित्रण असलेले नाटक ‘संगीत कान्होपात्रा’ रंगभूमीवर आले होते. गंधर्व नाटक कंपनीने एकेकाळी गाजविले. पुढे अनेकदा त्याचे पुनरुज्जीवनही झाले. १९७७-७८ साली अरविंद पिळगांवकर यांचा चोखोबा त्यात होता. कान्होपात्रा किणीकर, रामदास कामत, माया जाधव यांच्या त्यात भूमिका होत्या, तर ‘आविष्कार’तर्फेही सुषमा देशपांडे यांनी ‘बया दार उघड’ या नाट्यातून संत कवियत्रींवर एक ‘डॉक्युड्रामा’ केला होता.
कान्होपात्राचा ‘गणिके’चा मुखवटा फेकून ‘वारकरी’ होण्याचा निर्णय ‘जन्मावरी’त आहे. जो पुन्हा एकदा नव्या रसिकांपुढे आजच्या ‘स्त्री’शी तुलना करून मांडण्यात आलाय. रामायणातल्या सीतेला एकदाच अग्निदिव्य करावं लागलं. पण इथे आज स्त्रिया रोजच अक्षरशः होरपळून निघताहेत. विठ्ठलभेटीची ओढ मनात असलेल्यांसोबत खुद्द ‘श्रीहरी’ चालतो. भेटतो, असं म्हणतात. आजच्या दुनियेत योग्य दिशेने घेऊन जाईल, तोच आपला श्रीहरी. दोन काळातला हा हरी!!
या नाटकाच्या निमित्ताने दोन ठळक गोष्टींची नोंद घेणे आवश्यक आहे. एक ‘देवबाभळी’ नाटकाच्या आगमनामुळे रसिकांच्या बदलत्या अभिरुचीप्रमाणे ‘जन्मवारी’ची निर्मिती वाटतेय आणि दुसरं म्हणजे ‘वंचितांच्या रंगभूमी’च्या अकरा वर्षातलं हे एक महत्त्वाचे पाऊल!
संत तुकोबांच्या शोधात त्यांची पत्नी आवलीबाई निघते आणि तिच्या पायात ‘बाभळीचा’ काटा रुततो आणि तो काढण्यासाठी विठोबा आपली पत्नी रखुमाईला पाठवितात. या वनलाईनवर प्राजक्त देशमुखच्या मूळ एकांकिकेचे हे दोन अंकी नाटक देवबाभळी, जे विठुमय बनले. ज्यात संत आणि देव विठोबा या दोघा पत्नींच्या भावभावना आहेत. हे नाट्य ‘मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन’ असं बिरूद मिरवत असून त्या नाटकाची ‘परतवारी’ ऊर्फ ‘दिंडी’ही सुरू झालीय. हे नाटक २०२१च्या साहित्य अकादमी पुरस्कारासह ४४ बक्षिसांचे मानकरी ठरले. हाऊसफुल्ल गर्दी नाटक खेचतेय. ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ‘जन्मवारी’ त्याच वाटेवरून निघालंय.
नाटककार रत्नाकर मतकर यांनी १० वर्षांपूर्वी ठाण्यात वंचितांची रंगभूमी हा अभिनव प्रयोग सुरू केला. पाडे, वस्त्या, फुटपाथ, रेल्वे फलाट, बालसुधारगृह, चाळी इथल्या समस्यांनी ग्रासलेल्या मुलांना एकत्र आणून त्यांच्या नाटकातून व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचे काम सुरू केले. वंचितांना हक्काने व्यक्त होण्यासाठी नवे व्यासपीठच त्यातून मिळाले. त्या चळवळीतल्या सक्रीय मंडळींचा या नाटकात असलेला सहभाग हा नोंद घेण्याजोगा तसेच कौतुकास पात्र आहे. दोन अंकी नाट्याऐवजी ‘जन्मवारी’ दीर्घांकात सादर केले असते, तर त्यातील नाट्य अधिकच प्रभावी व गहिरे बनले असते. पण एकूणच कलात्मक पातळीवर दोन काळातील एक आनंददायी उत्कट अनुभव रसिकांना यातून मिळतो.
काळ बदलतो. जुन्या काळातील विचारधारा बघता बघता कालबाह्य ठरते. केशवसुत म्हणतात तसे ‘जुने जाऊ द्या, मरणालागुनी!’ पण संतविचार त्यातील आशय, त्यामागली शिकवण आणि वारीतला प्रवास हे सारं आजच्या दुनियेतही चिरंतन आणि दिशादर्शकच. नवा दृष्टिकोन त्यातून निश्चितच मिळतो. संत तुकोबांच्या अभंगातील प्रतीकात्मकता जी आज संगणक युगातही लागू पडते. ते म्हणतात, जे ज्या पाहिजे जे काळी। आहे सिद्धची जवळी!!
जन्मवारी
लेखन/ दिग्दर्शन – हर्षदा संजय बोरकर
संगीत – मंदार देशपांडे
नेपथ्य – सचिन गावकर
प्रकाश – अमोघ फडके
निर्मिती – शांभवी बोरकर / सतीश आगाशे
सूत्रधार – सुरेश भोसले
निर्मितसंस्था – स्वेवन स्टुडिओज