हे व्यंगचित्र आहे १९७७ सालातलं. आणीबाणी लादल्यामुळे संपूर्ण देशाला अप्रिय झालेल्या इंदिरा गांधी यांना जनतेने पदावरून पायउतार केलं होतं आणि त्यांच्याजागी समाजवादी, जनसंघी अशा परस्परविरोधी विचारधारांच्या जनता पक्ष नामक कडबोळ्याच्या हाती देश सोपवला होता. आणीबाणीच्या काळात वर्तमानपत्रांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला, पोलीस यंत्रणांनी अनावश्यक बळाचा वापर केला, आणीबाणीचे निमित्त पुढे करून इंदिराविरोधकांना तुरुंगात डांबले गेले. इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांनी आणि त्यांच्याभोवती जमलेल्या चांडाळचौकडीने अनेक अत्याचार केले, सक्तीच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून हाहाकार माजवला, असे अनेक आरोप होते. जनता पक्षाने या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्या. जे. सी. शहा यांचा शहा आयोग नेमला, तेव्हा इंदिरा गांधींनी हा आपल्या बदनामीचा कट आहे, असा आरोप करून थयथयाट केला. प्रत्यक्षात संजय गांधी यांच्या उद्योगांनीच इंदिराजींची अधिक बदनामी झाली होती, हे सत्य किती चपखलपणे सांगितलं आहे बाळासाहेबांनी या चित्रात. इंदिराजींचं नाक, त्यांच्या चेहर्यावरचे संत्रस्त भाव आणि संजय गांधी यांच्या बाललीला यांना तटस्थ बाण्याने ताठ उभे असलेल्या न्या. शहा यांनी बॅलन्स केले आहे… हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या कांगाव्यांची आठवण येते. केरळमध्ये, कर्नाटकात प्रचारकी भाषणांमध्ये काँग्रेस कशी आपल्याला शिव्या देते आहे, असे हास्यास्पद रडगाणे ते विनोदी आकडेवारीसह सांगत फिरत आहेत… प्रत्यक्षात त्यांची बदनामी त्यांनी मांडीवर घेतलेल्या ब्रिजभूषण शरण सिंगसारख्या भ्रष्ट बाहुबली नेत्यांमुळेच अधिक होते आहे, हे त्यांना कळत नसेल? मग कुठे गेले ते लाल डोळे, करारी बाणा, नि:स्पृह, निडर शिस्तबद्धता… की अशा रावणाला मोदी पाठिशी घालतात तरी त्यांच्या भक्तांसारखे म्हणायचे, मोदीजी ने किया है तो कुछ सोच के किया होगा.