अति राग आणि भीक माग अशी म्हण प्रचलित आहे. खरंं तर राग येणं ही स्वाभाविक भावना आहे, पण रागाला आवर न घालता येणं ही गंभीर समस्या आहे. यात राग येणार्याबरोबरच त्याच्या सहवासात असणार्या प्रत्येकाला कधीही काहीही घडू शकतं या भीतीच्या सावटाखाली जगावं लागतं. रागाच्या भरात आईने मुलाचा किंवा मुलाने आईचा खून केला अशा बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. अशाच एका रागीट माणसाची गोष्ट सांगणारा ‘सर्किट’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
सरकार (रमेश परदेशी) नावाच्या वसुली करणार्या गुंडाने एक ढाबा बळकावला आहे. कट टू…
कॉलेज निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी एक तरुण युवक अपप्रवृत्तीच्या मुलांना बुकलून काढतोय. हा सिद्धार्थ (वैभव तत्ववादी) शीघ्रकोपी आहे. एरवी सगळ्यांशी हसतमुखाने वागतो पण, त्याला राग आला तर कोणाचीच खैर नसते. तो वस्तू आणि माणसांना उचलून लीलया फेकतो. कॉलेजमधील मारामारीत व्यस्त असताना सिद्धार्थ, शास्त्रीय गायन करणार्या अंजलीला (हृता दुर्गुळे) गाणं गाताना पाहून स्वतःच्या रागाला तात्पुरता विसरतो आणि तिच्या प्रेमात पडतो. गाण्यांमधून दोघांची गोष्ट सरकते.
अधून मधून सिद्धार्थच्या रागाचे प्रसंग दिसत राहतात, पण त्याचे इतर चांगले गुण पाहून अंजली सिद्धार्थच्या प्रेमात पडून त्याला मागणी घालते. दोघांचं लग्न लागतं. यात सिनेमाचा लांबलेला पूर्वार्ध संपतो. यापुढे घटना वेगाने घडायला लागतात. सिद्धार्थचा राग नेहमी समजून घेणार्या अंजलीचा एक दिवस स्फोट होतो आणि ती माहेरी जायला निघते. सिद्धार्थ अंजलीला माहेरी सोडत असताना त्याची गाठ रंगा (मिलिंद शिंदे) हा ट्रक ड्रायव्हर आणि सरकार या गुंडांशी पडते. इथून खरा थरार सुरू होतो. हा थरार इथे शब्दात सांगता येणार नाही. तो अनुभवायला सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहायला हवा.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘काली’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक आहे. त्यामुळे मेलोड्रामा आणि देमार अॅक्शन ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत. पण कथेतील काही दुवे कमकुवत आहेत, उदा. सिद्धार्थच्या अतीव रागीट स्वभावाचं कारण काय? त्याने या समस्येवर कोणा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली आहे का? या प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळत नाहीत.
दिग्दर्शक आकाश पेंढारकर यांनी अॅक्शनपटाला साजेशी मांडणी केली आहे. काही थरारदृश्ये काळजाचा ठाव घेणारी आहेत. सिनेमाचा पूर्वार्ध प्रेमकहाणीत खर्च झाला आहे, हा भाग थोडा वेगवान हवा होता. सिनेमाचा उत्तरार्ध मात्र चांगला जमून आला आहे. एकही संवाद नसलेला मिलिंद शिंदे यांचा रंगा पडद्यावर पाहणे ही सिनेरसिकांसाठी पर्वणी आहे. नजर आणि मुद्राभिनयातून एखादा कसलेला अभिनेता मिळालेल्या संधीचे सोने कसे करू शकतो हे मिलिंद शिंदे यांचा अभिनय पाहताना दिसतं. वैभव तत्ववादी शर्ट घातलेला असताना आणि नसताना पडद्यावर आकर्षक दिसतो. राग दर्शवणारी आणि हाणामारीतील दृश्य वैभव चांगली निभावतात. ऋता दुर्गुळेचा सिनेमातील वावर सहज आहे. नवर्याच्या रागाला आवर घालण्यासाठी प्रयत्न करणारी गृहिणी आणि अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला तोंड देताना तिचा उडालेला थरकाप तिने उत्तम रीतीने दर्शविला आहे. रमेश परदेशी यांचा सरकार लक्षात राहतो. छायांकन आणि संकलन समाधानकारक आहे. ‘काहीसा बावरतो’ हे गाणं आणि ‘वाजवायची सनकन’ हे रॅप साँग उत्तम जमले आहे. सिनेमाचे पार्श्वसंगीत थरारक प्रसंगांना अधिक तणावपूर्ण करतं. संजय जमखंडीचे खटकेबाज संवाद सिनेमाची रंगत वाढवतात.
‘चांदनी बार’, ‘फॅशन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ असे सुपरहिट हिंदी चित्रपट देणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर या सिनेमाचे निर्माते आहेत. पहिल्याच मराठी चित्रपटनिर्मितीत त्यांनी उत्तम निर्मितीमूल्ये राखली आहेत. ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ असे दाक्षिणात्य चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणारा मराठी प्रेक्षकवर्ग आपल्याकडे निर्माण झाला आहे. त्यांना हा मराठी रिमेक नक्कीच आवडेल.