पूर्वी संताबंताचे जोक्स फार जोरात चालायचे, त्यात त्यांचा बिनडोकपणा जास्त असायचा. सध्या पुणेकर या वल्ली विक्षिप्त, फटाक अपमान करणार्या, संत्रस्त, चिडखोर मंडळींचा चांगलाच दबदबा आहे. म्हणूनच की काय, विनोदाला धार यावी म्हणून पु.ल. पाच-पन्नास वर्षांपूर्वी पुण्याला स्थायिक झाले असावेत. कुजकट, आक्रस्ताळी, चिडखोर, वैताग आणणारी व्यंगचित्र शैली मंगेश तेंडुलकर यांनी पुण्यातच लिलया आत्मसात केली. समस्त लेखक-कवींना तुच्छ, अडाणी, अशिक्षित समजणार्या सदाशिवपेठी संपादकांना याच भूमीने मोठे केले. समस्त तर्कट तर्कतीर्थ, पगडीवाले विद्वान येथलेच. या फटकळपणाचा फटका लोकमान्य टिळकांनाही बसला आहे. स्वातंत्र्यासाठीचे योगदान, गीतारहस्यसारखा ग्रंथ, तुरुंगवास, स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले अफाट कर्तृत्व असणार्या टिळकांची चौपदरी वाड्यात रात्र रात्र सोंगट्या खेळणारी मित्र मंडळी; त्यांना एकदा पत्रकाराने विचारले, ‘टिळकांच्या कर्तृत्वाबद्दल आपणास काय वाटते?’ यावर एक पगडीवाले सत्तरीतले, बोळके बहाद्दर म्हणाले, आमचे उभे आयुष्य या चौपदरी वाड्यातच सोंगट्या खेळण्यात गेले. बळवंता मात्र वाड्याचा उंबरठा ओलांडून बाहेर गेला, इतकेच काय ते त्याचे कर्तृत्व!
स्टेशनशेजारीच असलेल्या गल्लीत राहात असलेल्या मित्राच्या घरी नेताना केवळ भाड्याच्या लोभापोटी संपूर्ण पुणे फिरवून आणणारा आचार्य अत्र्यांना भेटलेला टांगेवाला पुण्याचाच. जगदंब बायकोने ताटात वाढलेली अर्धी चतकोर पोळी मान न वर करता, एक केळ्याचे पांचट दुधात केलेले शिक्रण स्वीट डिश म्हणून मान न वर करता मिटक्या मारीत रवंथ करणारा पुणेकर इतरांच्या घरी मात्र आठ दहा पोळ्या, श्रीखंडाच्या दोन-तीन वाट्या तुडवतो. तोही इथलाच.
एक गमतीचा किस्सा. पायी चालणार्या एका पुणेकराने सायकलवाल्याला हटकले. ‘दिसत नाही का?’ धक्का लागून मी पडलो असतो तर.. माझा पाय मुरगळला असता.. वा फ्रॅक्चर झाले असते, दवाखान्यात जावे लागले असते, उपचार करावे लागले असते, दवाखान्यात चार तास नंबर लावून महागड्या गोळ्या घ्याव्या लागल्या असत्या. अॅडमिट झालो असतो तर बायकोला दुपारी भर उन्हात डबा घेऊन यावे लागले असते.
ऑफिसात साहेबांच्या शिव्या खाव्या लागल्या असत्या ते वेगळेच. आणि सारखं सॉरी, सॉरी काय म्हणतोस?’ सायकलस्वाराच्या लक्षात आले की आपला धक्का या माणसाला लागलेलाच नाही.. तो उसळून म्हणाला, अहो, तुम्हाला तर धक्का लागलेला नाही. पुणेकर म्हणाला, धक्का लागला असता तर काय वाढून ठेवले होते ते सांगितले.
पुण्याच्या विमाननगरजवळ राहणार्या एका दारावरचा बोर्ड ‘आमच्या दारापुढे स्कूटर मोटरसायकली वा विमान पार्क करू नये. आम्ही या जागेत आमच्या दोन सायकल कशाबशा लावतो!’
पुणेकर बाईसुद्धा तेवढ्याच तिखट, भल्याही त्या सोवळ्या ओवळल्यातल्या असोत. लोकमान्य टिळक एकदा घरी नसताना त्यांचा एक मित्र भेटायला आला व हाक देत म्हणाला ‘टिळक घरी आहेत का?’ टिळकांच्या पत्नीने दार उघडले. ओसरीवर कटाक्ष टाकला व म्हणाल्या, इकडच्या स्वारींच्या वहाणा बाहेर दिसत नाहीत… पतीबद्दल आदर दाखवणारे वाक्य, पण म्हटले तर तिरपट.
आताचीच गोष्ट घ्या. एका पुणेकराचा मोबाईल हरवला. शेजार्याने खूप हळहळ व्यक्त केली. मग हळूच म्हणाला, ‘आता चार्जरचा उपयोग करणार नसाल तर मला देऊन टाकता का?’
आद्य पुणेकर म्हणाला, ‘वापरणार नाही कसा.. उद्यापासून बायकोच्या नाकात तो अडकवून मी गावभर फिरणार आहे.’
पूर्वी पुण्याला कधीमधी जाणंयेणं होई. तुळशीबाग, मंडई, पर्वती, सारसबाग ही पुणेकरांची मर्मस्थाने. जगात कोणत्याही मिठाईच्या दुकानापुढे लाईन लागत नाही. ती फक्त चितळेंकडे पाहायला मिळते. कारण दुपारी चितळे चक्क दुकान बंद ठेवतात. कशासाठी? वामकुक्षीसाठी. आणि लाईनीत बरेचसे पुणेकरच असतात. भरगच्च थाळीसाठी प्रसिद्ध असलेले श्रेयस हॉटेल, कावरे कोल्ड्रिंकचे आईस्क्रीम, चार-दोन ठिकाणी मिळणारा जोशींचा बटाटेवडा, कॅम्पात मिळणारे केक्स, चिकनचे वेगवेगळे प्रकार. वैशालीमधली एसपीडीपी वगैरे चाखली की नाही असे पुणेकर हमखास विचारतो. मात्र नेत नाही.
अप्पा बळवंत पेठेत छोटी-मोठी पुस्तकांची शंभरच्या वर दुकाने आहेत. लाखो पुस्तके तेथे विकली जातात. नवखे लेखकही हौसेने त्यांची पाचदहा अपत्ये विकायला ठेवतात. त्याने दहा वर्षांनी चौकशी केली तरी दुकानदार म्हणतो, ‘तुमच्या पुस्तकांना उठावच नाही. दहापैकी नऊ पडून आहेत. ती विकली की हिशोब करू.. हा जीवघेणा अपमान लेखकाला पुरेसा असतो. तेच त्याचे मानधन.
एके वर्षी पुण्याच्या एका गडगंज श्रीमंत नातेवाईकाच्या वडिलांचे निधन झाल्यानिमित्ताने वैकुंठ स्मशानभूमीत जाणे झाले. अग्नीदाह देण्याआधी कलेवरावर सोन्याची फुले उधळण्याची प्रथा आहे. पाचदहा मिलिमीटर आकाराची दहा बारा सोन्याची टरफले हातात घेऊन म्हातार्याचा मुलगा व दोन-तीन नातू उभे राहिले. मुलाने बापावर ती फुले उधळली. इतरांच्या लक्षात येण्याआधीच नातवांनी ती त्वरेने उचलली सुद्धा (त्या वर्षी सोने फक्त चार-पाच हजार रुपये तोळा असावे).
‘पुणे तेथे फक्त उणे’ हेच खरे. मंगळावर साहित्य संमेलन अशी कल्पना करून मी चित्रमाला काढली होती. त्यात एक टिपिकल पुणेकर साहित्यिक मंगळावरून सुखरूप परतले आणि शिवाजीनगर स्टँडवरुन मंगळवारीच्या संयोजकांना रात्री बाराला फोनवर खडसावत आहेत.’ महोदय, मंगळवारीचे योग्य मानधन मला मिळालेय. मात्र माझे घर कोथरूडला आहे. आपण शिवाजीनगरपर्यंतचा खर्च दिलेला आहे. आता रात्री बाराला मी काय कोथरूडपर्यंत पायपीट करू?’
गेल्या दोन अडीच दशकात पुराच्या पाण्यासारखं पुणे अफाट पसरलं आहे. लोकवस्ती झिरपत झिरपत दूरवर पोहोचली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला लक्ष्मीचा वरदहस्त लाभला आहे… आलिशान इमारती, मोठमोठे मॉल्स, वसाहती टाऊनशिप्स वाढत आहेत. पिझ्झा बर्गर संस्कृती जोशी वडेवाल्यांच्या जागी अवतरली आहे. काउंटरवर मात्र आपली जुनीच संस्कृतीरक्षक मंडळी जोशी, शिंगणे, सरपोतदार, विंचुरकर, पुरंदरे वगैरे ठाण मांडून आहेत. मोडेन पण वाकणार नाही ही जिद्द तीच. पण वयाने वाकवलेय. बहुतांश तरुण पिढी आयटी हब्सच्या जाळ्यात अडकत चालली आहे. परदेश त्यांच्या डिग्रीची वाट पाहत आहे. पूर्वी भारतातल्या चीज वस्तू कापड खाण्यापिण्याची वस्तू एक्सपोर्ट व्हायच्या आता मोठ्या प्रमाणात आपली शिकलेली पोरं एक्स्पोर्ट होतात. मत ठाम असलेली मुलंमुली परदेशात जायचा ठेका सोडत नाहीत. मात्र उसना आव आणून म्हातारा म्हातारीला म्हणावं लागतं. ‘मुलांना त्यांची मतं आहेत, भविष्य आहे.. कर्तृत्व आहे, जिद्द आहे.. त्याच्या आड आपण कशाला यायचं? ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय आहेत ते त्यांचे आई-वडील मध्ये कडमडले नाही म्हणूनच ना?