स्त्री मुक्ती संघटना आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकलॉजिकल हेल्थ यांच्या जिज्ञासा या कुमारवयीन मुलामुलींसाठी असलेल्या जीवन शिक्षण उपक्रमात (व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात) मी गेली १५/२० वर्षे संवादक म्हणून काम करतो आहे. हजारो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसोबत बोललो आहे. आजवर आम्ही संवादकांनी साडेसात लाखांहून अधिक मुलामुलींशी संवाद साधला आहे. कुमार वय, ताणतणाव नियोजन, व्यवसाय मार्गदर्शन, व्यसनविरोधी विचार, मूल्य शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण असे सहा विषय आम्ही मुलींपुढे मांडतो.
असाच एकदा रायगड जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागातल्या शाळेत मी ताणतणाव नियोजन हा विषय मांडत होतो. टेन्शनचा सामना कसा करायचा हे मुलामुलींना सांगत होतो. तेवढ्यात एक मुलगी उभी राहिली अन म्हणाली, सर ते सकारात्मक वगैरे बोलायला सोपं आहे. पण आम्हाला रानातल्या पाऊलवाटेने शाळेत यावं लागतं. शाळेत जाता-येताना रस्त्यात समोर साप दिसला की भीती वाटते. टेन्शन येतं. अशावेळी मी काय करायचं? अशावेळी पॉझिटिव्ह विचार काय आणि कसा करायचा? तिने हा प्रश्न विचारला अन् वर्गात एकच हशा पिकला.
त्या मुलीचा प्रश्न योग्यच होता. मी म्हणतोय ते प्रत्यक्ष जगण्यात वापरता येणार नसेल तर माझ्या म्हणण्याला काही अर्थ नव्हता. मी म्हणालो, सांगतो कसा विचार करायचा ते. आपण रस्त्यातून चाललो आहे अन् समोर साप दिसला. आपल्याला भीती वाटली. भीती कशातून निर्माण झाली? मनात आलेल्या विचारांनी निर्माण झाली. काय विचार आले? आपण मनात स्वतःशी काय बोललो? बापरेऽऽ साप. हा मला चावेल. अन् हा साप विषारी असला तर मी मरेन! या क्षणी माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. बरोबर ना! आता सर्वात प्रथम आपल्याला असा विचार करता येईल की काही फुटांवर जो साप दिसतोय तो बिनविषारी असू शकतो. कारण महाराष्ट्रात ५२ जातीचे साप आहेत, ज्यात फक्त १२ जातींचे साप विषारी आहेत. त्यामुळे हा साप विषारी नसण्याची खूप शक्यता आहे.
मुलगी म्हणाली पण सर तो साप नेमका विषारीही असू शकतो ना? मी म्हटलं, बरोबर आहे. तो साप विषारीही असू शकतो. पण जसे आपण इथे घाबरलो आहोत तसा तोही तिथे काही फुटांवर घाबरलेला आहे ना? आपली जी पायवाट आहे ती तो इकडच्या गवतातून तिकडच्या गवतात जाण्यासाठी वापरतो आहे? तो काही आपल्या दिशेने येत नाहीये. बरोबर? आता आपण आहोत तिथे शांत उभे राहिलो तर तो समोरच्या गवतात, झुडपात निघून जाणार आहे ना? मुलगी म्हणाली, हो सर. असंच होतं. तिचा चेहरा खुलला. ती म्हणाली, बरोबर सर. उगीच घाबरायची गरज नाही.
त्या मुलीलाच नव्हे, बहुतेकांना सापाची भीती वाटते. शहरी भागात राहणार्यांना ती अधिक वाटू शकते. कारण शहरातल्या लोकांना क्वचितच साप दिसतो. पण काही स्त्रिया, मुली, झुरळ, पाल, उंदीर यांनाही घाबरतात. यांना एवढं घाबरायची खरंच गरज आहे का? अनेक पुरुषही घाबरट असतात. अनावश्यक घाबरण्याची काय गरज आहे? पण लोक वेगवेगळ्या गोष्टींना घाबरतात. कुणी कुत्र्याला घाबरतं, कुणी रस्त्यात गाय, बैल दिसल्यावर घाबरतात. कुणाला पाण्याची (बुडण्याची) भीती वाटते तर कुणाला विमान प्रवासाची भीती वाटते.
आमचे मोरे काकाही असेच घाबरट आहेत. काकांच्या डोळ्याचं (मोतीबिंदूचं) ऑपरेशन करावं लागणार होतं. ते छोट्या छोट्या आजारपणांनाही घाबरतात. आता ऑपरेशन आणि तेही डोळ्याचं म्हटल्यावर ते अधिकच घाबरून गेले. त्यांना अनेकांनी सांगितलं की आता मोतीबिंदूच ऑपरेशन हे अत्यंत सोपं झालं आहे. पण तरीसुद्धा ते खूप घाबरून गेले होते. त्यांना काकीने समजावलं, तुम्हाला सध्या पेपर वाचायला, टीव्ही पाहताना त्रास होतोय. अहो, डॉक्टर ऑपरेशन करून डोळ्यात लेन्स टाकतात. त्यामुळे आपल्याला चांगलं दिसू लागतं.
ऑपरेशनने आपले डोळे तरुण होतात. काकांना काकीचं हे ‘डोळे तरुण होतात’ वाक्य खूप आवडलं. त्यांनी ते त्याच्या मित्राला देशमुखला सागितलं. देशमुख म्हणाले, अरे मोरे डोळ्याचं काय घेऊन बसला आहेस? ऑपरेशननंतर आपणच काही प्रमाणात तरुण होतो. वहिनी हे तुला बोलल्या नाहीत कारण तू तरुण होऊन तरुणपणीचे उद्योग करू नयेस.. हा हा हाऽऽ त्या मित्राने काकांना समजावून सागितलं की आता विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आता लेझर ऑपरेशन करतात. काही त्रास होत नाही. काकांच्याही लक्षात येऊ लागलं की आपण घाबरलो तर आपलं बीपी वाढेल अन बीपी नॉर्मल नसेल तर डॉक्टर ऑपरेशन ऐनवेळी रद्द करतील. आपल्याला चागलं दिसायला हवं असेल तर घाबरटपणा सोडला पाहिजे. काकांनी मग घाबरटपणा सोडला आणि ऑपरेशन करून घेतलं. आता ते पूर्वीसारखे वाचनालयात अनेक तास अनेक वर्तमानपत्र वाचत बसतात.
आनंदी आणि स्वानंदी. पुण्यात राहणार्या दोघी बहिणी. आनंदी थोरली आणि स्वानंदी धाकटी. दोघी गाण्याच्या क्लासला जायच्या. क्लास घरापासून लांब अन थोडा आडबाजूला होता. पण क्लास घेणार्या बाईंचं गाणं शिकवणं खूप छान होतं. त्यामुळे दोघी स्कूटीवरून क्लासला जात. नंतर स्वानंदीला जॉबसाठी तिला मुंबईला जावं लागलं. आता आनंदीची मोठी पंचाईत झाली. तिल्ाा स्कूटी चालवता येत होती पण तिला रहदारीच्या रस्त्यावर स्कूटी चालवायला भीती वाटायची. आनंदीला गाणं शिकणं सोडायचं नव्हतं. क्लासला रिक्षाने जावं तर ते परवडणारंही नव्हतं अन तिकडे यायला तयार होणारा रिक्षावाला उपलब्ध होणंही कठीण होतं.
स्कूटी नीट न चालवता आल्याने अपघात होऊन आपण हात पाय मोडून घेऊ. डोकं फोडून घेऊ, असं वाटल्याने स्वतः स्कूटी चालवून क्लासला जायची कल्पना आनंदीला भीतीदायक वाटायची. पण हळूहळू ती विचार करू लागली की अनेक मुली सरावाने हळुहळू रहदारीच्या ठिकाणीही उत्तम स्कूटी चालवतात हे आपण पाहिलं आहे. आपणही काळजीपूर्वक स्कूटी चालवू. सरावाने काही दिवसात आपल्यालाही हे जमेल. आनंदीने भीतीवर मात करायचं ठरवलं अन ती काहीच दिवसात रहदारीच्या रस्त्यावरही चांगल्या प्रकारे स्कूटी चालवू लागली. तिची भीती पळून गेली.
भीती ही भावना नैसर्गिक आहे. आपल्याला स्वरक्षणासाठी सजग ठेवणं, सावध ठेवणं हे काम आपली भीती करत असते. त्यामुळे भीती वाटणे काही चुकीचं नाही. पण अकारण, अवास्तव, अवाजवी भीती घातक ठरते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी एक म्हण आहे ती खरीच आहे. आपल्या सार्यांनाच असा अनुभव येतो की जी गोष्ट घडेल अशी आपल्याला भीती वाटत असते, त्यातल्या ९०-९९ टक्के गोष्टी घडतच नाही. आपण उगीचच घाबरलो होतो हे नंतर लक्षात येतं.
जी गोष्ट घडेल अशी प्रचंड भीती आपल्याला वाटते त्यात वाईटात वाईट काय घडेल याचा विचार करून ती गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे अशी कल्पना करावी. आपण त्या परिस्थितीला समर्थपणे कसे तोंड देत आहोत याचे तपशीलवार चित्र पाहावे म्हणजे आपली भीती कमी होईल. जगात लोकांच्या बाबतीत अनेक भयंकर घटना घडतात. आपल्या बाबतीत तसं काही घडूच नये किंवा घडणारच नाही असं समजण्यात अर्थ नसतो.
भीतीदायक वाटणार्या गोष्टींची आपण नीट ओळख करून घेतली पाहिजे. भीती कमी करत नेली पाहिजे. माणसाला सर्वात जास्त भीती मरणाची वाटत असावी. मी मरायला घाबरत नाही असं म्हणणारे अनेकजण समोर प्रत्यक्ष मरण दिसलं की घाबरतात. जन्माला आलेला माणूस कधीतरी मरणारच. एखाद्या आजाराने, रोगाने, अपघातात, एखाद्या जीवघेण्या हल्ल्यात मरू शकतो किंवा मग नैसर्गिकपणे वृद्धापकाळाने मरू शकतो. कधी अन् कसा मृत्यू यावा हे काही आपल्या हाती नाही. मला वाटतं आपण आजवर इतरांचा मृत्यू अनुभवला आहे. त्यातून आपल्याला आपला मृत्यू ही गोष्ट भयंकर वाटते. आपल्याला प्रिय असणारा माणूस अचानक एका क्षणी कुठेच नसतो, हे दुःखदायक आहे. वेदना देणारं आहेच, पण मृत्यूनंतरचा तो पार्थिव देह, ते शोकाकुल वातावरण आपल्या मनावर अधिक परिणाम करत असतं. जवळच्या माणसाचा विरह आपल्याला सहन होत नाही. आठवणीने काळीज पिळवटत असतं. आपल्या आप्तांच्या मृत्यूनंतर आपल्याला हे दुःख सोसावं लागतं, पण आपला मृत्यू झाला की आपल्याला काय मानसिक, शारीरिक त्रास होणार आहे? आपण तेव्हा कुठेच नसणार मग आपण आपल्या मृत्यूने का घाबरून जातो?
मरणाला घाबरून जगत रहाण्यात आपण जगण्याचा आनंद गमावतो. मरणाला घाबरून माणसे वाटेल ते सहन करतात. अन्याय सोसत राहतात. यावर उपाय म्हणजे प्राणाची पर्वा न करता लढायचं. मरायला घाबरायचं नाही, हे या देशातल्या लोकांना गांधीजींनी शिकवलं. जिवाची पर्वा न करता सारा देश गांधींजींच्या नेतृत्वाखाली एकवटला आणि ब्रिटिशांना हा देश सोडून जावं लागलं.
मरणाला न घाबरता सत्य, न्याय यासाठी लढणारा माणूस एकदाच मरतो, पण घाबरट माणसं मात्र जगताना पावलोपावली मरत असतातं. भीती वाटणं चूक नाही. पण त्या भीतीवर मात करण्याचा धैर्य शहाणपणा आपल्याला जमायला हवा. कारण डर के आगे जीत है!