(ग्रामपंचायत कार्यालय, एक टेबल, आठ खुर्च्या, काही खुर्च्यांत फाटलेल्या उश्या. टेबलवर एक कळकट चादर अंथरलेली. त्यावर एक चार ठिकाणी तडा गेलेला काचेचा तुकडा टाकलेला. कार्यालयाच्या कोपर्यात कुठल्याश्या जटाधारी बुवाची तसबीर, तीवर एक सुकलेला फुलांचा हार, समोर अगरबत्तीच्या राखेचा ढीग आणि पूर्ण कोपरा कोळ्याच्या जाळ्याने वेढलेला. बाजूला भिंतीला खेटून चारदोन लाकडी-लोखंडी कपाटं. त्यातून डोकावणारे फाईली नि कागदं. समोरील कोपर्यात एक कम्प्युटर, त्यावर कमी आवाजात कोकलणारी इम्रान हाश्मीची गाणी… तर मीटिंगला सुरुवात होते. सरपंच बाकेराव उभे राहतात. डोक्यावर गांधी टाकेदार टोपी, डोळ्याला लाल काचेचा चष्मा (?) पायजम्यावर भगवं टी-शर्ट).
बाकेराव : आज आपुन मिडासनगरचे सात मेम्बर लोक ब्वॉ… जमलोय! आपल्या नगराला पुढं न्यायला. शेवट आपुन साहेबाच्या ईचारावर चालणारी मान्सं आहे…
सर्जेराव : हा… तुम्हाला रस्त्यानं सोईचं चालता यायना, तुम्ही ईचारावर चालाय लागलाय…
बाकेराव : आपुन इथं इकासाचं बोलायला जमलोय… मी सरपंच झाल्यापासून मिडासनगराचा सर्वांगीण विकास करायचा मी संकल्प केलाय. आताच मी आणि साहेब अयोध्येला जाऊन आलो…
पिराजी : (मधीच) आमच्या गल्लीत करंगळीवानी धार येती पाण्याची, ते बघा राव! बायको हाणायची नाही तं…!
बाकेराव : बघा, पिराजी! मी जंतेच्या मनातला सरपंच…
सर्जेराव : ते पाठ झालं आमचं! पुढलं बोला!
बाकेराव : आता तुम्ही ऐकानाच झाले तर मांडा ब्वॉ तुमचे प्रश्न!
कांताराम : ते नालीपासून माथ्यापर्यंत शिमीटचा जो रस्ता केला आजून उद्घाटन करून दीडेक महिना झाला नाहीतर त्याच्यातल्या सळ्या वर आल्या बघा बा! काल टायर फोडलं आस्तं…
बाकेराव : हे पाहा, मागं काय झालं, याच्या खोलात मी जात नाही…
गजीनाथ : तुम्ही खोलात जाच! माझ्या दारापुढं गटार दरयेळी कशी तुंबती? ते बघाच! पार रस्त्यावर पाणी धावतं ओ! त्याच्यानं मच्छर वाढले. एखादं मलेरिया, डायरिया, असलं काही होऊन मरायचं…
वाकणकर : मी म्हणतो, आज आपल्यापुढं लव्ह जिहादसारखा मुद्दाय… आपण गावात एक मोर्चा काढायला पाहिजे…
सर्जेराव : कश्यासाठी?
वाकणकर : आपल्या पोरीबाळींना कुणी फसवून…
सर्जेराव : अशा गावात किती घटना झाल्यात?
वाकणकर : गावात नाही हो! बाहेर फार होतंय!
सर्जेराव : सगळे ‘खरे’ आकडे घेऊन या! मग बोला. इथं गावचे प्रश्न मांडा!
सामंतराव : एक विशेष सत्कार प्रस्ताव आहे. दोन महिन्याआधी सरपंच साहेब दावचगावला गेलेले, सरपंच परिषदेला तिथं गावच्या विकासच्या प्रेमात पागल होऊन लक्ष्मीवाडीच्या सरपंच बाई सरपंच साहेबांच्या मागंच लागलेल्या…
सर्जेराव : बाईला पॅन्टला करगुठा लावलेलं, नाक गळकं सरपंचाचं कार्ट इकासला भेटवायचं की! बाईची झिंग उतरली अस्ती.
गजीनाथ : ते बरडावर फॅक्ट्री येणार होती, ती पळवून नेली शेजारच्या गावात. तेच गावभर भटकणार्या पोरांला काम मिळलं असतं…
वाकणकर : मी म्हणतो, बरडावर एक मंदिर बांधूया! तिथं मुलांना संस्कारवर्ग नि तलवारबाजी शिकवू! म्हणजे मुलं रिकामी फिरणार नाहीत!
सर्जेराव : वाकणकर, पोरांना नोकर्या पाहिजेल. तुमच्या फुलटाइम रिटायरमेंटच्या प्लॅनसाठी पुढल्या पिढीला नासवू नका! पैशेच कमवायचे असतील तर गजीनाथरावांच्या दारापुढली गटार साफ करा!
बाकेराव : तुम्ही फार संताप करताय सर्जेराव! आम्ही गावच्या प्रत्येक पोरामागं खंबीरपणे उभं राहणार आहोत!
सर्जेराव : तुमचं पॅनल ज्यांच्या जिवावर निवडून आलं, त्यांनाबी तुम्ही असंच म्हंटलं की. अन रातीतून मागल्या मागं पळून गेले. तवाच पॅनल फोडून सरपंच झाले…
बाकेराव : मी आधीच म्हटलंय, मी आधीच्या विषयावर बोलणार नाही. आणि त्याच्या खोलात पण जाणार नाही. आम्ही शेठचा फोटो लावून जिंकलोय आणि आम्ही विचारांचे वारसदार आहो, आणि म्हणून…
सर्जेराव : आठेक महिने एवढंच ऐकतोय, कधीतरी कॅसेटची ‘बी’ साईड टाका की! सारखं बोअर मारत्या राव!
कांताराम : सरपंच, त्या तलाठ्याला पंचनामे पटपट करायला लावा ओ!
सर्जेराव : ते फक्त पटपट फेकू शकतात, कुणाला काम करायला सांगणं त्यांना जमणार नाही!
बाकेराव : तुम्ही आमच्यावर कितीही आरोप केले तरी आम्ही वेगवान निर्णय घेऊन विकास करूनच दाखवू, त्यासाठी आमच्याकडे कारेक्रम आहे…
सर्जेराव : काय कार्यक्रम आहे सांगा!
बाकेराव : एक फटक्यात बेरोजगारी आणि शेतकर्यांसाठी योजनाय…
सर्जेराव : आता पोरांना औतफाट्याला झुंपता का?
बाकेराव : नाही, आम्ही गावच्या सार्या पोरांना घेऊन अयोध्या दौरा करू, आणि बेरोजगारी, शेतकरी समस्या, महिला सक्षमीकरण अश्या सार्याच प्रश्नांसाठी रामाकडं साकडं घालू…
सर्जेराव : वा रे भामट्या! म्हणजे खायचं रावजीनं, अन देयचं देवजीनं!