येत्या २४ एप्रिलला सचिन वयाची पन्नाशी साजरी करेल. सचिनचं जगण्याचं तत्त्वज्ञान त्याच्या अनेक विचारांतून जाणवतं. त्यामुळेच त्या केवळ प्रतिक्रिया म्हणून मर्यादित न राहता, त्या पल्याड जाऊन जीवन जगण्याचे सुविचार होतात आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देतात.
– – –
‘खेळाचा आनंद लुटा. स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवू नका, कारण ती सत्यात उतरतात,’ हे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचं मत. क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन हे दैवत मानणार्या किंवा न मानणार्या असंख्य नागरिकांसाठी प्रेरणादायी सुविचारच आहे हा.
सचिन रमेश तेंडुलकर… या नावाने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील बरीचशी पानं व्यापली आहेत. १९८३च्या अनपेक्षित विश्वविजेतेपदानं क्रिकेट आपल्या देशात रुजलं. १९८७च्या रिलायन्स विश्वचषक यजमानपदानं भारतानं क्रिकेटच्या मंचावर अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर दोनच वर्षांनी मिसरूडही न फुटलेल्या एका षोड्षवर्षीय क्रिकेटपटूनं पाकिस्तानात चक्क अब्दुल कादिरच्या फिरकीचा खरपूस समाचार घेत क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर २०१३पर्यंत वानखेडे स्टेडियमवरील दोनशेव्या म्हणजेच अखेरच्या कसोटीपर्यंत एकूण २४ वर्षे ‘सचिन… सचिन…’ हा नाद प्रत्येक स्टेडियममध्ये घुमला. येत्या २४ एप्रिलला सचिन वयाची पन्नाशी साजरी करतो आहे. तो महान खेळाडू आहेच. पण, खेळ हेच जीवन असल्यामुळे आणि त्यात सर्वस्वाने रमल्यामुळे की काय, सचिन सहज काहीतरी बोलून जातो, त्याचा प्रेरणादायी सुविचार बनतो. त्याचं स्वत:चं म्हणून एक जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. ते या विधानांमधून झळकत असतं. केवळ कोणाच्या प्रश्नावर उत्तर किंवा प्रतिक्रिया म्हणून मर्यादित न राहता त्याची वचनं हे त्यापल्याड जाऊन जीवन जगण्याचे सुविचार बनतात आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देतात.
‘सचिन हा महान क्रिकेटपटू आहे, यापेक्षा सचिन हा चांगला माणूस आहे, असं लोक बोलतात, ते मला अधिक आवडतं. तुम्ही नम्र राहिल्यास निवृत्तीनंतरही लोक तुम्हाला प्रेम आणि आदर देतील,’ ही सचिनच्या विचारांतली शिकवण त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची. सचिनच्या निवृत्तीलाही येत्या काही महिन्यांत १० वर्षे पूर्ण होतील. पण सचिनला लोकांकडून आणि क्रिकेटपटूंकडून मिळणारं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. १६ नोव्हेंबर, २०१३ या दिवशी सचिननं निवृत्ती पत्करली. क्रिकेटरसिकांच्या साक्षीनं सचिननं भाषण केलं आणि मनं जिंकून मैदान सोडलं. काही वेळानं विराट कोहली त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, ‘पाजी आपने कहा था आपको याद दिलाने के लिए कि आपको पिच पे जाना है.’ सचिनला ते लक्षात होतं. मग सचिननं मैदानाला वंदन केलं. तो क्षण पाहणार्या अनेकांचं हृदय हेलावलं होतं.
सचिन म्हणजे विक्रमादित्य. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून एकूण ३४,३५७ धावा त्याच्या खात्यावर आहे. यापैकी १८,४२६ धावा कसोटी तर १५,९२१ धावा एकदिवसीय क्रिकेटमधल्या. याशिवाय एकंदर १०० शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आजही अबाधित आहे. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीतील विजयात सचिनचे योगदान मोठे आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे मानसोपचारतज्ज्ञ पॅडी अपटन यांनी सराव संपल्यावर सर्व भारतीय क्रिकेट संघाला एकत्रित बोलावलं. सर्वांना वाटलं की आता हे महाशय आपल्याला व्याख्यान देतील. परंतु आता तुमच्यासमोर सचिन बोलणार आहे, असे सांगून ते चक्क खुर्चीवर जाऊन बसले. मग सचिनच्या शब्दांनी भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि भारताने पाकिस्तानला नमवण्याची किमया साधली. हा सचिन फक्त व्याख्यान देऊन थांबला नाही, तर या सामन्यात मैदानावरही तो महावीराप्रमाणे लढला आणि सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. पण त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा क्षण म्हणजे २ एप्रिल, २०११ या दिवशी भारतानं श्रीलंकेला हरवून पटकावलेला विश्वचषक. ‘विश्वचषक स्पर्धेचा विचार केला तर ती एक प्रक्रिया आहे. आम्हाला थेट ५०व्या मजल्यावर उडी मारता येणार नव्हती. आपण तळमजल्यावर सुरुवात केली पाहिजे,’ अशा शब्दांत सचिननं विश्वचषकाच्या प्रवासाचं वर्णन केलं होतं. यात सचिनला बळ दिलं त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांनी. निकाल काय असेल, याची चिंता न बाळगता सर्वोत्तम प्रयत्न करावेत, हेच माझ्यावर वडिलांनी बिंबवलं, असं सचिन म्हणतो.
‘बाबा, हे शतक तुम्हाला समर्पित…!’ आभाळाकडे पाहून सचिन तेंडुलकरने बॅट उंचावली, तेव्हा ३३ कोटी देवांनीही त्याच्यावर फुले वर्षावण्यासाठी नभांगणात गर्दी केली असावी. २३ मे १९९९ हाच तो दिवस होता आणि स्थळ होते इंग्लंडमधील ब्रिस्टॉल. वडील ख्यातनाम साहित्यिक रमेश तेंडुलकर यांच्या निधनामुळे सचिनला इंग्लंडच्या विश्वचषक दौर्याहून माघारी परतावे लागले होते. परंतु तिकडे साता समुद्रापार भारतीय क्रिकेट संघाची अवस्था वाईट होती. आधी दक्षिण आफ्रिका, मग झिम्बाब्वेसारख्या संघानेही भारताला हरवले. सलग दोन पराभवांनंतर भारताचे आव्हान टिकणेही कठीण झाले होते. इकडे भारतात सचिनची आई रजनी तेंडुलकर यांनी त्याला धीर दिला आणि त्याला म्हणाल्या, ‘तू इंग्लंडमध्ये जा आणि देशासाठी खेळ. तिथे तुझी गरज आहे. तुझे वडील असते तर तेही तुला हेच म्हणाले अस्ाते.’ सचिनसाठी हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता. परंतु सचिनला मनाने खंबीर बनवले. गडाचे सारे दोर तोडण्यात आले आहेत. आता जिंकू किंवा मरू, या अविर्भावाने लढा, हा तानाजी मालुसरेचा इतिहास सचिनच्या पक्का पाठ होता. केनियाविरुद्धच्या लढतीत सचिनने १०१ चेंडूंत १४० धावांची शतकी खेळी साकारली आणि भारताला जिंकून दिले. तेव्हा त्याच्या मानसिक कणखरतेचा सार्या भारतभूमीला अभिमान वाटला होता.
जशी साहित्यिक वडिलांकडून सचिननं विचारांची दीक्षा घेतली, तसाच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला देतो. अर्जुनसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्वप्न जोपासून मेहनत करतोय. ‘अर्जुन, आयुष्य हे पुस्तकासारखं आहे. त्यात असंख्य अध्याय आहेत. त्यात अनेक धड्यांचाही समावेश आहे. ते विविध प्रकारच्या अनुभवांनी युक्त एका पेंडुलमसारखे दिसते. जिथे यश आणि अपयश, आनंद आणि दु:ख हे केवळ मध्यवर्ती वास्तवाचे टोक आहे. यश-अपयशातून शिकायचे धडेही तितकेच महत्त्वाचे आहेत. अनेकदा यश आणि आनंदापेक्षा अपयश आणि दु:ख हे मोठे शिक्षक असतात,’ ही विचारांची शिदोरी सचिननं अर्जुनला दिली आहे.
प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो, गोलंदाज कुणीही… वेगवान किंवा फिरकी आणि अगदी मैदानसुद्धा कोणतंही… सचिननं कशाचीही तमा न बाळगता तमाम भारतीय क्रिकेटरसिकांच्या आशा-अपेक्षांचं ओझं सांभाळत फलंदाजी केली. कारण तो मैदानावर असला की फटक्यांची नजाकत पाहायला मिळायची. भारत जिंकेल, ही आशा जिवंत असायची आणि तो बाद झाला की टीव्ही बंद व्हायचे, अनेकांनी स्टेडियमही सोडलंय. पण तू याकडे कसा पाहतोस, या प्रश्नावर सचिननं उत्तर दिलं की, ‘दडपणाची परिस्थिती हाताळण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्वत:ला स्थिर ठेवणे. आपल्या अंत:प्रेरणेचं अनुसरण करणं आणि स्पष्टपणे विचार करणं.’
सुख-दु:खाचे अनेक क्षण आयुष्यात अनेक धडे देतात. प्रत्येक सामना आयुष्य जगायला शिकवतो, हे सचिन आवर्जून सांगतो. कठीण स्थितीतील सामन्याकडे कसे पाहावे, यासाठीही सचिनचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तो म्हणतो, ‘सामना वाचवण्याचा प्रयत्न करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटी लक्ष्यं निश्चित करणं. हे पुढील पाच षटकं किंवा पुढील तास किंवा अगदी एका सत्रात फलंदाजी करण्याइतकं मर्यादित स्वरूपाचं असू शकतं. एखाद्या सत्रात विकेट पडली नाही, तर प्रतिस्पर्धी संघ कितीही नियंत्रणात असला तरी दडपण जाणवेल.’ सामन्यात पराभव वाट्याला आला तर कसे पाहावे, हेसुद्धा सचिननं उत्तमपणे सांगितलं आहे. आपल्याला अपयश येऊ शकतं, हे समजणं महत्त्वाचं आहे. परंतु त्यानंतर पुन्हा सावरणं अधिक महत्त्वाचं असतं, अशी सचिनची विचारधारा आहे. स्वभावानं शांत वाटणारा सचिन मैदानावर आक्रमक फलंदाजी करायचा. याबाबत एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘आक्रमकता आणि सावधगिरी यांच्यातील समतोल अत्यंत महत्त्वाचा असतो.’ सचिनच्या कारकीर्दीत आशा-अपेक्षांची पूर्तता न केल्यावर टीकाही त्याला सहन करावी लागली. पण टीकेकडेही सकारात्मकतेनं पाहावं, ही सचिनची वृत्ती. ‘लोक तुमच्यावर दगड फेकतील आणि तुम्हाला त्यांचे मैलाच्या दगडांमध्ये रुपांतर करायचं असतं.’ हेच सचिननं केलं आहे.
खेळातून मनोरंजन करण्याबरोबरच विचारप्रवृत्त करणार्या सुविचारांमधून चाहत्यांच्या, क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांत वेळोवेळी अंजनही घालणार्या या महान खेळाडूला सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा!