शिवसेनेचे पहिले अधिवेशन २२ आणि २३ जानेवारी १९८४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, दादर, मुंबई येथे शिवसैनिकांच्या प्रचंड उपस्थितीत, जल्लोषात आणि उत्साहात पार पडले.
शिवसेनेची स्थापना १९६६मध्ये झाली. परंतु शिवसेनेचे पहिले अधिवेशन भरवायला तब्बल १८ वर्षांनंतर १९८४ साल उजाडलं. पक्षाचे अधिवेशन घेणे ही संकल्पनाच शिवसेनेला नवीन होती. महाराष्ट्र राज्य पातळीवरचे हे पहिले अधिवेशन २२ आणि २३ जानेवारी १९८४ रोजी सावरकर स्मारकाच्या सभागृहात घेण्याचे ठरले. या अधिवेशनाला सुमारे ५००० प्रतिनिधी उपस्थित राहतील असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, ‘भारतास इस्लामी राष्ट्र बनवू पाहणार्या मुसलमानांना हाकललं पाहिजे.’ विशेष म्हणजे या अधिवेशनात ‘मुंबई वाचवा’ या विषयावर परिसंवाद घेण्याचे ठरले आणि त्यासाठी भाजपचे राम नाईक, संपादकद्वय विद्याधर गोखले व माधव गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले, तर ‘शिवसेनेकडून अपेक्षा’ या विषयावर कॉम्रेड एस. ए. डांगे, गोदी कामगार नेते एस. आर. कुळकर्णी व विचारवंत प्रा. धों. वि. देशपांडे यांनी बोलण्याचे मान्य केले. शिवसेनेच्या व्यासपीठावर कॉ. डांगे यांच्यासारख्या नेत्यांना येण्याची ही पहिलीच वेळ होती. या पहिल्या अधिवेशनात परस्परविरोधी विचारांची माणसं शिवसेनेच्या व्यासपीठावर प्रथम आली होती.
याच अनुषंगाने १५ जानेवारी १९८४च्या ‘मार्मिक’ साप्ताहिकात ‘शिवसेनेचे विचारमंथन’ अशा शीर्षकाखाली संपादकीय प्रसिद्ध झाले, त्यात अधिवेशनाची रूपरेषा मांडण्यात आली. ‘‘शिवसेनेच्या विभागीय शिबिरानंतर आता २२ आणि २३ जानेवारी रोजी राज्य पातळीवर पहिले अधिवेशन भरणार आहे. या अधिवेशनात मुंबईप्रमाणेच रत्नागिरी, नाशिक, नागपूर, धुळे, जालना, लातूर, ठाणे, सांगली, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, सिंधुदुर्ग, पुणे, भुसावळ, बुलढाणा, बीड, संभाजी नगर इत्यादी भागांतील शिवसेनेचे प्रतिनिधीही सहभागी होतील. सीमा भागातील शिवसैनिकांनाही निमंत्रित करण्यात आले असून गुजरातमधील शिवसैनिकही अधिवेशनाला हजर राहतील. अधिवेशनाच्या बांधणीला जोमाने सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे हे अधिवेशन इतर पक्षांप्रमाणे अंतर्गत लाथाळ्या आणि बेशिस्तीचे प्रदर्शन न ठरता एक युगप्रवर्तक विचारमंथन ठरणार आहे.’’
त्याचबरोबर २२ जानेवारी १९८४च्या ‘मार्मिक’च्या अग्रलेखात शिवसेनेची ध्येयधोरणे स्पष्ट करण्यात आली. ‘‘गेल्या अठरा वर्षांत आम्ही कधीही थांबलो नाही. गती हा शिवसेनेचा आत्मा आहे, म्हणून गेल्या अठरा वर्षांत या देशाचे राजकारण आणि समाजकारणही वारंवार गोठले, पण पृथ्वीच्या फेर्याप्रमाणे शिवसेनेची गती कोणीही रोखू शकले नाहीत. जे स्मरणशक्तीला ताण देतील त्यांना आठवेल की, गेल्या अठरा वर्षांत किमान सतरा वेळा ‘आता शिवसेना संपली’ अशी ‘शापवाणी’ आळीपाळीने विरोधकांकडून उच्चारली गेली. पण इतिहासाच्या पानावर आज काय लिहिले गेले? शापवाणी उच्चारणारे नष्ट झाले आणि शिवसेना मात्र वाढीस लागली. आचार्य अत्र्यांपासून ते डांग्यांपर्यत आणि एस.एम.पासून ते यशवंतरावांपर्यंत सर्वांशी आम्ही काय कमी लढलो? पण म्हणून त्यांचे मोल कमी होत नाही आणि तेथे मत्सरालाही थारा नाही आणि म्हणूनच उद्याच्या अधिवेशनाला शिवसेनेवर बोलायला आम्ही कॉ. डांग्यांना सन्मानाने बोलावले आहे आणि तेही मोठ्या मनाने येऊन आपले विचार मांडणार आहेत.
या अधिवेशनाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ राजकीय नेते आणि विचारवंतांचे मार्गदर्शन होय. ‘‘गतेतिहासात जाऊन आजचे प्रश्न सुटणार नाहीत. प्रॅक्टिकल सोशॅलिझमच्या गप्पांनीही जमायचं नाही. कारण आधी ‘थियरी’ लागते. त्यासाठी विचार करण्याची सवय लावा, असा सल्ला ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. श्री. अ. डांगे यांनी काल शिवसैनिकांना दिला. ‘शिवसेनेने आतापर्यंत काय केलं हे मी विचारणार नाही, तर तिने पुढे काय करावे असं मला वाटतं ते मी आज सांगणार आहे’, अशी सुरुवात करून भाई डांगे यांनी खुसखुशीत शैलीत शास्त्रीय समाजवादाच्या विचारसरणीचीच शिवसैनिकांना तोंडओळख करून दिली. कापड उत्पादन वाढूनही कापड काढणार्या कामगाराला लंगोटीपुरतंच कापड का मिळतं? विक्रमी पीक पिकविणारा शेतकरी उपाशी का? अमेरिकेसारख्या संपन्न देशातही बेकारी कशी? असे नेहमीच्या जीवनातील प्रश्न विचारून श्री. अ. डांगे यांनी आम्ही कम्युनिस्टांनी याचा विचार कसा केला आहे, याचे सोप्या भाषेत विवरण केले. ‘निवडणुकीच्या पेटीतून जेव्हा मंत्री होतो. तेव्हा त्याच्यावर लोकांना उत्तर द्यायचं काही बंधन असतं का, असा सवाल करून डांगे यांनी येथेही सत्ता उलथवण्याचं काम करायला पाहिजे,’ असे उद्गार काढले. ‘मात्र चार दुकाने लुटून काही होणार नाही. घाव मुळावर घातला पाहिजे’, असं सांगून कॉ. डांगे यांनी समस्येचे मूळ भांडवलदारी व्यवस्थेत आहे आणि ती नष्ट करून संपत्तीचं वाटप केले पाहिजे, हे स्पष्ट केले.
शिवसेनेच्या राजकीय तडजोडीत कोणत्याही प्रकारची सुसंगती नव्हती, असं मत व्यक्त करून प्रा. धों. वि. देशपांडे यांनी ‘मार्क्सवाद स्वीकारायचा तर त्याची आनुषंगिक बाजू मान्य करावीच लागते याचा विचार शिवसैनिकांनी केला आहे का, असा सवाल केला. कामगार चळवळ पक्ष, सरकार किंवा मालक यांची बटिक असता कामा नये आणि अन्यायावर आधारलेली समाजरचना मोडण्याचे तिचे ध्येय असले पाहिजे, या मूळ पायावर शिवसेनेची कामगार चळवळ राहावी अशी अपेक्षा गोदी कामगार नेते एस. आर. कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
विचार करण्याऐवजी नेते मंडळी देतील त्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसैनिकांनी स्वतःला झोकून देण्याचे महत्त्व चित्रपट अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या ‘चावट’ आणि करमणूकप्रधान भाषणात प्रतिपादन केले. नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांचेही भाषण झाले. पहिल्या अधिवेशनाला कलावंतांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या अधिवेशनाचा समारोप शिवतीर्थावरील प्रचंड जाहीर सभेने शिवसेनाप्रमुखांनी केला.
‘‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न एक महिन्याच्या आत सोडवला गेला नाही, तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुंबईत शिवसेना उघड्या मोटारीतून फिरू देणार नाही, अशी घोषणा शिवसेनाप्रमुखांनी केली. ‘पंतप्रधानांवर अवलंबून न राहता आता शिवसेना ‘आपल्या’ मार्गाने हा प्रश्न सोडवणार, अशी ग्वाही देऊन त्यांनी ‘शिवसेनेच्या आंदोलन काळात उरणला केले तसेच अत्याचार शिवसैनिकांवर पोलिसांनी केले तर त्याचा प्रतिकार करण्यात येईल,’ असा इशाराही दिला. ‘मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सत्तेवर आल्यापासून काय भलं केलं ते सांगावं, असा सवाल करून बाळासाहेब म्हणाले, ‘उरण-भिवंडीसारख्या ठिकाणी न्याय मागायला गेलेल्या गरीब जनतेवर गोळ्या घालणारं दादांचं शासन बेचिराख व्हायला हवं होतं. या मंत्रिमंडळातील नालायक मंत्र्यांना कोणत्याही समारंभाचं आमंत्रण देऊ नका आणि दिसतील तेथे घेराव घाला’, असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला. ‘येत्या ३१ तारखेला मुंबई-पुणे बंद राहिलं पाहिजे,’ असेही आवाहन केले.
शिवसेनेच्या या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर महाड (रायगड) येथे २ आणि ३ नोव्हेंबर १९८५ रोजी दुसरे अधिवेशन संपन्न झाले. तिसरे अधिवेशन पुणे मुक्कामी ३० आणि ३१ डिसेंबर १९८८ रोजी तर चौथे राज्यव्यापी अधिवेशन १७ नोव्हेंबर १९९४ रोजी नाशिक येथे पार पडले. त्यानंतर शिवसैनिकांना, पदाधिकार्यांना आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी शिबीरे, विभागीय अधिवेशने घेण्यात आली.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची ढाल करून हिंदुत्वाची लढाई जे खेळत आहेत आणि महाविकास आघाडीत शिवसेना सामील झाल्यामुळे शिवसेनेचे सावरकरप्रेम बेगडी आहे असा आरोप करत आहेत, त्यांना ना शिवसेनेचे हिंदुत्व समजले, ना स्वा. सावरकरांचे हिंदुत्व समजले. इंदिरा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेला आणि उद्धवजी ठाकरे यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न भाजपाने केला. मग २६ मार्च रोजी मालेगाव येथील शिवसेनेच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वा. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे ठासून सांगितले. शिवसेनेची सावरकरांविषयी भूमिका पूर्वी होती तीच आजही आहे.
या बेगडी हिंदुत्ववाद्यांना आणि सावरकरप्रेमींना एक आठवण करून द्यावीशी वाटते ती अशी की, स्वा. सावरकरांचे उचित राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी भाजपा, संघ, हिंदु महासभेपेक्षा शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे अधिक आग्रही होते, प्रयत्नशील होते. क्रांतिकारकांचे मुकुटमणी, ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, देशभक्त, प्रभावी वक्ता, कवी, विज्ञाननिष्ठ साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या सावरकरांच्या स्मारकासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दादरला कॅडल रोड (सावरकर मार्ग) प्लॉट मिळवून देण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी सतत मनापासून प्रयत्न केला आणि त्यावर सावरकरांचे भव्य स्मारक उभे राहिले. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये म्हणून स्वतः बाळासाहेबांनी त्या प्रकल्पाचा सतत पाठपुरावा केला, हा इतिहास आहे. अशा या स्फूर्तिदायक, देशप्रेमाची प्रेरणा देणार्या, विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाची कास धरणार्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात शिवसेनेने आपले पहिले राज्यव्यापी अधिवेशन भरवून सावरकरांविषयीचे प्रेम, आदर आणि निष्ठा दाखवली.