इंतजार का फल मिठा होता है अशी हिंदी म्हण चित्रपटाला कधी फळलीय तर कधी मारकही ठरली. कभी हार कभी जीत व्हायचचं.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटातील एक म्हणून गौरवण्यात येत असलेल्या के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (रिलीज ऑगस्ट १९६०) या चित्रपटाचा सर्वाधिक काळ वाट पहावी लागलेला चित्रपट म्हणून नेहमीच कौतुकाने उल्लेख होतो. मूळ कलाकारांच्या जागी पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार आणि मधुबाला यांची निवड झाली आणि भव्य सेटसाठी छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष अशा विविध स्तरांवर अतिशय खोलवर लक्ष, मेहनतीची तयारी, वाढीव खर्च यातून एका दशकापेक्षा जास्त वेळ घेत घेत आहे अजरामर ऐतिहासिक कलाकृती पडद्यावर आणली. (पडद्याभर ते दिसतेय. ‘मुगल ए आझम’ कितीही वेळा पाहिला तरी तोच कलात्मक अनुभव येतो. दृश्य सौंदर्याचा प्रत्यय येतो.) बरं हा इतका कालावधी का बरे लागला? तर आपली ही कलाकृती अधिकाधिक प्रभावी, प्रवाही, देखणी आणि लोकप्रिय व्हावी हाच त्यामागचा उद्देश (खरं तर तळमळ).
पिक्चर दिल से बनती है, पैसे से नहीं अशी उत्कट भावना असल्याचा तो काळ होता. दिवस मोजून चित्रपट निर्मिती होत नसे आणि किती दिवसात चित्रपट निर्माण झाला अशा बातम्या होत नसत. त्या काळातील अनेक चित्रपट रसिकांचे तर सिनेमाच्या मुहूर्तापासूनच ‘हा चित्रपट कधी बरे रिलीज होतोय नि आपण पाहतोय’ हे जणू ब्रीदवाक्य असे. त्याची वाट पाहणे असे.
आजच्या ग्लोबल रसिकांना रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ (सेन्सॉर २०२०) कधी बरे रिलीज होतोय नि आपण पाहतोय असं होते. ‘हे वाट पाहणे ‘ नेमके कशामुळे होते याचे वेगळे कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. कोरोना काळातील एकूणच सामाजिक, आरोग्य, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थिती पाहता आणखीन किती महिने ‘सूर्यवंशी’ आपल्यापासून असा दूर राहणार याचे उत्तर फिल्मी ज्योतिषाकडेही नव्हते. अधिक वाट न पाहता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजचा चांगला पर्याय होता. अर्थात चित्रपटाचा निर्मिती अवाढव्य खर्च आणि अपेक्षित आर्थिक यश यातून तो निर्णय घेतला जातो. त्यातील ‘आकड्याचे सत्य’ निर्मितीवर खर्च करणारे आणि आर्थिक यश मिळवणारेच जाणोत अन्यथा फक्त प्रेस रिलीज.
एखाद्या चित्रपटाची अशी वाट पाहणे ही दोन भिन्न काळातील आणि तशीच भिन्न स्वरुपाची उदाहरणे आहेत. असे इतरही काही चित्रपटांबाबत काही ना काही कारणास्तव घडतच असते.
अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा या जोडीचा १९७२ साली सेटवर गेलेला एक चित्रपट चक्क २००८ साली एकदाचा पडद्यावर आला याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. माझ्यासारखा अमिताभ भक्त त्याच्या अशा रखडून रखडून एकादाचा पडद्यावर आलेल्या आणि अगदी न आलेल्या चित्रपटांची खबर ठेवत असतोच. (रुद्र, शिनाख्त, आलिशान, लंबू दादा वगैरे वगैरे न आलेल्या) पण हा चित्रपट इतका काळ निर्मिती अवस्थेत का राहिला? काही चित्रपटांच्या निर्मितीच्या गोष्टीत अनेक खाचखळगे, रस्ते चुकलेले असतात. चित्रपटसृष्टीच्या भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी आणि निरीक्षण यातून मला अशा अनेक गोष्टी माहित झाल्या. नव्वदच्या दशकात असेच एकदा एका शूटिंग रिपोर्टिंगसाठी आमंत्रण आले. ‘यार मेरी जिंदगी’चे इर्लाच्या चिरंजीव बंगल्यात शूटिंग आहे (हा बंगला कालांतराने पाडला.. ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील अनेक मराठी चित्रपटाचे शूटिंग येथेच झाले). या चित्रपटात अमिताभ, शत्रूघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत हे माहित होते, पण हा चित्रपट केव्हापासून तरी बनतोय आणि आता बहुतेक तो पूर्ण होईल असे वाटले. डब्यात गेला आहे असेच समजत होतो. प्रत्यक्षात सेटवर गेल्यावर लक्षात आले की, आता मूळ दिग्दर्शक मुकुल दत्त नव्हे तर अशोक गुप्ता करीत आहे आणि आजच्या शूटिंगमध्ये सुधाचंद्रन वगैरे स्टार आहेत.
हा चित्रपट १९७२ साली सेटवर गेला तेव्हा अमिताभचा सुरुवातीचा ‘पडता काळ’ सुरु होता, शत्रुघ्न सिन्हा लहान मोठ्या भूमिका साकारत आपला जम बसवत होता (हीदेखील एक व्यावसायिक गरज असते हो). दिग्दर्शक मुकुल दत्त जे. ओमप्रकाश निर्मित ‘आन मिलो सजना’च्या खणखणीत यशाने उत्साहात होता आणि या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले. ते थोडे फार होतेय तोच प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३)च्या खणखणीत यशाने अमिताभला ‘अॅन्ग्री यंग मॅन’ची इमेज चिकटली, तो स्टार झाला आणि इतर अनेक चित्रपटात बिझी होत गेला. शत्रूघ्न सिन्हादेखिल व्हीलन म्हणून लोकप्रिय झाला, मग हीरोगिरीकडे वळला. अशा पध्दतीने करियर पुढे जात असतानाच अनेक स्टार्सचे काही चित्रपट मागे मागे पडत जातात. आणि अशा चित्रपटांना सतत टाळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, आपली डायरी पुढची दोन वर्षे तरी फुल्ल आहे, तारखाच नाहीत असे कारण पुढे ठेवणे. अशा पध्दतीने अनेक चित्रपट कायमचे डब्यात जातात. तर एकादा खमक्या निर्माता अजिबात हार मानत नाही. तो मूळ पटकथेत फेरफार करीत करीत इतर कलाकारांना घेत घेत एकदाचा तो चित्रपट पडद्यावर आणतो. आता २००८ साली रिलीज झालेल्या चित्रपटात १९७२चे अमिताभ व शत्रूघ्न सिन्हा कसे दिसले असतील आणि त्यांची किती दृश्ये होती हा विषयच वेगळा. अशोक गुप्ताने निर्मिती आणि दिग्दर्शन करीत हा चित्रपट पडद्यावर पोहचवला यासाठी त्याचे कौतुक हवे. बीग बीच्या निस्सीम फॅन्सना ही गोष्ट माहीत असेलच. खुद्द अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा आपल्या या चित्रपटाची आठवण ठेवू इच्छितात का?
एखाद्या चित्रपटाला रिलीज व्हायला उशीर होण्याच्या गोष्टीतही अनेक रंग आहेत. आणि हीच तर सिनेमाच्या जगाची अनोखी रित आहे. दिलीपकुमारची तिहेरी भूमिका असलेल्या आणि सायरा बानू व लीना चंदावरकर अशा दोन नायिका असलेल्या असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’ (१९७६)चे रिलीज होणे रिशूटिंगने लांबले होते. दिलीपकुमार दिग्दर्शकांच्या कामात ढवळाढवळ करतो हे त्या काळातील सर्वात खमंग गॉसिप्स. भारी चघळले जाई आणि त्यासाठी दिग्दर्शक राम मुखर्जींचा ‘लीडर’ (१९६४), दिग्दर्शक के. आर. कारदारचा ‘दिल दिया दर्द लिया’ (१९६६), दिग्दर्शक ए. भीमसिंगचा ‘आदमी’ (१९६८), दिग्दर्शक एच. एस. रवैलचा ‘संघर्ष’ (१९६८), दिग्दर्शक बी. आर. चोप्रांचा ‘दास्तान’ (१९७२) या चित्रपटाच्या फ्लॉप्सचे उदाहरण दिले जाई. दिलीपकुमारच्या अनावश्यक हस्तक्षेप, सल्ले, सूचना यामुळे हे चित्रपट फसल्याचे त्या काळात रकानेच्या रकाने लिहिले जाई. आणि याच कारणामुळे ‘बैराग’ पूर्ण व्हायला उशीर होतोय हे जणू अधोरेखित होत होते. पण हे उशीर होणे हे चक्क ‘बैराग’च्या पथ्यावर पडले. यातील गाणी तोपर्यंत लोकप्रिय तर झाली, पण ‘छोटी सी उमर मे लग गया लोग’ हे गाणे बिनाका गीतमालामध्ये एकदा सोळा वेळा वाजल्यानंतर पुन्हा एकदा काही बुधवारनंतर आले. ‘सारे शहर में आपसा कोई नहीं’, ‘पीते पीते कभी कभी जाम बदल जाते है’ (गीतकार आनंद बक्षी, संगीत कल्याणजी आनंदजी) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्या काळात अनेक चित्रपटांची गाणी खूपच अगोदरपासून लोकप्रिय होत आणि त्यामुळे त्या चित्रपटाच्या रिलीजकडे फार लक्ष लागायचे हो. तात्पर्य, रिलीज लांबले तरी हरकत नाही, गाण्यांमुळे चित्रपट रसिकांसमोर राह्यचा. (‘सूर्यवंशी’ची गाणी अशीच लोकप्रिय व्हायला हवी होती असे सकारात्मक दृष्टिकोनातून वाटते. राजीव रॉय दिग्दर्शित ‘मोहरा’मधले ‘टीप टीप बरसा पानी’ नवीन अवतारात ‘सूर्यवंशी’मध्ये आले आणि तीस वर्षांनीही अक्षयकुमार कसा फिट आहे याचे कौतुक झाले असले तरी मूळ गाणेच सरस. दोन्हीत म्हणजे पहिल्यात रविना टंडन आणि मग कतरिना कैफ ओलेत्या रुपात मादक रुपात आहेत तेवढेच काय ते ताजेपण.)
सतीश कौशिक दिग्दर्शित चक्क दोन चित्रपट असेच कधी बरे रिलीज होताहेत असे झाले होते, पण ते दोन्ही चित्रपट पडद्यावर आले तेच पडले. कारण वाट पाहण्यातीलही उत्सुकता संपली होती. मग सगळेच शिळे वाटू लागले. ते चित्रपट होते, बोनी कपूर निर्मित ‘रुप की रानी चोरों का राजा’ (१९९३) आणि ‘प्रेम’ (१९९५). यातील ‘रुप की रानी…’चे दिग्दर्शन शेखर कपूरने मध्येच सोडल्यावर सतिश कौशिकचा दिग्दर्शक म्हणून जन्म झाला. आता चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणजे मूळ कथा, त्यावर पटकथा संवाद आणि मग शूटिंगसाठी पटकथा, शूटिंगसाठी लोकेशन्स ठरवणे, कलाकारांची निवड करणे, तारखा मिळवणे आणि जुळवणं असा बराच मोठा प्रवास सुरु असतो आणि सिनेमाचे शूटिंग हे वेगवेगळ्या शेड्युलप्रमाणे होते. मूळ दिग्दर्शकाचे व्हीजन दुसरा दिग्दर्शक सहजपणे आत्मसात करु शकत नाही. अशातूनच रिशूटींगने लांबले आणि रुप की रानी… पडद्यावर येणेही लांबले. त्या काळात एक विनोद सांगितला जाई, काही सांगता येत नाही हो, फस्ट डे फर्स्ट शोपर्यंत ‘रुप की रानी’चे रिशूटींग होईल… अनिल कपूर आणि श्रीदेवीची भूमिका असलेला हा भव्य चित्रपट रसिकांनी नाकारला. कला दिग्दर्शन मात्र भन्नाट होते. तेवढ्यासाठी कोणी चित्रपट पाहत नाही.
‘प्रेम’मधून बोनी कपूर आणि अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरने रुपेरी पदार्पण केले. सतिश कौशिकने पुनर्जन्माच्या पटकथेवर काम सुरु केले आणि नायिका म्हणून तब्बूची निवड केली. (तत्पूर्वी, तब्बूने देव आनंद दिग्दर्शित ‘हम नौजवान’मध्ये कॉलेज युवती साकारली होती. साल १९८६). आता नायिका म्हणून तब्बूने नवीन चित्रपट स्वीकारायला सुरुवात केली आणि ‘पहला पहला प्यार’, ‘विजयपथ’ चित्रपट पूर्ण होऊन रिलीजही झाले आणि ‘रुक रुक गर्ल’ इमेज एस्टॅब्लिज झाली. तरी ‘प्रेम’ पूर्ण होऊन पडद्यावर येतच होता. हा इतका आणि असा उशीर होत गेला की, संजय कपूरला वरिष्ठ नवीन चेहरा असे थट्टेने म्हटले गेले… आणि जेव्हा ‘प्रेम’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याचे आकर्षण ओसरले होते. मुंबईत मेन थिएटर इरॉसला पहिले तीन दिवस गर्दी झाली इतकेच.
काही चित्रपटांच्या नशिबी हे असे ‘कधी बरे रिलीज होणे, हे त्यांच्या नशिबी नसते’. कधी ते ‘एकदाचे पूर्ण होऊन पडद्यावर येऊन सुपर हिट होणे’ही असते (रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’च्या बाबतीत तेच झाले. रमेश सिप्पीने प्रत्येक दृश्यावर अधिकाधिक मेहनत घेतली. विशेषतः गाण्यावर त्याने घेतलेली मेहनत खूप कौतुकाची झाली… ‘चेहरा है या चांद खिला है’ या गाण्यात विशिष्ट वेळचेच उन हवे म्हणजे ते अधिक उत्तम दिसेल असे दिग्दर्शक रमेश सिप्पीने मानले आणि दररोज दुपारी ठरावीक वेळीच शूटिंग केले. मढच्या अक्सा बीचवर त्यासाठी कोळी वस्तीचा लावण्यात आलेला भव्य सेट तुम्ही चित्रपटात नक्कीच पाह्यला आहे) तर एखाद्या रखडून रखडून आलेल्या चित्रपटाच्या नशिबी ‘पडणे’ असते (हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नौकरी’ चित्रपटाचे तेच झाले. राज कपूर आणि राजेश खन्ना त्यात एकत्र आल्याचा योग आला होता. हे दोघे असे एकत्र आले म्हणजे काहीतरी वेगळे पाह्यला मिळेल असे वाटणे स्वाभाविक आहे. पण नंतर हा चित्रपट कधी बरे प्रदर्शित झाला आणि गेलादेखिल हेच अनेकांना समजलेही नाही. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर अप्सराला मॅटीनी शो होते.)
आपली चित्रपटसृष्टी अशाच अनेक लहान मोठ्या उलटसुलट गोष्टीनी खचाखच भरलीय, रंगलीय. अहो, सगळ्याच गोष्टी सारख्याच असतील तर ते सिनेमाचे जग कसले? आणि आपल्या चित्रपटसृष्टीतील छोट्या छोट्या गोष्टींचा रंग अनोखा आहे. पडद्यावर येत असलेल्या चित्रपटाइतकेच खरं तर त्याहीपेक्षा जास्त असे हे चित्रपटाचे जग जास्त रंजक आणि गंमतीदार आहे. ते जेवढे जाणून घ्यावे तेवढे थोडेच आहे…
असाच एक बराच काळ वाट पहावी लागलेला चित्रपट, ‘जय शिव शंकर’. (१९९०) या चित्रपटाच्या निमित्ताने राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या एकत्र येऊन काम करु लागले इतकेच नव्हे तर ते का एकमेकांपासून वेगळे राहत असताना या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचा निर्माता खुद्द राजेश खन्नाच होता. या चित्रपटाच्या मुहूर्ताचे माझ्या हाती आमंत्रण आले तेव्हा या चित्रपटात राजेश खन्नाची नायिका म्हणून डिंपल कापडिया आहे हे वाचून आश्चर्य वाटले. याचे कारण म्हणजे, राजेश खन्नापासून वेगळे होत डिंपलने रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ (१९८५) पासून रुपेरी क्षेत्रात पुनरागमन केले होते. या दोघांच्या संसारातील भांडणे, वाद, आरोप प्रत्यारोप यावर गॉसिप्स मॅगझिनमधून इतके आणि असे शिजवले अथवा पिकवले गेले की हे दोघे इतक्यात काही एकत्र नांदतील असे वाटत नाही अशी खात्री वाटत होती. पण सिनेमाच्या जगात काहीही घडू शकते तसेच हे झाले आणि हे दोघे एकत्र येत असलेल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला आवर्जून हजर राह्यलाच हवे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील देवळात या चित्रपटाचा मुहूर्त होता. राजेश खन्नाच्या अगोदर डिंपल आली ही बातमी होऊ शकते का? त्या काळात अशा गोष्टींच्याही बातम्या होत. चित्रपटात या दोघांसह जितेंद्र, पूनम धिल्ला, चंकी पांडे, संगीता बिजलानी इत्यादींच्या भूमिका होत्या. सगळे मुहूर्ताला हजर असल्याने फोटोग्राफर फॉर्मात होते. राजेश खन्ना स्वतः निर्माता असल्याने आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराला व्यक्तिशः भेटला. माझ्यासाठी हा सुखद अनुभव होता. ‘यादगार पल’ ठरला.
अधूनमधून या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग, कधी शूटिंग यांच्या बातम्या येत होत्या. राजेश खन्ना आणि डिंपल पतीपत्नी पहिल्यांदा एकत्र येऊन चित्रपटात भूमिका साकारत आहेत हेच केवढे तरी उत्सुकता वाढवणारे होते. बरेच दिवस अशा बातम्या येत राहिल्या. पिक्चर काही पूर्ण होत नव्हता. डिंपल अनेक चित्रपटात बिझी असल्याने तिच्या तारखा मिळत नाहीत अशी बातमी होती. पण आपला पती निर्माता असलेल्या चित्रपटाला तिने प्राधान्यक्रमाने तारखा द्यायला नकोत का असा एक मध्यमवर्गीय प्रश्न मनात आला तरी त्याचा काहीही उपयोग नाही असेही लक्षात आले.
…अखेर चित्रपट पूर्ण झाला. रस्त्यावर होर्डींग्स आणि पोस्टर्स लागली/चिकटली. अगदी चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख ठरली. थिएटरवरची अॅडव्हास बुकिंगची खिडकी उघडली. आणि पिक्चर रिलीजच्या दिवशीच राजेश खन्नाच्या खार येथील
ऑफिसमध्ये आयकर खात्याची धाड पडली आणि पिक्चरचे प्रदर्शन रोखले गेले ते अगदी कायमचे… कालांतराने हा चित्रपट
युट्यूबवर आला ते ठीक आहे हो. पण तोपर्यंत त्याच्याबद्दलची उत्सुकता संपुष्टात आली होती… एखादा शो सुरु होण्यापूर्वीच संपतो तो असा.