लोकसभा निवडणुकीत १९७७ साली धुव्वा उडलेल्या काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधी यांच्या बलाढ्य नेतृत्वाखाली लगेचच उभारी घेतली. नंतरच्या १९८० साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ७७च्या पराभवाची परतफेड करत घवघवीत यश मिळवले आणि केंद्रात पुन्हा सत्ता हस्तगत केली. काँग्रेसला ३५० जागांवर विजय प्राप्त झाला, तर त्याच्या खालोखाल लोकदलाला अवघ्या ४१ जागा मिळाल्या. १९७७ साली सत्तेवर आलेल्या जनता पक्षाला तर ३१ जागांवरच समाधान मानावे लागले. इंदिरा काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल प्रतिक्रिया देताना जनसंघाचे आणि जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी म्हणाले की, ‘‘आमच्या आपापसातील भांडणामुळे आम्हाला जनतेने शिक्षा दिली.’’
या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दक्षिण मुंबईमधून प्रि. वामराव महाडिक तर ठाणे येथून सतीश प्रधान यांना उमेदवारी दिली. इंदिरा काँग्रेसच्या लाटेत हे दोन्ही शिवसेना उमेदवार पराभूत झाले. केंद्रात सत्तेत येताच इंदिरा गांधींनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त केली आणि मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांना जावे लागले. महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. इंदिरा काँग्रेसच्या या मनमानीविरोधात शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. परंतु शिवसेना या विरोधी पक्षांच्या एकजुटीपासून अलिप्त राहिली.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. शिवसेनेने इंदिरा काँग्रेसबरोबर युती करण्याची इच्छा प्रकट केली. युतीची बोलणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते प्रि. मनोहर जोशी आणि प्रि. वामनराव महाडिक यांनी इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. अ. र. अंतुले यांच्याशी चर्चा केली. पण ती निष्फळ ठरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशाची सद्य परिस्थिती पाहत विधानसभा निवडणूक न लढवता इंदिरा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी त्यांच्यावर विरोधकांनी चौफेर टीका केली. मग या निर्णयाचे स्पष्टीकरण त्यांनी ‘मार्मिक’मध्ये ११ मे १९८० रोजी लिहिलेल्या ‘इंदिरा काँग्रेसला पर्याय नाही’ या अग्रलेखात दिले. ‘‘आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसला पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. त्यामुळे शिवसेनेचा एकही उमेदवार महाराष्ट्रात उभा राहणार नाही. हा निर्णय थोडाफार धक्का देणारा असला तरी तो आम्ही अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे.’’ अपेक्षेप्रमाणे विधानसभेत इंदिरा काँग्रेसला बहुमत मिळाले. या निवडणुकीत त्यानंतर धक्कातंत्र वापरून इंदिरा गांधी यांनी बॅ. अ. र. अंतुले यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविले. परंतु नंतर सिमेंट घोटाळ्याच्या आरोपावरून अंतुले यांना पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी बॅ. बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यावेळी १९८१ साली सुरू झालेला मुंबईतील गिरणी कामगारांचा संप बेमुदत सुरूच होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नावरून मराठवाडा पेटला होता. महाराष्ट्रातील राजकारणाचे हे असे अस्थिर चित्र होते. हे सगळे सावरण्यासाठी महाराष्ट्राला खंबीर नेतृत्वाची गरज होती.
महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची ताकद वाढली होती. तिला सत्तेवरून दूर करणे कठीण होते. लवकर निवडणुका होण्याची शक्यताही नव्हती. गिरणी कामगारांचा संप मिटत नव्हता आणि संख्येने विरोधी पक्ष दुर्बल होता. अशावेळी २६ ऑक्टोबर, १९८२ रोजी काँग्रेस (स) चे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. ‘‘उद्या दसर्याच्या मुहूर्तावर काँग्रेस (स), लोकदल (क) आणि शिवसेना या तीन पक्षांची युती होणार आहे. यासंबंधात जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे आणि मी शिवाजी पार्कवर उद्या भाषणं करणार आहोत.’’ हे सांगत असताना त्यांनी जाहीर केले की, ‘‘भारतीय जनता पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनीसुद्धा या युतीत सामील व्हावं म्हणून प्रयत्न केले जातील.’’
दसर्याच्या मुहूर्तावर पवार, फर्नांडिस आणि ठाकरे या त्रिमूर्ती नेतृत्वाची शिवाजी पार्कला प्रचंड सभा झाली. या ‘मैत्री मेळाव्यात’ फर्नांडिस यांनी मागणी केली की गिरणी कामगारांचा पगार वाढवून मिळालाच पाहिजे. तसेच त्यांनी ९ महिने १० दिवस संप चालविणार्या डॉ. सामंत यांच्यावरही नाव न घेता टीका केली. काँग्रेस (स) चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘‘केंद्र सरकार आणि डॉ. सामंत यांनी एकत्र बसून प्रश्न सोडवला नाही, तर आम्हाला यात लक्ष घालावे लागेल.’’ मग काय होईल ते सांगता येणार नाही. भाषणात त्यांनी बाबासाहेब भोसले यांच्यावरही कडाडून टीका केली. ते म्हणाले, ‘‘कोणालाही त्यांचं नाव ठाऊक नाही, महाराष्ट्राचे सगळे जिल्हे, निम्मे तालुके, मुंबईतील रेल्वे स्थानके, राज्याचे प्रश्न ज्यांना ठाऊक नाहीत, असा माणूस लॉटरी लागून मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्राची इज्जत गेली आहे. भोसल्यांचं राज्य आले म्हणून टेंभा मिरवणार्या या माणसाने छत्रपतींची विटंबना थांबवावी.’’
शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच्या पद्धतीने भाषणात ठासून सांगितले की, ‘‘राज्यात १९८५ साली किंवा केव्हाही निवडणुका येवोत, श्रीमती इंदिरा गांधींची सत्ता येथे पुन्हा येणार नाही. त्या जाणार म्हणजे जाणार. त्यांना घालवणार म्हणजे घालवणार. त्यांना येऊ देणार नाही म्हणजे नाही.’’ बॅ. अंतुले मुख्यमंत्रीपदी असेपर्यंत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसवर टीका केली नाही. प्ारंतु अंतुले मुख्यमंत्रीपदावरून जाताच शिवसेनेने इंदिरा काँग्रेसवर तोंडसुख घेतले, त्यामुळे शिवसेनेवर टीका झाली.
शरद पवारांच्या मेळाव्यात गिरणी संपाचा उल्लेख होणे अपरिहार्य होते. येत्या आठ दिवसांच्या आत संप न मिटल्यास तो मिटावा म्हणून मैदानात उतरण्याची घोषणा केली. ”गिरणी संपाची समाप्ती हा प्रश्न वेगळ्या चर्चेचा विषय आहे. कोणाच्याही प्रयत्नांनी का होईना, पण आता अटीतटीने चालविलेला हा संप लवकरात लवकर मिटावा आणि यंदाची दिवाळी अंधारात काढण्याचे कामगारांवर ओढवलेले भीषण संकट दूर व्हावे एवढीच सदिच्छा आम्ही तूर्त येथे व्यक्त करतो,’’ असे बाळासाहेब म्हणाले. ठाकरे, पवार, फर्नांडिस या त्रिमूर्तींच्या सभेवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी कडक टीका केली. तर डॉ. सामंत म्हणाले, ‘‘ठाकरे-पवार-जॉर्ज यांची लुडबूड गिरणी संपात मी चालू देणार नाही.’’
दै. ‘लोकसत्ता’ने ‘शिवतीर्थावर त्रिमूर्ती-संयोग’ असा अग्रलेख लिहिला. महाराष्ट्रातील या नव्या युतीबद्दल सर्व थरांमध्ये भरपूर चर्चा सुरू झाली. या तिघांनी संप मिटविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून राज्य व केंद्र सरकार तसेच गिरणी मालकांबरोबर भरपूर चर्चा केली. परंतु त्या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. गिरणी कामगारांचा संप सुरूच राहिला. शेवटी हा संप मिटविण्यासाठी पवार, फर्नांडिस, ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गिरणी मालक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गिरणी कामगार गिरणी मालकांना घेराव घालतील असा इशारा तिन्ही नेत्यांनी दिला. त्याबरोबरच कामावर जाणार्या एकाही गिरणी कामगाराचा खून झाला तर शिवसेना गय करणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी दिली.
‘मार्मिक’ने या युतीचे वर्णन ‘एक मंगल युती’ असे केले. पवार, ठाकरे, फर्नांडिस युती केवळ गिरणी कामगार संपापुरती मर्यादित नव्हती, तर महाराष्ट्रात काँग्रेसला विरोध करणारी जबरदस्त शक्ती होती. पण ती फार काळ टिकली नाही. २०१९ साली हा योग पुन्हा जुळून आला. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी शिवसेना आणि काँग्रेसशी युती करून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यापासून रोखले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे राजकारणात एकमेकांचे शत्रू होते. वेळोवेळी एकमेकांवर टीका करायचे. तरी त्यांच्यात एक सुप्त मैत्रीचा धागा कायम होता. त्यामुळेच २००६ साली शरद पवारांची कन्या राज्यसभेच्या खासदारपदासाठी उभी राहते हे समजल्यावर शरद पवारांनी न मागता बाळासाहेबांनी दिलदारपणे शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. ‘‘शरदबाबूंची सुप्रिया राज्यसभेची खासदार होणार असेल तर मला आनंदच आहे. लहानपणी मी तिला अंगाखांद्यावर खेळवले आहे. ती आज खासदार होणार आहे,’’ असे ते म्हणाले. फर्नांडिस, पवार आणि ठाकरे यांची १९८२ साली झालेली राजकीय युती तुटली. परंतु त्या तिघांची मैत्री मात्र अभेद्य राहिली. ती महाराष्ट्राने पाहिली आहे. कारण फर्नांडिस, पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये राजकीय सुसंस्कृतपणा होता. सध्या तो अभावानेच दिसतो.