एखादा गंभीर विषय विनोदाआडून नाट्यसंहितेतून मांडताना अनेक प्रकारांनी तो सजवता येतो. त्यामागे बरेचदा ‘विसंगती’चे दर्शन असते. ब्लॅक कॉमेडी, डार्क कॉमेडी, असेही त्याला म्हटले जाते. त्यातली विसंगती महत्त्वाची ठरते. जीवनातली भयानकता, गोंधळ, शोकात्म आशय हा विसंगतीच्या पायावर उभा करून मांडला जातो. त्यामुळे ‘हसू आणि आसू’ याबद्दल रसिकही बरेचदा संभ्रमात पडतात. मग तो ‘बाजीराव’मधला बाजीराव असो वा ‘महानिर्वाण’मधला भाऊराव किंवा ‘चल रे भोपळ्या’तला वांधेकर… अशी अनेक उदाहरणे मराठी नाटकात आहेत. त्यामागली फॅन्टसी, अतिवास्तवता, अतर्क्यता यामुळे कथानक सार्यांनाच चक्रावून सोडते.
फ्लॉरियन झेलरच्या ‘द ट्रूथ’ या नाट्यमालिकेतले हे एक रंगदालन. जे मराठीत नव्या पिढीचे दमदार नाटककार नीरज शिरवईकर यांनी संहिताबद्ध केलंय. दोघा मध्यमवर्गीय दांपत्यांच्या विवाहबाह्य संबंधांवर बेतलेल्या पण परस्परांच्या फसवणुकीतून हसवणूक करणार्या ‘खरं खरं सांग’ या नाट्याचे कूळ-मूळ परकीय आहे आणि ते दोन टोकांच्या कथेत मांडण्याचा ‘प्रयोग’ निश्चितच बदलत्या परिस्थितीचा अंदाज व मागोवा घेणारा आहे, तो नव्या पिढीच्या बेधडक भावनांचे दर्शन घडवतो. त्याला दिलेली ट्रीटमेंटही ‘हास्यस्फोट’ करणारी, जी रसिकांना हलवून, हादरून, हसवून सोडेल, यात शंका नाही!
खरं खरं सांग’ हे नाटक म्हणजे दोन अंकी फुल्ल टाईमपासच! पडदा उघडतो आणि हॉटेलातल्या एका रूममध्ये दोघेजण सावरासावर करताहेत. दोघेही विवाहित पण प्रेमातल्या गाठीभेटी चालूच आहेत. अंकुर आणि इरा. या दोघांचं सहा महिने असं हॉटेलात भेटून प्रेमप्रकरण रंगात आलंय. दोघेही आपल्या ‘जीवनसाथी’ला उल्लू बनवताहेत. अंकुरची पत्नी उर्मिला आणि इराचा नवरा रजत. रजत बेरोजगार आहे. नोकरी शोधतोय. तसे अंकुर आणि रजत हे मित्र. तरीही फसवाफसवी सुरू आहे. प्रौढत्वाकडे झुकत असतानाही लपून छपून हॉटेलमध्ये जाणं हा त्यांचा उद्योगच बनलाय. इरा डॉक्टर आहे. तीदेखील अंकुरवर ‘तन-मनाने’ प्रेम करतेय. आता तर इराने ‘शनिवार-रविवार’ या वीकएन्डला कुठेतरी ‘दूर जाऊन धम्माल करायची!’ असा प्रस्ताव मांडलाय. ‘हो’-‘नाही’ करता-करता दोघांचा बेत पक्का होतो. आता प्रश्न पुढे येतो तो- ‘घरी’ काय सांगायचं! रजत आपल्या बायकोला म्हणजे उर्मिलेला बिझनेस मीटिंगला जायचंय असं सांगून दोन दिवसाची ‘हक्काची सुट्टी’ घरातून घेतो, तर दुसरीकडे इरा ही विरारला तिच्या आत्याकडे जाण्याचा बहाणा करते. दोघेही लोणावळा मुक्कामी एकदाचे पोहचतात. आणि सुरू होतो घोळात घोळ!
इकडे नवरा रजत फोनवर आत्याशी बोलण्याचा आग्रह धरतो. ‘आत्या झोपलीय’ असेच कारण पुढे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही होतो. पण रजतचा आग्रह वाढल्याने अखेर इरा अंकुरला आवाज बदलून ‘आत्या’चा ‘रोल’ देते. दुसरीकडे उर्मिलाही लोणावळ्यातील मीटिंगबद्दल वारंवार फोन करते. ही लपवाछपवी करता-करता या दोघा प्रेमवीरांची फट्फजिती उडते. नाकीनऊ येते.
वीस वर्षे एकाच व्यक्तीसोबत राहून तिचा कंटाळा काहीदा येऊ शकतो. मग ‘पर्याय’ म्हणून अशी ‘अफेअर’ सुरू होतात. पण अशी प्रकरणे ही कायमची लपविण्याचं कौशल्य मात्र हवे, हा विचार आपल्या संस्कृतीत मान्य होणं तसं अशक्यच आहे. देवाब्राह्मणांच्या साक्षीने आपली लग्न होतात. त्यामुळे हा विषय व आशय परकीय वातावरणात शोभून दिसणारा आणि त्यांना मान्यही होणारा आहे. नेमका याचाच तुफान विनोदनिर्मितीसाठी वापर करून रूपांतरकार नीरज शिरवईकर यांनी बाजी मारली आहे. विवाहबाह्य संबंधांना धर्म, कायदा, संस्कृती, समाज हा आपल्याकडे कदापि मान्यता देणार नाही. हे सत्य आहे. पण दुसर्याची ‘लफडी’ आणि त्यातही ‘फसलेली’ असल्याने त्याचे कुतहूल, आकर्षण हे वाटणं मानवी स्वभावामुळे स्वाभाविक म्हणावं लागेल.
दोघा जोडप्यांचा विवाहबाह्य संबंधाचा शेवट काय होतो? कसा होतो? लग्नाचं हळुवार नातं तुटतं? की मनधरणी करून सारं काही सुरळीत होतं? की अशा संबंधांना समोरची व्यक्तीही मान्यता देते? की आणखी काही धक्कातंत्राने यातलं नाट्य वेगळ्याच हास्यस्फोटक वळणावर पोहचते! या सार्या प्रश्नांसाठी खरंं खरं सांगून त्यातली ‘धम्माल’ उघड करणं हे योग्य ठरणार नाही. ‘खरं’ जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष नाट्यप्रयोग बघणं उत्तम! नाहीतर उत्कंठा संपेल!!
चौघा कलाकारांच्या ‘टीम’ने रंगमंचावर नाटक पेललं आहे. आनंद इंगळे याने केलेली अंकुर या पतिराजाची भूमिका म्हणजे कहर आहे! फेकमफाक करताना उडालेली त्याची त्रेधातिरपीट कमालच! वाट्टेल ते सांगून तसेच सोयीचा अर्थ लावून हक्काचे हशे त्याने वसूल केलेत. ‘लोटपोट हसवणूक’ म्हणजे काय याचे दर्शन अंकुरच्या देहबोलीतून होते. बरेच दिवसानंतर रंगभूमीवरली ही त्याच्या वाटेला आलेली भूमिका. त्याचे त्याने सोनं केलं आहे. विनोदाची पक्की जाण असल्याने नाटक एकखांबी पेललंय. पत्नी उर्मिलाच्या टिपिकल भूमिकेत ऋतुजा देशमुख हिने यात चांगली साथसोबत केलीय. सारं काही समजून न समजण्याचा अभिनय उत्तम. अंकुर-उर्मिला हे दांपत्य शोभून दिसतेय. संयमी-विचारी असणारा इराचा नवरा रजत हा राहुल मेहंदळे याने सफाईदारपणे उभा केलाय. अंकुर आणि रजत यांच्यातला प्रसंग चांगलाच खिळवून ठेवलाय. डॉक्टरीण बाईच्या मुखवट्याआडली प्रेयसी इरा सुलेखा तळवलकरने बिनधास्तपणे साकार केलीय. नवर्याच्या नकळत फसवून त्याच्या मित्राबरोबरचे ‘संबंध’ चांगले रंगविलेत. चौघा व्यक्तिरेखा या वैशिष्ट्यपूर्ण आणि नजरेत भरणार्या असल्याने भट्टी मस्त जमली आहे.
यातील चारही खोटं बोलणार्या व्यक्तिरेखांना नवनवीन घटना, प्रसंग, शब्दांचे अर्थ लावण्याचा प्रयोग व प्रयत्न हा कायम करावा लागतो. त्यांच्या मनात सतत रुखरुख सुरूच आहे. एक खोटं लपविण्यासाठी दुसरं खोटं आणि त्यातून तिसरं! म्हणजे ही न संपणारी बनवाबनवीची मालिकाच सुरू होते. आपण नेमकं खोटं काय बोललोय, हे काहीदा त्यांच्या लक्षातही राहात नाही. मग त्यातून सावरासावरी! सुसंगत संवादही शक्य होत नाही, मग खोटारडेपणा उघड होतो आणि डाव संपतो. घराघरात छोटीमोठी भांडणं ही तशी होतच असतात. पण शारीरिक संबंधांवरील प्रकरणे वेगळीच. त्यातून बाहेर पडणं अवघडच असतं. पण हे नाटक आहे. शेवट गोडच गोड!! देवा शप्पथ खरं सांगणारा!!
नाटककार नीरज शिरवईकर याची संहिता आणि विजय केंकरे यांचं दिग्दर्शन ही युती रंगमंचावर आजवर भक्कमपणे उभी आहे. इथेही याचा अनुभव रसिकांना येतो. ‘परफेक्ट मर्डर’ आणि ‘यू मस्ट डाय’ या दोन्ही इंग्रजी कूळ व मूळ असणार्या नाटकांत सस्पेन्स थ्रिलर स्टाइलने थरकाप उडविला गेला. ‘खरं खरं सांग’ ही फ्लोरियन झेलरच्या मूळ कलाकृतीवर आधारलेलं नाटक असलं तरी आपल्या जमिनीवरलं वाटतंय. नाटककारात जर दिग्दर्शक शंभर टक्के जागा असेल तर सादरीकरण झकास होते. नाही तर संहितेत असलेल्याचा अर्थ-अन्वयार्थ लावताना दिग्दर्शकाची तारेवरची कसरत सुरू होते आणि मग चांगल्या संहितेचा फुसका बार होऊ शकतो. पण इथे दोघांची तंत्रावर असणारी हुकमत आणि एकवाक्यता यामुळे प्रयोग पकड धरून ठेवतो. रंगतदार होतो.
ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी हॉटेलची रूम, अंकुरचे घर, बॅडमिंटन क्लब, इराचं क्लिनिक ही स्थळं ठळकपणे उभी केलीत. त्यामुळे वातावरणनिर्मिती उत्तम होते. मंगल केंकरे यांची वेशभूषा त्यातील रंगसंगती अनुरूपच. यातला रूग्णवाहिकेचा सायरन अर्थपूर्ण. जो हसवणुकीचा ‘सायरन’ पण ठरतो. अजित परब याचं शीर्षकगीत तसंच संगीत तालबद्ध आणि या सार्यांची चांगली मोट बांधण्याचे कसब विजय केंकरे यांनी कल्पकतेने केलंय. बंदिस्त प्रसंगांना संशयकल्लोळाची दिलेली खुमासदार फोडणी हसून पुरेवाट करते! नाटक कुठेही, जराही रेंगाळणार नाही याची पुरेपूर खबरदारी केंकरे यांनी घेतल्याचे पदोपदी जाणवते. त्यामुळे विनोदी नाटकांच्या भाऊगर्दीतही हे नाटक विषयापासून ते सादरीकरणापर्यंत एकच धम्माल उडविते!
विवाहित पुरुषाला पत्नी सोडून दुसर्याच स्त्रीबद्दल जर आकर्षण वाटले तर ही त्याची चूक ठरत नाही. समाज या चुकीला माफ करतो, त्याची पत्नीही प्रसंगी क्षमा करते. पण हाच प्रकार पत्नीने केला तर मात्र जग डोक्यावर घेतलं जातं. तिला पतीसह कुणीही माफ करीत नाही, हेच जयवंत दळवी यांच्या ‘महासागर’ नाटकात मांडलंय. परपुरुष किंवा परस्त्रीचे आकर्षण यावर अनेक दर्जेदार नाटके मराठी रंगभूमीवर आलीत. समाजातील सर्वमान्य कुटुंब व्यवस्थेत जर वेगळी वाट निवडली तर अनेक प्रश्न उभे राहतात. प्रशांत दळवी यांच्या ‘चारचौघी’तल्या ‘चारचौघी’ही याचे एक उत्तम उदाहरण आहे.
असो! आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत विवाहित दांपत्यांच्या नात्याव्यतिरिक्त ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणं म्हणजे एक ‘फॅशन’ समजली जातेय. त्याला प्रतिष्ठा मिळतेय किंवा लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा नवा पर्याय उघडपणेही सर्रास स्वीकारण्यात येतोय. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा तर आज प्रेमवीरांचा खेडोपाड्यापर्यंत पोहोचलेला एक अधिकृत सण-उत्सवच बनत चाललाय. या पार्श्वभूमीवर हे नाटक खूप काही तिरकस नजरेतून विनोदी ढंगाने सांगतंय. एखादं छोटंसं कृत्रिम निर्जीव कुलूपही उभ्या घराला सुरक्षित ठेवतं. तस्संच नवरा-बायकोतील परस्परांच्या विश्वासावर आधारलेलं पारदर्शक कुलूपरूपी नातं हे पूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतं, हेच खरे!
खरं खरं सांग
लेखक – नीरज शिरवईकर
दिग्दर्शक – विजय केंकरे
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
प्रकाश – शीतल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
रंगभूषा – शेखर केमनाईक
निर्मिती – बदाम राजा प्रोडक्शन