आठवतं का मंडळी, पूर्वी रेडिओवरून पुणे वेधशाळेकडून मिळालेला हवामानाचा अंदाज सांगितला जायचा… उदा. राज्यात येत्या २४ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते तुरळक सरी पडतील. मच्छिमारांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला असून कोकण किनारपट्टीवर समुद्रात संवेदनशील ठिकाणी तीन नंबरचा बावटा रोवण्यात आलेला आहे वगैरे वगैरे.
हा अंदाज ऐकल्यावर चाकरमानी छत्र्या घेऊन बाहेर पडायचे. शाळेतली मुलं रेनकोट नि टोप्या शोधायची. शेतकरी आपापली नांगरी बैलजोडी घेऊन वावरांकडे निघायचे… नि मायला फुस्स व्हायचं… २४ तासात येणार असलेला पाऊस आठवडा-पंधरावडा झाला तरी तोंड दाखवत नसे नि लोक मग रेडिओला आणि वेधशाळेला शिव्या घालत चडफडत राहायचे.
भाजपाच्या पुणे वेधशाळेने कसब्यात आपणच जिंकणार, असा अंदाज चेवेंद्र महोदयांना सांगितला नि त्यांनीही टिळक कुटुंबियांना डावलून रासनेंच्या बाजूने भाषणे देण्याचा सपाटा लावला. चंपा उर्फ चाचोकेब (चाऊन चोपून केस बसवलेले) एकदम इंग्रजीतच घुसले नि `हू इज धंगेकर?’ असा प्रश्न करून तुच्छतापूर्वक हसले. पण पुण्येश्वरांचा कौल मिळाला नाही. शेंडी-जानव्यानं हिसका दाखवला. नाका-तोंडात नळ्या लावलेल्या बापटांना बाहेर काढून पाहिलं. तेही फुकट गेलं. रासनेंची पोरं गल्ली-बोळात पैसे वाटत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. दादागिरी करून झाली. पण २८ वर्षे ताब्यात असलेला कसब्याचा किल्ला ढासळला तो ढासळलाच. ११ हजार ४० मतांनी विजय मिळवून रवींद्र धंगेकर यांनी `हू इज धंगेकर?’ या प्रश्नाला उत्तर दिले. कमळीचा हवामानाचा अंदाज चुकला. भर उन्हाळ्यात हुडहुुडी भरली. आत्मचिंतनाच्या शेकोटीवर हात-पाय शेकत बसण्याची वेळ आली.
कसबा म्हणालं, आता बस बा कमळे, खूप झाली तुझी नाटक-चेटकं. मंडळी, कसबा ही केवळ एक झलक आहे देशातील बदलत्या हवामानाची. लोकांच्या आता लक्षात येऊन लागलंय की तारवटलेला हुकूमशहा आपल्याही उंबरठ्याशी येऊन एक दिवस कधीतरी ठेपणार आहे. दरडावून सांगणार आहे, `चला, घर खाली करा आपल्या राष्ट्रासाठी. तुमच्या घरात जरुरीपेक्षा जास्त भांडी दिसतायत. दोन पातेली नि चार ताट-वाट्या बास झाल्या. त्याग करा त्याग. आपल्याला महाशक्ती व्हायचंय.’ लोकांना हेही कळून चुकलंय की ते अडचणीत येतील. तेव्हा त्यांच्या मदतीला `लाव रे तो व्हिडिओ’वाले येणार नाहीत की खोके घेऊन ओके झालेले. सगळे शेपूट घालून हुकुमाची तामीली करत फक्त भाषणांच्या रेवड्या उडवत राहणार आहेत.
ते पंचामृत बजेट बघितलंत ना? अहाहा… काय तो शब्दांचा फुलोरा, काय ते स्वप्नांचे इमले, काय तो घोषणांचा सुकाळ! `पिकवावे धन, ज्याची आस करी जन’ या तुकोबारायांच्या ओळी वाचत अर्थमंत्र्यांनी व्यर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. पण महोदयांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की तुकारामबाबांच्या गाथेतील एका अभंगात `भले तरी देऊ कासेची लंगोटी, (मूळ शब्द गांडीची लंगोटी) नाठाळांचे माथी हाणू काठी’ असं म्हणून ठेवलंय. ह्यांचे मालक देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार होते. ते झालं नाही तेव्हा तो `चुनावी जुमला’ होता, असं फिदीफिदी हसत सांगितलं गेलं. नोटाबंदी करून देशाबाहेर असलेला काळा पैसा देशात आणणार होते. काळा कुत्रा आणू शकले नाहीत. दर सहा महिन्यांनी यांचा तोंडातला गॅस स्वस्त आणि सिलेंडरमधला गॅस महाग होतोय. लोकांच्या ध्यानात आलंय की हे पंचामृती बजेट पण कसब्यांसारखं कोसळणार आहे.
हवामान तुम्हाला अनुकूल नाही, अध्यक्ष महोदय. पण म्हणून लांबवून लांबवून किती लांबवणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? घोडेमैदान जवळ आहे. आणि अशावेळी ईडीचे उंट, सीबीआयची प्यादी, इन्कमटॅक्सचे हत्ती कामी येत नाहीत हे तर सर्वांना माहीत आहे. घोडा अडीच घरं चालतो. आणि तुमचा हिंदुत्वाचा घोडा घराबाहेर गेलेला असताना महाविकास आघाडीचा एकजुटीचा घोडा रणांगणात दमदार दौड करू लागलाय. काय कळतंय ना चेवेंद्रजी अडणवीस तुम्हाला? मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, पुणे आणि पिंपरी-चिंचवड सगळं तुमच्या हातून जाणार अशी हवामानाची ताजी स्थिती आहे. दिवाळीच्या दरम्यान या निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा तुमच्या दाताखालची भगवी चकली कडक झालेली असणार आणि वॉशिंगमधून धुऊन काढलेली कडबोळी वातड झालेली. लोक विचारणार तुम्हाला… बाळासाहेब, गद्दारांना क्षमा करत होते का? केंद्रात आणि राज्यात तुमचीच सत्ता असताना हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे का काढावे लागत आहेत? बिल्लू-टिल्लू भर विधानसभेत एका खासदाराला धमक्या देत असताना तो नाही का हक्कभंग होत? गॅस ५० रुपयांनी वाढवला नि मध्यमवर्गाचं कंबरड मोडलं, त्याबद्दल काहीच कसं बोलला नाहीत तुमच्या पंचामृतात?
हुकूमशाहीचे विरोधक जसजसे एकत्र येत जातील, तसतसे कमळीचे कुत्रे अधिकाधिक त्यांच्यावर भुंकू लागतील. आणि सीबीआयची छापेमारी भरात येईल. पण तरीही विरोधक हटणार नाहीत, हे आजचा हवामानाचा अंदाज आहे. पंतप्रधानांनी अलीकडेच हवामान खात्याला सूचना केली की आपला दैनंदिन हवामान अंदाज लोकांना सहज समजेल अशा पद्धतीने जाहीर करावा. लोकांना म्हणजे पंतप्रधानांना सहज समजेल अशा पद्धतीने. तर आता हवामान खात्यातील विश्वसनीय सूत्रांचा हवाला देऊन खणखणपाळ `हवामान की बात’ सादर करीत आहे.
येत्या नजीकच्या काळात भाजपाच्या चिखलातील कमळांवर जनतेच्या असंतोषाच्या गारपेटीचा जोरदार मारा होण्याची शक्यता असून ढोंगी हिंदुत्वाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसानी होईल. गोदी मीडियाचे वारे उलट दिसेने वाहतील. ४० पैसेवाल्या ट्रोल मच्छिमारांनी इंटरनेटच्या समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात येईल. सीमावर्ती किनारपट्टीवरील पेड विद्वानांनी आपली अब्रू वाचवण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातून वादळी वार्यांची मुसंडी दिल्लीच्या दिशेने सरकत असून २०२४ आसपास `चायवाला हटाव देश बचाव’, `भाग अदानी भाग- मालिक को लग गयी है आग’, `जिंदगी ना मिलेगी दोबारा’, `कमळे कर आता पोबारा’, `लेट्स डिफीट बीजेपी, लेट्स प्रोटेक्ट इंडिया’ अशा घोषणांना जोर येईल. पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, केरळ आणि महाराष्ट्रातील ८० टक्के मतदारसंघ संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत असून बेरोजगारी, महागाई आणि कोविड काळातील त्रासाची आठवण ठेवून लोक मतदानास बाहेर पडतील. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मूळ पक्षांतून पळून गेलेल्या गद्दारांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. त्यांना रस्त्या-रस्त्यावर संतप्त जनमाणसाने तुडवल्यास वेधशाळा जबाबदार राहणार नाही.
महाराष्ट्रात लगु-हगु-सुक्षम उद्योग मंत्र्यांच्या दिवट्यांच्या कानाखाली ढग गडगडतील. मुलुंडच्या पोस्टलालचे दिवस भरत आलेले असून व कोणत्याही क्षणी हा पोपट न्यायालयाच्या पिंजर्यात पकडला जाण्याची दाट शक्यता आहे. कमळछाप वॉशिंग मशीन, वॉश बेसीन्स आणि वॉशिंग रूम्सना ओवरटाईम करावा लागेल. तथापि अपेक्षित रिझल्ट न मिळाल्यास निवडणूक पाऊसकाळ संपताच ती भंगारात जमा होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी एकजूट दाखवल्यास दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात ते प्रस्थापित सत्ताधीशांवर मात करतील. सर्व विरोधी पक्षांना अंतर्गत बंडखोरी फायर ऑडिट करण्याची सूचना देण्यात येत असून २०२४पासून खरी लोकशाही सुरू करायची असेल तर हुकूमशहाच्या साथीदारांची यादी तयार ठेवण्याची गरज आहे.