आजकालच्या जमान्यात कॅशलेस व्यवहार करण्याचे महत्व वाढत चालले आहे, त्यामुळेच कोणत्याही व्यवहारासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर करणारी मंडळी वाढू लागली आहेत. हे चित्र अर्थकारणाच्या सुलभीकरणासाठी चांगले असले तरी यामधून फसवणूक होण्याचे प्रकार हे दिवसागणिक वाढू लागले आहेत. कितीही सजगता बाळगली तरी काहीजण यामध्ये फसवले जात आहेत…
सोमवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे पुण्यातील त्या पंचतारांकित हॉटेलचे कामकाज सुरु झाले होते. सकाळचे दहा वाजले होते. त्या हॉटेलच्या काउंटरच्या फोनची रिंग वाजली. रिसेप्शनिस्टने फोन घेतला तेव्हा, समोरून एका व्यक्तीने अमेरिकन अॅक्सेंटयुक्त गोड आवाजात मधाळ संवाद सुरू केला. हॅलो, मॅडम, आय अॅम कोलिन अँडरसन कॉलिंग फ्रॉम न्यूयॉर्क… मी माझ्या कंपनीच्या कामासाठी पुढच्या महिन्यात पुण्यामध्ये येणार आहे. मी एक आठवडा पुण्यात राहणार असून त्यासाठी मला एक लक्झरी सूट बुक करायचा आहे. त्याची प्रक्रिया काय आहे, अशी विचारणा कोलिन याने काउंटरवरील त्या महिलेकडे केली. तिने ती सगळी माहिती तत्परतेने दिली. मग कोलिनने त्या महिलेकडे पुढची विचारणा केली, ‘मला काही इमर्जन्सी आली आणि यदाकदाचित काही कारणामुळे रूमचे बुकिंग रद्द करावे लागले, तर त्याची प्रक्रिया काय आहे?’ रिसेप्शनिस्टने तीही सर्व माहिती दिल्यानंतर कोलिन याने अॅडव्हान्समध्ये दीड लाख रुपयांची रक्कम क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्या पंचतारांकित हॉटेलच्या बँक अकाउंटवर जमा केले. रिसेप्शनिस्टला त्याने आपल्या क्रेडिट कार्डाचे डिटेल्स दिले. त्या माध्यमातून तिने कोलिनची रूम बुक करण्यासाठी ते पैसे जमा करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती.
त्या रूमचे बुकिंग होऊन दोन दिवस होतात न होतात, तोच सकाळच्या वेळेस पुन्हा एकदा त्या हॉटेलच्या फोनची रिंग वाजली. समोरून, हॅलो, मी कोलिन बोलतोय, असं सांगितलं गेलं. तो म्हणाला, दोन दिवसांपूर्वी मी आपल्याकडे एका आठवड्यासाठी लक्झरी सूट बुक केला होता. काही कारणामुळे मी त्या काळात भारतात येणार नसून मला कामासाठी इटलीला जावे लागणार आहे. त्यामुळे माझे हॉटेलमध्ये केलेले बुकिंग रद्द करावे आणि जो काही रिफंड मिळणार असेल, ती रक्कम मी सांगतो त्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करावी, अशी विनंती त्याने केली. दरम्यान, काउंटरवर असणार्या महिलेने तिच्याकडचे सगळे तपशील पडताळून पाहिले, त्याची खातरजमा केली आणि ठरलेल्या प्रक्रियेप्रमाणे कोलिनची मागणी मान्य केली. त्याने अॅडव्हान्स म्हणून भरलेली रक्कमही लगेच कोलिनच्या खात्यामध्ये जमा केली गेली. किती साधा सरळ व्यवहार. हो, ना. पण, हे वरकरणी दिसत होते. त्याच्या पाठीमागे जे काही घडले होते ते फारच भयंकर होते.
इथे हा प्रकार घडत होता, तेव्हा अमेरिकेतील एका महिलेने आपले क्रेडिट कार्ड भारतात वापरले जात असून त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च केली गेली आहे, अशी तक्रार एफबीआयकडे केली होती. एफबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून शोध घेतला तेव्हा हा सगळा प्रकार महाराष्ट्रातल्या पिंपरी-चिंचवडमध्ये होत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे एफबीआयने ही केस पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे पाठवली.त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
सर्वात पहिले म्हणजे अमेरिकेतील महिलेचे कार्ड कोणत्या ठिकाणी वापरले गेले याचा शोध घेण्याची सुरवात केली, तेव्हा त्या पंचतारांकित हॉटेलचा आयपी अॅड्रेस समोर आला. बँकेचे खाते तपासले तेव्हा त्या हॉटेलमधल्या कर्मचार्याने ते पैसे बँकेच्या खात्यामध्ये भरल्याचे समोर आले होते. या सगळ्या प्रकारामध्ये हॉटेलच्या कर्मचार्याने कोणतीही शहानिशा न करता कोलिनकडून पैसे स्वीकारले होते आणि नंतर कॅन्सलेशन झाल्यावर त्याने सांगितलेल्या बँकेत पैसे जमा केले होते. म्हणजे क्रेडिट कार्डावरची रक्कम या मार्गाने त्या कोलिनला रोख स्वरूपात मिळण्याची व्यवस्था झाली होती. परदेशातून ग्राहक येणार असेल, तर त्याच्या नागरिकत्वाचे सगळे संदर्भ तपासावे लागतात, कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ते न करता, कोलिन कोण आहे, याची शहानिशा न करता निव्वळ फोनवरील संभाषणाच्या आधारे त्या महिलेने हा सगळा व्यवहार केला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ती महिला दोषी ठरली होती. तिने हॉटेलच्या खात्यात क्रेडिट कार्डावरून पैसे घेताना खातरजमा केली नाही, पैसे परत पाठवतानाही खातरजमा केली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दखल केला होता. खरेतर, नकळतपणे तिच्या हातून ही चूक घडली असली तरी तो एक गुन्हाच होता, त्यामुळे त्याची शिक्षा तिला भोगावी लागणार होती.
हे लक्षात ठेवा…
या प्रकाराला ‘कार्ड नॉट प्रेझेन्ट फ्रॉड’ असे म्हणतात. तुमच्या संगणकावर दुसर्याचे डेबिट, क्रेडिट कार्ड वापरू नका. पैसे भरणार्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकू द्या. कोणाचेही कार्ड डिटेल घेताना त्याचे नाव आणि कार्डावरील नाव, नंबर बरोबर आहे की नाही, याची शहानिशा करा. बाहेर कुठेही कार्ड स्वाइप करताना तुमच्या कार्डच्या मागे सही असणे आवश्यक आहे. दुकानदाराने देखील कार्ड स्वाइप करताना आपल्याकडील कॉपीवर ग्राहकाची सही घेणे आवश्यक आहे. पण तसे आपल्याकडे कुठेही होताना दिसत नाही. कोणताही व्यवहार करताना जर तुम्हाला कार्ड दिले गेले तर त्याचे डिटेल्स, नाव हे बरोबर आहे काय हे तपासून पहा. कार्डचे व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्या. आपल्या संगणकावर दुसर्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून व्यवहार केला आणि त्यात जर काही गडबड आढळली तर ते तुमच्याच अंगावर शेकू शकते. त्यामुळे सावध राहा.