इंग्रजीत एक वाक्यप्रचार आहे- ‘ओल्ड वाईन इन न्यू बॉटल!!’ म्हणजे जुना माल नव्या खोक्यात!! अथवा नेहमीचा माल वेगळ्या खोक्यात.
अगदी सर्वसाधारण उदाहरण द्यायचे तर रोस्ट गर्लिक विथ सीझन्ड राइस अँड ड्राय चिली…
काय येते डोळ्यासमोर?
हा पदार्थ आहे आपला फोडणीचा भात. नाव असे द्यायचे की हे काय हा प्रश्न विचारायची हिम्मत होणार नाही.
आता नमनाला इतके तेल ओतले का? तर एक दुःखद अनुभव आला, थोडक्यात डोक्याला शॉट.
एका समारंभाला गेले होते, परिचितांशी जुजबी हसून बोलून झाल्यावर माझे लक्ष जेवण कधी लागतेय याकडे होते… हसू नका, तुमचे पण असेच होत असणार, मी बोलून दाखवते इतकेच! कारण पहिल्या पंगतीला अथवा बुफेमधे जागा यासाठी घ्यायची की तेव्हा पुरी-पापड असे पदार्थ चांगले मिळतात, अनुभवाचे बोल आहेत.
तर हातात अर्धा किलो वजनाची बशी घेऊन, काटे चमचे धराशायी होऊ नयेत याची काळजी घेत, साडी सांभाळत मी मांडलेले पदार्थ बघत होते. सलाड बिलाड अशावेळी टाळावे, कारण आपल्या समोरचे लोक, ज्यांनी आयुष्यात काटा वापरला नसेल ते चिमट्याने बीट, गाजर, काकडी उचलण्याची कसरत करत मागील माणसांना अडकवून ठेवतात. असो, तर मुख्य पदार्थ दिसले. पनीर लबाबदार, शाही सब्जी, दिलखुश (कोणाचे हा प्रश्न अनुत्तरित) मटार, दखनी सब्जी, मक्खन मटार… इत्यादी इत्यादी…सर्व पदार्थ चित्राहुतीसारखे वाढून घेतले. म्हटले चव आवडली तर पाहू, इंच इंच लढवू करत रिकामे टेबल पटकावले, खायला सुरुवात आणि शेवट एकाच वेळी… डोळे मिटून खाल्ले असते तरी फरक जाणवला नसता इतके समान चवीचे, बंधुभाव जपून एकात्मिक असणारे सर्व पदार्थ… नावे मात्र आलिशान… वर म्हटले तेच… ओल्ड वाईन!!!!!
लग्नातील जेवण, त्यातही मराठी लग्नातील जेवण, हे कोणे एकेकाळी काय सुंदर असायचे. हे मी साधारण ४५ वर्षे आधीचे सांगते आहे. अगदी पुणे-मुंबई सोडा, पण गावखेड्यात पण मराठमोळा मेनू असायचा.
शहरात वरण भात, अळू, बटाटा भाजी, बासुंदी, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात, गावाकडे गोड बुंदी, शेव, सोजी, डाळ, भात, गोड वडे, वांगी भाजी… अहाहा…
आणि वाढपी असायचे.. तुरुंगातील कैद्यासारखे हातात ताट घेवून बुभुक्षितासारखे आशाळभूत उभे राहावे लागायचे नाही.
इथे मला एक प्रश्न नेहमी सतावतो, लग्नावर अमाप खर्च करणारे वाढपी किंवा पंगत यावर थोडे पैसे का घालत नाहीत? एकतर आपले भारतीय पदार्थ बुफेसाठी अजिबात योग्य नाही. वरण, भात, पोळ्या, पराठे, रस्सा भाज्या… सगळे पदार्थ दणदणीत वजनदार. बुफे जिथून आला त्या पाश्चात्य देशांत अर्धी प्लेट असते, आणि पदार्थ सँडविच, कटलेट असे हलक्या वजनाचे. खाणारे पण नाजूक साजूक. आपल्याकडील पैज लावून १०० जिलब्या खाणार्या महाप्रतापी भोजनभाऊंशी त्यांची तुलना होणे शक्य नाही.
मुद्दा काय की बुफे आणि त्यातील पदार्थ हा माझ्या डोक्याला गेले अनेक वर्ष शॉट होऊन राहिलाय. बुफे पद्धत भारतीय जेवणासाठी अयोग्य आणि हल्ली बुफेत असणारे पदार्थ तर अगदी बाष्कळ… विधान अतिरंजित, अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण सत्य आहे. वर जे पदार्थ उल्लेखले आहेत त्यांची चव एकसमान. गेली काही वर्षे या क्षेत्रात घालवल्याने हे सत्य पूर्ण परिचयाचे. घाऊक पद्धतीने केलेले मसाले, आयत्यावेळी गरम करून त्यात भाजी पनीर घालून तिखट इत्यादी पाहून दिले जातात. जवळपास ५० टक्के ठिकाणी हेच होते. पंजाबी पदार्थ का आणि ते स्वस्त का याचे उत्तर यात आहे. किलो किलो ग्रेव्ही स्वस्त पडते, मराठी पदार्थ तसे होत नाहीत.
मराठी अभिमानी, पाडव्याला शोभायात्रा, फेटे, तिलक, संस्कार भारती रांगोळ्या अशा गोष्टीत पुढाकार घेतात, पण जेवण सीन बदलायला नाही. १०० टक्के मराठी लग्नात ही पंजाबी भरताड का? इथे पंजाबी अन्नाचा अधिक्षेप करायचा नाही. कारण असे पदार्थ मुळात पंजाबी नाहीत. १९८०नंतर बार, रेस्टॉरंट अमाप वाढले आणि ते बहुतेक उडपी मालकीचे… तिथे अशा लबाबदार, लपेटा इत्यादी डिश उगम पावल्या. मुंबईत पंजाबी/सरदार मालक असणारे हॉटेल्स असायचे, तिथे असले काही मिळायचे नाही.
तर मराठी लग्नातील ही भेसळ वैताग आणते. परत निव्वळ इतकेच नाही, तर सुरुवातीला भेळ पाणीपुरी ठेवली जाते, मग नूडल्स्, मचुळ सूप्स, हिरव्या पिवळ्या थाई आमट्या, मग पंजाबी डिशेस… कशाचा कशाला ताळमेळ नाही. नुडल्स खाताना (ते पण हातात प्लेट सांभाळत… माइंड यू…) बाजूची पनीर भाजी रागावून विलक्षण लाल झालीय असे मला नेहमी वाटते; किंवा हरा भरा कबाब गिळताना, शेवपुरी निषेध दाखवत मलूल होते. विविधतेत एकता कुठे मिळेल तर अशा जेवणात. माझ्यासारख्या माणसाला वैताग आणायला असे कारण पुरे.
मी तर आता या बुफेत काय जेवावे याबद्दल मार्गदर्शन करणारे छोटे पुस्तक लिहायचे म्हणतेय..
यजमानांनी अमाप पैसा टाकून समारंभ केलेला असतो. त्यामुळे टीका करणे योग्य वाटत नाही आणि असले भयानक खाता येत नाही. वरण भात लिंबू तूप खाताना मधेच शेझवान राइस दिला तर? किंवा मसाले भात ओरपतना थाई करी वाढली तर? असले फ्युजन फूड कन्फुजन होऊन राहते.
तुलनेत दक्षिण भारतीय किंवा वंग बंधू आपल्या पारंपरिक जेवणाला सोडत नाहीत. स्वागत समारंभ असतो तेव्हा वेगळा बेत ठेवतील, पण लग्नाचे जेवण मात्र पारंपरिक.बुफेच्या मागे जे वाढपी असतात, त्यांचे चेहरे अतिशय कंटाळवाणे, त्रासिक (अपवाद वगळा)… म्हंजे वाटते, आपण जेवून काही गुन्हा करतोय. हे काय? पण असे विचारायची सोय नाही.
एकूणच लग्नातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टीबद्दल कमालीची अनास्था दिसते. कारण जेवण कसे होते यावर मग पाहुण्यांच्या चर्चा पुढील काही दिवस रंगत राहतात आणि मग अमुक लग्नातील जेवण हा निकष ठरतो म्हंजे त्या लग्नातील जेवणापेक्षा छान, किंवा बेकार असे. तुम्ही पण असे केले असेल नक्की. उगा शहाजोगपणा दाखवू नका.
परत बुफेमधील एक अर्थकारण महत्त्वाचे असते.
छोट्या प्लेट्स असतात, त्या लडबडून जातात; मग अनेक जण त्या ठेवून दुसर्या नव्या प्लेट्स उचलतात. आणि नव्या प्लेटचा खर्च वाढतो. पाहुणे मुद्दामहून करत नाहीत, पण खर्च होतो हे पक्के.
पंगतीत असे होणे शक्य नाही. तिथं फार तर चतकोर पापड, बळीइतका भात आणि वरणाचा थेंब टाकून उसेन बोल्ट लाजेल अशा वेगाने वाढपी पळतात. पण वायफळ खर्च होत नाही. पुन्हा अन्न टाकले जात नाही. बुफेत होणारी अन्न नासाडी मला अस्वस्थ करते. रांगेत उभे राहायला नको म्हणून लोक वारेमाप वाढून घेतात आणि टाकून देतात. खास करून लहान मुले.
अर्थात बुफे परवडला पण ते पनीर लबाबदार, व्हेज कोल्हापुरी आणि शाही सब्जी नको. अगदी आमच्या कोकणात पण त्यांनी धुमाकूळ घातलाय.
बदल, नवे आचार विचार, पद्धती अवलंबणे चूक नाही पण अंधानुकरण करणे चूक… डोक्याला शॉट होतो राव.