हॅलो, मी निलेश, आणि मी एक अॅडिक्ट आहे. बर्याचदा लोक तरुणाईच्या जोशमध्ये अमली पदार्थांच्या आहारी जातात, पण माझ्या बाबतीत हा अपघात अगदीच लहान समज नसलेल्या वयात झाला.
खरं तर यासाठी सगळा समाजच दोषी आहे असं म्हणता येईल. प्रत्येक लहान मुलाच्या वाढदिवसाला सगळ्या आजूबाजूच्या मुलांना एकत्र करून प्लेट प्लेट भर भरून हे अमली पदार्थ खुले आम आमच्याकडे केक आणि रसना सोबत वाटले जायचे.
ते पातळ पातळ गोलाकार काप, पार डीप तेलात तळलेले, त्यावर हलकसं शिंपडलेलं मीठ, त्यांचा सोनेरी रंग, तोंडात टाकताच त्यांचा कुर्र कुर्र होणारा आवाज. अगदी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षीच घेतलेला ‘वेफर्स’चा पहिला घास हा माझा घात करणारा ठरला.
एखाद्या लहान मुलाच्या नाजूक भावविश्वाला अशा मादक पदार्थाची ओळख करून देण्याआधी समाजाने विचार करायला हवा होता. कारण अगदी पहिल्याच दिवसापासून वेफर्सनी मला वाईट मार्गाकडे वळण्यास प्रवृत्त्त केलं होतं. स्वतःच्या प्लेटमधले वेफर्स पटापट संपवून मी मग शेजारपाजारच्या मुलांच्या प्लेटमधून थोडेसे उचलू पाही. त्यांचा विरोध टाळण्यासाठी, ‘तुझी आई बोलावतेय’ असं खोटं सांगून त्यांचं लक्ष विचलित करून, लक्षात येणार नाही एवढेच वेफर्स त्यांच्या प्लेटमधून गायब करण्याची खोड पण मला ह्या व्यसनापाईच लागली.
हे सगळं तेव्हा वाढदिवसापर्यंत मर्यादित होतं. वेफर्स तेव्हा असे हवाबंद पाकिटात जागोजागी विकलेही जात नसत. साधारणतः मिठाईच्या दुकानात मोठ्या काचेमागे जपून ठेवलेले असत. कोणातरी नातेवाईकांच्या घरी गेल्यावर त्यांनी दोन तीन प्रकारचे वेफर्स समोर आणल्यास साहजिकच माझी सगळी निष्ठा आणि आपुलकी मी त्यांना अर्पून टाकत असे. अशावेळी एका हाताने वेफर्स खात असताना दुसर्या मुठीत पुढची बॅच मी संरक्षित करून ठेवत असे. पटकन त्यांनी ट्रे उचलला तर पंचाईत नको म्हणून.
वाढदिवसाव्यतिरिक्त न्यू इयरला घरातील मोठी माणसं आवर्जून वेफर्स आणत असत. तेव्हाच हे बिंबवले गेले की ‘इट्स अ पार्टी ड्रग’. आणि त्यामुळेच सत्यनारायणाचा किंवा गणपतीचा प्रसाद किंवा दिवाळीचा फराळ म्हणून पण वेफर्स द्यायला हवेत ही माझी मागणी नेहमीच धुडकावून लावली गेली होती कदाचित. कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या सोबतीत तुम्ही तरुणाईच्या स्वातंत्र्याचे नवीन घोट घ्यायला शिकता. साधारणतः मुलांना वर्ज्य असणारे पदार्थ ‘एकदा ट्राय करून तर बघ रे’ म्हणून आपली मर्दानगी प्रस्थापित करण्यासाठी आपण हातात घेतो आणि तिथेच आयुष्याच्या घसरगुंडीची सुरुवात झालेली असते. रेल्वे स्टेशनवर मिळणारं तेलाने माखलेलं १०० ग्रामचं प्लास्टिकचं वेफर्सचं पाकीट चाटता चाटता एखादा उच्चवर्गीय मित्र कधीतरी तुमच्यापुढे ‘लेज’चं सुंदर पोपटी किंवा पिवळं पाकीट तुमच्या पुढे धरतो. ह्यात काय एवढं विशेष, म्हणून तुम्ही त्या खोल पाकिटाच्या तळाशी जाऊन एक वर्तुळाकार बटाट्याची काप घेऊन वर येता. त्याचं डिझाईन, फिनिशिंग, फिल वेगळं असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहिला घास घेता अगदी त्या क्षणीच मेंदू इतर सर्व इंद्रियांना संपावर पाठवतो, डोळे अलगद बंद होतात, कान त्या कुरकुरीतपणाच्या ब्रम्ह नादाने प्रभावित झालेले असतात आणि लाळेच्या नदीला पूर येऊन ती जिभेच्या चारही बाजूंनी ओसंडून वाहू लागलेली असते. अमृताहुनी गोड काही सापडलं नसलं तरी नमकिन सापडलं म्हणून तुम्ही समाधी अवस्थेत गेलेले असता.
भारी आहेत रे हे वेफर्स… म्हणत तुम्ही मित्राचं पाकिट त्याच्या नकळत स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करता. तो सावधपणे ते धरून ठेवून, तुम्हाला शिकवतो. ‘दे आर नॉट वेफर्स, दे आर चिप्स.’
नशेची पहिली इयत्ता पार करून तुम्ही आता वरच्या वर्गात गेलेले असता. एकदा चिप्सची चटक लागली तर पुन्हा वेफर्सनी तुमचा हव्यास शमत नाही. आता तुम्हाला फक्त हाय क्वालिटी माल हवा असतो. फ्लेवर हवे असतात. चीज आणि ओनियन, त्या खाली क्लासिक सॉल्टेड, मग मॅजिक मसाला, अगदीच काही नसेल तर टोमॅटो.
परवा मुंबईत मित्राकडे बसताना कुठेच लेज मिळेनात. चार पाच दुकानं फिरलो, सगळीकडे बालाजी. पुण्यात असताना बालाजीचे वेफर्स खात होतो. पण तेव्हा मजबुरी होती. क्वांटिटी चांगली यायची त्याची. पण त्यात लेजची नशा नाही. कासावीस व्हायला झालं. पण शेवटी रेल्वे स्टेशन वर लेज मिळाले. त्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट काढलं. व्यसन माणसाला कुठल्याही थराला नेऊ शकतं हेच खरं.
व्यसनाकडे तुम्ही व्यक्ती म्हणून आकर्षित होत असलात तरी ते बळावतं बर्याचदा तुमच्या संगतीमुळे. मी आणि मुळ्या दररोज पेपरमधला दिवस संपल्यावर घरी येताना ट्रेनमध्ये एक चिप्स आणि एक फ्रुटी घेऊन बसायचो. ट्रेन सोडावी लागली, स्लो ट्रेन मिळाली तरी हरकत नव्हती पण जिन्नस हवाच. भल्या मोठ्या पाकिटात थोडे फार मिळणारे चिप्स मित्रांमध्ये पटापट संपत असले तरी मला अगदी तळावरचा चुरा आणि मसाला टिपून घ्यायला आवडतं. पुढचा कितीतरी वेळ त्याची धुंदी तुमच्या जिभेवर रेंगाळू शकते. तरुण वयात तुम्हाला कोणी सिगारेट पिताना पाहू नये म्हणून तुम्ही टाकीमागे जाऊन पिता, मोठे झालात, कमवू लागलात तसं घरात आणून प्यायलात तरी कोणाची काही बोलायची हिम्मत होत नाही. तसंच हळूहळू मला सवय आहे म्हणून घरचेच बिग बाजारमधून दोनवर एक फ्री वाले चिप्सचे फॅमिली पॅक आणू लागले. चिप्सचा बाउल माझ्या हातात मुठी ह्यांच्या भरलेल्या. व्यसन शेवटी कुटुंब उद्ध्वस्त करते हेच खरे.
चिप्स स्वतः पातळ असले तरी माणसाला जाड बनवण्यात महत्वाचा वाटा उचलतात. वयानुसार खाण्या पिण्याच्या सवयींना आवर घालायचा प्रयत्न करतोय. इतर बर्याच गोष्टी मी बदलल्या आहेत पण हे अॅडिक्शन काही सुटत नाही. अंकल चिप्समधला तो अंकल मीच तर नाही ना अशी भीती वाटू लागलीय. स्वित्झर्लंडमध्ये महाग आहेत म्हणून आपोआपच चिप्स खाणं कमी झालंय. पण कुणाकडे पार्टीला मिळाले तर ते लोकांना माझ्यापासून वाचवावे लागतात. साऊथ इंडियन माणसं भात जेवतात तशा वेगाने मी चिप्स खाऊ शकतो हे लोकांच्या लक्षात आलंय.
शेवटी पूर्णपणे व्यसन सुटणं कठीणंच आहे पण त्याला मर्यादा आखून देणं गरजेचं आहे किंवा मन वळवणे गरजेचं आहे. आता नित्य नियमाने मी फक्त फ्रायडेला संध्याकाळी चिप्स खातो. तेदेखील पूर्ण पॅकेट मोकळं न करता एका बाउलमध्ये घेऊन. (बाउल केवढा आहे विचारू नका) कधी कधी संध्याकाळी घरी पोहचल्यावर हात थरथरू लागतात, श्वास जड होतो, एंक्शियस व्हायला होतं, अशावेळी काहीतरी कुरकुरीत पटकन तोंडात टाकावं म्हणून पोह्याचा चिवडा घरात करून ठेवलाय.
चिप्स माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, त्यांची जागा कशानेच भरून निघणार नाही. चिप्सच पण माझ्यावर तितकंच प्रेम आहे. ते पण शरीरात गेल्यावर चरबी रूपाने बरोबर अयोग्य अशा काना कोपर्यात बरोबर दबा धरून बसतात. एक्सरसाईज केल्याशिवाय ढिम्म हलत नाहीत. कुठे पाहायला मिळते अशी घट्ट मैत्री.
माझ्यासारख्या अनुभवातून जाणार्या इतर एडिक्टेड मंडळींना माझं एकच सांगणं आहे. काळजी करू नका, नशा है सब में, बस नशे का रंग है जुदा. काढायचे आहेत अजून तीन दिवस, फ्रायडे आलाच बघा.