आपण गीतेतील एक वचन अनेकदा ऐकलंय. कर्म करत राहावं आणि फळाची अपेक्षा बाळगू नये. आपल्याला हे वचन पटायला आणि पचायला जड जातं. कारण मोबदल्याशिवाय कोण कसं कर्म करत राहणार? एकदा मी सुनील या मित्राला हे वचन सांगितलं, तर तो म्हणाला. असं कसं होऊ शकतं? माणूस बिनपगारी नोकरी कशी करेल? त्याने मला विचारलं, तू करशील? हवं तर तुझ्यासाठी बिनपगारी फुल अधिकारी नोकरी शोधतो. आमचा सुनील आहेच तसा गमत्या. पण त्यालाही सवाई लोक भेटतात. परवा मी त्याच्या घरी गप्पा मारत असताना त्याचा दूधवाला आला.त्याने सुनीलला दुधाचं बिल दिलं. सुनील मुद्दाम मला सुनवत गमतीने त्या दूधवाल्याला म्हणाला, अरे भय्याजी, कर्म करते रेहने का. फल की अपेक्षा नही करनेका. दूधवाला म्हणाला, अरे साहब, हम फल कहां मांग रहे है? हम तो रोकडा मांग रहे हैं…
तर सुनील आणि त्याचा दूधवाला गंमत करत असले तरी कर्म करीत राहावे आणि फळाची अपेक्षा बाळगू नये, हे व्यवहारात कितपत शक्य आहे, असा प्रश्न आपल्या सार्यांनाच पडत असतो. परंतु फळाची अपेक्षा न करता काम करत राहणे या विचारातला चांगला भाग जर घ्यायचा असेल, तर तो असा असू शकतो की आपण जे काही काम करतो त्या प्रत्येक कामाबाबत आपण अत्यंत व्यवहारी, हिशोबी असण्याची गरज नाही; आपण फळाची अपेक्षा न बाळगता अखंडपणे कार्यरत राहिलो तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचं फळ आपल्याला मिळतंच. आपल्याला शिकायला मिळतं, अनुभव मिळतो. समाधान मिळतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मान, सन्मान, प्रतिष्ठा, संधी, पुढील कामाची पायाभरणी, त्या कामातून पुढचं प्रत्यक्ष आर्थिक मोबदला देणारं काम, असं बरंच काही मिळत असतंच. आपण सतत कार्यरत राहिलो, तर त्यात आपलं नुकसान काहीच नसतं. वेगळ्या प्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होतच असतो. त्यामुळे कार्यरत राहा, मोबदला मिळणं, फळ मिळणं हा आपला फोकस ठेवू नका, असा याचा अर्थ घेता येईल. असो.
जीवनात आपण सारेच एकमेकांकडून अपेक्षा बाळगत असतो. मुलांच्या आई-वडिलांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. शाळा-कॉलेजात शिकणारी मुलं आपली मित्र-मैत्रिणी ज्या प्रकारचे खर्च करतात, ज्या प्रकारचे जीवन जगतात त्या प्रकारची लाईफस्टाईल आपल्यालाही मिळायला हवी अशी पालकांकडून अपेक्षा करतात. पुढे सुद्धा एखादं खर्चिक करिअर त्यांना निवडायचं असेल तर त्यासाठी परवानगी आणि खर्चाची तयारी ही त्यांची पालकांकडून अपेक्षा असू शकते. पालकांनी शिक्षणासाठी परदेशी पाठवावं ही देखील अपेक्षा असू शकते. जशा मुलांच्या पालकांकडून अपेक्षा असतात तशाच पालकांच्याही मुलांकडून असतात. आपण मुलांसाठी एवढं सगळं केलं, त्यांना एवढं शिकवलं, स्वत:च्या पायावर उभं केलं, त्यांना काही कमी पडू दिलं नाही तर आता त्यांनी आपली मर्जी सांभाळली पाहिजे, आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे सांभाळायला पाहिजे, अशी पालकांची अपेक्षा असू शकते.
मंडळी, आपण कुणाला तरी म्हणतो माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती किंवा माझी तुझ्याकडून अमुक एक अपेक्षा आहे. कधी कधी आपण काहीच सांगत बोलत नाही, पण अपेक्षा मात्र असतेच. आपण म्हणतो, काय सांगायचं? न सांगता यांना कळायला नको?
आपण फक्त ‘लोक आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत,’ अशी तक्रार करत राहतो. पण आपल्याकडूनही लोकांच्या अपेक्षा असतात, त्यांचा आपण किती विचार करतो?
आपण जिला अपेक्षा म्हणतो ती खरच अपेक्षा असते का? की आपली अपेक्षा ही मागणी असते? अपेक्षा आणि मागणी या दोहोंमध्ये काही फरक आहे का? असेल तर तो कोणता?
आपण एक उदाहरण पाहू.
श्रीकांत या तरुणाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे. त्याच्या एका मित्राने त्याला एक उद्योग सुचवला आहे. तो उद्योग आपण चांगला करू शकू असं श्रीकांतला वाटतं आहे. त्याला या व्यवसायासाठी भांडवल हवं आहे. हे भांडवल तो वडिलांकडे मागतो. पण वडील पैसे द्यायला नकार देतात. ते म्हणतात, तुला व्यवसाय जमणार नाही. तू त्यात पडू नको. दुसरा काही काम धंदा बघ. श्रीकांत त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करतो की मी हा व्यवसाय यशस्वी करेन. बाबांना मात्र तसं वाटत नाही. श्रीकांत त्यांना समजावतो पण ते ऐकत नाहीत. श्रीकांत लक्षात घेतो की बाबांना विश्वास वाटत नाहीय. त्यांना तसं वाटू शकतं. आपली अपेक्षा होती की त्यांनी पैसे द्यावे. पण मी तो व्यवसाय नीट करू शकलो नाही तर पैसे गमवून बसेन, नुकसान होईल ही त्यांची भीती अगदीच अनाठायी नाही. त्यांची भीती रास्त आहे. आता श्रीकांत मनाशी म्हणतो की आपण बाबांना अजून एक दोनदा आपलं व्यवसायाचं नियोजन पटवण्याचा प्रयत्न करू अन् ते नाहीच म्हणत असतील तर मग अनेक मित्राकडून थोडे थोडे पैसे उभे करू.
श्रीकांत जसा उद्योग उभा करू पहात आहे, तसाच मनोज हा तरुणही काही उद्योग धंदा उभारू इच्छितो आहे. तोही त्याच्या वडिलांकडे उद्योगासाठी पैशाची मागणी करतो. त्याच्याही वडिलांना मनोजने उद्योग वगैरे न करता इतर काही नोकरी वगैरे करावी असे वाटते आहे. तेही त्याला पैसे देण्यास नकार देतात. वडील पैसे देत नाहीत म्हटल्यावर मनोज चिडतो. बडबड करू लागतो. मला पैसे हवेच म्हणतो. मला काहीच सांगू नका. मी काही ऐकणारच नाही म्हणतो. चिडून म्हणतो, तुमच्या त्या अमुक मित्राने तुमचे पैसे बुडवले. त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे होते. स्वत:च्या धडपडणार्या मुलाला द्यायला मात्र तुमच्याकडे पैसे नाहीत? मला पैसे हवे आहेत तर काय मी लोकांकडे भीक मागू? त्याची बडबड सुरूच राहते….
श्रीकांत आणि मनोज दोघांनीही वडिलांकडे पैसे मागितले. पण श्रीकांतची अपेक्षा होती अन् मनोजची मागणी होती.
आपण अपेक्षा करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला समजून घेतो. त्याची अडचण लक्षात घेतो. त्याच्याही बाजूने विचार करतो.आपण आपल्या मनासारखच झालं पाहिजे असं म्हणत नाही. मानत नाही. आपली अपेक्षा आहे. पूर्ण झाली तर ठीक. आपण संयम बाळगतो. विचारीपणे वागतो. विवेक बाळगतो.
मात्र आपण मागणी करत असू तर मात्र आपण दुसर्याला समजून घेत नाही. आपण आपलंच खरं म्हणतो. आपण मागणीबाबत आग्रही असतो. अनेकदा दुराग्रही असतो. आपल्या मागणीला ‘च’ लागलेला असतो. हा, ‘मी यशस्वी होणारच’ अशासारखा निग्रहाचा ‘च’ नसतो. हा दुराग्रही हट्टाचा ‘च’ असतो. मागणीचा ‘च’ असतो. आपल्या मनासारखं झालंच पाहिजे या मागणीवर राहून आपण स्वतःही दुःखी होतो अन् इतरांनाही दुःखी करतो. स्वत:च्याही डोक्याला ताप करून घेतो अन् इतरांच्याही डोक्याला ताप देतो.
आपण शाळा-कॉलेजच्या दिवसांत पालकांकडे काही वस्तू मागायचो. नाही मिळाली तर आदळआपट करायचो. असं करण्याऐवजी आपण शांतपणे आईवडिलांची अडचण समजून घेतली की मात्र आई म्हणायची, ‘शहाणं आहे माझं बाळ’.आपली कुमारवयीन मुलंही असंच वागतात.मला येत्या बर्थडेला नवी सायकल हवी म्हणतात. पालक म्हणून आपल्याला सध्या शक्य नसेल, आर्थिक ओढाताण असेल तर आपण मुलांना समजावतो, या वर्षी नाही बेटा जमणार. नव्या घराचे हप्ते आहेत. जवळची लग्नं आहेत. मोठा खर्च आहे. पुढच्या वर्षी नक्की घेऊ. मुलांची अपेक्षा असेल तर मुलं समजून घेतात. अन्यथा चिडतात. ओरडतात. बोलत नाहीत. जेवत नाहीत.मला सायकल पाहिजेच अन् यंदाच पाहिजे म्हणतात. घरात, घरातल्या सदस्यासोबत, घराबाहेर मित्रांसोबत-सहकार्यांसोबत आपण दुराग्रही मागणी करतो की समंजस विवेकी अपेक्षा करतो, हे आपण तपासलं पाहिजे.
आपली अनेकांशी मैत्री असते. मैत्रीत देखील आपण मित्रांकडून, सहकार्याकडून काय मागणी करतो, त्याचंही भान ठेवलं पाहिजे. मैत्रीत आपण असं मानतो की अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत केली पाहिजे, प्रसंगी धावून आलं पाहिजे. प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. मित्रांनी मदत करावी असं वाटलं तर त्यात काही वावगं नाही, ते साहजिक आहे. पण कोणत्या गोष्टीत मदत मागावी, सोबत मागावी याला काही अर्थ आहे की नाही? समजा, आपण ड्रिंक करतो. आपला मित्र मात्र दारू पीत नाही. आपण आज त्याला म्हणतो, यार, आज नाही म्हणू नकोस. आज तू माझ्यासोबत घेतलीच पाहिजे, माझ्यासाठी, आपल्या दोस्तीसाठी. आपण हट्टालाच पेटतो. तो नकार देत राहतो अन् आपण त्याने ‘घ्यावी’ ही मागणी करत राहतो…
आपली अपेक्षा ही अपेक्षा असली पाहिजे.अन् ती रास्त आहे का, हेही आपण तपासून पाहिले पाहिजे.