□ जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत. तीन महिन्यात तीन गुन्हे दाखल.
■ जो जो गद्दारांपुढे आव्हान उभे करेल, त्याच्यापुढे अडचणींचा पहाड उभा राहीलच… आव्हाड लेचेपेचे नाहीत म्हणून बरे!
□ कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण झालेल्या प्रबोधनकार ठाकरे सरोवराचे गेट पडले…
■ प्रबोधनकारांच्या नावाने पवित्र झालेल्या ठिकाणी पाप्यांचे हात लागल्यावर दुसरं काय होणार?
□ उल्हासनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकीटमारी.
■ मंचावर किती ऐवज गेला? तिथेही महाचोरच बसले होते ना!
□ केळीच्या बोगस विम्यातून सरकारची १०० कोटींची फसवणूक.
■ पीकविम्याच्या नावाखाली एकीकडे शेतकर्यांची फसवणूक झाली, दुसरीकडे सरकारची, आता फायदा कुणाचा झाला, करा गणित!
□ नगरसेवकच नसताना महानगरपालिकेचे निधीवाटप कसे?
■ बाहुल्यांना काय विचारताय नाच का करताय म्हणून? नाचवणारे हात पाहा आणि ते मुळातून उखडून टाका!
□ कसबा पेठ निवडणुकीची सूत्रे फडणवीसांकडे.
■ अरेच्चा, म्हणजे मोदींची सभा नाही? कसबा पेठ से मेरा पुराना रिश्ता है, असं भाषण नाही? बरीच सूट दिली म्हणायची…
□ एसटीच्या वेतनाचा तिढा कायम. फेब्रुवारी संपला तरी जानेवारीचे वेतन नाही
■ एसटी कर्मचार्यांनी नको त्या रत्नाच्या नसलेल्या गुणांवर भाळून पायावर कमळ मारून घेतले आहे… आता उपयोग काय रडून?
□ कर्ज व्याजदरात वाढीचे सत्र सुरूच.
■ कर्जाने पिचून माणसे सामुदायिक आत्महत्या करत नाहीत, तोवर ते वाढतच राहणार… जो काही प्राणी पाळला आहे, त्याचा खर्च तर करावा लागणारच ना?
□ राजकारणात धोका देणार्याला बरोबर धडा शिकवायचा असतो : अमित शाह.
■ निवडणुका लावा मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशात… जनता तुम्हाला तो शिकवायला आतुर आहे…
□ आजकाल राजकारणात विरोधकाकडे शत्रू म्हणून पाहिले जाते : देवेंद्र फडणवीस.
■ काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा तुमच्या नेत्यांनी दिली, तेव्हापासूनच विरोधक म्हणजे शत्रू हा पाचकळपणा सुरू झाला देवेनभाऊ… आता तुम्ही महाराष्ट्रात त्याच्या सीमाही पार केल्या आहेत…
□ भाजप आता एवढा ताकदवान झाला आहे की समोर कुणीही एकटा लढू शकत नाही : अमित शहा.
■ इकडून तिकडून गोळा केलेली पादरफुसकी हवा भरल्याने फुगा ताकदवान होत नाही, उलट तो फुटण्याची शक्यता वाढते. एक बारीकशी टाचणी पण पुरेशी आहे हा फुगा फोडायला!
□ आसामातील भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करणार्या आसाम सरकारच्या जाहिरातींमुळे खळबळ.
■ बाप चोरतात, पक्ष चोरतात, नाव चोरतात आता देव पण चोरू लागले… यांच्याकडे स्वत:ची बुद्धी तरी आहे की तीही कुठून चोरलेली आहे?
□ ऑक्सिजनची नळी लावून आजारी गिरीश बापटांना भाजपने कसब्यात प्रचारात उतरवले.
■ सत्ता हाच पक्षाचा ऑक्सिजन असल्यावर दुसरं काय होणार?
□ भाजप कार्यकर्त्यांनी रिफायनरीसाठी बळकावल्या बारसूमधील जमिनी
■ तिथले भाजप कार्यकर्ते म्हणजे टिल्लू टॉम गँग, तिचा धंदाच तो आहे!
□ निवडणूक आयोगाच्या निकालावर चर्चा करता येत नाही. या निकालाने फारसा फरक पडेल, असं वाटत नाही : शरद पवार.
■ परफेक्ट बोलले पवार साहेब! प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाचा पक्ष एक, चिन्ह एक… श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे!
□ बाळासाहेबांनी माकडांची माणसे केली. त्यांना हाती तलवार देऊन सरदार बनवले : संजय राऊत.
■ त्यातली काही माकडेच राहिली होती, राऊत साहेब! त्यांनीच घात केला!
□ विरोधक एकत्र आले तर भाजपला १०० जागाही मिळणार नाहीत : नीतीश कुमार.
■ मग वाट कसली बघता नीतीश बाबू, घ्या पुढाकार! ही विषवल्ली सगळ्यांनी मिळून आजच उपटली नाही, तर देश ओसाड केल्याशिवाय राहणार नाही…
□ अदानी प्रकरणामुळे भारताची गुंतवणूकयोग्य देश ही प्रतिमा मलीन झाली : अमेरिकेचे उद्योगपती जॉर्ज सोरोस.
■ अरे यांना पाकिस्तानात हाकलून द्या कोणीतरी! भारताचा बदाबदा सुरू असलेला विकास पाहावत नाहीये यांना (इथेही तो दिसत नाहीच आहे म्हणा कुणाला)!