वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा न भूतो न भविष्यति असा भव्य सत्कार समारंभ झाल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुशीत असल्याच्या अफवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्या आहेत, असं त्या सभेला उपस्थित असलेला माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या सांगत होता, तेव्हा मला हसायलाच आलं. मात्र त्याचवेळी त्या सभेनंतर दाढीवाले खूप नाराज आहेत, असंही पोक्या सांगत होता. तेव्हा मी जे काय समजायचं ते समजलो. त्या सभेला अजिबात गर्दी नव्हती. समोरच्या ११ हजार खुर्च्यांवर एकही माणूस न बसल्यामुळे सभेला सुरुवात होता होता त्या कंत्राटदारांमार्फत हटवण्याची ऑर्डर देण्यात आली आणि दाढीवाल्यांना आवाज घुमण्यासाठी मैदान मोकळं करून देण्यात आलं. त्याचे व्हीडिओही तत्काळ व्हायरल झाले आणि भाजपचे गुलाम असलेली टीव्ही चॅनल्स सोडून बाकीच्या चॅनेल्सनी तो फियास्को दाखवण्यात अजिबात कसर केली नाही. हे पाहून भाजपप्रेमींच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि गद्दारांच्या गोटात शोककळा पसरली होती. व्यासपीठावरची नेतेमंडळीही कधी एकदा ही सभा संपतेय याचीच वाट पाहात आंबट चेहरे करून बसली होती. कोळीबांधवांच्या वेषात जे सात-आठजण व्यासपीठाजवळ दिसत होते ते तर स्थानिक वाटतच नव्हते. त्यांना झारखंडहून भाड्याने आणल्याचं वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमधून देण्यात आलं. वैशिष्ट्य म्हणजे खुर्च्या रिकाम्या असल्याची खबर लागताच फडणवीस यांनी सभेला चक्क दांडी मारली. हे सर्व कसं काय घडलं याबद्दल जाणून घेण्यासाठी मीच पोक्याला सांगितलं की, तूच त्या दोघांच्या मुलाखती टेप करून घे.
पोक्या आधी फडणवीसांकडे गेला. ते अमृताबाईंच्या गाण्यांचे व्हीडिओ पाहात बसले होते.
– या या पोक्यासाहेब. विचारा काय विचारायचं ते.
– साहेब, कोळीवाड्यातील ऐतिहासिक सभेला तुम्ही कल्टी का मारलीत? अनेकजण म्हणतात की मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडण्यासाठी तुम्हीच हे सारं घडवून आणलंत.
– साफ खोटं आहे ते. असं मी कशासाठी करीन! सभेच्या आधी मला दिल्लीवरून फोन आला आणि महत्त्वाच्या कामासाठी पुढील सूचना मिळेपर्यंत घरीच थांबा, असा निरोप मिळाला. पण बाकीची नेतेमंडळी होती ना! आमचे केसरकर, सामंत होते, शेलार होते.
– पण तुम्ही असता तर सभेला वजन आलं असतं.
– खरंय. पण मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या पायावर कधीतरी उभं राहायला हवंच ना!
– म्हणजे? अजून ते ‘स्वत:च्या पायावर’ उभे नाहीयेत?
– आहेत ना. काय तुफान भाषण केलं त्यांना.
– पण ते ऐकायला समोर गर्दी तर हवी ना! शिवसेनेशी गद्दारी केल्यापासून ते लोकांच्या मनातून उतरले आहेत, हेच जनतेने दाखवून दिलं आहे, असं नाही वाटत तुम्हाला?
– मुळीच नाही. जनतेच्या हिताचे शेकडो निर्णय एका दिवसात घेण्याचे, जनतेसाठी कोटी कोटी रुपयांची कंत्राटे देण्याचे, एकेका दिवशी अनेक दौरे करण्याचे काम ते किती तत्परतेने करतात.
– पण लोकांच्या मनातली मलीन प्रतिमा उजळ करण्यासाठी ते जनतेच्या पैशांचा चुराडा करीत आहेत, असं नाही वाटत तुम्हाला?
– पोक्या, उगीच सुतावरून स्वर्ग गाठू नको. काही दैवयोगाच्या गोष्टी असतात. ज्याला जे मिळायचं असतं ते आपोआप मिळतं.
– पण त्यासाठी त्यांनी पक्षाशी गद्दारी केलीच ना! तत्वनिष्ठेच्या गप्पा मारून पक्ष फोडण्याचं आणि तो स्वत:च्या मालकीचा म्हणून मिरवण्याचं कटू कारस्थान केलंच ना! खोक्यांनी बेईमानी विकत घेता येते, इमान नाही घेता येत साहेब.
– तू म्हणतोस ते पटतंही आणि पटत नाहीही.
– कसं पटेल? तुम्हीच त्यांना शिवसेना संपवण्यासाठी गौहातीला घेऊन गेला होतात ना! महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलंय ते. बाळासाहेबांचे मुखवटे लावून निवडणुका जिंकता येत नाहीत साहेब. असो, मला दाढीवाल्यांची मुलाखत घ्यायला जायचंय. येतो मी…
– शिंदे सर, आत येऊ का?
– दार उघडंच आहे सर्वांसाठी. कधीही या, गार्हाणी मांडा. ताबडतोब निर्णय घेतो. कोटी कोटी मंजूर करतो. तुमचं काय काम?
– मी वरळीच्या तुमच्या ऐतिहासिक सभेबद्दल बोलायला आलोय.
– माझं तडाखेबंद भाषण ऐकलंत ना. कसे तडाखे दिले एकेकाला.
– पण तुमचे विचार ऐकायला दोनशे-तीनशे लोकच होते. तुम्ही रात्री साडेनऊला आलात तरी खुर्च्या रिकाम्या होत्या. शेवटी तुमचा अपमान नको म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरने आपली सारी माणसं कामाला लावून त्या पटापट माघारी नेल्या.
– भाषण करताना माझं लक्ष समोर लोकांकडे नव्हतं. कारण विचार मांडताना माझं लक्ष माझ्या मनावर केंद्रित झालेलं असतं. त्यावेळी डोळ्यासमोरचं मला काही दिसत नाही. ती एक समाधी असते. हे सारं दिव्य ज्ञान मला गौहातीत प्राप्त झालं.
– लोक म्हणतात तो खोक्यांचा संकेत होता…
– असेलही. माझ्या नेतृत्त्वाला मी किती मोठा आहे हे कळलंच नाही. माझा त्याग, मेहनत कळली नाही. पण ती भाजपवाल्यांना कळली. पूज्य मोदीसाहेबांना कळली. आदरणीय फडणवीस साहेबांना कळली. तेव्हा त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला. प्रिय मोदीजी, अमित शहाजी, फडणवीसजी यांना साक्ष ठेवून मी पक्ष फोडला.
– म्हणजे पक्षाशी बेईमानी केली. सच्च्या शिवसैनिकाने वरिष्ठ नेत्याचे फक्त आदेश पाळायचे असतात. तुम्ही त्यांना तर जुमानले नाहीच, पण शिवसेनेवर मालकी हक्काच्या बाता करू लागलात. निष्ठावंत शिवसैनिक हे कधीच सहन करणार नाहीत आणि शिवसेनेला मानणारी जनताही. वरळी कोळीवाड्यातील रिकाम्या खुर्च्या हे त्याचं उत्तर होतं.
– या बोलण्याला काही अर्थ नाही आणि मला दिलेल्या आव्हानांनाही. आता जनतेने आत्मपरीक्षण केलं पाहिजे.