जॉर्ज फर्नांडिस यांची नुकतीच पुण्यतिथी झाली. जॉर्ज हे मुंबईतील झुंजार कामगार नेते. स. का. पाटील या काँग्रेसच्या मुंबईतील बड्या नेत्याचा पराभव केल्यामुळे जॉर्ज प्रकाशझोतात आले. संपसम्राट, बंदसम्राट बनले. त्यांच्या एका हाकेसरशी मुंबई बंद होते, असा त्यांचा लौकिक पसरला. आणीबाणीच्या काळात सरकारी कार्यालये आणि रेल्वे रूळ डायनामाइट लावून उडवून देण्याचा कट रचल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा पराभव करून जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा जॉर्ज केंद्रात मंत्री बनले. शिवसेनाप्रमुखांचे ते ‘अरेतुरे’तले मित्र. पण, गडी बिल्कुल भरवशाचा नाही, याची शिवसेनाप्रमुखांनाही कल्पना होती. जनता सरकारला याचा अनुभव आला. १९७९ साली संसदेत आदल्या दिवशी जनता सरकारच्या बाजूने भाषण ठोकणार्या जॉर्ज यांनी जनता सरकारच्या बाजूने जोरदार बॅटिंग केली. दुसर्याच दिवशी या सरकारवर विश्वास राहिला नाही, म्हणून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनेक पक्षांच्या कडेकडेने वाहात ते अखेर त्यांच्या समाजवादी विचारधारेच्या थेट विरोधी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले आणि तिथे स्थिरावले. जॉर्ज यांच्या बेभरवशी वृत्तीवर बाळासाहेबांनी जनता पक्षाच्या राजवटीच्या काळातच केलेले हे भाष्य कमीत कमी शब्दांमध्ये, फक्त देहबोलीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्क सांगणारे आहे.