• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नॉर्वे देशाच्या राजधानीचे शहर… ऑस्लो

- डॉ. सतीश नाईक, डॉ. उर्मिला कबरे (अपुन अपुन)

Nitin Phanse by Nitin Phanse
February 9, 2023
in भाष्य
0

नॉर्दर्न लाईट्स पाहून झाल्यावर आम्हाला स्कँडिनेव्हियन देशांच्या राजधान्यांची आठवण झाली. आम्ही ट्रॉम्सोमध्ये होतो. ते छोटुकलं शहर नॉर्वे या देशात आहे. सगळ्यात आधी त्याच देशाच्या राजधानीचं शहर म्हणजे ऑस्लो पाहायचं होतं. ट्रॉम्सो हे नॉर्वेचं उत्तरेकडलं टोक आहे तर ऑस्लो दक्षिणेकडच्या भागात. त्यामुळं हा प्रवास विमानाने करण्याने वेळ वाचणार होता.
विमान पकडायला आम्ही ट्रॉम्सो विमानतळावर गेलो, तेव्हा सुखद धक्का बसला. भारतात विमानतळाच्या दरवाजापासून सुरुवात होऊन पुढे पदोपदी सुरक्षा तपासणीचा ‘जाँच’ रक्तात भिनलेला. इथं कोणतीही तपासणी न करवून घेता तुम्ही विमानतळाच्या आत थेट प्रवेश करू शकत होता. हा अनुभव देखील नवीन होता. पण आनंद तिथे संपला. कारण विमानतळावर आमची उस्तवार करायला माणसेच नव्हती. आपणच तिथल्या मशीनवरून बोर्डिंग पास काढायचा. विमानात द्यायच्या सामानाला लावायचा टॅगही आपणच लावायचा आणि सामान पट्ट्यावर पण आपणच चढवायचं. आम्हाला भारताची सवय. तिथली भरपूर कामगारवर्गाची मिजास अंगवळणी पडलेली. ही सगळी कामं करायला सगळीकडे कोणी ना कोणी असतं. तिकीट दाखवून बोर्डिंग पास द्यायला बराच मोठा तांडा असतो. चेक इन करायचं सामान त्यांच्याकडे सुपूर्द केलं की आपण मोकळे होतो. सामानाचा टॅग कसा लावायचा हे जाणून घ्यायची आपल्याला काहीच गरज नसते. इथं माणसांचीच वानवा. त्यामुळं हे स्वतःचं स्वतः करताना आमची तारांबळ उडाली. दाखवायलाही कुणी नव्हतं. मग आम्हीच स्वतःचे शिक्षक झालो आणि एकमेकांना मदत करून ते दिव्य पार पाडलं.
आपण आता बर्‍यापैकी दक्षिणेकडे शहरात जातोय. तिथं तरी ट्रॉम्सोची हाडं गोठवून टाकणारी थंडी नसेल हा आमचा होरा तितकासा खरा ठरला नाही. ऑस्लो हे बर्‍यापैकी मोठं, साडेचारशे चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं अस्ताव्यस्त शहर आहे. शहराच्या आसपास चांगलं विस्तीर्ण जंगल आहे. सतराव्या शतकात आगीत ऑस्लो भस्मसात झालं होतं. त्यानंतर मूळ शहराच्या थोडं पश्चिमेकडे नवं शहर वसवलं गेलं. त्याचं मूळ नाव बदलून ख्रिश्चियानिया ठेवलं गेलं. गेल्या शतकात ते पुन्हा ऑस्लो झालं.
युरोपातल्या इतर देशांच्या मानानं नॉर्वे बरंच साधन आहे. इथलं दरडोई उत्पन्न युरोपियन युनियनमध्ये असलेल्या अन्य देशांच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त आहे, त्यामुळं हा देश बर्‍यापैकी महागही आहे. आम्ही गेलो तेव्हा पाण्याच्या एका बाटलीला दीड-दोनशे रुपये मोजावे लागत होते. बाहेरची थंडी आणि हाती असलेला कमी वेळ यांची सांगड घालून जमेल तितकंच पाहायचा निर्णय सर्वानुमते झाला होता. तरी आम्ही शहराच्या मध्यवर्ती भागात राहायला होतो. पाहायच्या बहुतेक गोष्टी चालत जाण्यासारख्या अंतरावर होत्या. सुदैवानं ऊन पडलं होतं. पण थंडी तितकीच वाजत होती. उन्हामुळं रस्त्यावरचं बर्फ वितळायला लागलं होतं आणि त्यावरून घसरून पडायची भीती होती. रस्त्यात भरपूर माणसं पाहून आपल्या देशाची आठवण होणं साहजिक होतं. मुख्य रस्त्याच्या एका टोकाला राजवाडा होता. रस्ता बराच लांब होता. त्यात आम्हाला कळलं की प्रत्यक्ष राजवाड्यात प्रवेश मिळत नाही. मग राजवाडा जवळून पाहण्याचा आमचा उत्साह आपोआपच मावळला. नाहीतरी थंडीनं आम्ही कंटाळलो होतोच. मग त्यातल्या त्यात बर्‍यापैकी ‘जवळ’ जाऊन ‘दुरूनच’ राजवाडा पाहिला. फोटो काढले आणि निघालो. जवळच या देशाचं पार्लमेंट होतं. राजवाड्याची इमारत आणि पार्लमेंट एकाच साच्यात बनवल्यासारखं वाटलं. त्याच प्रकारचे दगड, त्याच मुशीतली बाह्य रचना. त्याचं देखील बाहेरूनच दर्शन घेतलं.
रस्त्यावरून चालताना सगळे विखुरले गेलो होतो. काही वेळानं लक्षात आलं की आमच्यातलं एक जोडपं कुठे दिसत नाहीय. आसपास शोध घेतला पण ती दोघं कुठे दिसेनात. या सगळ्या गदारोळात आता काय करायचं, कुठं शोधायचं यांना या विवंचनेत आम्ही चांगलेच थकून गेलो. शिवाय सकाळी विमान पकडायला फार लवकर उठलो होतोच. त्यामुळं सगळ्यांनी पुन्हा हॉटेलवर परतायचं आणि पुढं काय करायचं ते ठरवायचं हा निर्णय झाला. अर्थात आम्ही हॉटेलला पोचल्यावर कळलं की ती दोघंही आधीच तिथं पोचली आहेत. आमचा जीव भांड्यात पडला. इतका वेळ तणावाखाली असलेले सगळे त्यांची फिरकी घेण्यात मग्न झालो.
दुसर्‍या दिवशी आमची थोडी पळापळ झाली. तिथे बस, ट्रॅम, मेट्रोसाठी एकच तिकीट चालतं. ते मिळतं किऑस्कवर. आमच्या हॉटेलजवळचं तिकीट मिळण्याचं स्थान रेल्वे स्टेशनजवळ होतं. आमच्यातले दोघे तिघे जण तिकीट काढायला पुढं गेले. बाकीचे मागून निघाले. जाताना एक गंमत घडली. रस्त्याच्या कडेला एक कावळा होता. आकाराने चांगला डोमकावळ्यासारखा मोठा. कोणीतरी सहज गंमत म्हणून म्हणालं, ‘हा युरोपचा कावळा थोडा गोरटेला वाटतोय नाही!’ आता सगळ्यांनाच तो गोरटेला वाटायला लागला! आणि बाकीचे सगळे हास्यविनोदात बुडून गेलो. पुढे तिकीट काढायला गेलेली मंडळी किऑस्क शोधून तिकीट काढेपर्यंत आम्ही त्या स्टेशनवरच्या खाण्यापिण्याच्या दुकानात रेंगाळलो. एकंदरीतच जगाच्या या भागात छोटी चवदार फळं- ज्यांना आपण बेरी म्हणतो- मिळतात, चवीला खूपच छान असतात. काहींनी त्या बेरी घेतल्या. वेगळ्या प्रकारच्या फळं सगळ्यांनी चाखली.
पुढे गेलेल्या मंडळींना कळलं की ओस्लो फिरायला चोवीस तास चालणारं तिकीट मिळतं. हे तिकीट अगदी महिनाभर किंवा वर्षभरासाठीही मिळतं. अर्थात दिवसांच्या संख्येप्रमाणे दर कमी अधिक असतात. फक्त जोपर्यंत ते तिकीट तुम्ही अ‍ॅक्टिव्ह करत नाही तोपर्यंत ते निरुपयोगी असतं. एखाद्या मॉलमध्ये पैसे देताना जसं आपण क्रेडिट कार्ड त्या मशीनसमोर धरतो तसं बसमध्ये एक मशीन असतं, त्यासमोर ते तिकीट धरायचं. अ‍ॅक्टिव्ह झालं की तुम्ही प्रवास करायला मोकळे. शिवाय ओस्लो पासही इथे उपलब्ध असतो. ओस्लो पासात अनेक म्युझियम्सची प्रवेश फी देखील अंतर्भूत असते.
आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यातल्या त्यात जेवढं बघता येईल तितकं पाहायचं होतं. आम्हाला नोबेल पीस म्युझियम पाहायची इच्छा होती. त्यामुळं आम्ही ‘आके ब्रिगे’ नावाच्या ठिकाणी निघालो. हे ठिकाण म्हणजे एक लहान बंदर आहे. कोपर्‍यावर शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या म्युझियमची इमारत आहे. इमारत फारशी ठसठशीत किंवा नजरेत भरेल अशी नक्कीच नाही. नोबेलचा जगभर असलेला दबदबा पाहता आम्हाला काहीतरी भव्य दिव्य अपेक्षित होतं. त्यामुळं भ्रमनिरास होणं साहजिकच होतं. आत गेल्यावर ज्या प्रकारे आतली मांडणी केलेली आहे ती पाहून मात्र हरखायला होतं. खूप झगमग नाही तरीही आटोपशीर आणि भारावून टाकणारी अशी म्युझियमची एकंदर रचना आहे. जगाचा इतिहास बदलणार्‍या व्यक्तींची मांदियाळी पाहून थोडा काळ त्या मस्त वातावरणात रमलो. नुकतंच मलाला या अफगाणी मुलीला आणि भारतातील कैलास सत्यार्थी यांना शांततेचं नोबल मिळालं होतं. त्यांचीही छायाचित्रं तिथं होती. साहजिकच आमचा ऊर अभिमानाने भरून आला.
जगभरात एक पद्धत आहे. कुठल्याही म्युझियमला भेट द्यायला गेलो तर तिथं एक स्मरणिका विकणारं दुकान असतं. नोबेल शांतता पारितोषिकाच्या म्युझियममध्ये नोबेल पारितोषिकाच्या प्रतिकृतीची चोकोलेट्स मिळत होती. काहींनी ती घेतली. प्रत्यक्षात पारितोषिक नाही तर निदान प्रतिकृती तरी!
म्युझियममधून खाली उतरलो. समोरच प्रवासी बोटींचा धक्का होता. आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी जाणारी बोट लागलीच निघणार होती. मागचा पुढचा विचार न करता आम्ही सगळे त्या लाँचमध्ये घुसलो. लगोलग लाँच निघालीही. पण लाँच सुटल्यावर कळलं की आम्ही काढलेला पास इथं चालत नाही. मग ‘आलीय भोगासी असावे सादर’ म्हणत पुन्हा नव्याने तिकिटं काढली.
त्यानंतर आम्ही प्रथम पाहिलं ते व्हायकिंग शिप म्युझियम. जवळपास अकराशे वर्षं नीट सांभाळून ठेवलेल्या बोटी तिथं आहेत. शिवाय व्हायकिंगशी संबंधित अनेकानेक वस्तूंचा संग्रह देखील आहे. गॅलरीमध्ये उभं राहून तुम्ही बोटींच्या आतल्या वस्तू पाहण्याचा आनंद घेऊ शकता. त्यानंतर आम्ही एका गार्डनकडे थांबलो. गार्डन म्हणायला हिरवळ कुठेच दिसत नव्हती. सगळीकडे बर्फाचं साम्राज्य. माथ्यावर लख्ख सूर्य होता. अशावेळी जमिनीवरचा बर्फ वितळू लागतो. भुसभुशीत हिमाची जागा घट्ट बर्फ घेतो. सगळं कसं निसरडं होतं. शिवाय वितळणार्‍या बर्फातून निथळणारं पाणी सगळीकडे पसरतं. त्यात आपले बूट भिजले की पाय चांगलेच गारठायला लागतात. गार्डनच्या दरवाजाशी अशाच पाण्याचं तळं साचलं होतं. त्या पाण्यातून स्वतःला वाचवून गार्डनमध्ये प्रवेश करताना आमची चांगलीच तारांबळ उडाली.
याला फ्रॉगेन पार्क किंवा विजेलॅन्ड पार्क असंही म्हणतात. गार्डनचं वैशिष्ट्य म्हणजे इथं एका टोकाला बरेच पुतळे आहेत. आमच्यापैकी काहींना बराच उत्साह होता. ती मंडळी पुतळे पाहायला गेली. काही जण गार्डनमध्ये असलेल्या रेस्टोरंटमध्ये गरम गरम कॉफीचा आस्वाद घ्यायला बसले. बर्फ, थंडी आणि निसरडी जमीन यांचा आलेला कंटाळा गरम कॉफीच्या कपात बुडवण्याचा आनंद औरच होता.
शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. पुतळे बघायला गेलेल्यांपैकी एक जण घसरून पडला होता. त्याला मनगटाच्या हाडांचं फ्रॅक्चर झालं होतं. तिथं हॉस्पिटलमध्ये जाणं आणि उपचार करणं ही मोठी भानगड असते. मग आम्ही कुठून तरी फुटपट्टी मिळवली आणि त्याचं मनगट त्या पट्टीला नीट बांधून ठेवलं. कारण कुठलंही हाड मोडलं की ते नीट योग्य जागी बसवण्याला महत्व असतं. हाडाची तुटलेली टोकं एकमेकांपासून दूर जाता नयेत. शक्यतो तुटण्याआधी ती ज्या ‘अलाईनमेन्ट’मध्ये होती त्याच प्रकारे राखणं हे खूप आवश्यक असतं. म्हणून तुटलेल्या हाडाच्या दोन्ही बाजूचे सांधे हलणार नाहीत अशा प्रकारे बांधले जातात. अन्यथा ते वेडेवाकडे जुळून येतात. आमच्यात बरेच डॉक्टर्स असल्यानं ही गोष्ट आम्हाला माहित होती. सोबत डॉक्टर्स असल्याचा हा एक मोठा फायदा होता. पण ज्याला फॅक्चर झालं त्याला बिचार्‍याला पुढची संबंध ट्रिप गळ्यात हात घालून मिरवावं लागणार होतं.
यातून दोन गोष्टी शिकलो. एकतर प्रवासाला जाताना पुरेशा किंमतीचा प्रवासी इंश्युरन्स घ्यायला हवा आणि प्रवासात विशेषतः परदेशी प्रवासात काळजीपूर्वक वागायला हवं. उगीचच धोका पत्करून स्वतःला अपघात करून घेणं श्रेयस्कर नसतं. अपघात झाल्यावर मग आम्ही आमचं त्या दिवसाचं ‘साईटसीईंग’ आवरतं घेतलं आणि थेट हॉटेल गाठलं.

Previous Post

‘पाच मिनिटांचं’ काम करूया!

Next Post

पोखरलेल्या व्यवस्थेची चिरफाड!

Next Post

पोखरलेल्या व्यवस्थेची चिरफाड!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.