शिवसेनाप्रमुखांच्या राजकीय आयुष्यात त्यांची थेट घाव घालणारी ठाकरी शैली, प्रतिस्पर्ध्याला घायाळ करणारी ठाकरी भाषा यांची चर्चा खूप झाली. त्या भाषेच्या सभ्यासभ्यतेवरही बराच ऊहापोह झाला. मात्र, ही रोखठोक भाषा बाळासाहेबांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेली होती, सर्वसामान्य माणसांना ‘त्यांच्या भाषे’त कोणीतरी आपल्याशी संवाद साधते आहे, असे वाटायचे. त्यात शिवाय बाळासाहेबांमधला अष्टावधानी व्यंगचित्रकार सतत जागा असायचा. त्याला जे तिरकस दृष्टीने दिसायचं, ते मांडायला हाताशी रेषा नसली की भाषा कामी यायची आणि शाब्दिक व्यंगचित्र रेखाटलं जायचं. ज्यांना हे कळायचं ते राजकीय प्रतिस्पर्धीही बाळासाहेबांच्या त्या ठोशांनी घायाळ होत नसत. त्यांची ही ठाकरी शैली त्यांच्या काही व्यंगचित्रांमधून दिसते. इथे त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसचे महानगरपालिका निवडणुकीत तीन तेरा वाजल्यानंतर काढलेले व्यंगचित्र फारच तिखट आणि अवघड जागी झालेल्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. पण, त्यामुळेच तर त्यातला आशय लख्खपणे पोहोचतो. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतल्या निवडणुकांमध्ये इकडून तिकडून गोळा केलेल्या उमेदवारांच्या मागे सर्व प्रकारची महाशक्ती उभी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी दयनीय अवस्था झाली, तिच्यावर अगदी चपखल शोभून दिसेल, असे हे व्यंगचित्र आहे.