नाटककार रत्नाकर मतकरी यांची ‘काळी राणी’ ही नाट्यसंहिता त्यांच्या पश्चात रंगभूमीवर आली आहे. कोरोनामुळे दुर्दैवाने त्यांना पडद्याआड जावं लागलं, पण त्यांची नाटके, एकांकिका, नाटके, बालनाट्ये, कथासंग्रह, कादंबर्या, मालिका यांचा आस्वाद घेऊनच मराठी वाचक आणि रसिक परिपक्व झालेत. त्यांची किमान पाच-सहा नाटके आजही व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यात ‘संभ्रम’, ‘जगाला नाही रे मंजूर’, ‘तुळसा’ आणि ‘गांधीजी : अंतिम पर्व!’- यातल्या शेवटच्या नाटकाच्या अभिवाचनाचे काही प्रयोग मतकरी यांनी केले होते, त्यात त्यांनी ‘गांधी’ साकारला होता. असो. एकूणच मराठी रंगभूमीच्या जडणघडणीतले ते एक कल्पक शिल्पकार! हे नाटकही त्यांच्यातल्या नाटककार म्हणून असलेल्या कौशल्याची पदोपदी साक्ष देते. वयाच्या सोळाव्या वर्षापासून अथकपणे साहित्य रंगभूमीला कवेत घेणारी ही रत्नाक्षरे ‘काळी राणी’ या नाटकातून रसिकांना हिंदी सिनेसृष्टीच्या एका वेगळ्याच ग्लॅमरस दुनियेत सहजतेने गुंतवून ठेवते.
नंदलाल पांडे उर्फ लालजी उर्फ एन. पी. या बड्या निर्मात्याच्या ब्रिटीशकालीन आलिशान बंगल्यातलं एका चित्रपटामागलं हे थरारनाट्य. होतकरू, प्रामाणिक तरुण चित्रपट लेखक मोहित मैत्र इथे पोहोचतो. थेट रसिकांशी संवाद साधतो. तोच यातील नाट्य अलगदपणे पुढे नेतो. ‘हिंदी’तल्या प्रवेशासाठी त्याने हे नामांतर केलंय. त्याचं मूळ मराठमोळं नाव जयराज जाखडे! निर्माता आणि लेखक यांच्यात एक हिरोईन प्रगटते. मूळची गोव्याची नीरा म्हापसेकर ही बोल्ड तरुणी मुंबापुरीतल्या मायानगरीत आलीय. हे दोघे उमेदवारी करण्यासाठी लालजी या ग्रेटेस्ट शोमनच्या दरबारी दाखल झालेत. सुपरडुपर हिट सस्पेन्स, थ्रिलर चित्रपटाची निर्मितीची जुळवाजुळव सुरू झालीय.
लालजी देखणेपणावर भाळून नीराची सोबत करण्याचा निर्णय घेतो. तिला ‘काळी राणी’ बनवतो. चित्रपटात भूमिका देतो, पण तिचा जीव जडलाय जयराजवर. दोघेजण परस्परांमध्ये लपून-छपून गुंतलेले. असा हा प्रेमाचा त्रिकोण त्यातून जणू बुद्धिबळाचा डाव रंगतो. ज्या सस्पेन्स, थरार चित्रपटामागे सारेजण आहेत त्यातले तेच नाट्य प्रत्यक्ष आकाराला येते, जे दुसर्या अंकात अधिकच धक्कातंत्राने भरलेले आहे. काही डाव उलट-सुलट होतात आणि त्यातूनच नाट्य एखाद्या इंग्रजी चित्रपटाप्रमाणे वेग घेते, गुंतवून ठेवते.
नाटकातली ऐंशीच्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टी काही वेळा भूतकाळात घेऊन जाते आणि काही प्रसंगांशी तुलना करण्याचा मोहही होतो. वैशिष्ट्यपूर्ण ठळक व्यक्तिरेखा हे देखील यातलं आकर्षण आहे.
‘लालजी’च्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक यांनी वेशभूषा, रंगभूषा आणि देहबोली यातून एक चाणाक्ष, कपटी, बिनधास्त निर्माता उभा केलाय, जो फिट्ट शोभून दिसणारा आहे. त्यांच्या नाट्यकारकिर्दीतलं हे पाऊल वेगळेपणानं भरलेलं. फिरोज खानप्रमाणे गेटअप. वातावरणनिर्मिती उत्तम होते. हिंदीतून संवाद तसेच बेरकी नजरही लक्षवेधीच. एकाच वेळी व्यावसायिकवर दोन नाटके स्वीकारणं हे तसे आव्हानात्मक. दोन्हीतले विषय, भूमिका हे सारं काही कमालीचे भिन्न. त्यांचा हा नवा मुखवटा बाजी मारतो.
‘ऑल द बेस्ट’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘हॅम्लेट’ या नाटकांनंतर रंगभूमीवरून गायब झालेली गुणी अभिनेत्री मनवा नाईक या नाटकाच्या टायटल रोलमध्ये ‘काळी राणी’च्या भूमिकेत आहे, तिने थक्क केलंय. आकर्षित करणारा गेटअप आणि त्याला अनुरूप हालचाली तिने केल्यात, ज्या भुरळ पाडतात. मुद्राभिनयातही सहजता दिसते. मोहित मैत्रच्या भूमिकेत हरीश दुधाडे याने भूमिकेसोबतच कथानक सफाईदारपणे मांडले आहे. ‘आय एम लकीएस्ट डॉग इन बॉलिवुड!’ असे तो आत्मपरीक्षणही करतो. ते समर्पकच. भूमिकेची समज उत्तम आहे. आनंद पाटील (जगदीश), चंद्रलेखा जोशी (नंदना), प्रदीप कदम (रघू) या सहकलाकारांनीही चांगली साथसोबत केलीय.
खुद्द नाटककार मतकरी यांनी यातील सादरीकरण आणि निवेदनावर भाष्य केलं होतं. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘या नाट्यात निवेदनाला म्हणजे मोहितच्या स्वगतांना एक वेगळेच महत्त्व आहे. कारण एकाच वेळी ते नायकाचे व्यक्तिचित्रण आणि दुसरीकडे कथानकाचा ओघ सांभाळते. या दोन्हीत महत्त्वाची भूमिका बजावते.’ नाटककाराची भूमिका ही दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे यांनी ताकदीने सांभाळली आहे. हा खेळ चांगलाच रंगविला असून त्यामुळे एका संहितेला न्याय मिळतो. आज मतकरी असते तर त्यांनाही प्रयोग पसंत पडला असता. ‘कॅप्टन ऑफ शिप’ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी एकूणच नाटकाची भट्टी मस्त जमविली आहे. भूमिकानिवडीतला नेमकेपणा तसेच तांत्रिक बाजूंची जमवाजमव चांगली केलीय. अगदी जाहिरातीपासूनच कल्पकतेची साक्ष पटते.
ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी निर्मात्याचा दिवाणखाना उभा करताना त्याला भूतकाळाची जोड दिलीय. जिना, दरवाजा, खिडक्या, कमानी सारं काही जुहूच्या बंगल्यात घेऊन जाते. रंगसंगतीही कथेला शोभून दिसणारी. अजित परब याचे संगीत साजेसे. ‘पदोपदी नवे डाव इथे, क्षणोक्षणी नवे घाव इथे,’ हे मंदार चोळकर याचं संज्योती जगदाळे हिने गायलेलं गाणं गूढता वाढविते. मंगल केंकरे यांनी प्रत्येकाची वेशभ्ाूषा ठळकपणे उभी केलीय. विशेषतः लालजी आणि काळी राणी यांचा कपडेपट अनुरूप आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि राजेश परब यांची रंगभूषा चांगलीच. तांत्रिक बाजू या नाटकाची रंगत वाढविण्यास पूरक ठरतेय.
‘विक्रमांचा विक्रम’ या नाट्यातून साधला गेलाय. मराठी रंगभूमीवर आपण केलेल्या प्रयोगांची संख्या नोंदविण्याचा नवाच प्रकार सुरू झालाय. सध्याच्या चढाओढीच्या व्यावसायिक युगात याही विक्रमांचे सोहळे होतांना दिसतात; पण एकेकाळी संगीत आणि गद्य रंगभूमीवर तर नाटक म्हणजे पूर्ण कुटुंबच सहभागी असायचे. बालपणापासूनच रंगभूमीवर सर्रास वाटचाल असायची. पडेल ते काम करणारी अनेक घराणी त्यावर अवलंबून होती. तो एक स्वतंत्र विषय ठरेल. इथे ‘काळी राणी’ हे नाटककार म्हणून मतकरी यांचे ९०वे नाटक आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे यांचे हे दिग्दर्शक म्हणून १००वे नाटक. चाळीस वर्षातली ही सेंच्युरीच! नेपथ्यकार प्रदीप मुळे यांचे २००वे तर संगीतकार अजित परब यांचे ४०वे नाटक ठरलंय. प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांचे १२५वे नाटक, तर वेशभूषाकार मंगल केंकरेंचे ५०वे नाटक आहे. रंगभूषाकार राजेश परब यांचेही ५०वे नाटक आणि अक्षरलेखक, जाहिरात डिझाईनर अक्षर कमल शेडगे यांचे चक्क १४००वे नाटक आहे. डॉ. गिरीश ओक यांचे हे ५१वे नाटक आहे. अधिक शोध घेतला तेव्हा कळलं की डॉक्टरांनी या नाटकामुळे ६,६६६ प्रयोगांच्या पुढच्या टप्प्याला प्रारंभ केलाय.
बुद्धिबळाचा दोघांचा बैठा खेळ जसा एका चौरस पटावर सोंगट्या मांडून खेळला जातो, त्याच प्रकारे इथे एका ग्लॅमरस चंदेरी-रुपेरी पटावर तीन सोंगट्या उभ्या करून डाव मांडलाय. जो रंगतदार होतोय. कुणाची तिरपी चाल तर कुणाची सरळ. पण फासे टाकून डाव सुरूच आहे. महान शक्ती असणारा वजीर; दोन घरे चालण्याची मुभा मिळालेली प्यादी… एक ना दोन. वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखांचा हा चित्तथरारक डाव! बुद्धी अन् कौशल्यावर नाटककार रत्नाकर मतकरी आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी रसिकांपुढे डाव मांडलाय. ज्यातून अंधारातल्या अनोख्या दुनियेचं दर्शन घडते.
काळी राणी
लेखन – रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक – विजय केंकरे
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
संगीत – अजित परब
प्रकाश – शीतल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
सुत्रधार – संतोष शिदम
निर्मिती संस्था – मल्हार आणि दिशा