`शिवसेना कशासाठी?’ या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनाप्रमुखांशी भेट झाली. काही वर्षांच्या परिचयानंतर त्या भेटीचे रूपांतर त्यांच्यामते `मैत्रीत’ तर माझ्यामते एका निष्ठावंत शिवसैनिकात झाले आणि `शिवसेनाप्रमुख’ माझ्यासाठी साहेब झाले.
यानंतर मी `मार्मिक’मध्ये नियमित लिहू लागलो. अनेक विषयांवर लिहिले. काही कविता लिहिल्या. त्या प्रसिद्ध झाल्या. त्यावेळी माझे मलाच आश्चर्य वाटले! `मार्मिक’मुळे मी काहीतरी छापण्यायोग्य लिहू शकतो असा विश्वास मला मिळाला. `मार्मिक’चे प्रभुदेसाई अशी ओळख मिळाली. सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल लेखांक लिहिले, त्यावेळी सर्व उत्सवांच्या, मंडळांच्या, संस्थांच्या पदाधिकार्यांना मी एक विनंतीपत्र लिहून शेजारच्या एका मुलाला त्यांच्याकडून कार्यक्रमपत्रिका, जमाखर्च पत्रक आणायला पाठविले होते. तो ते सर्व साहित्य घेऊन आला तेव्हा फारच खूश होता.’काय झाले रे’ असे विचारताच तो म्हणाला, `पत्र देताना मी त्यांना सांगत असे, `मार्मिक’च्या प्रभुदेसाई यांनी हे मागितले आहे. तेव्हा ती सर्व कागदपत्र देतच, पण प्रथम मला गणपतीचे दर्शन घडवत, इतर लोक रांगेत उभे असताना, मग मला प्रसाद देत. या मोठमोठ्या मंडळांच्या गणपतींचे दर्शन मला रांगेत उभे न राहता मिळाले!’
हे लेखन मी दर आठवड्याला प्रथम दादरला `कृष्णकुंज’ येथे नेऊन देत असे. मग साहेब वांद्र्याला `मातोश्री’त रहायला गेल्यावर तेथे नेऊन देत असे. रेल्वेने मी `शीव’ला जाई व तेथून खाडीच्या काठाने रस्त्याच्या एका बाजूने चालत वांद्र्याला जात असे. `कलानगर’मध्ये. त्यावेळी वाहने, इमारती व माणसे यांची एवढी गर्दी नव्हती. चालताना मजा येत असे. एके ठिकाणी मात्र धारावीतील चर्मोद्योगाचे पाणी, कातडी काढलेल्या जनावरांची चरबी यांची असह्य दुर्गंधी पसरलेली असे. रस्ता ओलांडून पलीकडे गेले की उजव्या हाताला कलाकारांची वसाहत म्हणून `कलानगर’ वसले होते. बाहेरच्या रस्त्याला लागून असलेली साहित्यिकांची वसाहत-साहित्य सहवास. कलानगरमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कलाकारांचे बंगले होते. डाव्या हाताच्या रांगेत शेवटून दुसरा बंगला `मातोश्री’. समोर छोटीशी बाग. दोन-तीन पायर्या चढून गेल्यावर अर्धवर्तुळाकार व्हरांडा, त्याला सिमेंटचा बाकासारखा कठडा. डाव्या हाताला एका खोलीत दादांचा, म्हणजे `प्रबोधनकारां’चा मुक्काम असे. तेथून वर जाणारा जिना होता. व्हरांड्यात खाली जमिनीवर `मार्शल’ पसरलेला असे. साहेबांचा अल्सेशियन कुत्रा. दिसायला उग्र असला तरी तो कुणालाही काही करत नसे. दादरप्रमाणे येथे साहेब खुर्ची घेऊन बसत. व्हरांड्याच्या कठड्यावर मी व खाली तक्रारी, गार्हाणी घेऊन आलेले लोक बसत. काही लेखन द्यायचे नसले तरी मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जात असे.
फारसे कुणी नसले म्हणजे मग साहेब, त्यांचे स्वीय्य सहाय्यक राजे, मी व `मार्शल’, `मातोश्री’पासून कलानगरच्या प्रवेशद्वारापर्यंत फेर्या मारत असू. त्यावेळी त्यांनी माझा परिचय करून घेतला. अनेक विषयांवर ते बोलत. पण मुख्यत्वे महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन, महाराष्ट्राची, देशाची राजकीय दुर्दशा, देशात हिंदूंवर आणि महाराष्ट्रात मराठी माणसांवर होणार्या अन्यायावर ते बोलत.
एक दिवस आम्ही व्हरांड्यातून खाली उतरल्यावर ते उजव्या हाताला वळले. बागेला लागूनच असलेला एका बंद लोखंडी दरवाजासमोर उभे राहिले. आत बंगल्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत रुंद बोळासारखी एक बंदिस्त जागा होती. आम्ही उभे राहताच आतमधून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. पुढच्या क्षणी एक अजस्त्र कुत्रा पूर्ण उंचीच्या त्या दरवाजावर अगदी वरच्या टोकावर पुढचे दोन पाय ठेवून साहेबांकडे बघत, तोंडाने वेगवेगळ्या आवाज काढत मान वेळावत उभा असलेला दिसला. मी दचकलोच! आमच्यापेक्षा कितीतरी उंच होता तो. दरवाजावर ठेवलेल्या त्यांच्या पायांची मजबूत आणि जाड हाडे पाहिल्यावर त्याच्या ताकदीची कल्पना येत होती. साहेबांनी आत हात घालून त्याच्या डोक्यावर थोपटले, त्याचे तोंड कुरवाळले मग तो समाधानाने आत गेला.
मग साहेबांनी डाव्या हाताला मोर्चा वळवला. तिथे गॅरेजसारखी मोठी मोकळी जागा होती. साहेबांचे अंगरक्षक शिवसैनिक तेथे बसत. दिवसरात्र त्यांच्या जागता पहारा असे. त्यात माझे दोन मित्र होते. एक `दिना’ आणि दुसरा `बाळा (सावंत)’ असावा. या जागेच्या टोकाला मोठा पिंजरा ठेवलेला होता. साहेबांची चाहूल लागताच पिंजर्यात हालचाल झाली आणि एक भला थोरला पांढराशुभ्र कुत्रा पिंजर्यात उभा राहिला. त्यालाही साहेबांनी थोपटले. रात्री या कुत्र्यांना `मातोश्री’च्या आवारात मोकळे सोडलेले असे!
आत गेल्यावर मला साहेब म्हणाले, `या रक्षकांवर माझा जास्त विश्वास आहे `इमानी’ असतात बिचारे!’ मग माझ्याकडे पाहून नेहमीप्रमाणे मिस्कीलपणे हसले. त्यांना काय म्हणायचे आहे हे मला कळले होते.
तो पांढरा कुत्रा पाहून मला लहानपणी शाळेतून जोगेश्वरीला येथे गेलेली ट्रिप आठवली. तेथील गुहांच्या बाजूला एक साधूने आश्रम थाटला होता आणि त्याच्या दरवाज्यात एक मोकळा असलेला वाघ झोपलेला असे. फिरायला जाताना तो साधू वाघाच्या गळ्यात साखळी घालून त्याला आपल्याबरोबर नेत असे! कोल्हापूरचे एक संस्थानिक वाघाला घेऊन रंकाळ्यावर फिरायला जात, असे मी वाचले होते.
साहेबांना प्राण्यांची, पक्ष्यांची, एकूणच निसर्गाची फार आवड होती. `रमाधाम’ बांधण्याच्या वेळी त्यांचा तो दृष्टिकोन होता. माझ्या एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेची सुरुवातच त्यांनी अशी केली आहे… `मी एक निसर्गवेडा माणूस आहे…”