केंद्रात सत्ता मिळाली की लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांनी आपले अंकित व्हावे, कारण आपल्यामागे जनमत आहे, अशी उन्मत्त धारणा लोकशाहीचे सुमार आकलन असलेल्या अर्धशिक्षित सत्ताधार्यांची होते, त्यात नवल नाही. पण, महात्मा गांधीजींपासूनचा वारसा सांगणारे, साधनशुचिता वगैरेंना फार महत्त्व देणारे मोरारजी देसाई हेसुद्धा मनाने एक हुकूमशहाच होते. दारूवर त्यांचा विशेष राग. तिचा वापर करून त्याने न्यायव्यवस्थेवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. न्या. छागला यांनी मोरारजीभाईंच्या सरकारच्या मागणीला कशी केराची टोपली दाखवली होती. याचे चित्रण करताना बाळासाहेबांनी काय अफलातून चित्ररचना (कॉम्पोझिशन) केली आहे आणि मोरारजींच्या टाळक्यात न्यायालयाचा हातोडा पडल्यावर त्यांच्या चेहर्याचे काय होईल, हे काय बहारीने चित्रित केले आहे… त्यांची कळ अगदी आपल्या हृदयात पोहोचवणारे जिवंत चित्रण! आताही राज्यसभेचे सभापती धनखड, न्यायमंत्री किरण रिजिजू यांच्या माध्यमातून अखंड वाचाळता करून न्यायमूर्ती नेमणुकीच्या प्रक्रियेत शिरकाव करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहेच… यांच्याही टाळक्यात न्यायव्यवस्थेचा असाच सणसणीत हातोडा बसल्याशिवाय सत्तापिपासू मेंदू ताळ्यावर येणार नाहीत.