सिनेमाचं परीक्षण म्हणजे चार परिच्छेद सिनेमाची संपूर्ण कथा आणि दोन परिच्छेदांत नेत्रसुखद छायाचित्रण, सफाईदार दिग्दर्शन, वेगवान संकलन असं लिहिण्याची परंपरा रूढ झालेली आहे. त्यात सिनेमावर सोशल मीडियावर लिहिताना तर स्पॉयलर (म्हणजे सिनेमा बघण्याची इच्छा असणार्यांची उत्सुकता संपेल असे रसभंग करणारे तपशील) देण्याचीच स्पर्धा लागते. त्यामुळे, ज्यात दर काही मिनिटांनी एक रहस्यभेद होतो आहे, कथा अकल्पित वळण घेते आहे, अशा थ्रिलर जॉनरमधल्या सिनेमाबद्दल कसं लिहावं, हा प्रश्न पडतो. वाळवी हा अशी पंचाईत करणारा सिनेमा आहे. या सिनेमात आपण अंदाजांची साखळी बांधत कथेत गुंतत जातो. काही वेळा अंदाज चुकतात, तर काही वेळा ते अचूक ठरतात. कथेचा धागा इथे उलगडला, तर त्या प्रसंगाची पुढची गाठ सुटू शकते.
त्यामुळे, रसभंग न करता हा सिनेमा काय आहे, याची कल्पना द्यायची तर या चित्रपटात एकूण पाच प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. नवरा स्वप्नील जोशी, बायको अनिता दाते, डेंटिस्ट शिवानी सुर्वे, मानसोपचार तज्ञ सुबोध भावे आणि वाळवी.
नवरा कर्जबाजारी आहे. त्याचं बाहेर प्रकरण सुरु आहे. बायको वैफल्यग्रस्त आहे. तिची मानसिक आजाराची ट्रीटमेंट सुरू आहे. नवरा-बायको दोघांनी मिळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचं ठरवलंय, अशी समजूत करून देणार्या प्रसंगापासून हा सिनेमा सुरू होतो. मात्र दुसर्याच प्रसंगापासून ही समजूत खोटी ठरवणारी मांडणी सुरू होते आणि एक अचंबित करून टाकणारा थरारक प्रवास सुरू होतो. या प्रवासाची गंमत ज्याने त्याने (सोशल मीडियावरच्या या सिनेमाबद्दलच्या विस्तृत पोस्टी किंवा परीक्षणं आधी न वाचता) लवकरात लवकर अनुभवली पाहिजे.
थ्रिलर कॉमेडीपटामध्ये वेगवान प्रवाही पटकथेची मागणी असते. पहिल्या दृष्यापासूनच सिनेमा पकड घेतो आणि क्वचित काही ठिकाणी वेग मंदावल्यासारखा वाटला तरी मध्यंतरानंतर अनपेक्षित अतर्क्य घटनांची वेगवान साखळी सुरू होते आणि सगळ्यांचे सगळे आडाखे चुकवणार्या अनपेक्षित शेवटावर येऊन थांबते. सस्पेन्स चित्रपटाची खासियत म्हणजे अंदाज बरोबर आले तरी आपण गुंततो आणि ते चुकले तरी आपण त्यात गुंततो.
हिंदीतल्या श्रीराम राघवन यांच्या सिनेमांच्या शैलीतला, पण स्वतंत्र परेश मोकाशी टच असलेला हा सिनेमा आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते हे सर्वपरिचित चेहरे या सिनेमात आहेत, पण ते त्यांच्या परिचित इमेजपेक्षा वेगळ्याच व्यक्तिरेखांमध्ये असल्याने गंमत येते. स्वप्नील जोशी यांनी परिस्थिती हाताबाहेर जातानाची हतबलता उत्तम प्रकारे दाखवली आहे. अनिता दाते यांनी बायकोचे नैराश्य उत्तम साकारले आहे. सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्यातील खाष्ट जुगलबंदी झकास रंगली आहे. नम्रता संभेराव छोट्याशा भूमिकेतही लक्षात राहते. आणि वाळवी… तिने तर अफाट काम केलेलं आहे.
चित्रपटातील व्यक्तिरेखांची गुंतागुंत, त्यांच्यातला संशयकल्लोळ, कथेत येणारी वेगवेगळी वळणे, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा असा सगळा पट लेखकद्वय (परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी) आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मोठ्या शिताफीने उभा केला आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व. चि.सौ.कां.’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केलेले परेश मोकाशी याही वेळी निराश करत नाहीत. संकलक अभिजित देशपांडे, सौरभ प्रभुदेसाई यांनी सिनेमाची गती अचूक पकडली आहे. फार संथही नाही की भरदार वेगानं डोक्यावरूनही जात नाही. मधुगंधा, परेश यांच्या खटकेबाज संवादांतून चित्रपटात ‘डार्क ह्युमर’ डोकावत राहतो. थ्रिलरपटांमध्ये व्यक्तिरेखा, दिग्दर्शन, कथा-पटकथा यांच्या बरोबरीने पार्श्वसंगीत महत्त्वाचं असतं. मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत कथेला अनुरूप माहोल अफलातून पद्धतीने तयार करतं. ‘वाळवी’ हा नुसता थ्रिलरपट नाही. त्यात अनेक छटा आहेत. कीड लागलेल्या समाजावर, नात्यांवर भाष्य आहे. ते कथानकाच्या ओघात आपसूक येतं आणि शेवटाला ते एखाद्या रूपककथेच्या पातळीवर नेतं. ‘वेड’ या सिनेमाने मराठी प्रेक्षकांना मोठ्या संख्येने पुन्हा सिनेमागृहात आणलेलं असतानाच त्यांना तिथेच थांबवून, खिळवून ठेवण्याची क्षमता असलेला वाळवी हा परेश मोकाशीपट प्रदर्शित झाला आहे. तो लवकरात लवकर पाहा.
‘सरला एक कोटी’चा ट्रेलर लॉन्च
‘सरला एक कोटी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरसोबतच या चित्रपटातील गाणीही रिलीज झाली. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण निर्मित ‘सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल. नवलवाडीतील निरागस, सौंदर्याची खाण असलेली सरला आणि तिचा भोळा-भाबडा नवरा भिका यांच्या नशिबाची गोष्ट या चित्रपटात सांगण्यात आलेली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला भिका डावात हारतो आणि आपल्या सुंदर बायकोला डावावर लावतो आणि मग पुढे काय होतं याची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळेल.
‘जय मल्हार’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर सरलाच्या भूमिकेत आहेत. त्या म्हणाल्या, या भूमिकेचा बाज, भाषेचा लहेजा बीड औरंगाबाद भागातील आहे. इथे वरच्या पट्टीत बोललं जातं, सुरुवातीला तार स्वरात बोलताना माझा घसा बसला होता. वरच्या पट्टीत बोलताना, सालस, नाजूक, मोहक दिसणारी सरला मला साकारायची होती, हे माझ्यासाठी मोठं चलेंज होतं. जरी ही गोष्ट कौटुंबिक, सामाजिक असली तरी याची मांडणी विनोदी अंगाने केलेली आहे. ओंकार भोजनेसोबत माझी आधीची ओळख नव्हती, पण थोड्याच कालावधीत आमच्या भूमिकांचे सूर जुळले. छोट्या पडद्यावरील ‘हास्यजत्रा’ कार्यक्रमातून सर्वांना हसवणारा ओंकार भोजने या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. भिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ते म्हणाले, जेव्हा मी या सिनेमाची कथा ऐकली तेव्हा मी दिग्दर्शकांना सागितलं तुम्ही मला कोणताही रोल द्या, मला या सिनेमाचा भाग व्हायला आवडेल. बायकोला डावावर लावलं अशी कथा आपण महाभारतात वाचली आहे. ती आजही प्रत्यक्षात घडू शकेल अशी आहे.
अनेक मराठी, हिंदी सिनेमांत ठसा उमटविणार्या अभिनेत्री छाया कदम यांनी सरलाची प्रेमळ सासू साकारली आहे. त्या म्हणाल्या, या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन यांच्यात कथेमध्ये रंग पेरण्याचं कसब आहे हे मी त्यांचा ‘आटपाडी नाईटस्’ चित्रपट करताना अनुभवलं होतं. इथेही त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटात तीन गाणी आहेत. ‘केवड्याचं पान तू’ या गाण्याचे गायक अजय गोगावले आणि आर्या आंबेकर हे आहेत. ‘थार्यावर जीव राहिना’ या गाण्याला वैशाली माडे यांनी चार चाँद लावले आहेत. तर ‘सई माय साजणी’ हे गाणं सायली खरे हिने गायले आहे. सर्व गाण्यांना विजय गवांडे यांनी संगीत दिलं आहे, तर गुरू ठाकूर यांच्या शब्दांनी नेहमीप्रमाणेच जादू केली आहे. या सिनेमात कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण हेही कलाकार आहेत.