‘खामोशी’च्या वेळेस वहिदाचं वय होतं एकतीस वर्षांचं, धरम होता चौतीसचा आणि हँडसम राजेश खन्नाचं वय सत्तावीस वर्षांचं. कथेतील ही तीनही पात्रं याच वयाची होती. चित्रीकरणादरम्यान वहिदा प्रचंड डिप्रेस्ड झाली होती. कारण गुरुदत्तला जाऊन जेमतेम चार वर्षं झाली होती. जो किस्सा तिच्यामुळे गुरुदत्तच्या आयुष्यात घडला होता, तो तिला इथे विरुद्ध अर्थाने निभावायचा होता. हा वहिदाच्या करिअरमधला सर्वात सशक्त आणि सरस रोल ठरला. अख्ख्या सिनेमाभर तिचं अस्तित्व जाणवत राहतं. तिचं सावकाश चालणं, मान वेळावून बघणं, कपाळावरील महिरपीतून कानाजवळून रेंगाळणार्या बटांना दुर्लक्षित उस्मरत राहणं कमालीचं भावतं. वहिदाच्या आयुष्यात जी वादळं येऊन गेली त्याची ही रिव्हर्स इमेज होती, जिला तिने समरसून न्याय दिला.
हा कालखंड स्वातंत्र्योत्तर पहिल्या दोन दशकातला होता ज्यात आयडियालिझम आणि रोमँटीसिझमने पडदा व्यापला होता. त्याची छाप संवाद आणि पात्ररचनेत स्पष्ट दिसते. सामाजिक दृष्ट्या अगदी मागच्या दोनेक दशकापर्यंत आपल्याकडे ‘नर्स’ या घटकाकडे समाजाने चारित्र्याच्या दृष्टीने नेहमी संशयाने पाहिले आहे. डॉक्टरांशी तिचे काहीतरी लफडे असू शकते किंवा अफेअर करणारं प्रोफेशन हाच दृष्टिकोन असायचा चटोर साहित्य आणि सिनेमांचा. त्याला टोकदार छेद देत आशुतोष मुखर्जींनी हे एक नोबल प्रोफेशन आहे हे बिंबवतानाच ती एक प्रेमसुलभ भावना असणारी विविध नात्यांनी बांधली गेलेली स्त्री पण आहे, हा रिव्होल्युशनरी अँगल मांडला. असे असूनही या सिनेमाला फारसा लोकाश्रय लाभला नाही. एक धक्कादायक शेवट, शोकांतिका आणि स्त्रीप्रधान कथानक अशा फारशा उठावदार बाबी नसूनही ‘खामोशी’ने इतिहास घडवला.
‘वो शाम कुछ अजीब थी’ हे अवीट गोडीचं गाणं याच ‘खामोशी’मधलं. पुन्हा पुन्हा पाहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे ‘खामोशी’. मागे एका प्रसिद्ध समीक्षकाने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा ‘खामोशी’ बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात? आपण ज्या पुरुषावर प्रेम करतो, तो दुसर्या स्त्रीवर प्रेम करतो हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्या दुःखातून सावरण्यासाठी तशाच एका समदु:खी जिवाला तशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात एका मानसिक आजारातून तो बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया असते, हे कळल्यावर तिचं भावविश्व हादरून जातं. इतरांचे प्रेमविश्व बरे करण्याच्या नादात तीच वेडी होते. अखेरीस तिने बर्या केलेल्या प्रेमवेड्याला ती पूर्ववत होण्याची आस लागून राहते.
‘खामोशी’चे संवाद गुलजार यांनी लिहिले होते तर स्वतः दिग्दर्शक असित सेन यांनी (विनोदी अभिनेते असित सेन नव्हे) त्याची पटकथा लिहिली होती. हेमंतकुमार यांनी संगीताची बाजू सांभाळली होती, तर गीते गुलजारजींचीच होती. वहिदा रेहमान, राजेश खन्ना, धर्मेंद्र, नाझीर हुसेन, इफ्तिकार, ललिता पवार, देवेन वर्मा अशी मुख्य स्टारकास्ट होती. जेमतेम दहा महिन्यात चित्रीकरण पुरं करून ‘खामोशी’ रिलीज झाला होता २५ एप्रिल १९६९ला. ‘आया सावन झूम के’ (धर्मेंद्र), ‘धरती कहे पुकार के’, ‘जीने की राह’ (जितेंद्र), ‘बंधन’, ‘आराधना’, ‘दो रास्ते’ (राजेश खन्ना), ‘तुमसे अच्छा कौन है’ (शम्मी कपूर), ‘तलाश’ (राजेंद्रकुमार) असे हिट नायकांचे हिट सिनेमे याच वर्षी आले होते. त्यांना टक्कर देताना वहिदाचा ‘खामोशी’ सुपरहिट होऊ शकला नाही.
हा काळ सुपरस्टार राजेश खन्नाचा सुवर्णकाळ होता. १९६९ ते १९७१ या दोन वर्षात सलग १७ सुपरहिट सिनेमे त्याने दिलेले. त्यातले तब्बल पंधरा सिनेमे सोलो रोलचे होते. हे सांगण्याचे कारण म्हणजे ‘खामोशी’ हा नायिकाप्रधान चित्रपट होता. काहींनी याचे श्रेय राजेश खन्नाला देण्याचा प्रयत्नही केला होता. वहिदाइतकेच अन्य बिंदूही महत्वाचे आहेत. असित सेन, गुलजार, हेमंतकुमार यांच्या जोडीने महत्त्वाचे नाव होते छायालेखक कमल बोस यांचे!
राधा (वहिदा) ही डॉ. कर्नल साहब (नाझीर हुसेन) यांच्या मानसोपचार रूग्णालयातील परिचारिका. वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या केसेस केवळ मानसिक आधाराच्या जोरावर नीट करता येतात हे डॉक्टरांना दाखवून द्यायचे असते. असाच एक प्रेमभंग झालेला तरुण, अविवाहित रुग्ण देव याला त्यांनी बरं केलेलं असतं. देवच्या इलाजासाठी राधाला त्याच्या भावविश्वात गुंतून पडावं लागतं. देव बरा होतो, पण नकळत राधाचं त्याच्यावर प्रेम जडतं. केवळ इलाजासाठी तिथं दाखल झालेल्या देवला राधाचं प्रेम उमगत नाही. बरा झाल्यानंतर तो तिथून निघून जातो. त्याचं हरवलेलं प्रेम त्याला परत मिळतं; त्याचं लग्नदेखील होतं. दरम्यानच्या काळात कर्नलसाहब देवसारखीच अजून एक केस घेतात, जेणेकरून इलेक्ट्रिक शॉकशिवाय असे रुग्ण बरे होतात यावर शिक्कामोर्तब व्हावं. ही केस असते अरुणची. ज्याला सुलेखाने प्रेमात दगा दिलेला आहे. अरुणला त्याच्या आयुष्यात कोणतीच स्त्री मंजूर नसते, पण सुलेखा त्याच्या मेंदूतून बाहेर पडत नसते. डॉक्टर ही केस घेण्यासाठी राधाची विनवणी करतात. पण ती त्यांना नकार देते. कारण देवच्या केसमध्ये प्रचंड मानसिक त्रास झालेला असतो. ती त्याला विसरूच शकलेली नसते. त्याच्यासाठीचा तिचा इंतजार अजून संपलेला नसतो. राधाऐवजी अन्य नर्सेस प्रयत्न करून पाहतात, पण अरुण कुणाला बधत नाही. अपघाताने राधाला त्या केसमध्ये पडावं लागतं. पुन्हा तोच खेळ होतो. काही महिन्यात अरुण बरा होतो. त्याचं तिथून गावी परत जाणं निश्चित होतं आणि आपण पुन्हा या खेळात हकनाक जीव गुंतवून बसलो हे राधाला उमगतं. हा धक्का ती सहन करू शकत नाही. त्याच रुग्णालयात तिला रुग्ण म्हणून राहावं लागतं. देव आणि अरुण यांच्यात ती स्वत्व हरवून बसते. यातून बाहेर यायला किती वेळ लागेल हे ठाऊक नाही, पण बरा झालेला अरुण क्लायमॅक्सला राधाला ज्या खोलीत बंद केलेलं असतं तिथे येऊन सांगतो की, अखेरच्या श्वासापर्यंत तो राधाची प्रतीक्षा करेन. ‘मैं तुम्हारा इंतजार करुंगा’ हे अरुणचे वाक्य राधाच्या कानात घुमत राहतं. रूमला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी ती कोलमडून पडते. शेवटी जाळीवरून घसरत जाणारे तिचे रिते हात दिसतात आणि सिनेमा संपतो.
‘खामोशी’ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ‘खामोशी’त पाच गाणी होती. पाचच्या पाच सोलो गाणी होती. पाचही गाणी भिन्न गायकांनी गायली होती, हे एक आगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लता मंगेशकरांच्या आवाजातले ‘हमने देखी है, इन आँखों की महकती खुशबू’ हे अप्रतिम गाणं यातलंच. ‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ हे हेमंतकुमारनी गायलेलं गाणं कोणता रसिक विसरेल बरे? मन्ना डेंच्या आवाजा`तलं ‘दोस्त कहां कोई तुमसा’ आणि आरती मुखर्जीच्या आवाजातलं ‘आज की रात चरागों की लौ’ हे अर्थपूर्ण गाणं यात होतं. पाचवं गाणं म्हणजे किशोरदांच्या आवाजातलं ‘वो शाम कुछ अजीब थी’… आधी सांगितल्याप्रमाणे हा सिनेमा जसा सशक्त अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाचा होता, गुलजारजींच्या तरल संवादांचा होता, तसाच तो कमल बोस यांच्या विलोभनीय छायाचित्रणाचाही होता. पडद्यावर झळकणार्या लोकांचा आणि प्रकाशझोतातील लोकांचा नेहमीच उल्लेख होतो, पण ज्यांचे मोलाचे योगदान असूनही अगदी नाममात्र प्रसिद्धी ज्यांच्या वाटेस येते त्यात समावेश असणार्या सिनेतंत्रज्ञात सिनेमॅटोग्राफर्सचे नाव अग्रस्थानी असेल. कमल बोसनी बिमल रॉय यांच्या बहुतांश चित्रपटांचे छायाचित्रण केलं होतं. ‘परिणीता’, ‘बंदिनी’, ‘दो बिघा जमीन’, ‘देवदास’, ‘सुजाता’ या ब्लॅक अँड व्हाइट जेम्ससाठी ते परिचित आहेत. रुपेरी पडदा रंगीत झाल्यावर त्यांनी फिरोज खानच्या ‘धर्मात्मा’, ‘कुर्बानी’, ‘दयावान’, ‘जाँबाज’ला चार चाँद लावले होते. त्याच कमल बोस यांच्या जादुई कॅमेर्याने ‘खामोशी’ला बोलकं केलं आहे. मी तर जेव्हा जेव्हा ‘खामोशी’ पाहिला आहे, तेव्हा तेव्हा त्यातली प्रत्येक फ्रेम नव्याने रसरसल्यासारखी वाटते. छायाचित्रण हा या सिनेमाचा प्राण आहे. कमल बोसना ‘खामोशी’सह ‘बंदिनी’, ‘अनोखी रात’, ‘दस्तक’ आणि ‘धर्मात्मा’साठी छायाचित्रणाचं फिल्मफेअर मिळालं होतं हे उल्लेखनीय.
‘खामोशी’ची सुरुवात हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरील रुमच्या सज्जात वहिदा उभी असते तिथून होते आणि क्लायमॅक्स रूम नंबर चोवीसमधील दारावरील जाळीवर हात खरडणार्या वहिदाने होतो. याच चोवीस नंबरच्या खोलीत कधी काळी देव (धर्मेंद्र), नंतर अरुण (राजेश खन्ना) अॅडमिट असतात. हॉस्पिटलमधील खोल्या, कॉरिडॉर, आतले सज्जे, खोल्यांना लागून असणारी बाल्कनी, दरवाजे, रिकाम्या खुर्च्या, प्रशस्त टेबले, जाळीदार दरवाजे, फुलांची चित्रे असणार्या बेडशीट्स, प्रशस्त कमनीय जिने, काचेच्या तावदानांच्या खिडक्या ही सगळी या सिनेमातील पात्रे वाटू लागतात. गाण्यांचे चित्रीकरण कसे असावे, याचा कुणाला अभ्यास करायचा असेल किंवा प्रकाशरचना कशी असावी, कॅमेर्याचा टेक ऑफ कसा असावा, अँगल ऑफ व्ह्यू कोणता ठेवावा, सिनेमॅटोग्राफीचे बेसिक्स काय असतात, हे कुणाला शिकायचे असेल तर त्याने ‘खामोशी’ची गाणी पाहावीत. प्रत्येक गाणं स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या पोस्टमध्ये ‘वो शाम कुछ अजीब थी..’ हे किशोरदांचे अजरामर गाणे.
हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर काही काळानंतर अरुणच्या तब्येतीत बर्यापैकी फरक पडल्यावर त्याला हॉस्पिटलबाहेर जाण्याची, फिरण्याची अनुमती मिळते. डॉक्टरांचा हा निर्णय त्याला राधा कळवते. तोवर राधाला हेही कळलेय की आता काही दिवसांत अरुण इथून जाणार आहे. या आधी देव आपल्याला सोडून गेला होता, त्याच्या स्मरणात आपलं प्रेम राहिलं नाही आणि आता अरुणबरोबरही मनाच्या तारा जुळल्या आहेत, पण त्याच्या आयुष्यात आपल्याला स्थान असेल का? मग आपण देवशी ठेवलेलं नातं कोणतं होतं? की आपल्याला पुन्हा ‘इंतजार’च करावा लागणार? अशा अनेक प्रश्नांनी तिला ग्रासलेलं आहे. त्याचं मन रिझवण्यासाठी ती त्याला घेऊन जाते त्याच ठिकाणी, जिथे कधी काळी तिचे मन रिझले होते. या सिच्युएशनला हे गाणं आहे. संपूर्ण गाण्यात राधा आणि अरुण एका होडीत दिसतात. कोलकात्याच्या मस्तकाशी असलेल्या गंगेच्या विस्तीर्ण पात्रात, हावडा ब्रिजखालून पुढे जात हे युगुल आपल्या डोळ्यापुढे तरळत राहतं.
गाण्याची सुरुवात होते तेव्हा कॅमेरा पाण्याच्या अत्यंत संथ पात्रावर फिरतो. त्यात हळूच हात घालून आपल्या हृदयातील तरंग जाणून घेणारा, राधेच्या पुढ्यात ओणवा झालेला अरुण गुणगुणतो – ‘वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है…’! बंद गळ्याचे स्वेटर घातलेला, नेटके केस विंचरलेला, फ्रेश मूडमधला क्लीन शेव्हड राजेश खन्ना कमालीचा आकर्षक वाटतो, पण त्याच्या चेहर्यावरचे काहीतरी गमावल्याचे भाव टिपलेत कमल बोसच्या कॅमेर्याने!
त्याच्या शेजारी बसलेली काळ्या ठिपक्यांच्या फिकट राखाडी साडीवर, पांढर्या नाजूक फुलांची वेलबुट्टी विणलेलं गर्द काळे स्वेटर परिधान केलेली, विमनस्क चेहर्यातली उदासवाणी राधा दिसते. या संपूर्ण चित्रपटात पांढर्या वेशातल्या नर्सेस आणि पांढर्या कोटमधील डॉक्टर्स दिसतात, पण मधूनच फुलांच्या, मोठाल्या डिझाईनच्या जॉर्जेटच्या साड्या घातलेली फ्लॅशबॅकमधली वहिदा दिसली की वार्याची शीतल झुळूक यावी तसे सुखद फील येतात. याही सीनमधल्या वहिदाला ही साडी, स्वेटर अत्यंत खुलून दिसतात. गाण्याचा मुखडा होईपर्यंत हेलकावे खाणारी होडी आणि त्यात दोलायमान मन:स्थितीत बसलेली वहिदा डोक्यात ठाण मांडून बसतात. शिवाय ओळीही अर्थपूर्ण असल्याने त्यात गहिरी अधीरता येते. अरुण त्याच्या सुलेखासोबतच्या आठवणीबद्दल बोलतोय तर राधाचे मनही देवच्या आठवणीत व्याकुळ होते. होडी हावडा ब्रिजखालून पुढे येते. हा सीन असा अप्रतिम शूट केलाय की पाहणार्याला वाटावे की आपणही त्या होडीत बसलो आहोत. सॅल्यूट टू कमल बोस.
‘झुकी हुई निगाहो में, कहीं मेरा खयाल था, दबी दबी हंसी में इक, हसीं सा गुलाल था’ या ओळी गाणारा अरुण तिच्या मांडीवर डोकं ठेवून मन मोकळं करतोय तर नदीच्या पात्रातून राधाच्या तोंडावर उडणारे जलतुषार तिला देवची आठवणही करून देतात आणि भानावरही आणतात. त्याला हायसे वाटतेय की आपण तिच्या कुशीत आहोत, ती खेचल्यागत त्याच्या केसातून हळुवार बोटे फिरवते आहे, पण तिचे चित्त स्थिर नाही. दोघांच्या हाताचे पंजे शेजारी शेजारीच असतात, पण एकमेकांत गुंतलेले नसतात. तिच्या मांडीवरून पुढे रेलून तो आता होडीच्या पृष्ठभागावर झोपलेला दिसतो. ‘मैं सोचता था, मेरा नाम गुनगुना रही है वो..’ या पंक्तीत वरचे स्वर लागतात आणि ढोलकीचे बीट्स येतात, तेव्हा पडद्यावरचे दृश्य फार सुंदर आहे. शीड फडकावत पुढे जाणारी होडी, तिच्या डेकच्या एकसमान फळ्यांच्या सपाट पृष्ठभागावर पाठ टेकलेला अरुण, त्याच्या शेजारची गोंधळून गेलेली राधा आणि होडीच्या बाजूने वेगाने वाहत जाणारं गंगेचं पाणी. स्वर जसे चढत जातात तसा होडीचा वेग वाढत जातो हे पाण्यावरून उमगते. पुढच्या पंक्तीत साऊंडटोन खाली आल्यावर पाणी पुन्हा संथ दिसतं, हेलकावे कमी झालेले दिसतात आणि राधाच्या मिठीत असलेला पाठमोरा अरुण दिसतो. दोघांचे काळे पांढर्या रंगाचे स्वेटर एक होताना दिसते. ‘यही खयाल है मुझे, के साथ आ रही है वो’ या ओळी गाणारा अरुण होडीवर अंग टाकतो आणि राधा त्याच्यावर अलगद रेलते. या पूर्ण गाण्यात पाण्याच्या प्रवाहाचा वापर खूप सुरेख चितारला आहे. नेमक्या शब्दाला होडीच्या मागून जाणार्या अजस्त्र बोटी वेगळे संदर्भ देऊन जातात. होडीचा वेग आणि कॅमेरा याचं जे संतुलन आहे त्यासाठी शब्द कमी पडावेत. पूर्ण गाण्यात आकाश निरभ्र दिसते आणि त्याची एक धुळकटलेली डल फ्रेम राधाच्या मनातील मळभ गडद करत जाते.
पूर्ण सिनेमात ‘तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है…’ या गाण्याच्या शेवटी असलेली शीळ काळजाचे पाणी पाणी करून जाते आणि गाण्याच्या सुरुवातीचं हमिंग मनात घर करून राहतं… या सिनेमाबद्दल आणि यातल्या गाण्याबद्दल लिहावं तितकं कमी आहे. सिनेमा हिट झाल्यावर रेडिओ सिलोनवर एका मुलाखतीत हेमंतकुमारना विचारले गेले की, ”खामोशी’चे तुम्ही निर्माते आणि संगीतकारही आहात, मग ‘वो शाम कुछ अजीब थी… ‘ हे तुम्ही स्वतः न गाता किशोरदांना का दिलं?’ यावर त्यांनी दिलेलं उत्तर अद्वितीय होतं. ‘त्या गाण्याचा जन्मच त्याच्या आवाजासाठी झाला होता, मी फक्त पाळण्यात घातलं, लोरी तर त्यानंच (किशोरदा) गायला हवी ना?’ एक संगीतकार जो गायक आहे तो दुसर्या गायकाबद्दल किती आदराने आणि प्रेमाने बोलतो याचे हे विलक्षण बोलके उदाहरण आहे. अर्थात आता काळ बदलला आहे आणि त्या भावनाही लोप पावल्या आहेत.
‘वो शाम कुछ अजीब थी’ गाण्याचे अचूक अर्थ लावायचे असतील तर ‘खामोशी’ बघायलाच हवा. नाहीतर निदान गाणं तरी बघितलं पाहिजे. कधीतरी ‘तुम पुकार लो..’ या स्वर्गीय गीतावर लिहीन. तूर्त थांबलं पाहिजे, बॉलिवुडवर प्रेम करायला ही गाणी पुरेशी आहेत!