□ नाशिक शिक्षक मतदारसंघात अर्ज न भरता मुलाला अपक्ष उभे करणारे डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसची निलंबनाची कारवाई.
■ जी हौदाने जाते, ती थेंबांनी कुठून येणार?
□ साडे सात रुपयाला एक अंडे! सर्वसामान्यांच्या बजेटची ऐशीतैशी.
■ थंडीत अंड्यांनी ऊब येते म्हणतात, इथे अंड्यांचे भाव कुडकुडी वाढवतायत!
□ दिल्लीश्वरांच्या आदेशानेच हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई; सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल.
■ हे सगळे भुभू कोणाच्या दारातले आहेत, हे आता काय गुपित आहे का?
□ मोदी सरकार न्यायव्यवस्थेवर कब्जा करते आहे : कपिल सिब्बल.
■ मोदी सरकारने मतदारांच्या विचारशक्तीवर केलेला कब्जा हटवा, मग देशातल्या सगळ्या लोकशाही यंत्रणा आपोआप मुक्त होतील.
□ महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करणार्यांना सत्तेची मस्ती आलेली आहे : अजितदादा पवार.
■ जोवर जनता ही मस्ती ठेचत नाही, तोवर ती सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही, दादा.
□ ऊर्फी जावेद भारतीय जनता पक्षात आली तर, या प्रश्नावर चित्रा वाघ यांचा तीळपापड.
■ ती पक्षात आली तर त्यांना तिच्याबरोबर तीळगूळ समारंभ करावा लागेल हो एकत्र! वाणांची देवाणघेवाण करतील त्या हसून हसून!
□ २०२१च्या धर्मसंसदेत विखारी भाषणे करणार्यांच्या तपासात कसलीही प्रगती नाही : सर्वोच्च न्यायालयाचा फटकारा.
■ असली वक्तव्यं जिथे होतात, ती कसली धर्मसंसद, ती तर अधर्मसंसद!
□ आपला कुठलाच देव बॅचलर नाही : चंद्रकांत पाटील.
■ गिरीश बापटांकडून दादांना क्लिपा मिळायला लागल्या आहेत की काय हल्ली?
□ द्वेष पसरवणार्या अँकरना दूर करा : सर्वोच्च न्यायालयाचे वृत्तवाहिन्यांना निर्देश.
■ त्यांना दूर करतील तर खातील काय? द्वेष पसरवण्याच्याच तर व्यवसायात आहेत या वाहिन्या!
□ द्वेषाचे राजकारण फार काळ चालणार नाही : राहुल गांधी.
■ लोकांच्या मनात किती खोलवर द्वेष रुजवण्यात आला आहे, याची तुम्हाला (आजी, वडील गमावल्यानंतर पण) कल्पना नाही राहुलजी!
□ मोदींच्या सभेला शिंदे गटापेक्षा जास्त गर्दी जमवण्याचे भाजपचे ठाण्यातील कार्यकर्त्यांना आदेश.
■ शिवसेनेचे ठाणे मिंधे बनवून घशात घालण्याचा डाव खर्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि ठाणेकर योग्य वेळी उधळून लावतील… तोवर भाडोत्री गर्दी गोळा करून घ्या!
□ उद्योजकांना त्रास देणार्यांचे कंबरडे मोडा : देवेंद्र फडणवीस.
■ तुमचा किचकट आणि त्रासदायक जीएसटी उद्योजकांचं कंबरडं मोडतोय, त्याबद्दल कुठे लाथ हाणायची?
□ मध्यंतरी काही जणांनी पोलीस खात्याला बट्टा लावला होता. आता बदली किंवा बढतीसाठी भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागणार नाही : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ चुकून राजकारणात आलात, देवेनभाऊ, हास्यजत्रेत नाव काढलं असतंत हो! समोर बसलेले पोलीसही हसून लोटपोट झाले असतील.
□ गुजरातच्या यशामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील : अमित शहा.
■ आणि हिमाचल, दिल्लीतल्या अपयशाचा संकेत काय आहे होराभूषण अमितभाई?