चला, आणखी एक भव्यदिव्य ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पार पडली. यावेळी असंख्य वादांचे अडथळे ओलांडत पुण्यात ती पार पडल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चीतपट करीत मानाची चांदीची गदा उंचावली. किताब, पाच लाख रुपये रोख इनामासह महिंद्रा थार गाडीसुद्धा शिवराजच्या मालकीची झाली. परंतु ‘महाराष्ट्र केसरी’चे हे यश आंतराष्ट्रीय स्तरावर परावर्तित होईल का? खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला भेडसावणारा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपणार का? हे प्रश्न गेली ७१ वर्षे कायम आहेत. २०२४चे पॅरिस ऑलिम्पिक दीड वर्षांवर येऊन ठेपले असतानाही त्यादृष्टीने कोणतेच आशादायी चित्र दिसत नाही.
‘महाराष्ट्र केसरी’च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह शरण यांनी ऑलिम्पिक पदकाच्या महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आणि उत्तर प्रदेशचे गुणगान गायले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी कुस्तीमधील महाराष्ट्राची हीच खंत प्रकट केली. मग समोरील लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने कुस्तीक्षेत्राला खूश करण्यासाठी खैरात झाली. आजी-माजी कुस्तीपटूंच्या मानधन आणि निवृत्तीवेतनात तिप्पट वाढ करण्यात आली. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेत दरवर्षी असतानाच काही दिवसांपूर्वी कुस्तीच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडास्पर्धाही पार पडल्या. म्हणजे शासन दरबारी कधीही कुस्ती या क्रीडा प्रकाराची प्रतारणा केली गेली नाही. इतके सारे अनुकूल असतानाही राज्यातून आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई का होत नाही, हाच प्रश्न अनुत्तरित आहे.
१९२०मध्ये अँटवर्प येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या भारतीय कुस्ती संघातही दिनकर शिंदे आणि के. पी. नवले या महाराष्ट्राच्या दोन मल्लांचा समावेश होता. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी पराक्रम गाजवत ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. हे कुस्तीमधीलच नव्हे, तर एकूण वैयक्तिक क्रीडाप्रकार म्हणूनही पहिले पदक ठरले. १९६५च्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये उच्च वजनी गटातील मारुती माने यांनी सोव्हिएट रशियाचा तीन वेळा ऑलिम्पिक विजेता अलेक्झांडर मेडवदेव याला अस्मान दाखवून खळबळ माजवली होती. पण महाराष्ट्राच्या मातीतून दुसरा किमयागार ऑलिम्पिक कुस्तीपटू घडू शकला नाही. भारताचा कुस्तीमधील ऑलिम्पिक दुष्काळ ५६ वर्षांनंतर संपला, पण महाराष्ट्राचा दुष्काळ संपला नाही. २००८पासून आतापर्यंत गेल्या १५ वर्षांत आणखी दोन रौप्य आणि चार कांस्य अशा सहा ऑलिम्पिक पदकांची कमाई भारतीय कुस्तीपटूंनी केली. सुशील कुमार (एक रौप्य, एक कांस्य), योगेश्वर दत्त (कांस्य), साक्षी मलिक (कांस्य), रविकुमार दहिया (रौप्य), बजरंग पुनिया (कांस्य) हे पाचही मल्ल उत्तरेकडील राज्यांचे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तरेकडून कुस्तीचे यशस्वी ‘उत्पादन’ कसे काय तयार होते, याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात कुस्तीपटूंच्या प्रशिक्षण केंद्राला तालीम म्हणतात, तर उत्तरेकडे त्यांना आखाडा म्हटले जाते. हीच आखाडा कुस्ती संस्कृती आता यशाचा टेंभा मिरवते आहे, तर महाराष्ट्राच्या तालमीतून तयार होतात ते स्थानिक गदेच्या लक्ष्यप्राप्तीत समाधान मानणारे मल्ल. ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते व्हायचे. मग राज्यभरात होणारे मान-सन्मान घेत फिरायचे. यातून नावलौकिक मिळाल्यावर प्रशिक्षण अकादमी सुरू करायची, हे गेली अनेक वर्षे कुस्तीमध्ये घडते आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावणारा वीर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पराभूत झाल्यास नाक कापले जाईल, या दडपणामुळे या मल्लांची कारकीर्द राज्यापुरतीच मर्यादित राहते. काही कुस्तीगीरांचा आलेख ‘हिंद केसरी’पर्यंतही उंचावला. अभिजीत कटके हा महाराष्ट्राचा ताजा ‘हिंद केसरी’. मात्र, यातल्या मोजक्याच मल्लांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. हे यश आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपुरते दिसले. या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये देशाने अनुक्रमे ५९ आणि ११४ पदके जिंकली आहेत. त्या तुलनेत भारताची आकडेवारी अत्यंत तुटपुंजी ठरते. जागतिक अजिंक्यपद कुस्तीमधील भारताच्या २२ पदकांपैकी फक्त तीन पदकवीर महाराष्ट्राचे. नरसिंग यादव, संदीप यादव आणि राहुल आवारे यांच्यापैकी दोन यादव मूळचे उत्तरेचेच, २०१९मधील पदकविजेता राहुल हे मात्र पूर्णत: महाराष्ट्राचे यश म्हणता येईल.
कुस्तीच्या पुरुष गटातील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील खुल्या गटात माती आणि गादी गटातील विजेत्यांमधील झुंज ‘महाराष्ट्र केसरी’ ठरवते. ‘महाराष्ट्र केसरी’च्या राज्य कुस्ती अध्यायाला १९६१मध्ये प्रारंभ झाला. म्हणजे आता ही ऐतिहातिक परंपरा ६३ वर्षांची झाली. एवढ्या वर्षांत शासनाने सदैव कुस्तीला पाठबळ दिले. शरद पवार यांनी अनेक वर्षे महाराष्ट्र कुस्तीचे अध्यक्षपद भूषवले. आजीवन अध्यक्षपद ही संकल्पना न्यायालयाने मोडीत काढल्यामुळे त्यांचे नाव कागदोपत्री दिसत नाही, एवढेच. पण खेळाला राजाश्रय देण्यात त्यांचा मोठा वाटा. तसे अगदी इतिहासकाळापासून या खेळाची देशातील अनेक राज्यांमध्ये जोपासना केली गेल्याचे सिद्ध होते. ‘म्ाहाराष्ट्र केसरी’ किताब विजेत्याला निवृत्तीवेतन आणि हा किताब तीनदा जिंकणार्याला म्हणजेच ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला प्रथम श्रेणीची शासकीय नोकरी हे भाग्य फक्त कुस्तीपटूंच्याच नशिबी आहे. नरसिंगने २०११ ते २०१३ असे तीन सलग ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावले. मग २०१४ ते २०१६ या कालखंडात विजय चौधरीने तिहेरी ‘महाराष्ट्र केसरी’ बहुमान प्राप्त केला. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी मिळाली. पण पुढे काय? नरसिंगने आशियाई, राष्ट्रकुल आणि जागतिक स्तरावर पदकप्राप्ती करीत आशा उंचावल्या. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेपर्यंतही तो झेपावला होता. परंतु उत्तेजक पदार्थांच्या सेवनाचा ठपका ठेवण्यात आल्यामुळे स्पर्धेत सहभागी न होताच त्याला माघारी परतावे लागले. त्यानंतर नरसिंगवर बंदीचीही कारवाई करण्यात आली. नरसिंगच्या दैनंदिन अन्नात भेसळ करून त्याला ऑलिम्पिकपासून रोखण्याचा डाव रचल्याचेही म्हटले जात होते. त्याच्या सरावखोलीबाहेर आढळलेले संशयास्पद साहित्य चर्चेत आले. पण या षडयंंत्राचा पर्दाफाश होऊ शकला नाही. राहुल आवारेकडेही ऑलिम्पिक सहभागाची क्षमता होती. परंतु उत्तरेकडील वर्चस्वामुळे त्याची जागा नितीन तोमरने घेतली.
सातारा, कोल्हापूर येथील तालमींतून महाराष्ट्राचे कुस्तीपटू घडायचे. खाशाबा यांनी मिळवून दिलेले कुस्तीवैभव सातारावासीयांना नंतर टिकवता आले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्योला दिलेले प्रोत्साहन हा कोल्हापूरचा इतिहास. पण आता तिथेही कुस्तीला ओहोटी लागल्याचे प्रत्ययास येते. कोल्हापूरची सध्याची पिढी फुटबॉलमध्ये रममाण झाल्याचे दिसून येते. गतवर्षी कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा जिंकली. दोन दशकांनंतर हे यश कोल्हापूरला मिळाले. पृथ्वीराजने त्याआधी जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते. पण पृथ्वीराजचे हे यश कोल्हापुरातील कुस्ती संस्कृतीला प्रेरक ठरेल, ही आशा फोल ठरली. जी स्थिती या दोन शहरांची, तीच राज्यातील अन्य जिल्ह्यांची. मग कसे घडणार ऑलिम्पिकवीर?
शिवराजचे ‘महाराष्ट्र केसरी’मधील यश साजरे करूया. या स्पर्धेच्या निमित्ताने कुस्तीपटूंना मिळालेल्या बक्षिसीचेही कौतुक करूया. पण महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पदकविजेते का घडत नाहीत, याचे आत्मपरीक्षणही नक्की करूया.