अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल (वक्री) मेषेत, केतू- तुळेत, बुध-रवि धनु राशीत, शुक्र-प्लूटो, शनि मकर राशीत, नेपच्युन-कुंभेत, गुरु-मीन राशीत, चंद्र-मिथुनेत, त्यानंतर कर्क-सिंह आणि सप्ताहाच्या अखेरीस कन्या राशीत.
मेष – जोखमीचे काम सुरू असल्यास येणारा काळ खूपच त्रासदायक जाईल. नोकरीत हाताखालचे लोक चोरी करून शिरजोरीने वागतील. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होईल. कर्मस्थानातील शनि-प्लूटो-शुक्र यांच्यामुळे चुकीचा निर्णय घेतला जाईल किंवा घ्यावा लागेल. वैवाहिक जोडीदार, व्यावसायिक भागीदार यांचे कटू अनुभव येतील. मात्र, त्यातून मार्ग सापडेल. चिंतन, ध्यानधारणा, साधना यासाठी वेळ राखून ठेवा. हुकूमशाही वृत्ती टाळा. शांत राहा. गोड बोला. वेळ निभावून जाईल.
वृषभ – शुक्राचे राश्यांतर मकरेत योगकारक शनि-प्लूटो सोबत असल्यामुळे व्यवसायात धूर्तपणे निर्णय घ्या. आव्हानांना शिताफीने तोंड द्या. नोकरीत लांबचा प्रवास करावा लागेल. लाभातील गुरु अनपेक्षित ठिकाणी आर्थिक लाभ मिळवून देईल. नव्या संधी चालून येतील. वक्री मंगळामुळे कळत नकळत कठीण प्रसांगात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. काळजीपूर्वक पाऊल टाका. शुक्रामुळे कलागुणांना वाव मिळेल. त्याचा फायदा होईल.
मिथुन – वक्री आणि अस्त असणार्या बुधामुळे कामाने थकून जाल. दाम्पत्यजीवनात थोड्याबहुत प्रमाणात अशांतता राहील. शुक्र प्लूटोसोबत मकर राशीत भ्रमण करत असल्यामुळे प्रेमी युगुलांमध्ये गैरसमज निर्माण होतील, त्यामधून वाद टोकाला जाऊ शकतात. शांततापूर्ण मार्गाने पुढे जा, त्याचा चांगला फायदा होईल. बंधूवर्ग सहकार्य करणार नाही. ऐनवेळी पाठ फिरवण्याचे प्रसंग घडू शकतात. कोर्टकचेरीच्या कामातील गुंतागुंत वाढेल. गुरूकडून चांगले सहकार्य मिळाल्याने समाधान लाभेल.
कर्क – दुष्काळात तेरावा महिना असा अनुभव येईल. जरा सांभाळूनच राहा. मंगळाचे वक्री भ्रमण, शुक्र सप्तम भावात, सुखस्थानात केतू, त्यामुळे नोकरीत त्रासाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कामे अर्धवट राहतील. कागदपत्र तपासूनच सही करा, नाहीतर पुढे गोत्यात याल. बळीचा बकरा बनू नका. गुरुची साधना करा, ध्यान करा, त्यामधून आपोआप मार्ग सापडेल.
सिंह – आर्थिक, विशेषत: व्यवहार करताना सजग राहा. आंधळा विश्वास नुकसान करेल. मोठा आर्थिक फटका बसेल. मुलांचे अभ्यासात लक्ष राहणार नाही. त्याकडे लक्ष द्या. शेअर ब्रोकर, प्रॉपर्टी एजंटची चांगली कमाई होईल. आलेले पैसे जपूनच वापरा. प्रवासात काळजी घ्या. कामात अति आत्मविश्वास दाखवू नका.
कन्या – निर्णय चुकेल, पण वाईट वाटून घेण्यापेक्षा काहीतरी शिकलो ही भावना मनात ठेवा. पुढे चला. बुध अस्तामुळे बंधूंबरोबर वाद घडू शकतात. शुक्र-प्लूटो, शनी-शुक्र यांच्यामुळे उत्साह वाढेल, प्रेमात यश मिळेल. प्रेमी युगुलांचे वादविवाद होतील. नातेवाईकांबरोबर कभी खुशी कभी गम, असे अनुभव येतील. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. मौजमजेसाठी पैसे खर्च करण्याचा मोह टाळा.
तूळ – शुक्र आणि योगकारक शनीमुळे नोकरीत बढती, बदली किंवा उच्चपदावर वर्णी लागेल. पंचमातील शनीचे भ्रमण शुभ राहील. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. व्यवसायात दिरंगाई होईल. लांबच्या प्रवासात विलंब होऊ शकतो. कामाचा ताण वाढून धावपळ होईल. ९ आणि १० तारखांचा गुरु चंद्र नवपंचम योग अनपेक्षित आनंद देणार्या घटनांचा ठरेल.
वृश्चिक – मंगळाची वक्री दृष्टी धनस्थानावर, बुध धनस्थानात अस्त, त्यामुळे व्यवसायात अपेक्षित रक्कम वेळेत हातात न पडल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. हातातील पैसे खर्चासाठी राखून ठेवा. संततीसाठी उत्तम आठवडा आहे. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवनात कठीण प्रसंग निर्माण होतील. बौद्धिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. षष्ठातील राहू प्रतिस्पर्धी, नोकरवर्ग यांच्यावर अंकुश ठेवेल. त्यामुळे व्यावसायिक स्थिती चांगली राहील.
धनु – पंचमात राहू, मंगळ षष्ठम भावात वक्री, बुध अस्त आणि मंगळाच्या दृष्टीत त्यामुळे खासकरून गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. सुखस्थानातील गुरु धावपळीच्या काळात चांगली ऊर्जा देईल. त्यामुळे कामे मार्गी लागतील. मानसिक स्थिती अस्थिर होईल. साडेसातीच्या फेर्यातून लवकरच सुटका होईल. आपले प्रश्न सुटलेले दिसतील. घरात मंगलकार्य पार पडेल. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल.
मकर – नवीन व्यवसायात जपून पाऊल टाका. अचानक प्रवास करावा लागल्याने पैशाचे गणित कोलमडेल. मेडिकल क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी उत्तम काळ आहे. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जावे लागेल. रवि-बुधाची व्यय भावातील विपरीत राजयोगाची स्थिती तुमच्यासाठी सकारात्मक राहील. राहू-हर्षल युती योगामुळे कौटुंबिक आणि स्वभावात बदल घडतील. नोकरीत वेगळी स्थिती निर्माण होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होईल.
कुंभ – नोकरीनिमित्ताने विदेशात असाल तर मायदेशी येण्याच्या प्रयत्नांत यश मिळेल. वक्री मंगळामुळे पती-पत्नीत धुसफूस होईल. पतप्रतिष्ठेला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. आई-वडिलांची काळजी घ्या. सरकार दरबारी कामे मार्गी लागतील. कमिशनच्या माध्यमातून चांगली कमाई होईल. संततीचे सहकार्य मिळणार नाही. टेलिकम्युनिकेशन्समधील मंडळी, विमा एजंट यांच्यासाठी चांगला काळ आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होतील.
मीन – जुनी कामे मागी& लागण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. उधार उसनवार देऊ नका. नोकरीत चांगली प्रगती होईल. उद्योग-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील, त्यामुळे काळजीचे कारण नाही. सरकारी कामात यश मिळेल. संततीला शिक्षणात यश मिळेल. धार्मिक ठिकाणी जाऊन याल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे.