‘दश दिशा ते अचूक’ दाय नेम इज कार्टून. कारण कार्टूनला विषयाचे बंधनच नाही ना.
नाइट क्लब आम्ही फार पूर्वी देवानंद, अशोक कुमार, के. एन. सिंग, गुरुदत्त यांच्या सिनेमात फक्त पाहिलेत. शकिला, शामा, मधुबाला, हेलन या अर्ध कपड्यातील हिरोइन्स, अंधारलेले वातावरण, त्यांच्याही तोंडात सिगारेट असे. तेथे कोणाचा तरी खून पडेल याची सतत भीती वाटायची, नंतर मुंबईसारखा शहरात क्लब्जचे साम्राज्य आहे हे फक्त ऐकून होतो. आपण कधीच उच्चवर्गीय नसल्याने ते जे विश्व होते ते कायमच दूर राहिले.. मुंबईला गेल्यावर खर्चायला पैसे नसायचे, तेथे त्या बायकांच्या अंगावर उधळायला पैसे आणायचे कुठून? त्यात क्लबमध्ये जाणार्याला गुंड लुबाडतात हेही ऐकून होतो. थोडक्यात क्लबमध्ये जाण्याइतकी औकात कधीच नसायची. आमचे मित्र आमच्यासारखेच कफल्लक. एकही श्रीमंत मित्र नव्हता की जो कधीतरी क्लबला घेऊन जाईल, तिथल विश्व दाखवेल. बाहेरच्या जगामध्ये तमाशांचे विश्व होते, पण आमच्यासारखे ‘सो कॉल्ड’ सभ्य तिकडे फारसे फिरकत नसत. ती तमाशाची आमची हौस मराठी सिनेमांनी भरपूर पुरविली. पडद्यावर नाचणारीला शिट्ट्यांची बिदागी मात्र आम्ही भरपूर देऊ शकायचो. कारण सामान्यपण हे वेताळासारखे कायमच पाठीवर बसलेले. त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर आयुष्यभर देता आले नाही. नंतर हिंदी सिनेमा रंगीत झाला. क्लबमध्ये नाचणार्या नायिकांचे कपडे आणखीच कमी झाले. झीनत, परवीन बाबी, माधुरी, अरुणा इराणी आदी.
यात क्लबचे झगमगाटी कर्णकर्कश बेछूट रूप डोळ्यापुढे आले. येथे फक्त आपण मनाने जाऊ शकतो. शरीराने जाणे कधीच परवडणार नाही हे समजले दहा-वीस वर्षांपूर्वी डान्स बार नावाची चलती सुरू झाली. मुंबई, कलकत्ता, बेंगलोरसारखी शहरे यात थिरकू लागली. मुंबईत असे क्लब गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होऊ लागले. तरुणींचे अंगलटी येणारे मादक नाच या जनरेशनच्या श्रीमंत पोरांना, पैसेवाल्या श्रीमंतांना झुलवू लागले. अंडरवर्ल्ड तेथे आनंदाने नांदू लागले. राष्ट्रवादी सरकारचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अशा डान्स बारवर बंदी आणली. डान्स बारमध्ये नाचणार्या अनेक तरुणी बेकार झाल्या. खूपच गजर झाल्यावर अशा मुलींना इतरत्र नोकर्या देण्याचा प्रस्ताव आला. अशा फक्त नाच गाणे करणार्या मुली कोणत्या नोकर्या करू शकणार होत्या? त्यावर एक खूप चांगली चित्रमाला तयार झाली. ती चित्रमाला समाजाची प्रतिक्रिया दाखवणारी होती.
या मुली आणि सर्वसामान्य माणसांची मानसिकता या चित्रांतून पाहण्यासारखी आहे. पूर्वी दरवर्षी ‘दिवाळी अंकांनी आम्हाला काय दिले’ असे भाकड परिसंवाद अंकातून असायचे. आम्हा व्यंगचित्रकारांना मात्र भरपूर स्पेस दिवाळी अंकांनीच पुरविली. शक्यतो दिवाळीच्या अलीकडच्या पलीकडच्या सामाजिक विषयांवर चित्रमाला तयार होत.
चित्रमालासाठी विषयांचा शोध घेताना चार चिठ्ठ्यांतून एक निवडायची या खेळासारखे आहे. मग एक एक विषयाचं स्कॅनिंग करायचं. आठ चित्रे सुचतील इतपत. त्याच्यामध्ये शोध घ्यायचा. हसू यायलाच हवे. एके दिवशी घरात मुले पत्ते (प्लेइंग कार्ड्स) खेळत बसली होती. जराशाने पत्ते तसेच टाकून ते खेळायला निघून गेले. राजा राणी एक्का जोकर इतस्तत: पडले होते.
वाटलं पत्त्यांवर चित्रमाला चांगली होऊ शकेल. सकाळचे दहा वाजले असावेत. मी टीपॉयवर सगळे पत्ते हारीने मांडून ठेवले व काही सुचतं का याची वाट पाहत बसलो. वरच्या मजल्यावरचे माटे वकील ऑफिसला निघाले होते. त्यांनी मला पत्त्यांकडे एकटक पाहताना पाहिले व ते चमकलेच. मला पत्त्यांचा नाद कसा लागला याचे त्यांना आश्चर्य वाटले असावे, तेही भरदिवसा?
संध्याकाळी सहा वाजता ते ऑफिसमधून परत येत होते. त्यावेळीही मी डाव मांडून तसाच बसलेलो होतो. तसे ते मितभाषी, पण त्यांना वाटलं असावं की एक चांगला व्यंगचित्रकार वाया गेला कसा? मात्र ती माझी निर्मितीची समाधी होती. कधीतरी रात्री दहा बाराला व्यंगचित्रमाला जमली. तसे या ५२ पत्त्यांचे कुटुंब गेले कित्येक वर्ष अबाधित आहे. जोकर आले गेले. मात्र ते ५२ जण अबाधित राहिलेत. या निमित्ताने त्यांच्या विश्वात डोकावून पाहता आले. या चित्रमालेतील पहिले चित्र. समुद्रकिनारी ऊन खात पडलेली एक टंच युवती पाहून बदाम राजा घायाळ झालाय अनिमिष नेत्रांनी भान विसरुन तिला, तिच्या मांड्या, पोटर्या न्याहाळतोय. त्याच्या शेजारी उभा असलेला चौकट राजा म्हणतोय, ‘मित्रा उगाचच अस्वस्थ होऊ नकोस. तिच्यासारखे आपल्याला पाय कोठे आहेत? आणि कदाचित म्हणूनच आपलं कुटुंब कित्येक वर्ष विस्तारलंच नाहीय, बघ. दुसर्या चित्रात पत्त्यातला अठ्ठा व छक्का वंध्यत्व विशारद तज्ञाकडे गेलेत. एकजण म्हणतोय, डॉक्टरसाहेब, हवी तर आमची तपासणी करा पण आम्हाला लागलेला हा अपमानास्पद कलंक काढून टाका बुवा! ही माणसे एखाद्याची नालस्ती करताना आमचाच उद्धार करतात बघा.
इस्पिक राजाने पेग भरलाय. बहुधा पाचवा असावा. त्याला चढली आहे. त्यामुळे चौकट राणीच्या अंगावरची काचोळीच त्याला दिसत नाही. पुढच्या चित्रातले किलवर राजा राणी त्याचं ११ जणांचे कुटुंब घेऊन कुटुंब नियोजन केंद्रात गेलेत. डॉक्टर तडकून म्हणतोय, ‘आता काय डोंबलं नियोजन करताय?’ एका चित्रात मी चौकट राजाला त्याच्या क्राऊनऐवजी पांढरी टोपी घातली. राजा अस्वस्थपणे म्हणतोय ही टोपी घातल्यापासून सारखं खोटं बोलावं, भ्रष्टाचार करावा, रयतेला फसवावं असं वाटतंय!
त्या वर्षीचे दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यावर माटे वकिलांनी आजूबाजूला कोणी नाही ना हे पाहून मला गाठले. म्हणाले, ‘तुमची चित्रं असलेले ‘आवाज’, ‘जत्रा’, ‘मार्मिक’सारखे चार-पाच अंक मी गुपचूप विकत घेतो. आमच्या घरातील माणसे सोवळ्या ओवळ्यातील. मागच्या महिन्यात तुम्ही पत्ते घेऊन बसला होतात, त्याचं उत्तर मला आज मिळालं. पत्त्यावरची चित्रे मी जत्रात पाहिलीत बरं का?’