आज वर्षाचा अखेरचा दिवस. आपण २०२२ या सालातून २०२३ या सालात प्रवेश करणार आहोत… हे साल सध्या प्रसारमाध्यमांच्या खिजगणतीत नाही. गोदी मीडियाची नजर आता थेट २०२४ या वर्षावर आहे. हे निवडणूक वर्ष असणार. या वर्षी मोदींच्या भारतीय जनता पक्षाला तीनशे जागा मिळतील की ते चारशेच्या पार जातील, याचे आकडे फेकण्यात ते रमलेले आहेत. संसदेत जागा कितीही असोत, त्यांनी मनोमन १००० जागा मोदींना देऊन टाकलेल्या आहेत. त्या वर्षी राम मंदिर बनून तयार होईल. दिवसाचे १८ तास काम करणारे आणि एवढं काम करूनही गलवानच्या खोर्यात चीनची घुसखोरी झालेली आहे की नाही, याचीही नीट माहिती नसलेले मोदी सगळी कामं सोडून महिनाभर सकाळ-संध्याकाळ धार्मिक कपड्यांचा फॅशन शो करीत पूजाअर्चा करतील, चॅनेलवाले, बहुदा सोवळंच नेसून त्याच्या बातम्या सांगतील आणि भारतीय जनता नावाचं पब्लिक या जगातल्या सगळ्यात मोठ्या इव्हेंटला भुलून पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकील, याची त्यांना खात्री आहे. जोडीला भारतीयांच्या मनात सोयीच्या शत्रूंबद्दल धास्ती निर्माण व्हावी, यासाठी काही हुकमी खेळही खेळून दाखवले जातीलच. त्यामुळे, आता २०२४ हेच वर्ष येणार, त्यात निवडणुका होणार आणि मोदीच जिंकणार, यापलीकडे या माध्यमांना काही सुचत नाही.
पण, त्यांच्या दुर्दैवाने मध्ये उद्यापासून सुरू होणारं २०२३ साल आहे आणि या वर्षात नऊ विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. गोदी मीडियाने आतापासून कितीही ढोल वाजवले तरी २०२४च्या निवडणुकीतली देशाची नेपथ्यरचना याच निवडणुका ठरवणार आहेत आणि ती मोदींच्या सोयीचीच असेल, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण ही निवडणुकांना सामोरी जाणारी नऊ राज्ये आहेत. यातील ईशान्य भारतातील चार छोट्या राज्यांच्या निवडणुका आणि कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड या मोठ्या राज्यांच्या निवडणुका या संपूर्ण भिन्न प्रवृत्तीच्या आहेत. अर्थात या विधानसभा निवडणुकांसोबतच मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात होणार्या महानगर पालिका निवडणुका देखील महत्त्वाच्या असतील. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे पारडे फारच जड होते. मात्र, त्यावरून तीच देशाची भविष्यातील दिशा असे भ्रम ठेवून उपयोग नाही. देशाची दिशा तीच आहे का, हे आगामी वर्षात कळणार आहे. कारण यात सर्व भागातील राज्ये आहेत. दक्षिणेचे कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात मुंबई व आसपासच्या महानगरपालिका आहेत. पूर्वेचे छत्तीसगड आहे, मध्य भारतातील मध्य प्रदेश आहे, वायव्येचे राजस्थान आणि ईशान्येतील राज्ये अशा देशभर निवडणुका आहेत. त्यांना काही प्रमाणात प्रातिनिधिक मानता येईल.
देशाच्या राजकीय पटलावर २०२४चे ढोल वाजत असले तरी २०२३ हेच कदाचित २०१४नंतरचे या शतकातले सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरू शकेल. या देशात गेली ७५ वर्षे टिकलेली आणि रुजलेल्या लोकशाहीचे अस्तित्त्व टिकणार आहे की पुन्हा एकदा हा देश मोदीस्तोमात वाहावत जाऊन मोदींनी देश मजबूत केल्या या धादांत अफवेवर विश्वास ठेवणार आहे आणि त्यांच्या राजकीय बुवाबाजीला बळी पडणार आहे, हे २०२३मध्येच समजणार आहे. २०२३च्या सर्व निवडणुकांमध्ये मोदींना यश मिळणार, ही जणू आता फक्त औपचारिकताच उरली आहे, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न गोदी मीडिया करत असतो. अजूनही देशभर व्यापक अस्तित्त्व असलेला आणि भाजपला तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष असलेल्या असणारा त्यांचा देशपातळीवरचा खरा प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्ष पुरता पिछाडीवर पडलेला असल्याने हा भ्रम सत्याच्या जवळचा वाटतो, हे नाकारता येणार नाही. २०२३ला एखादा प्रादेशिक पक्षही मोदींच्या फुग्याला टाचणी लावू शकतात. अनेक राज्यांमध्ये त्या राज्यांपुरतेच असलेले पक्ष त्या राज्यात बहुसंख्येने खासदार निवडून आणू शकतात. यातले अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात मोदी नावाचा पतंग उडू देखील देत नाहीत. एकहाती सत्तेच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे भाजप यातील कोणाशी जुळवून घ्यायला तयार नाही. तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, जनता दल युनायटेड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, आम आदमी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्ष जरी भाजप अथवा काँग्रेससारखे देशपातळीवर चमकत नसले तरी त्यांच्या राज्यात ते मोदी आणि भाजप यांचा संपूर्ण पराभव करायला सक्षम आहेत, नव्हे गेल्या आठ वर्षांतही मोदींचा बुलडोझर फिरत होता, तेव्हाही यातील बहुतेक पक्षांनी भाजपला धूळ चारली आहे. काँग्रेस पक्षाने भाजपसोबत थेट लढत असलेल्या ठिकाणी जास्त जागा जिंकून या प्रादेशिक पक्षांना साथ दिली, तर चित्र बदलू शकते. मात्र, काँग्रेसला आता जागा वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. २०२३ला त्यांना ते जमण्याची शक्यता अधिक आहे. कारण, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेने देशभर वातावरण ढवळून काढले. भाजपचे आयटी सेल, गोदी मीडिया आणि सोशल मीडियावरचे ट्रोल यांनी मिळून राहुल यांच्यावर ‘पप्पू’ असा टॅग लावून दिला होता. भारत जोडो यात्रेनंतर राहुल यांना पप्पू म्हणून हिणवण्याची त्यांचीही हिंमत राहिलेली नाही. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात जनसामान्यांचा सहभाग फार मोठा होता. देशात नफरतीचे वातावरण पसरवून विद्वेषाच्या आगीवर पोळ्या भाजणार्या भाजपच्या आक्रस्ताळ्या, रेटून खोटं बोलणार्या नेत्यांच्या आक्रमक आणि मस्तवाल देहबोलीसमोर प्रेमाचा संदेश देणार्या राहुल यांच्या यात्रेतील साधा सरळ वावर देशभरात त्यांच्याविषयीचं खोटं मत पालटवणारा ठरला आहे. त्यांची यात्रा ज्या भागांतून गेली त्यातील पाच राज्यांमध्ये २०२३मध्ये निवडणुका आहेत. काँग्रेस पक्षाच्या अजगरासारख्या सुस्तावलेल्या पक्षयंत्रणेने या यात्रेने निर्माण केलेल्या गुडविलचा योग्य वापर केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. अर्थात, या यात्रेची फळे लगेच मिळणे शक्य नाही. या यात्रेने केलेली वातावरणनिर्मिती हे एक भरभक्कम राजकीय भांडवल मात्र निश्चित आहे. त्या भांडवलावर पुढे काय कार्यक्रम आखले जातात, हे राजकीय यश मिळवण्यासाठी मूळ यात्रेपेक्षा जास्त महत्वाचे आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा ग्राऊंड लेव्हलवरचा निवडणुकांचा अनुभव आणि राजकारणात डावपेच आखण्याचे कसब ही काँग्रेससाठी जमेची बाजू म्हणता येईल. ते यात्रेच्या राजकीय फायद्याचे गणित मांडण्याची क्षमता असलेले पक्षाध्यक्ष आहेत. हिमाचल प्रदेशातील काँटे की टक्करमध्ये मिळवलेल्या यशानंतर आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे आणि तेलंगणात काँग्रेस विरुद्ध तेलंगण राष्ट्रीय समिती यांच्यात लढत आहे. जर या पाच राज्यांत काँग्रेसने हिमाचल प्रदेशातल्यासारखा चमत्कार करून दाखवला, तर मग मात्र देश भाजपच्या एकछत्री अमलातून बाहेर पडून पुन्हा एकदा भाजपेतर पक्षांच्या आघाडीच्या सरकारच्या स्थापनेच्या दिशेने जाऊ शकतो. गेल्या आठ वर्षांत एकतर फाजील आत्मविश्वास असलेली किंवा संपूर्ण आत्मविश्वास गमावलेली अशी दोन टोके असलेली काँग्रेस देशाने पाहिली. पण २०२३ला योग्य आत्मविश्वास आणि सूर गवसलेली काँग्रेस मैदानात असेल तर २०२४ची पंतप्रधानपदाची माळ मोदींच्या गळ्यात इतक्या सहज पडणार नाही.
भाजपकडे इतर पक्ष फोडून गोळा केलेली ईडीभीत आणि खोकेबाज गद्दारांची भरती सोडली, तर नाव घेण्यासारखे खरे मित्रपक्ष उरलेले नसल्याने आता मोदींना संपूर्ण बहुमतच मिळवावे लागेल. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्यास आघाडीचे नेतृत्त्व करण्यासाठी असलेले सर्वसमावेशक नेतृत्त्वाचे गुण त्यांच्यात नाहीत. आघाडीत त्यांच्या हेकेखोरपणाला कोणी भीक घालणार नाही. त्यांच्या सर्वोपरि प्रतिमेला ते परवडणारे नाही. त्यामुळे भाजपला आघाडी करावी लागली, तर त्यांना खरोखरच झोला उचलून केदारनाथच्या पंचतारांकित गुहेकडे प्रयाण करावे लागेल. त्यामुळे २०२३मधील मुंबई महानगरपालिका असेल अथवा नऊ विधानसभा असतील, मोदी प्रत्येक निवडणुकीत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार, सर्व ताकदीने प्रचार करणार, यात काहीच शंका नाही. आजवर कायम मदतीला आलेले राम मंदिराचे ब्रह्मास्त्र मोदी २०२४ला नक्की वापरतील. त्यांचा पक्ष राजकारणात गेली ३५ वर्षे ज्या काही पोळ्या भाजू शकला आहे, त्या रामाच्याच नावाच्या पोळ्या आहेत. ही शेवटची पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न भाजप करणारच. त्या मंदिराच्या उद्घाटनाच्या लाटेवरच भाजपला बहुमताचा किनारा गाठायचा आहे. पण या शेवटच्या वापरानंतर भाजपासाठी फार खडतर काळ सुरू होईल, या भयाने आता काशी-मथुरेतही वातावरण तापवण्याचे उद्योग सुरू आहेतच. अशा भावनिक मुद्द्यांच्या कुबड्या घेत घेत भाजप आता वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्तेचे इंधन संपले तर या पक्षाने गोळा करून आलेली सगळी पाखरं मूळ घरट्यांमध्ये निघून जातील आणि या पक्षाची दयनीय वाताहत होऊ शकते.
मोदी प्रचंड लोकप्रिय आहेतच. पण, त्यांचं यश काही फक्त त्यांच्या निखळ लोकप्रियतेवर मिळालेलं नाही. राजकारणात करायच्या सगळ्या लांड्यालबाड्या, खोटेपणा, जुमलेबाजी, शुद्ध फेकाफेक आणि सतत व्हिक्टिम कार्ड खेळणं असले सगळे ‘दोन नंबरचे’ उद्योग ते आणि त्यांचा पक्ष अतिशय निष्ठुरपणे, कसलाही विधिनिषेध न बाळगता करतो आणि वर आपण सदाशुचिर्भूत आणि परमपवित्र आहोत, असा आवही आणतो. आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी देशाच्या अर्थसंकल्पावर आताच दोन लाख कोटी रुपयांचा बोजा टाकला आहे… त्यांच्या भाषेतच सांगायचे तर निवडणुकीकरता रेवड्या वाटण्यासाठीची ही तजवीज आहे. दोन लाख कोटी खर्च करून सरकार ८० कोटी भारतीय जनतेला एक वर्ष फुकट अन्नधान्य देणार आहे. अर्थात एक वर्षानंतर ही योजना आणखी चार महिने वाढवण्यात येईलच. निवडणुका झाल्यावर मात्र हे ८० कोटी लोक नक्की काय खाऊन जगणार, हे त्यांचे त्यांना पाहावे लागेल. मोदींचे पोट शिव्या खाऊनच भरते. २०२३चा महिमाच असा आहे की या वर्षात भाजप रेवड्याच रेवड्या वाटणार, भावनिक मुद्दे, भाषिक संघर्ष पेटवणार, आश्वासनांचा महापूर येणार, मतदार, या रेवड्या घेऊन, भावनाप्रधान होऊन मतदान करणार की सजग राहून घटनादत्त लोकशाही सशक्त करण्यासाठी विद्वेषाला तिलांजली देणार्या खर्या विकासात्मक राजकारणाला साथ देणार, यावर हा सगळा खेळ रंगणार आहे. २०१४ सालाने भारताच्या भविष्याची जी दिशा दाखवली आहे, त्या दिशेने चालायचे की नवे, सर्वसमावेशक, सुदृढ लोकशाहीवर आधारलेले सद्भावपूर्ण भविष्य घडवायचे, याची कळ मतदारांच्या हाती आहे. या वर्षाचे स्वागत करायला आज सज्ज होऊ या आणि या वर्षाला निरोप देण्याची वेळ येईल, तेव्हा २०२४चे हॅपी न्यू इयर म्हणून स्वागत करण्यासारखी परिस्थिती असेल, अशी आशा करू या!