□ राज्यातून करोना हद्दपार झाला असून आता फक्त १३३ रुग्ण आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. : सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत
■ त्यातही काही गडबड झाली तर हाफकिन नावाच्या त्या माणसाला सांगून आपण करोनाच्या डासांना मारून टाकू या! हाय काय अन् नाय काय! आता खंडोबा, आई तुळजाभवानी आणि विठुरायालाच साकडं घाला महाराष्ट्रवासीयांनो!
□ भारतीय जनता पक्ष पसरवत असलेल्या द्वेषाचा पराभव प्रेमाने करू : राहुल गांधी
■ देशातल्या जनतेला त्या द्वेषाच्या गांजाची लत लागली असेल, तर तुमचाच पराभव अटळ आहे.
□ गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे आधीच्या सत्ताधार्यांनी देशाचे हरपलेले वैभव परत आणण्यासाठी काही केले नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ आधीच्या राजवटींनी देश ज्या पातळीवर नेला होता, तिथून तुमच्या कारकीर्दीत सगळ्या निर्देशांकांमध्ये देशाची घसरणच झालेली आहे! कसल्या पुराणकाळातल्या हरपलेल्या काल्पनिक वैभवाच्या गोष्टी सांगता?
□ मथुरेतील कृष्णजन्मभूमी वादाच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने सर्वेक्षण अहवाल मागवला…
■ चला, आता भाजपची पुढची ३५ वर्षे पोळ्या भाजण्यासाठीच्या चुलीची व्यवस्था झाली!
□ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शिवसैनिकांनी अमरावतीत जोडे दाखवले
■ त्यातला एखादा पसंत पडला की नाही त्यांना. तो घ्या आणि निघा म्हणावं मातृभूमीकडे.
□ करोना नियमांची अंमलबजावणी करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची राहुल गांधी यांना ‘विनंती’
■ हा हा हा हा! नमस्ते ट्रम्पची इव्हेंटबाजी, मध्य प्रदेशातली फोडाफोडी वगैरे झाल्यानंतर ज्यांना कोविडच्या आगमनाची दखल घ्यावीशी वाटली होती, ते आता कोणत्या तोंडाने असली भंपक विनंती करत असतील?
□ केंब्रिज अॅनालिटिकाला वापरकर्त्यांचा डेटा विकल्याप्रकरणी ७२.५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची फेसबुकची तयारी
■ भारतातल्या फेसबुकची सत्ताधार्यांच्या सोयीची धोरणं पाहता इथे नुकसानभरपाई देण्याची वेळ आली तर झुकेरबर्गला नंतर कटोरी घेऊन रस्त्यावर बसावे लागेल.
□ आधुनिक जग आणि आधुनिक विज्ञानाचा मार्ग भारतीय गुरुकुल पद्धतीतून प्रशस्त झाला. गुरुकुले ही समानतेची केंद्रे होती : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ म्हणजे मग हिणकस जातिव्यवस्था आणि विशिष्ट जातींनाच तथाकथित ज्ञानाचा अधिकार हे सगळं नेहरूंनीच आणलं म्हणता! वाजवा टाळ्या आणि थाळ्या… लावा दिवे!
□ सरकारी शाळेत माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या १५ मुलींवर उपचार करण्यासाठी तांत्रिकाला बोलावल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची उत्तर प्रदेशातील योगी सरकारला नोटीस
■ पंतप्रधानांच्या समजुतीनुसार शिक्षणक्षेत्रातील गतलौकिकाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम करणार्या योगी सरकारला नोटीस बजावल्याबद्दल हा गुलामगिरीच्या मानसिकतेचा देशद्रोही आयोगच बरखास्त करून टाकला पाहिजे.
□ आदिवासी पाड्यांचा विकास न झाल्याने त्यांचे धर्मांतर झाले : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
■ मुळात आदिवासी निसर्गपूजक आहेत. त्यांचा कोणताही धर्म नव्हता, तेव्हा धर्मांतर होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी एक धर्म स्वीकारला, इतकेच झाले. त्याला धर्मांतर म्हणत नाहीत.
□ मन:शांतीसाठी अरविंद केजरीवाल नागपूरला विपश्यना केंद्रात
■ नक्की विपश्यना केंद्रातच आले आहेत की गुजरात निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर ‘ए टीम’ला त्यांच्या ‘बी टीम’ने आणखी काय आणि कशी मदत करायची याची गुप्त आखणी करायला आले आहेत?
□ तरुणांमुळे आपला देश महासत्ता बनेल : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
■ त्यासाठी आधी तुमच्यासह सगळ्या वयोवृद्धांनी सगळ्या महत्त्वाच्या पदांवरून पायउतार होऊन देश तरुणांच्या हाती सोपवला पाहिजे. नुसतीच भाषणं देत बसलात तर तरूण म्हातारे होतील हो!
□ मुख्यमंत्र्यांच्या दौर्यासाठी केडीएमसीने रस्तेदुरुस्तीच्या नावाखाली ८० लाख रुपये खड्ड्यात घातले, महिन्याभरात रस्ते उखडले
■ झटपट विकासाचे मिंधे मॉडेल आहे ते!