भाजप भक्तगण
वादळांनाही लाज वाटेल
बोलघेवड्यांची भरली जत्रा
प्रत्येक भाजप नेता, मंत्री
पाजळतो अकलेची मात्रा
कशी अचानक बुद्धी फिरते
नको नको ते यांना स्फुरते
हाड जीभेला नाही यांच्या
गटारगंगा का अवतरते?
राग अनावर झाला तर हा
किती महागडा तो पक्षाला
पर्वा नसते माजोरड्यांना
अक्कल गहाण लोंबे खुंटीला
—– —– —–
एकनाथ शिंदे
बोम्मईविरुद्ध नाही बोलणार
आळीमिळी गुप चिळी
वरती अडकेल माझी मान
पायाखालची सटकेल फळी
गुरुमंत्र मिळाला मला
एक शब्द काढू नका
तोंडात तोबरा भरून ठेवा
तोंड मुळीच उघडू नका
मला माहीत आहे पुरते
मला कोणीच घाबरत नाही
बोललो काय नि अबोल राहिलो
माझी हालत जाणतो बोम्मई
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
मनात मार तू कितीही बाता
नको ना तू बोलू नाथा
मी असताना नकोच चिंता
जनतेच्या शिव्याही खाता
तुझ्या बोलाला नाही रे किंमत
त्यांनी ओळखली तुझी रे हिंमत
चार दिवसाचा पदाचा पाहुणा
म्हणून वाटे तुझी रे गंमत
सीमाप्रश्नासाठी सात दिवस आत
बाहेर सांगतो चाळीसची बात
इतके खोटे बोलता कसे
किती थापा मारता जोरात
—– —– —–
नरेंद्र मोदी
जेव्हा सगळा देश जिंकेन
तेव्हाच होईन जगज्जेता
हिमाचलात बर्फ वितळले
दिल्लीत झाडून शेकलाय माथा
तरीही बघा गुजरात राखले
मातृभूमीने राखली लाज
फौजफाटा किती लागला
त्याचीच मोजदाद करतोय आज
बाकी जनता माझ्या कब्जात
काय करू मी कशी येईल?
नाहीतर दिल्ली-हिमाचलसारखी
भाजपालाच फरफटत नेईल
—– —– —–
अमित शहा
गोबेल्सलाही लाजवेल असा
प्रचार करतील आमचे मोदी
विकासाच्या थापा मारून
पुन्हा निवडून आणतील गादी
आम्ही हुजरे सज्जच आहोत
चोवीस सालची वाट पाहात
लोणकढ्या ते कोणत्या ठोकतात
त्या प्रतीक्षेत नव्या दमात
तरीही आता वाटते भीती
लोक खूप शहाणे झालेत
ओळखतात नेत्यांना अचूक
अनुभवाच्या गंगेत न्हालेत