लॉकडाऊनचे दिवस. माणसं जगवणं जितकं महत्वाचं होतं तितकच कोविडने प्राण गमावलेल्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार होणं आवश्यक होतं. पण भीती आणि प्रवासाच्या सोयीअभावी लोक खांदा द्यायला पोहोचू शकत नव्हते. अशातच एका दुपारी ‘सुखांतचे सीईओ’ संजय रामगुडे यांचा फोन वाजतो, ‘हॅलो मी ऑस्ट्रेलियाहून बोलतोय, एका मित्राने मला तुमचा नंबर दिलाय. लीलावती हॉस्पिटलमध्ये माझे वडील कोविडने गेलेत, आई जसलोकला अॅडमिट आहे. बाबा गेल्याचं तिला सांगितलं नाहीये. विमानसेवा बंद असल्याने मी येऊ शकत नाही. मित्र, नातेवाईक सगळ्यांना फोन केला, पण बाबांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेसाठी यायला कुणी तयार नाही. मोठे काका वयोवृद्ध आहेत, त्यांना एकट्याला हे झेपणार नाही. तुम्ही प्लीज त्यांना मदत कराल का, प्लीज नाही म्हणू नका.’ मी तुमच्या वडिलांच्या यथोचित अंत्येष्टीसाठी प्रयत्न करतो, असं सांगून संजय रामगुडेंनी त्यांची टीम बोलावली. लीलावतीला पोहोचणार तेवढ्यात, काकांचा फोन आला, ‘मला अंधेरीला टॅक्सी मिळत नाहीये. तुम्ही प्लीज अंधेरीला येऊन मला पिकअप करा.’ काकांची सही असल्याशिवाय पार्थिव मिळणार नव्हतं. काकांना अंधेरीहून पिकअप केल्यावर लीलावतीला पार्थिव मिळेपर्यंतचे सगळे सोपस्कार रामगुडेंच्या टीमने पार पाडले. ऑस्ट्रेलियात असलेल्या मुलाला वडिलांचं ऑनलाईन अंत्येष्टी दर्शन घडवलं. मुलगा म्हणाला, ‘जे मी करायला हवं होतं ते सुखांतच्या टीमने केलं. बाबांचा शेवटचा प्रवास सुखकर करू शकलो नसतो, तर आयुष्यभर स्वतःला अपराधी मानलं असतं.’
कोविड लाटेत सुखांतने अशा अनेक शेवटच्या प्रवासांचा सन्मानाने समारोप केला. ‘सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सर्व जाती-धर्मातील अंत्यविधी सेवा देण्याचे काम करते.
११ नोव्हेंबर २०२२ रोजी समाजमाध्यमांवर यमाच्या वेशभूषेतील संजय रामगुडे व्हायरल झाले. हारफुलं घातलेली तिरडी आणि मडकं ठेवलेल्या स्टॉलवर, संजय ‘सुखांत’बद्दल माहिती देताना दिसले. मीडियाने या अभिनव कल्पनेला चांगलीच प्रसिद्धी दिली. पण, त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून टोकाच्या प्रतिक्रियाही आल्या. ‘हेच पाहायचं शिल्लक राहिलं होतं, असा धंदा कुणी करतं का, इथपासून ते असा व्यवसाय ही काळाची गरज आहे, नावीन्यपूर्ण कल्पना आहे, अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया समाजात उमटल्या. येत्या पाच वर्षात २००० कोटींची उलाढाल या व्यवसायातून करण्याचा रामगुडेंचा मानस आहे. याचं अर्थकारण काय आहे? हाच व्यवसाय त्यांना का करावासा वाटला? लोकांच्या टीकेवर त्याचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्यासाठी सांताक्रूझ ऑफिसमध्ये त्यांची भेट घेतली.
ते म्हणाले, ‘आज आमच्या सर्व्हिसेसबद्दल विरोधी सूर आहे तसाच विरोध काही वर्षांपूर्वी विमा प्रतिनिधींना व्हायचा. पॉलिसी विकायला गेल्यावर, माझ्या मृत्यूनंतरचे फायदे काय सांगतोस? मी जिवंत असतानाचे फायदे सांग, असं म्हणून लोक त्यांना घरातून हाकलून द्यायचे. आजारपण आलं नाही तर पैसे बुडतात, या कारणास्तव माणसं मेडिक्लेम काढायला नकार द्यायची. पण आज औषधोपचाराचे खर्च एवढे वाढले आहेत की मेडिक्लेम पॉलिसी विकत घेणं ही काळाची गरज बनली आहे. त्याचप्रमाणे येत्या काही वर्षांत समाजाला फ्युनरल सर्व्हिसेसची गरज भासणार आहे. अगदी कोरोना काळात लोकांना खूप वेगवेगळे अनुभव आले. एरवी दूरच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला जाणारी माणसं सख्ख्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला जायला देखील घाबरत होते आणि जेव्हा सगळं जग बंद होतं तेव्हा सुखांतची सेवा सुरू होती.
कोविडच्या साथीने देशात हाहा:कार माजवला असताना आमच्या सेवकांचा धीर खचू नये यासाठी मी देखील स्टाफसोबत अंतिम संस्काराचे काम करायचो. त्या काळात माझी पत्नी प्रीती हिनेही खंबीर साथ दिली. कॉल आल्यावर आम्ही दोन अॅम्बुलन्स घेऊन निघायचो. पहिली टीम पीपीई किट घालून पार्थिव घेऊन जात असताना दुसरी टीम बीएमसी ऑफिसकडे नोंदणी करायला निघायची. तिथे लांबलचक रांगेत थांबलो असताना आणखी एखादा कॉल यायचा. मग रांगेत एकाला उभं करून आम्ही दुसर्या ठिकाणी निघायचो. तेव्हा मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दिवसाला सात-आठ अंतिम यात्रा आम्ही केलेल्या आहेत. काही वेळा तर मृत व्यक्तीच्या घरातील कुणाही व्यक्तीला हजर राहणं शक्य नसल्याने स्मशानात जाऊन नाव लिहिणं, दुसर्या दिवशी जाऊन अस्थी गोळा करणं, अस्थींचं विसर्जन करणं, हे सगळं आम्हीच करत होतो. व्हिडिओ लाइव्ह करून फॅमिलीला विधी दाखवणं, पिंडाला कावळा शिवताना दाखवणं, या सर्वांतून आम्ही त्या कुटुंबाचा भाग बनत होतो. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणीच सज्ज नव्हतं खरंतर; पण जसजशी वेळ येत गेली, तसतसे आम्ही शिकत गेलो आणि काम करत गेलो. कोरोना कालखंडातल्या चॅलेंजेसना सामोरे जात आम्ही यशस्वी झालो, त्यातूनच सुखांत नावारूपाला आलं.’
या दूरदर्शी कल्पनेची पाळंमुळं तुमच्या बालपणात लपली आहेत का, असं विचारलं असता संजय म्हणाले, ‘आईवडील दोघेही सरकारी नोकरीत होते. मीसुद्धा सरकारी नोकरी करावी, अशी त्यांची फार इच्छा होती. पण मी मात्र आयुष्यात नोकरी करायची नाही, हे ठरवलं होतं. माझं शालेय शिक्षण भायखळ्यातल्या ह्यूम हायस्कूल येथे झालं. सातवीला असताना आमच्या कसाब सरांनी वर्गात कॅमेरा आणला होता. मी उत्सुकतेपोटी कॅमेरा हाताळत असताना चुकून माझ्याकडून फोटो क्लिक झाला. राग येऊन सरांनी माझ्या कानशिलात वाजवली. या घटनेने मला फोटोग्राफीबद्दल अजूनच उत्सुकता निर्माण झाली. शाळेत अनेक नाटकांतून काम केली होती. शूटिंगबद्दल आकर्षण होतं. माझे मावसभाऊ राजेंद्र सोनावले हे तेव्हा चित्रपट प्रोडक्शनचे काम पाहायचे. त्यांच्यासोबत सिनेमाच्या सेटवर फिरायला मिळायचं. बारावी झाल्यावर श्रमिक विद्यापीठातून फोटो डेव्हलपिंग शिकलो. माझी आवड पाहून आईने मला कॅमेरा घेऊन दिला. शिक्षण घेत असतानाच काम करायला लागलो आणि तेव्हापासून ते आजतागायत मी कधीही असिस्टंट म्हणून काम केलं नाही. जे काम करावसं वाटलं त्याबद्दल पूर्ण अभ्यासानिशी तयारीने उतरलो आणि ते यशस्वी करून दाखवलं. कॅमेरामॅन म्हणून माझं पहिलं शूटिंग होत टाटा टी जाहिरातीचं. किटू गिडवानी मॉडेल आणि भरत दाभोळकर डायरेक्टर होते. त्या दृश्यात हेलिकॉप्टरचा वापर केला होता.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून फोटोग्राफी डिप्लोमा पूर्ण केल्यावर, १९८८ला मी मुंबई दूरदर्शनला कॅमेरामन म्हणून रुजू झालो. तेव्हाची एक गोष्ट विशेष लक्षात आहे. १२ सप्टेंबर १९८८ रोजी मुंबईत एका दिवसात रेकॉर्डब्रेक १७७ मिलिमीटर पाऊस पडला होता. मुसळधार पावसाने अवघी मुंबई थांबली होती, पण दूरदर्शन सुरू होतं. आम्ही सलग तीन दिवस बातम्या देण्याचं काम करत होतो. सगळ्या मुंबईच्या अपडेट्स आमच्या कॅमेर्याने आम्ही जगापुढे आणत होतो, या गोष्टीचं समाधान मोठं होतं. जग थांबलं असताना काम करत राहण्याचा अनुभव दूरदर्शनने दिला. तो मला कोविड काळात खिंड लढवताना कामी आला. मुंबई दूरदर्शनवर आठ महिने काम केल्यावर मी गोवा दूरदर्शनला रुजू झालो. दूरदर्शनचा शिक्का बसल्यावर फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणं सोपं झालं. सुदैवाने कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मला जैन ब्रदर्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. फिल्म-टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधे टेक्निकल सपोर्टसाठी त्यांच्या नावाचा दबदबा होता. हा काळ छायाचित्रणाच्या तांत्रिक बाबींमधील आमूलाग्र बदलांचा होता. दरवर्षी काही तरी नवीन येत होतं. मी स्वतः यूमॅटिक लो बँड ते फोर के एचडी असा कॅमेराचा प्रवास अनुभवला आहे. गिरीश मिस्त्री, अजित नाईक यांच्यासोबत फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे कामं फ्रीलान्सर म्हणून करत गेलो. जाहिरातक्षेत्रातील लिंटास, त्रिकाया, चैत्रा यासारख्या नामवंत एजन्सीसाठी मी कॉर्पोरेट फिल्म्स आणि अॅड फिल्म्स बनवण्याचे काम केलं. टिप्स कंपनीच्या औजार, जब प्यार किसी से होता है, क्या कहना या चित्रपटांचे मेकिंग केलं.
स्वतःचा स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊस असावं हे माझं स्वप्न होतं. १९९५ साली सांताक्रुज येथे ‘अवर स्टुडिओ अँड प्रोडक्शन’ हे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केल्यावर ते पूर्ण झालं. ऑफिसमधे एडिटिंग सेटअप तयार करून मी डॉक्युमेंटरी फिल्म्स, म्युझिक व्हिडिओज बनवायला लागलो. भरपूर काम मिळत होतं, कारण तेव्हा रोज नवनवीन टीव्ही चॅनल्सची भर पडत होती. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कॅमेरा, क्रेन, डॉली अशा तांत्रिक गोष्टीचे नवीन मॉडेल्स विकत घ्यावे लागतात. व्यवसायातून मिळणारा फायदा त्यातच गुंतवत होतो. वेळ पडल्यास कर्ज काढून वस्तू विकत घेत होतो. व्यवसाय चांगला चालला होता. पण २६ जुलै २००५च्या पावसात माझ्या स्टुडिओला जलसमाधी मिळाली. ऐंशी लाख रुपये बुडाले. प्रचंड नुकसान झालं. त्या प्रलयंकारी पावसानं माझी पहिली इंनिग्ज संपवली.
कॅमेरा भलेही बुडाला असला तरी आजवर केलेल्या कामाचा अनुभव मला तारून नेईल याची मला खात्री होती. पुन्हा जिद्दीने नवीन सेटअप जमवला. कामं मिळवली. कृणाल म्युझिक, अल्ट्रा म्युझिक यांच्यासाठी अनेक म्युझिक व्हिडिओज बनवले. अल्ताफ राजाचा ‘तुम तो ठहरे परदेसी’ हा मी बनवलेला व्हिडिओ अल्बम सुपरहिट झाला होता.
एकदा ‘गंगा’ म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या शूटिंगसाठी मी वाराणसीला गेलो होतो. गंगातीरावर शूटिंग करताना, मला मृत्यचं वेगळंच रूप नजरेला पडलं. इथे अंतिम संस्कार केल्यावर मोक्षप्राप्ती होते या भावनेने गंगा घाटावर दूरवरून येणारी गर्दी, तिथे होणारे श्राद्ध पाहताना मी अंतर्मुख झालो. अनेक लोक चिंताग्रस्त दिसत होते. जवळच्या माणसाला गमावल्याच्या दुःखासोबत एक वेगळी चिंता त्यांच्या चेहर्यावर दिसत होती. तिथे बसलेल्या एकाने सांगितलं, गंगेकिनारी दहनविधी व्हावा ही आईची अखेरची इच्छा होती म्हणून तो त्याचे शेत गहाण ठेवून आला होता. दुसरा मनुष्य पैसे कमी होते, म्हणून दीडशे किलोमीटरवरून एकटाच वडिलांचे कलेवर घेऊन आला होता. ही माणसं पितरांना शांती मिळावी यासाठी जे कष्ट घेत होती, ते पाहून मी अचंबित झालो. वाटलं, जन्म ते मृत्यू हा प्रवास आपण पाहत असतो, पण मृत्यूनंतरचा देहाचा हा प्रवास आपण डॉक्युमेंटरीमधून मांडला पाहिजे. ज्या देहाला जितेपणी आपण जपतो त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, तो अंतिम निरोपाचा क्षण चिंतामुक्त होण्यासाठी काही तरी केलं पाहिजे… हा विषय मनात ठाण मांडून बसला. सामाजिक-आर्थिक परिस्थितीची स्थित्यंतरं पाहताना वारंवार डोकं वर काढत राहिला. एक कल्पना मनात आकार घेत होती, पण काळाच्या पुढची कल्पना असल्याने पूर्ण विचार झाल्याशिवाय पाऊल पुढे टाकवत नव्हतं. जीवनशैलीशी निगडित बिझिनेस करायचं ठरवल्यावर त्या कल्पनेचं आजच्या जगण्यातलं स्थान, ग्रोथ, सोशल अॅक्सेप्टन्स या सगळ्याचा विचार करावा लागतो. इथे तर मृत्यूनंतरचा देहाचा प्रवास व्यवसायासाठी निवडू बघत होतो. माझा जनसंपर्क दांडगा होता. स्टुडिओ सुरू असताना मी व्यवसायवाढीसाठी सॅटर्डे क्लब, एनबीसी, बीएसएस अशा अनेक बिजनेस ग्रुपशी जोडलो गेलो होतो. तिथे मी ‘सुखांत’ या अंतिम संस्कार सेवेची कल्पना मांडली. तेव्हा, पुंडलिक लोकरे, भारती महेश चव्हाण, सुरेश साळुंखे, दत्तात्रेय आधाते हे चारजण पुढे आले आणि आम्ही पाच मराठी उद्योजकांनी मिळून ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने कंपनी सुरू केली.
सुखाने अंत म्हणजे सुखांत. या संकल्पनेवर टीका होणारच होती. अंत्ययात्रा, अंत्यसंस्कार हा काय व्यवसाय करण्याचा विषय आहे, हा प्रश्नही अपेक्षित होता. पण तो लोकांनी मला विचारण्याआधी मी कित्येक वेळा स्वतःला विचारला होतो. मला वाटतं, एखादा मनुष्य ७०-८० वर्षाचं सुखी समाधानी जीवन जगल्यावर जेव्हा जगाचा निरोप घेतो तेव्हा त्या निरोपाचा क्षण चिंतामुक्त होण्यासाठी नियोजन का करू नये? आयुष्यामध्ये आपण प्लॅनिंग करून प्रॉपर्टीज घेतो, गुंतवणूक करतो, अनेक वस्तू खरेदी करतो, तसंच नियोजन अंतिम विधीसाठी का नको? आमचा प्लॅन तुमच्या देहासाठीच आहे, तुम्ही जाताना देखील स्वतःच्या देहाला दुःख देऊ इच्छित नसाल, तर तुम्ही किती मोठे प्लॅनर ठराल! कित्येक जाती-जमातींमध्ये वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्याचा रिवाज आहे. जगणं हे उत्सव असेल तर मृत्यूचा सोहळा का नको? या कठीण समयी तुम्हाला एक मदतीचा हात हवा, अंतिम संस्काराच्या सर्व जबाबदारीला असा खांदा देणारा सुखांत. ख्रिस्ती समाजात अशा प्रकारच्या अंडरटेकरच्या सेवा असतातच, लोक आपली शवपेटिकाही निश्चित करून ठेवतात, मापाप्रमाणे, आवडीप्रमाणे बनवून घेतात.
‘श्रद्धांजली आत्मसन्मानाने‘ ही आमच्या कंपनीची पहिली टॅगलाईन. ‘लक्षवेधी’ अकॅडमीचे अतुल राजोळी हे माझे मित्र, मेंटॉर आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी या कल्पनेचा विस्तार करत गेलो. दादर स्टेशनसमोर लक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ९ मार्च २०१५ रोजी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते आमच्या ऑफिसचं उद्घाटन झालं. जागेचं भाडं ७५ हजार रुपये होतं. मार्वेâटिंग आणि सेवक धरून पंधरा जणांचा स्टाफ कामावर ठेवला. ‘प्री प्लॅन इन अॅडव्हान्स’ ही आमची पहिली संकल्पना. लोकांनी अंतिम संस्काराची आगाऊ नोंदणी करावी. जेव्हा प्रसंग येईल त्यावेळी सर्व जबाबदारी उचलण्याची हमी देऊन त्या माणसाला चिंतामुक्त करायचं. पण दोन वर्षे आमच्याकडे एकही प्री प्लॅन नोंदवला गेला नाही. त्यामुळे आवक कमी आणि खर्च जास्त असं होऊ लागलं. सुरुवातीला अपयश पदरी पडलं. बरेचसे पैसे गमावल्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी दादर ऑफिस सोडून सांताक्रुझला शिफ्ट झालो.
प्री प्लॅन इन अॅडव्हान्ससोबतच आम्ही सुखांत अंतिम संस्कार ही सेवा देखील देतो. याअंतर्गत, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आम्हाला फोन येतो तेव्हा ते पार्थिव हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेने घरी आणणं, अंतिम संस्काराची सामुग्री आणि गुरुजींची व्यवस्था करणं, तिरडी बांधून त्यावरून देहाला सन्मानाने खांदा देऊन स्मशानात घेऊन जाणं, या सेवांचा समावेश आहे. अंतिम संस्काराचा अभ्यास करताना रुढीपरंपरेसोबतच प्रत्येक धर्माचं अंतिम संस्कारचं सामान कुठे उपलब्ध आहे, त्यात काय काय गोष्टी येतात, अस्थीविसर्जन कुठे होतं, याची माहिती जमवत होतो. ही माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवर जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. पण खरं सांगू का, ज्या कुटुंबावर, व्यक्तीवर ही वेळ आली आहे, त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, ही पण आमची भावना आहे. म्हणूनच आम्ही माहितीपेक्षा सर्व्हिस देण्यावर लक्ष केंद्रित केलं. या क्षेत्रात काम करत असताना लोकांच्या अनेक अडचणी समजल्या. काही लोक दुरून आलेले असतात. काहींना परगावी, परदेशी जाणं जरुरीचं असतं. त्यासाठी नाईट शिफ्ट सुरू केली. आम्ही २४ तास सर्व्हिस देतो. या धकाधकीच्या आयुष्यात जुनी जाणती माणसं, हाकेला धावून येणारी माणसं कमी झाली आहेत. अशावेळी अंत्यसंस्कर विधींपासून ते मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी कोण कामी येईल, तर सुखांत फ्युनरल सर्व्हिसेस. या कामात आलेली सर्वात मोठी अडचण म्हणजे मॅनपॉवर. मयताचं काम करायला येणार कोण? अशा प्रकारची नोकरी मी का करू? असे प्रश्न कामासाठी येणारी मुलं विचारत होती. आपल्याकडे मयताचं काम करणार्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. परिचिताच्या अंतिम यात्रेला जाताना आत्मीयता असते. पण नोकरी म्हणून हे काम स्वीकारणारी मुलं मिळणं फारच कठीण होतं. शवागृह असो की स्मशानभूमी या ठिकाणी काम करणारी माणसं बहुतांश वेळा व्यसनी आढळतात. पण आमच्याकडे काम करताना कोणतेही व्यसन नको ही प्रमुख अट आहे. नीटनेटके स्वच्छ कपडे परिधान केलेले नम्र सेवक हे सुखांतचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. आमच्या कंपनीत कोणीही साहेब किंवा नोकर नसून प्रत्येकाला समान पातळीवर वागवलं जातं. अॅम्ब्युलन्ससाठी पार्किंग, मृतदेह ठेवण्यासाठी प्रâीजर कुठे ठेवायचा, असे अनेक प्रश्न येत गेले. त्यावर तोडगा काढत सुखांतची यात्रा सुरू ठेवली. आता तिरडी बांधणे, सफेद कपडा, मडकं, अबीर गुलाल, गंगाजल, गळ्यात घालायला हार, फुलं, भस्म, चंदन या गोष्टी आम्ही आणतो. जाताना कोण राम राम म्हणतं, कोण जय श्री कृष्ण म्हणतं, तर कुणी हरी हरी म्हणतं. हे सगळं त्यांच्या रुढीनुसार आम्ही करतो. गोत्र, जातीनुसार अंतिम संस्कार विधी करणार्या पंडितांशी आम्ही संपर्कात असतो. मुस्लिम, ख्रिस्ती धर्माचे अंत्यसंस्कार त्या कुटुंबाच्या धार्मिक भावना आणि रीतीनुसार केल्या जातात. काही लोकांना कोणतेही कर्मकांड न करता अंतिम संस्कार करायचा असतो. त्यांचा मान राखून ती इच्छा पूर्ण केली जाते. मुंबईतील जुन्या चाळींना लिफ्ट नाही. तेथील तिसर्या-चौथ्या माळ्यावरून चिंचोळ्या जिन्याने पार्थिव खाली कसं आणायचं, याचं ज्ञान आमच्या सेवकांना आहे. तसेच मोठ्या हायराइज बिल्डिंगमधील छोट्या लिफ्टमधून ते कसं घेऊन जायचं, हेही त्यांना अवगत आहे.
वय वाढतं तसा अकस्मात येऊ शकणारा मृत्यू कुटुंबकबिल्यात राहणार्या माणसांची देखील झोप उडवतो. ज्यांची मुलं परगावी आहेत किंवा नवराबायको दोघेचं राहतात, एकल वृद्ध आहेत, नातेवाईक दूर आहेत, अशा वेळेला काही घडलं तर मदतीचा हात कोण देणार, असा रास्त प्रश्न उभा राहतो. ही व्यवस्था आपणच करून ठेवावी असं ज्यांना वाटतं ते आमची प्री प्लॅन इन अॅडव्हान्स सर्व्हिस निवडतात. आमच्या सभासदांनी मृत्यूपश्चात अवयवदान-नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्याचीही पूर्तता आम्ही करतो. परदेशी नातेवाईकांना यायला वेळ लागणार असेल तर देह शवागृहात ठेवणे, मृत्यूसंबंधित कागदपत्रांची पूर्तता करणे, जातीधर्माप्रमाणे अंतिम यात्रेचा सोहळा आम्ही आदर आणि सन्मानाने पार पाडतो.
पूर्वी प्रसिद्ध माणसे स्वतःच्या मृत्यूपूर्वीच स्वतःसाठीचा अग्रलेख लिहून घ्यायची. आपण स्मरणात राहावं, अमुक एका स्वरूपात माझ्यानंतर लोकांनी मला पाहावं, अशी माणसाची इच्छा असते. यासाठी नोंदणी करताना आम्ही त्या माणसाचा आवडता फोटो मागून घेतो. त्यांच्या कार्याला त्या फोटोची फ्रेम करून आम्ही देतो. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी अस्थिविसर्जन करून डेथ सर्टिफिकेट घरपोच देण्यापर्यंत सर्व जबाबदारी आमची असते.
आमच्या इच्छापूर्ती प्लॅनमधे, ज्यात आपल्या प्रथम स्मृतीदिनी किंवा वाढदिवशी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण मोफत द्यायचं असेल, वृक्षारोपण करायचं असेल, स्मृती स्मारकरूपाने जिवंत ठेवायच्या असतील, त्यांचे त्याप्रमाणे नियोजन आम्ही करतो. दृकश्राव्य माध्यमातून सुखांत सभासदाच्या आठवणी, त्याचं मनोगत, मित्रपरिवाराबद्दलच्या भावना आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून परिवाराकडे सोपवतो. सिनिअर सिटीजनच्या उपयोगी पडेल अशा मोबाईल अॅपवरही आमचं काम सुरू आहे. जपानमधील एका तंत्रज्ञाच्या मदतीने आमच्या सभासदाचा मृत्यू होताच आम्हाला त्याची सूचना मिळेल, असं डिवाइस आम्ही विकसित करत आहोत.
ज्यांनी आमच्यासोबत काम केलं आहे किंवा ज्यांना आम्ही सर्व्हिस दिली आहे, त्यांचं सुखांतबद्दलचं खूप चांगलं मत आहे. आमच्याकडे पूर्वनोंदणी करणारे अनेकजण म्हणतात की, तुमच्याकडे नोंदणी केल्यानंतर आमचं आरोग्य सुधारलं आहे. काही लोक तर गमतीने असंही म्हणतात की, समजा माझ्याआधी तुम्हीच मृत्यू पावलात तर माझं अंतिम कार्य कोण करेल? त्यावर मी त्यांना सांगतो, मी गेलो तरी माझ्या पश्चात सुखांत कंपनी तुमचा अंतिम संस्कार तुम्ही सांगितला आहे त्याच पद्धतीने करेल. अजिबात काळजी करू नका.’
आता आमच्याकडे १५०० प्री बुकिंग झालेले आहेत. पुढच्या तीन ते पाच वर्षांत आम्हाला पाच लाख लोकांना ही मेंबरशिप द्यायची आहे. मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या आज ४ कोटींपेक्षा जास्त आहे. यातून पाच लाख लोकांना चाळीस हजार रुपयाचा प्लॅन विकला, तर दोन हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर होऊ शकतो. यासाठी फ्रँचायची मॉडेल विकसित करून देशभर राबवणे, डिजिटल मार्वेâटिंग करणे या सर्वांची तयारी सुरू आहे. आज आमच्याकडे १९ माणसांचा स्टाफ आहे. काही दिवसात दीडशे ते दोनशे लोकांना रोजगार देण्याचा आमचा विचार आहे. आमच्या कंपनीच्या व्हॅल्यूज आणि समोरच्याची क्षमता यावरच आम्ही प्रâेंचायझी देण्याचा विचार करतो. आमची सर्वात मोठी व्हॅल्यू म्हणजे कमिटमेंट, कॉन्ट्रिब्यूशन आणि डिग्निटी. हे असेल तरच या व्यवसायाचं पावित्र्य कायम राहील. मृत व्यक्तीच्या अंतिम विधी करण्याची परवानगी कुटुंबियांकडून मिळणं हे फार जबाबदारीच विश्वासाचं आणि भावनेचं काम आहे. या गोष्टींचा सन्मान राखला जायला हवा. अंतिम संस्कार करताना मृतदेहाची हेळसांड होता कामा नये, तसेच कुटुंबियांच्या पारंपरिक धार्मिक भावनेला ठेच पोहोचणार नाही याची काळजी घेतली जायला पाहिजे. वेळ पाळण्यालाही आमच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमची सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. फोन आल्यानंतर एका तासात आम्ही सर्व तयारी करून तुमच्याकडे हजर होतो. सध्या आम्ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक भागात आमची सेवा पुरवतो.
मुलाखतीला सुरव्ाात करण्याआधी असलेल्या कुतुहलाची आणि नवलाची जागा आता आदराने घेतली होती. मृत्यू अटळ आहे. मृत्यू आणि तत्पश्चातच्या गोष्टींना आपण खरंच गृहित धरतो का? अंतिम संस्कार हा ‘धंदा’ होऊ शकतो का, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच असतील, पण एक निश्चित, आज देशात बेरोजगारी वाढत असताना स्वयंरोजगाराचा हा पर्याय तरुणांसाठी योग्यच आहे. पारंपरिक व्यवसायात मोठे भांडवलदार नवीन व्यावसायिकाला पाय रोवू देत नाहीत. अशावेळी एखादी नावीन्यपूर्ण कल्पना कमी भांडवलात धंद्याची उभारणी करू शकते. मर्तिकाच्या सामानाच्या दुकानात कुणी हौसेने जात नाही, पण ते दुकान असणं ही सामाजिक गरज आहे. फ्युनरल सर्व्हिसेससारखा व्यवसाय इतक्या मोठ्या स्केलवर होऊ शकतो हे संजय रामगुडे यांनी सुखांतद्वारे दाखवून दिलं आहे. या प्रकारचा व्यवसाय काळाची गरज म्हणून स्वीकारायला हवा.