व्यंगचित्रकाराच्या नजरेतून स्वत: व्यंगचित्रकार पाहायला मिळणे, हा एक दुर्मीळ अनुभव असतो. तो बाळासाहेबांच्या काही मोजक्या व्यंगचित्रांमधून घेता येतो. बाळासाहेब हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, देशातील श्रेष्ठ व्यंगचित्रकार तर होतेच, पण त्याचबरोबर ते महाराष्ट्रातले एक मोठे नेते होते, मराठीजनांचे आधारस्तंभ होते. राजकारणात त्यांच्या शब्दाला मान होता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गारूड तरुणांवर होते. महाराष्ट्राच्या हितासाठी बाळासाहेबांनी कसलेही किंतु मनात न ठेवता, शत्रुत्वाची भावना न बाळगता विरोधी विचारांच्या पक्षांबरोबर, नेत्यांबरोबर हातमिळवणी केली. समाजवादी मंडळींवर बाळासाहेबांचं विशेष ‘प्रेम’ होतं. त्यांच्या दुटप्पीपणावर बाळासाहेबांनी अनेकदा बोचकारणारे फटकारे मारले आहेत. पण, एसेम जोशी यांच्यासारख्या ऋषितुल्य नेत्यावर त्यांचं प्रेम होतं, त्यांच्याविषयी आदरही होता. त्यामुळेच त्यांनी एसेम यांच्याशी हातमिळवणी करण्याचं ठरवलं, तेव्हा एसेम यांच्या असुरक्षित वृत्तीच्या साथींनी एसेम यांना रोखण्याचा कसा प्रयत्न केला, हे या व्यंगचित्रातून त्यांनी खुमासदारपणे दाखवले आहे… यात बाळासाहेबांच्या कुंचल्याने चितारलेले बाळासाहेब पाहायला मिळतात, हे आणखी एक वैशिष्ट्य.