□ देशाच्या राजकारणात शॉर्टकटची विकृती तयार झालेली आहे. जनतेच्या पैशाची लूट करणारी ही विकृती आहे. : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ वा मोदीजी वा! ‘देशाची लूट करा, भाजपमध्ये या, पावन व्हा’ अशी शॉर्टकट स्कीम तुम्हीच तर चालवता आहात. ती बंद करा आणि भाजपमधल्या दोनचार भ्रष्टांनाही ईडी लावा… तुमच्याकडे गोळा झालेली खोगीरभरती केवढा मोठा लाँगकट घेते ते पाहायला मिळेल.
□ आमच्या काळात केंद्र सरकारकडून निघालेला रूपया पूर्णच्या पूर्ण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ म्हणजे आता कमिशन खाणारे अधिकृत लाभार्थी बनवून घेतलेत की काय!
□ महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडत नाही : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळले.
■ बरळले नाहीत, खरं बोलले. नकळत सगळी सेटिंग सांगून गेले.
□ गुजरातच्या विजयाचे श्रेय मोदींचे, हिमाचलमधला पराभव नशिबाने झाला : नितीन गडकरी.
■ अरेरे, गडकरी पण झिलकर्यांमध्ये सामील झाले!
□ ‘मन की बात’चा सारग्रंथ काढण्याच्या नावाखाली मुंबईत वर्गणी गोळा करून आर्थिक फसवणूक.
■ अरे देवा, ही तर डबल फसवणूक झाली.
□ आंतरधर्मीय विवाह करणार्यांशी सरकार संवाद साधणार. आईवडिलांवर नाराज होऊन मुले आंतरधर्मीय विवाह करतात : मंगलप्रभात लोढा.
■ आधी लोकांच्या ताटात डोकावून पाहात होतात, आता लग्नातही घुसताय? कुठून शोध लागतात तुम्हाला? धर्मांतर्गत विवाह केलेल्यांमध्ये खून होत नाहीत की घटस्फोट होत नाहीत? कशाला खासगी गोष्टींमध्ये नाक खुपसायला जाता?
□ एकीकडे समाज सुशिक्षित होतो आहे, पण दुसरीकडे मानवी मूल्यांचा र्हास होतो आहे : राज्यपाल कोश्यारींना चिंता.
■ महामहीम, तुम्ही सुशिक्षित की अशिक्षित?
□ निसर्गाची पिळवणूक केल्यास नैसर्गिक स्रोत संपुष्टात येतील. आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
■ पर्यावरणाचे निकष बाजूला ठेवून विनाशकारी प्रकल्पांना धडाधड परवानग्या देणार्या आणि त्याला विकास समजणार्या निसर्गद्रोही सरकारच्या अर्थमंत्री हे प्रवचन देत आहेत!
□ पोकळ आश्वासने, रेवडीचे राजकारण आणि तुष्टीकरण करणार्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.
■ गुजरातमध्ये भाजपचा विजय झालाय की पराभव? तुम्हीही हेच राजकारण करत आहात की अमितभाई?
□ मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश पुढे जाणार असा विश्वास गुजरातच्या जनतेने दाखवला आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ देश पुढे जाणारच आहे, त्यासाठी भाजपचीही गरज नाही नि मोदींचीही गरज नाही, असा विश्वास हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिकेच्या जनतेने दाखवला आहे देवेंद्रभाऊ!
□ निवडणुकीत विजय मिळाल्यावर राजकारण बाजूला ठेवून विरोधी विचारांच्या लोकांचे कौतुक करायचे असते, हे उद्धव ठाकरे यांना माहिती नाही : देवेंद्र फडणवीस.
■ तुम्ही स्वत: केले का अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांचे अभिनंदन? लोकांना ब्रह्मज्ञान सांगणं सोपं असतं. जागतिक प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर पत्रकार रवीश कुमारचे कौतुक करण्याइतकाही मनाचा मोठेपणा ज्यांना दाखवता आला नाही, ते करपट कद्रू इतरांना शिकवतायत. ‘मन की लाज’ तरी बाळगा जरा!
□ संसदेने मंजूर केलेले कायदे रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या सार्वभौम अधिकारांवर गदा आणली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड.
■ तुम्ही न्यायवृंद पद्धतीत ढवळाढवळ करून वेगळं काय करताय? सध्या तरी तुमच्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता काकणभर अधिकच आहे धनखड महोदय!
□ नोटबंदीसंबंधी सगळी कागदपत्रे सादर करा : सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला निर्देश.
■ कसली कागदपत्रं सादर करणार? एका भाषणाचा कागद सापडेल फक्त!
□ सीमाप्रश्नावर तोंड बंद ठेवा, नाहीतर पुन्हा तुरुंगात जाल : शंभुराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची खासदार संजय राऊत यांना धमकी.
■ संजय राऊत शिवसेनेचा ढाण्या वाघ आहेत, ईडीची छडी दाखवली की शेपटी घालून बावन्नबुळ्यांच्या बिळात शिरणारे उंदीर नाहीत, हे लक्षात ठेवा. मोगलाई लागून गेली आहे का धमक्या द्यायला?
□ राज्यपालांच्या खुर्चीबरोबर फोटो काढून घेणार्या अभिनेत्रीला समज.
■ सध्या त्या खुर्चीसोबत फोटो काढून घेण्यात बदनामीच अधिक आहे, हे तिच्या लक्षात आलं नसणार बिचारीच्या.