रामदेव बाबा
योगासने पाहता ललनांची
उफाळली ती ब्युटिफूल दृष्टी
मनात कमनीय स्त्री देहाची
रम्य पाहिली स्वप्नील सृष्टी
झाकले असले नसले तरीही
ते तर केवळ शरीर असते
त्या पलीकडचे सत्य अनावृत्त
दिव्यदृष्टीने मलाच दिसते
त्यात वावगे काहीच नाही
आपण सारे आदिमानव
लज्जारक्षणा वस्त्रे आली
कृत्रिमतेचे सारे वैभव
—– —– —–
अमृता फडणवीस
कित्ती सोपे विचार त्यांचे
करिती स्त्री देहाचा गौरव
त्यात वावगे काहीच नाही
त्यांच्या मनीचा तो गुंजारव
जग कितीतरी पुढे गेले
मागे राहून कसे चालेल?
बोल्ड विचार ऐकलेच पाहिजेत
इतके बिनधास्त कोण बोलेल?
आपले भाग्य पहा किती थोर
त्यांच्यासारखे गुरू लाभले
थंडीमध्ये जीभ घसरते
म्हणूनच थोडे शब्द आखडले
—– —– —–
संभाजी भिडे
घाबरू नका रामदेवबाबा
आपण दोघे ब्रह्मचारी
तुमच्यासारखाच मीही एकटा
मलाही शिकवा गंमत सारी
मी तुम्हाला समजू शकतो
या वयात का होते हालत
तुमचा देह मजबूत वाटतो
योगात रमता हिरवळ राखत
मी आहे तुमचा पाठीराखा
आम्हालाही संमेलन दाखवा
भाषण ऐकून काटा आला
आम्हालाही धडे शिकवा
—– —– —–
एकनाथ शिंदे
भविष्य पाहिले हे तर खरेच
किती जण देतील दगा?
कधी लागेल टाचणी टोकदार
केव्हा फुटेल माझा फुगा?
भविष्यात नक्की आहे तुमच्या
ज्योतिषी म्हणाले, दगाफटका
जसा तुम्ही दुसर्यांना दिलात
तसाच तुम्हाला मिळेल झटका
सगळे ग्रह वक्री आहेत
तुमचे भविष्य दिल्लीत ठरणार
तळतळाट जनतेचे भोवतील
आवळ्या-भोपळ्याची मोट फुटणार
—– —– —–
राज्यपाल कोश्यारी
कुठे ठाऊक आहे मला
महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल
काही नावे देतो ठोकून
नंतर कानी येती खडे बोल
माझ्यासारख्या बुजगावण्याला
आणला कशाला कळत नाही
ओढ लागली उत्तराखंडची
तिथे जाण्याची झाली घाई
असंबद्ध बोलणे माझे
म्हणजे नाही हो म्हातारचळ
एवढ्या शिव्या खाल्ल्यावरती
आता उरले नाही बळ