जगाला प्रेरित करणार्या छत्रपती शिवरायांचे महाचरित्र मी लिहिलेल्या ‘शिवाजी महासम्राट’ कादंबरीद्वारे आता इंग्रजीमध्ये उपलब्ध झाले आहे. इंग्रजी वाङ्मयाचे थोर अभ्यासक आणि जागतिक कीर्तीचे प्राध्यापक नदीम खान यांच्या अव्वल इंग्रजीतून ही कादंबरी भाषांतरित झाली आहे. ‘वेस्टलॅण्ड’ या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने ती इंग्रजीमध्ये आणली आहे. या आधी इतिहासकारांनी ठळकपणे आम्हाला कधीच सांगितले नव्हते की, शिवरायांचे महापिता शहाजीराजे यांनी दिल्लीच्या दोन दोन बादशहांसोबत मैदानामध्ये जंग छेडला होता. लाखा लाखाच्या मोघलांच्या फौजांशी सामना केला होता. औरंगजेबाचा आजोबा जहांगीर आणि त्याचा बाप शहाजहान या दोघांच्या फौजेशी शहाजीराजे भिडले होते. त्यांनी भातवडीच्या लढाईमध्ये दिल्लीकर मोगलांच्या फौजेची दाणादाण उडवली होती.
अभ्यासकांनी आम्हाला कधीच कळू दिले नाही की छत्रपती शिवराय यांच्या पित्याने म्हणजेच शहाजीराजांनी शिवरायांना तसेच व्यंकोजी राजे, कोयाजी राजे, थोरले संभाजी राजे या आपल्या युवराजांना स्वतः १६४० ते ४२ या दरम्यान बंगलोरच्या किल्ल्यात लष्करी शिक्षण दिले होते. प्राध्यापकांनी आम्हाला कधीच शिकवले नाही की, प्रतापगडावर शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा फाडला, त्यावेळी त्यांनी प्रतापगडच्या जंगासाठी आजूबाजूच्या खेड्यातील सर्व गोरगरीब स्त्री-पुरुषांना नव्हे, तर सह्याद्रीच्या कड्यापठारावर निसर्गालाही आपल्या जबरदस्त लढाईमध्ये सहभागी करून घेतले होते.
शहाजी राजांचा नष्टावा करण्यासाठी दिल्लीचा बादशहा शहाजहान स्वतः महाराष्ट्रावर १६३४मध्ये धावून आला होता. तेव्हा त्याने आग्य्राच्या यमुनाकाठी चालू असलेले ताजमहालचे बांधकाम बाजूला ठेवून शहाजीराजांच्या विरुद्ध धाव घेणे महत्त्वाची समजले होते. असा हा ज्वलज्जहाल इतिहास मी नव्या दृष्टिकोनातून व अभ्यासाच्या संशोधनाच्या आधारावर कादंबरी रूपाने मांडतो आहे.
आज सर्वत्र वाचक ‘शिवाजी महासम्राट’ या कादंबरीचे जे प्रचंड स्वागत करत आहेत, त्याबद्दल सर्वांचे आभार. ज्यांची मुले मराठी वाचू शकत नसतील त्यांनी या इंग्रजी कादंबरीचा जरूर लाभ घ्यावा.
बंगाली महाकवी रवींद्रनाथ टागोरांना शिवरायांवर काव्य सुचले. मीही माझ्या परीने गेली अनेक वर्ष शिवरायांचा अहोरात्र ध्यास घेऊन अभ्यास करतो आहे. त्यातून आकाराला आलेल्या पहिल्या खंडाचे वेस्टलॅण्ड प्रकाशन संस्थेने एवढ्या अल्पकाळात इंग्रजीमध्ये प्रकाशन करावे याचा मला खूपच आनंद होतो आहे. वाचकांना ही इंग्रजी कादंबरी ‘शिवाजी-१’ (शिवाजी महासम्राट सीरिज) ‘अॅमेझॉन डॉट इन’ या साइटवर उपलब्ध होईल. सोबतच्या फोटोतील बेंगलोर व देशभरातील इतर दुकानांमधील मांडलेल्या इंग्रजी कादंबरीच्या ढिगावरून वाचकांना कल्पना येईलच की देशभर या कादंबरीचे किती विराट स्वरूपात स्वागत होत आहे. माझ्या लेखणीवर प्रेम करणार्या तमाम मराठी वाचकांना माझा मानाचा मुजरा.