समाजात नेहमीच चर्चा झडत असतात. ती आपली राष्ट्रीय सवय आहे. आता तर सोशल मीडियाच्या आगमनानंतर चर्चांना चावड्याही मिळाल्या आहेत. लोकांकडे वेळही भरपूर असतो. चर्चांना ऊतच आला आहे. चर्चेत मांडले जाणारे मुद्दे कितपत विचारपूर्ण व तर्कशुद्द आहेत, याचा मोठा गोंधळ असतो. चर्चा करताना विषय कोणताही असला तरी किमान अभ्यास केला पाहिजे, नुसता मुद्द्याला मुद्दा मांडून आणि समोरच्याचा खोडून काढायचा, एवढाच चर्चेचा उद्देश असायचं काही कारण नाही. याच विषयावर आधारित ‘चर्चा तर होणारच’ या नव्या नाटकाचा शुभारंभ नुकताच १९ नोव्हेंबरला पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात झाला. त्यानंतर ठाण्यात २० नोव्हेंबरला गडकरी रंगायतनमध्ये प्रयोग पार पडला. यात अदिती सारंगधर, आस्ताद काळे आणि क्षितिज झारापकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या नाटकाविषयी क्षितिज झारापकर म्हणाले, हे नाटक ज्या प्रकाराने लिहिले गेलेय आणि ते ज्या प्रकाराने सादर होते आहे, तो प्रकार आपल्याला साधारणपणे लोकनाट्यात पाहायला मिळतो. याला पोलिटिकल नाही, तर सोशल सटायर म्हणता येईल. कारण या नाटकात कोणत्याही एखाद्या राजकीय मुद्यावर चर्चा नाहीये, तर समाजाच्या सतत चर्चा करण्याच्या वृत्तीवर चर्चा करण्यात आली आहे. अशा प्रकारचे सटायर दिवाणखान्याचा सेट असलेल्या एका व्यावसायिक मराठी नाटकात येतं हे या नाटकाचं वेगळेपण आहे. दिवाणखान्यातली नाटकं एकतर कौटुंबिक असतात किंवा फार फार तर विनोदी पण कौटुंबिकच असतात.
या नाटकात दोन सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे परस्परविरोधी विचारसरणीचे आहेत. एक डाव्या विचारसरणीचा आहे, तर दुसरा पुरोगामी. त्यांच्यात चुरशीची डिबेट घडवण्यासाठी एका अमेरिकन एनजीओचा माणूस उभा राहतो. तो त्यांना विषय देणार आणि त्यातून घडलेल्या चर्चेत कोण विजयी होणार, हेही तोच सांगणार असतो. या माणसाचा या डिबेटमागे काही वेगळा हेतू आहे का, त्याचे काही षडयंत्र आहे का, हा या नाटकाचा प्लॉट आहे. म्हणजे हे नाटक विनोदी आहे की रहस्यमय वगैरे आहे? हा प्रश्न पडतोच.
यावर क्षितिज म्हणाले, आजकाल चर्चाच विनोदी घडताहेत. व्हॉट्सअपवरील प्रत्येक ग्रुपवर होणारी चर्चा शेवटी विनोदावरच जाते. मात्र उगीचच वाक्याला वाक्य किंवा शब्दाला शब्द देऊन किंवा अंगविक्षेपाने केलेला एकही विनोद या नाटकात दिसणार नाही. यातले सगळे विनोद एका विशिष्ट विचारसरणीतून आलेले बौद्धिक विनोद आहेत. अशा प्रकारच्या नाटकांची सुरुवातच दादू इंदुलकर व दादा कोंडके यांनी केली. सी. डी. देशमुख नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनी राजीनामा दिला आणि ते परत महाराष्ट्रात आले होते. त्यानंतर तिसर्याच दिवशी ते दादांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’च्या प्रयोगाला पहिल्या रांगेत येऊन बसले होते. नाटकाच्या सुरुवातीलाच एक वाक्य आहे, शिपाई, राज्याची हालहवाल कशी आहे? तेव्हा दादा म्हणतात, बाकी सगळं आलबेल आहे, पण शिडी गेल्यापासनं समदे लटकताहेत… ही जी विनोदाची एक लेव्हल आपल्याकडे ६०-७०च्या दशकात लोकनाट्यात होती. मराठी प्रेक्षक हा मुळातच विचार करून नाटक बघणारा होता.
आपल्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, या नाटकात डिबेट घडवून आणणारा माणूस मी आहे. दिग्विजय देशपांडे. दिग्विजयचा ही डिबेट घडवून आणण्यामागे काय हेतू आहे, हे रहस्य नाटकात पुढे उलगडत जाणार आहे. या भूमिकेसाठी आपल्याला काहीच विशेष मेहनत घ्यावी लागली नाही असे क्षितिज म्हणतात. याचे कारण आहेत नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ऐदलाबादकर. ते नुसते लिहित नाहीत तर ते नाटक कन्सीव्ह करतात. थोडक्यात, रंगमंचावर काय दिसायला हवं ते लिहिण्याअगोदरच त्यांचं फिक्स असतं. त्यामुळे नाटकाची तालीम करताना आम्हाला कुठेही प्रश्न पडले नाहीत. कारण त्यांची प्रत्येक गोष्ट क्लीयर होती. अशा विषयावर नाटक करणं खरं तर खूप कठीण. कारण एका फार फाइन लाइनवर आपण चालत असतो. जरा जरी तुमचं इकडचं तिकडे झालं तरी ते एकांगी होण्याचा संभव होता. तसं होऊ न देण्याचं काम ऐदलाबादकर यांनी उत्तम केलंय.
आस्ताद काळे काय किंवा अदिती सारंगधर काय, आम्ही सगळे एकमेकांना साधारणपणे दहाएक वर्षे ओळखतोच आहोत. आस्तादने माझ्या पहिल्या सिनेमात काम केलं होतं. अदितीच्या पहिल्या एकांकिकेपासून मी तिला ओळखतोय. त्यामुळे एखाद्या प्रसंगी हा काय करणार हे आम्हाला कुणी सांगायची गरज नव्हती, आम्हाला आधीच कळायचं. ‘हा कोण आला मला सांगणारा’ असं आम्हा कुणालाच एकमेकांबाबत वाटत नाही. म्हणून हे नाटक सांघिक झालंय. राज्य नाट्य स्पर्धेत किंवा एकांकिका स्पर्धेत नाटक करताना कलाकारांची जी एकजूट असते ती या व्यावसायिक नाटकात आली आहे, असेही क्षितिज म्हणाले.
नाटकात एखादा विषय उचलला असला तर अखेरीस त्याचे सोल्युशन यावेच लागते. या नाटकातून असे काही सोल्युशन वगैरे दिले गेलेय का? असे विचारता ते म्हणाले, आजचा प्रेक्षक प्रगल्भ आहे. आपण कुणाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. हां. आरसा दाखवणं गरजेचं असतं. समाजात किंवा राजकारणात एखादी घटना घडली तर त्यावर आपण कुठल्या पद्धतीने रिअॅक्ट व्हावं, ते रिअॅक्ट होताना आपण कसला विचार करायला हवा, अभ्यास काय करायला हवा याचा आरसा आम्ही या नाटकातून दाखवला आहे. आम्ही कुणालाच काहीच सांगितलेलं नाहीये.
झारापकर तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा नाटकात काम करतायत. ‘बायकोच्या नकळतच’ हे शेवटचं नाटक त्यांनी २००६ साली केलं होतं. ते सांगतात, मध्यंतरीच्या काळात दोन-तीन लोकनाट्ये माझ्याकडे आलीही होती. पण ती मी नाकारली. आता गोपाळ अलगेरींचा फोन आला. ते म्हटले, लोकनाट्यासारखंच आहे, पण हे व्यावसायिक नाटक आहे. करूया का? अदिती आणि आस्तादही आहेत. ही नावे ऐकली आणि मी लगेच होकार दिला. रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते आहेत कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे, तर संगीत राहुल रानडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.
चिमटे काढ, ओरखडे नको!
क्षितिज झारापकर यांनी काही काळ नाट्यसमीक्षणही केलं आहे. एक समीक्षक म्हणून त्यांना या नाटकाबद्दल काय वाटत असेल? ते म्हणतात, समीक्षक म्हणून नाटक बघणं वेगळं असतं आणि एखाद्या नाटकात अभिनेता म्हणून असणं वेगळं असतं. मी ऐदलाबादकरांच्या दोन नाटकांची समीक्षा तेव्हा केली होती. माधव मनोहर समीक्षा करायचे. त्यांची समीक्षा म्हणजे नाटक चुकलंय कुठे हे दाखवण्याचं काम करायची. बाळासाहेबांनी ‘सामना’चे नाट्यसमीक्षक संजय डहाळे यांना सुरुवातीलाच म्हटलं होतं, ‘चिमटे काढ, ओरखडे काढू नकोस’. नाटक मराठी लोकांच्या हृदयाच्या जवळची बाब आहे. नाटक करणार्या लोकांना माहीत असतं ते कुठे चुकले आहेत ते… आपण त्यांना ते सांगायची गरज नसते. मुळात मला किती कळलं किंवा मी असतो तर काय केलं असतं हे सांगणं म्हणजे समीक्षा नव्हे. समीक्षा म्हणजे नाटक पाहिल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचलं का? लोकांपर्यंत त्याचा आशय, विषय पोहोचतोय का? याच्यावर भाष्य करणं.