प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची संपूर्ण जगाला समग्र ओळख करून देणार्या ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या रिलाँचिंगचा सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या वेबसाइटचे रिलाँचिंग झाले आणि राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याच्या शक्यतेने दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले. प्रबोधनकार ठाकरे आणि घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परस्परांच्या शुभचिंतक नेत्यांचे, सहकार्यांचे नातू यानिमित्ताने एकत्र आले, ही ऐतिहासिक घटना गाजली.
साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि दै. ‘सामना’ यांचे प्रकाशन करणार्या प्रबोधन प्रकाशन या संस्थेनेच ही वेबसाइट नव्या, आकर्षक, मोबाइलस्नेही स्वरूपात आणण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मार्मिकमध्ये गेली दोन वर्षे ‘प्रबोधन-१००’ या लेखमालेतून प्रबोधनकारांच्या ज्वलंत विचारांची आणि जीवनक्रमाची ओळख करून देत असलेले ज्येष्ठ पत्रकार, संपादक सचिन परब हेच या वेबसाइटचे संपादक आहेत. गेल्या दशकभरापासून ते प्रबोधनकारांचे साहित्य, त्यांची माहिती गोळा करून या वेबसाइटवर आणत असतात. प्रबोधनकारांच्या विचारांनी झपाटलेल्या सचिन परब यांचे साप्ताहिक ‘मार्मिक’ परिवारातर्फे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!
(छाया : सचिन वैद्य)