‘मला माझ्या संपूर्ण आयुष्यात चांगली बॅटिंग जमली नाही, मी बहुतेक बॉलिंगसाठीच जन्म घेतला आहे’ असे वाक्य मैदानावर क्रिकेट खेळणार्या एका ८ वर्षाच्या मुलाच्या तोंडी ऐकले आणि लक्षात आले की क्रिकेट नामक खेळाला मी एकटीने नावे ठेवण्यात काहीही हशील नाही. जिथे ८ वर्षाच्या मुलाला अवघ्या आयुष्याचं सार क्रिकेटमध्ये सापडलं तिथे मी पामर काय बोलणार?
सध्या चालू असलेल्या १६ संघांच्या विश्वचषकामुळे पुन्हा एकदा भारतीय जनतेचे क्रिकेटप्रेम भरतीला आलेले आहे. तसे ते आयपीएल मुळे हल्ली कायमच भरतीला आलेले असते. माझ्या मते भारतीयांना जर दोन गटात विभागायचे असेल तर एक क्रिकेट आवडणारा आणि दुसरा क्रिकेट न आवडणारा असेच दोन होऊ शकतात. न आवडणार्या गटात बर्याच महिला असतील कारण आवडणार्या गटातील रसिकांच्या क्रिकेट बघतानाच्या नाश्ता आणि चहाचा भार त्यांच्यावर आलेला असतो. मला तर त्यामुळे ज्यांना ज्यांना क्रिकेट आवडत नाही ते लोक जवळचे वाटू लागले आहेत. शेजारच्या मीनलचे लग्न जमवणे चालू होते. तिला मुलाने भेटल्यावर विचारले, ‘तुला क्रिकेट बघण्याचा छंद आहे का?’ मीनलने सरळ उत्तर दिले, ‘असले छंदीफंदी लोक आमच्या घरात नाहीत.’ मला तर बाई भारी आवडलं होतं तिचं उत्तर. मीनलला आपल्या भाच्याचे स्थळ दाखवावे का असाही विचार येऊन गेला एकदा मनात.
ज्या कोणी क्रिकेट या खेळाचा शोध लावला त्याला भरपूर पाणी पाजून पुण्याच्या किंवा ठाण्याच्या रस्त्यांवरून सायकलवरून फिरवण्याची माझी प्रचंड इच्छा आहे. अतिशय नतद्रष्ट आणि स्त्रीविरोधी खेळ आहे हा. म्हणजे असं की सुट्टीचा दिवस असतो. आपण नवर्याकडून पंखे पुसून घ्यावेत, खिडकीच्या काचा स्वच्छ करून घ्याव्यात, अगदीच शक्य झालं तर आठवड्याचा बाजार त्यांच्याकडून करून घ्यावा असाही विचार मनात आलेला असतो आणि सकाळी उठून अहो घोषित करतात, आज क्रिकेटची मॅच आहे, अख्खा दिवस मस्तपैकी मॅच बघणार. म्हणजे आपल्या योजनेला सुरुंग. एवढंच नाही तर दिवसभर कोचावर तंगड्या पसरून बसणं आलं, सारख्या चहाच्या फर्माईशी करणं आलं. आपणच मॅच खेळत असल्यासारखं जोशात येणं आलं, त्यापायी जोरात किंचाळणं आलं. एकदा तर हद्दच झाली होती. हे मॅच बघता बघता एवढ्या जोरात ओरडत होते की दुसर्या दिवशी बाहेर निघाल्यावर शेजारी माझ्याकडे संशयाने बघत होते आणि याना म्हणालेदेखील, ‘तुम्हाला काही त्रास असेल तर आमच्याकडे मन मोकळं करा.’
बरं मॅचमुळे बाहेर जाता येणार नाही म्हणून घरातील काम द्यावं तर त्यातही गडबडच होते. एकदा मी यांना मॅच बघता बघता मटार सोलायला दिले होते. म्हणजे अर्धेच मटार मला परत मिळणार हा धोकादेखील मी पत्करला होता. तर अहोंनी काय करावं? विराटची विकेट गेली या दुःखात सोललेले दाणे, निवडलेली कोथिंबीर असं सगळं केराच्या डब्यात टाकलं आणि काड्या, टरफलं माझ्याकडे भाजीसाठी आणून दिली.
एकवेळ विश्वामित्राची साधना भंग होईल पण क्रिकेटची साधना भंग होणे अशक्य. बुवाबाजीच्या नादी लागलेले आणि क्रिकेट बघायला बसलेले लोक सारखेच. कितीही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा, यांची पापणी म्हणून लवणार नाही.
बरं, जे इथे तेच आमच्या ऑफिसमध्ये. गुंतवणूक विभागातील टीव्ही बहुधा क्रिकेटसाठीच घेतला असावा. ज्या दिवशी मॅच असते त्यादिवशी सगळ्यांचं गुंतवणूक विभागात जरा जास्तच काम पडतं.
मी घरी, अहो ऑफिसमध्ये आणि त्या दिवशी क्रिकेटची मॅच अशी वेळ तर वैर्यावरही येऊ नये. हल्ली खरं तर मोबाइलवरही स्कोअर कळतो. तरी दर पाच मिनिटाला फोन करून मॅचची चौकशी करतात.
जसे आम्ही तसेच आमचे शेजारी. शेजारच्या घाटग्यांचा असा दाट समज आहे की त्यांनी मॅच बघितली की भारत हरतो. क्रिकेट तर आवडतं. मग, शेजारच्या केबिनमधल्यांना सारखे स्कोअर विचारतात. त्यांच्या मते त्यांनी मोबाईलवरही स्कोअर बघणे भारतासाठी फायद्याचे नाही.
क्रिकेटचे रसिक जेवढे अंधश्रद्धाळू आहेत तेवढे तर आई माताजीला बोकडाचा बळी देणारेही नाहीत. ‘पाय धुवायला जा, पाय धुवायला’ अशी सूचना शेजारचे काका घरी आलेल्यांना सारखी करतात. पाय धुवून मॅच बघायला बसलं तर भारत जिंकतो असा त्यांचा समज आहे. मी मॅच बघितली तर मॅच हरतो, सचिन तेंडुलकरने पहिला बॉल बॅटवर नाही घेतला म्हणजे आपण हरणार, धोनीने पहिल्या बॉलवर डोळे मिचकावले नाहीत म्हणजे आज मॅच हरणार, कोहली नॉट आऊट राहिला म्हणजे आज मॅच जिंकणार वगैरे वगैरे. या अंधश्रद्धा नाहीत तर काय?
बरं हे क्रिकेटचं लोण नुसतं बघण्यापुरतं मर्यादित असेल तर ठीक आहे. विश्वकप, आयपीएल असलं की मग तर विचारायलाच नको. लहान मुलं, मोठी माणसं अशा सगळ्यांनाच क्रिकेट खेळण्याचाही फिव्हर चढलेला असतो. आमच्या सोसायटीची महिलांचीही क्रिकेट टीम आहे. त्यासाठी प्रेक्षकवर्ग सगळे पुरुषच असतात.
आम्ही राहायला पहिल्या मजल्यावर असल्याने या टेम्पररी क्रिकेट शौकिनांचा भलता त्रास होतो. आळशी आयांना झोपायचं असल्याने दुपारी घरातून हाकलून दिलेली सगळी लहान मुलं मैदानात ऊन असते म्हणून बिल्डिंगच्या लगत खेळायला येतात. आणि नुसती हुल्लडबाजी करतात. मागच्या वर्षी तर कितीवेळा बॉल खिडकीतून येऊन आराम करत असताना माझ्या कपाळाला लागला. शेवटी मी नियम घालून दिला. बॉल वरती आला तर मिळणार नाही. मग जरा सांभाळून खेळायला सुरुवात झाली. तरीही एक दिवस बॉल आलाच. तो घ्यायला शेजारचा चिनू आला. खरं तर तो बॉल आमच्या बोक्याला म्हणजे सुलतानाला लागला होता. त्यामुळे तो परत करण्याचा प्रश्नच नव्हता. सुलतानाच्या कपाळावर छोटं टेंगुळही आलं होतं. चिनूने बेल वाजवली, दार उघडल्यावर म्हणाला, ‘काकू, बॉल द्या ना.’
सुलतानाला आलेलं टेंगुळ त्याला दाखवून मी बॉल देणार नाही असे ठाम सांगितले. तर म्हणतो कसा, ‘काकू, द्या ना. सचिन तेंडुलकर देखील असाच छोट्या गल्ल्यांमधून खेळून मोठा खेळाडू झालाय. उद्या मी अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला लागल्यावर तुम्हीदेखील म्हणाल, चिनूचा बॉल आमच्याच घरी यायचा बरं. तेव्हा काय असं म्हणणार का काकू, बॉल आमच्या सुलतानाला लागत होता म्हणून आम्ही दिला नाही.’
ही अशी पोरं आहेत.
मागच्या काही वर्षांत आमच्या घरी सगळेजण बळजबरी मला मॅच बघायला बसवतात. पण खरं सांगू का, मला काही त्या खेळाचं समजतच नाही. एलबीडब्ल्यू नक्की कधी देतात हे काही उभ्या जन्मात लक्षात येणार नाही. डकवर्थ लुईस कसा लागू होतो, ऑफसाईड्ला मारला म्हणजे नक्की कुठे मारला, स्पिनर म्हणजे कोण, यॉर्कर म्हणजे कसला बॉल, स्क्वेयर लेग, मिड ऑन, लॉन्ग ऑन, डीप फाईन लेग वगैरे वगैरे. इतक्या संज्ञा समजावून घ्यायच्या तर कशाला असला अवघड खेळ बघायचा. शिवाय हल्ली ते बॅट्समनला बॅटर म्हणायला लागले आहेत. खरं सांगा, बॅटर म्हटलं की इडली डोसा आठवत नाही का? उगीच आपलं काहीतरी.
बरं एवढा लोकप्रिय खेळ असूनही भारताचा राष्ट्रीय खेळ मात्र हॉकीच. इंग्रजांनी भारतात आणला म्हणून असं मुद्दाम क्रिकेटला राष्ट्रीय खेळ करत नाहीयेत का?
पण खरं सांगू का, बघून बघून हा खेळ तसा हल्ली मला बरा वाटायला लागलाय. म्हणजे त्यातही तसा बेटिंग, मॅच फिक्सिंग या गोष्टी आल्याच आहेत. पण तरीही मॅच चालू असेपर्यंत भारतीयत्व मनात जागत असतं. बाकीचे सगळे ताण, त्रास विसरायला होतात. हल्ली चालू असलेल्या सततच्या नकारात्मक बातम्या, राजकीय धुळवड बघण्यापेक्षा क्रिकेटचा खेळ बघितलेला बरा असे वाटते. राजकीय फटकेबाजी, टोलवाटोलवी बघण्यापेक्षा रोहित विराटची फटकेबाजी जास्त करमणूक करणारी वाटते. लहान मुलांनाही काही तास मोबाईल, त्यावरील गेम्स याना विश्रांती देऊन हा खेळ बघितला तर चांगलंच नाही का? हे बघून त्यांना जर मैदानी खेळाची आवड लागत असेल तर त्यासारखे दुसरे अजून काय हवे? घटका दोन घटका मन रमवणारा हा ‘छंद जीवाला लावी पिसे’ हेच खरे.