• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दत्तगुरुंचा असाही प्रसाद!

- घनश्याम भडेकर (शूटआऊट)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in शूटआऊट
0

गावकरी म्हणाले आत एका बाईची डेड बॉडी ठेवली आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकात ही बाई ट्रेनखाली पडली आणि मेली. तिचे शवविच्छेदन करण्यासाठी इथं आणले आहे. पण रात्र झाल्यामुळे आज डॉक्टर येणार नाहीत. बहुधा ते उद्या सकाळी येतील. उद्या दिवसा उजेडी यावं म्हणून मी निघालो. बाहेरगांवाहून आलेल्या भक्त मंडळींची झोपण्याची व्यवस्था केली आणि मीही दत्तगुरूंचे नामस्मरण करतच गाढ झोपी गेलो.
– – –

त्या खेडूताने धक्कादायक बातमी दिली. म्हणाला, ती पत्र्याची शेड दिसते आहे, तेथे बैल आणून कापतात. त्याच्या बाजूच्या शेडमध्ये बकरे कापतात. आणि ही दगडी खोली दिसते तेथे माणसं कापतात. आम्ही नेहमी पाहतो. तुम्हाला पाहायचे असेल तर थोडा वेळ थांबून पहा. जिवंत बैल आणि बकरे आपल्यासमोर कापतात. ताजं मटण मिळते तेही कमी भावात.
कमाल आहे? तुम्ही इथं माणसंही कापतात म्हणता, मग लोक मटण घ्यायला येतात कसे? त्यांना भीती नाही वाटत? या तीन वास्तू पाहून त्यांना जेवण तरी कसे जाते?
…आणि माणसं कशाला कापतात?
ते डॉक्टर सांगतील तुम्हाला. ते डेड हाऊस आहे. रेल्वे किंवा रस्ते अपघातात मयत झालेल्या माणसांना इथे आणतात. त्या खेडूताला असं म्हणायचं होतं की ते शवविच्छेदन केंद्र आहे.
या तीनही वास्तू इतक्या जवळ कशासाठी बांधल्या? इतकी जमीन पडली आहे ओसाड, तरी नगरपरिषदेच्या रचनाकाराला दुसरीकडे जागा मिळू नये?… किती भयाण वास्तव समोर उभे होते…. क्षणभरही इथं उभे राहू नये असे वाटले, पण बातमी धक्कादायक आणि महत्त्वाची होती. तिची शहानिशा करू आणि पुन्हा इथे येऊ असा विचार करून मी काढता पाय घेतला.
मुंबईपासून दोन अडीच तासाच्या अंतरावर असलेले हे इगतपुरी गाव. थंड हवेचे ठिकाण. पावसाळी हवामानात गावभर दाट धुके पसरणारे प्रसिद्ध पर्यटनाचे ठिकाण!
गावात प्रवेश केल्यानंतर प्रभू श्रीरामाचे पावन मंदिर, रेणुका मातेचे देऊळ, वारकरी संप्रदायाचे गुरू जोग महाराज यांचा भजनी मठ, पुढे गुरुकृपा दत्त मंदिर आणि हाकेच्या अंतरावर असलेले हे तीन भयाण कत्तलखाने… किती विरोधाभास दर्शवत होते. दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्ताने मी इगतपुरीच्या गुरूकृपा दत्त मंदिरात आलो होतो. दत्तजन्म झाल्यानंतर प्रसाद वाटण्याचे काम माझ्याकडे होते. भजन, भक्तीगीतांचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रसाद वाटत असताना काही माणसं समोरच्या रस्त्याने घाईगडबडीत जाताना पाहिली. काहीतरी अघटित घडले असावे म्हणून ताट दुसर्‍याच्या हाती देऊन त्यांच्या मागोमाग गेलो.
काल खेडूताने दाखवलेली ती जागा. तिथेच ही माणसे येऊन थांबली. संध्याकाळचे सात वाजून गेले. अंधार पसरत चालला होता. त्या खोलीबाहेर दोन दिवटी लावून पहार्‍यावर पोलीस बसले होते.
गावकरी म्हणाले, आत एका बाईची डेड बॉडी ठेवली आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकात ही बाई ट्रेनखाली पडली आणि मेली. तिचे शवविच्छेदन करण्यासाठी इथं आणले आहे. पण रात्र झाल्यामुळे आज डॉक्टर येणार नाहीत. बहुधा ते उद्या सकाळी येतील. उद्या दिवसा उजेडी यावं म्हणून मी निघालो. दत्तमंदिराबाहेर हात पाय धुतले आणि पुन्हा प्रसाद वाटण्याचे काम सुरू केले. बाहेरगावाहून आलेल्या भक्त मंडळींची झोपण्याची व्यवस्था केली आणि मीही दत्तगुरूंचे नामस्मरण करतच गाढ झोपी गेलो.
सकाळ उजाडताच कालची आठवण झाली. तोंडावर पाणी मारले आणि कॅमेरा घेऊन डोंगराच्या पायथ्याशी गेलो. दगडी खोलीबाहेर पोलीस नव्हते. त्या बाईचा भाऊ आणि म्हातारा बाप बसला होता. मी खोलीत जाऊन पाहण्याची हिंमत केली. दगडी चौथर्‍यावर तिचा मृतदेह ठेवला होता. खोलीला खिडक्या दारं नव्हती. पंखा नाही. नळाची लाईन आहे, पण नळ नव्हता. लाईट नाही. फक्त भयाण चार दगडी भिंती उभ्या.
तो म्हातारा सांगत होता, काल आम्ही गावी जाण्यासाठी मेल गाडीच्या रिझर्व्हेशन बोगीत चढलो. तिकीट होती जनरल बोगीची. टीसी आला आणि ताबडतोब खाली उतरा, जनरल बोगीत बसा म्हणाला. पोरगी घाबरली, ती खाली उतरत असताना ट्रेनखाली आली आणि गाडी सुरू झाली. काय दुर्दैव… त्या गरीब वृद्धाची तिशीपस्तिशीची तरुण पोरगी डोळ्यादेखत बळी गेली.
काल रात्र जागून काढली. डॉक्टर येईपर्यंत इथून हलू नका असे पोलीस सांगून गेले. कारण इथे चोर्‍या फार होतात. या खोलीत एकेकाळी सर्व सोयीसुविधा होत्या. पण दारे, खिडक्या, खिडक्यांचे गज, पंखा, लाईट सारं काही चोरीला गेलेले. फक्त चार दगडी भिंती आणि चौथरा शिल्लक होता. लाईट नसल्यामुळे डॉक्टर दिवसा येतात. कर्तव्यभावनेने काम करतात पण पाणी नसल्यामुळे सर्व शस्त्रे आणि हात कागदाला पुसून निघून जातात. स्वच्छता ठेवयला पाणी मिळत नाही.
मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना जागता पहारा ठेवावा लागतो. शवगृहाला दारेखिडक्या नसल्यामुळे रात्री उंदीर-घुशी येतात. कुत्रे प्रेताचे लचके तोडून नेतात. काही वर्षांपूर्वी एका प्रेताचा हातच कुत्र्याने पळवून नेला होता. खूप शोधाशोध केल्यानंतर तो हात डोंगराच्या पायथ्याशी सापडला… यात गोची होते ती पोलिसांची. पंचनाम्यामध्ये दोन्ही हात पाय असल्याची नोंद होते, पण नंतर एक हात गायब झाल्यावर रेकॉर्डमध्ये खाडाखोड करता येत नाही. तो हात शोधून आणावाच लागतो.
गावकर्‍यांकडून मी माहिती घेत असताना माझ्या बाजूला बराच वेळ उभा असलेला एक मुलगा धावत गावाच्या दिशेने गेला आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला घेऊन आला. तो जवळच राहात होता आणि रस्त्यावर त्याचे हॉटेल होते. इगतपुरी नगरपालिकेच्या गैरकारभाराचे अनेक किस्से त्याने ऐकवले. गावच्या प्रश्नावर तो पोटतिडकीने बोलत होता. मी कागदावर लिहित असताना माझंही नाव टाकायला विसरू नका असं म्हणाला.
या अजब गजब शवविच्छेदन केंद्राचा फोटो आणि बातमी घेऊन दुसर्‍या दिवशी मी मुंबईत परतलो. संपादकांना सर्व फोटो दिले व त्यामागील गांभीर्य सांगीतले. ते म्हणाले अरे, दत्तजयंतीसाठी रजेवर गेला होतास ना! मग हा काय प्रसाद आणलास?
त्यांनी पहिल्याच पानावर ठळकपणे तो फोटो प्रसिद्ध केला. तो पाहून इगतपुरीत चर्चेला उधाण आले. मुंबईचा पत्रकार अचानक इथे येतो आणि फोटो काढून जातो याचे त्यांना आश्चर्य वाटले. कुणा विरोधकाने मला सुपारी दिली असावी अशीही काहींच्या मनात पाल चुकचुकली.
तेथील नगरसेवक नेहमीच मुंबईच्या वार्‍या करतात, असे समजताच बातमीचा फॉलोअप घेण्यासाठी मी सीएसटी स्थानकातून सुटणार्‍या पंचवटी एक्सप्रेसमधील पास बोगीत जाऊन एका नगरसेवकाला शोधून काढला. तो म्हणाला, छान केले तुम्ही पेपरात छापले. असे विषय पेपरवाल्यांनी उचलून धरले पाहिजेत. त्याशिवाय आमचे प्रश्न सुटायचे नाहीत. मला मनाशीच प्रश्न पडला, यांचे कोणते प्रश्न? जे अजून सुटायचे बाकी आहेत. यांचे सर्वच प्रश्न सुटले असावेत, म्हणून यांचे पोट सुटले. ते कसे सुटले ते कुणीतरी यांना विचारायला हवे.
माझ्या बातमीचा इफेक्ट म्हणा किंवा कावळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणा, त्यानंतर काही दिवसांनी तेथील कत्तलखाने आणि शवविच्छेदन केंद्र दूरवर हलवण्यात आले. त्या ठिकाणी विपश्यना ध्यानधारणा केंद्रातर्पेâ टुमदार बंगले बांधण्यात आले. ज्या कत्तलखान्यातून रक्ताचे पाट वाहात होते, त्याच ठिकाणी मन:शांती मिळण्यासाठी जगभरातील साधक ध्यानधारणा करण्यासाठी रोज येत आहेत. आज तेथे सुख आणि शांतीचे संदेश देणारे जगप्रसिद्ध नंदनवन उभे राहिले आहे. याचे श्रेय माझ्या फोटोला मिळायला हरकत नाही.

आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं

डोंगर दर्‍या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला इगतपुरीचा परिसर पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येत असतात. पण स्थानिक आदिवासींचे हाल पाहायला कुणाला वेळ नसतो. दूरवर पलीकडे खेड्यापाड्यातील झोपड्यांतून अनेक आदिवासी ठाकर जमातीचे लोक फार वर्षांपासून राहात आहेत. भात शेती, भाजीपाला, रानमेवा जसे करवंद, जांभळं, आंबे, कैर्‍या यांच्या उत्पन्नावर त्यांची गुजराण होते. रानातील माल विकण्यासाठी बाहेरगावी जाण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नसतात. मग मालगाडीच्या इंजीन ड्रायव्हरला गयावया करून इंजिनावर जीव मुठीत घेऊन बसण्याची परवानगी घेतात. त्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी इंजीन ड्रायव्हर त्यांचे सामान केबीनमध्ये ठेवून घेतो. प्रसंगी वाघाशी दोन हात करणारी ही आदिवासी जमात धडधडणार्‍या इंजीनवरही कच्च्याबच्च्यांना घेऊन बिनदिक्कत स्वार होता. ते पाहून कुणाच्याही छातीत धडकी बसल्याशिवाय राहणार नाही.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

चिंतनशील विचारवंताचा नाट्यआलेख!

Next Post

चिंतनशील विचारवंताचा नाट्यआलेख!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.