• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कुमार आठवत राहतो…

- अतुल पेठे (व्हायरल लेख)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in विशेष लेख
0

२७ सप्टेंबर २०२२. कुमार गोखले या सख्ख्या मित्राला पारखं होऊन एक वर्ष उलटलं. आपल्या मित्राचा मृत्यू होणं किती दुःखद असतं. गेल्या दीड दोन वर्षांत माझे अतिशय जवळचे मित्र-संगीतकार नरेंद्र भिडे, मुखपृष्ठ आरेखनकार नयन बाराहाते, लेखक जयंत पवार आणि अक्षरसुलेखनकार व छायाचित्रकार कुमार गोखले निवर्तले. हे चारही जण अतिशय उत्तम काम करत असताना वेळेआधी गेले. माझंच काय पण आपल्या सर्वांचंच अपरिमित नुकसान झालं.
कुमारची माझी ओळख १९८५ सालापासूनची. श्रीधर उर्फ अण्णा राजगुरू यांच्यामुळे ती झाली. ‘क्षितिज’ या माझ्या नाटकाचे अक्षरसुलेखन, छायाचित्र आणि जाहिरात त्यानं संकल्पित केलेली होती. बोलायला स्पष्ट, वागायला स्वच्छ, बुद्धीने हुशार, वेळेचा पक्का आणि शब्दाला जागणार्‍या अशा या माणसाचा मी विनासायास मित्र बनून गेलो. यानंतर माझ्या प्रत्येक नाटकाचं सर्व काम त्यानंच केलं. यात भर व्याकरण तपासण्याचीही पडली. छापायला जाणारी ओळ न ओळ तो तपासायचा. इतकंच काय, पण नाटकाच्या संहिता व्याकरणदृष्ट्या निर्दोष व्हाव्यात म्हणून तो कष्ट घेत असे. या माणसानं मला खूप मायेनं शिकवलं, साथ दिली आणि मदत केली. अशा व्यक्ती ऋण वगैरे फेडण्यापल्याड असतात. त्यांचे फक्त ‘असणे’ म्हणजे आपले ‘जगणे’ होते.
नाटकाच्या व्यतिरिक्त कुमार सोबत माझी मैत्री जिव्हाळ्याची होती. त्यातील टेकडी हा उत्तुंग भाग होता. पहाटे चक्क ३ वाजता तो, मी, संभाजीराव नावाचे मित्र आणि त्यांची दोन कुत्री वेताळ टेकडीवर जायचो. तीन भुतं आणि दोन कुत्री! चालायला अफाट धमाल यायची. पायदळीच्या बारीकबारीक गोष्टींचे आवाज स्पष्ट येत. आपलाच श्वास ऐकू येई. विविध फुलांचे आणि गवताचे तरल गंध येत. येणारी मंद ओलसर झुळूक मन प्रफुल्लित करी. कुठे बसलो की मग शांतता आणि तारे अनुभवायचो. नंतर गप्पा, चर्चा, मतभेद, संवाद, हास्यविनोद, गाणी, टिंगलटवाळी, नकला, गॉसिप आणि खादाडी सारं बेफाम चाले. टेकडीवर कोणीही चिटपाखरूही नसताना आम्ही तिघं स्वतःच्या आयुष्याबाबत बोलत असू. तो सांगली, मिरज, कुपवाडच्या असंख्य आठवणी सांगे. अचानक अंतर्मुख होत असे. मग आम्ही शहराचे लुकलुकते दिवे बघत राहात असू. दोन्ही कुत्री लपलप करत प्रेमानं कुमारला बिलगत असत.
मग आम्ही कधी सिंहगड, राजगड, राजमाची हे गड पालथे घालत असू. सिंहगड झपाझप उतरून खाली आलो की पायथ्याच्या हॉटेलात पोहे आणि चहा. कुमारचा अलौकिक गुण म्हणजे तो प्रत्येकवेळी कुठलाही छोटा-मोठा खर्च करायला पुढे जात असे. ‘बिल भागिले माणसं’ म्हणजे टीटीएमएम (तुझं तू माझं मी) हा हिशेब त्यानं कधीच केला नाही. आमच्या मैत्रीत हा व्यवहार कधीच नव्हता. कुमारचं खाण्यावरचं आणि बिल देण्यावरचं प्रेम अफाट होतं. बिल देण्यावरून आमची खेचाखेची व्हायची. नाटकाच्या दौर्‍यावर आला की तो अनेक पदार्थ तर आणत असेच; शिवाय कुठलंही स्टेशन आलं की धावत जाऊन सर्वांकरता पेरू आण, चिक्की आण, द्राक्ष आण, असलं तो करीत असे. घरी येताना भडंग, खारे दाणे विपुल असलेली सुकी भेळ, चकल्या आणत असे. हात हलवत तो कधीच येत नसे. दरवेळी आमच्या ओंजळीत काही ना काही भरलेलं असायचं. ममत्व हा दुर्मिळ गुण त्याच्या ठायी होता.
मला हृदयविकाराचा धक्का बसल्याचं कळताच हा आणि त्याचा भाऊ राजन दोन लाख रुपये घेऊन तातडीनं घरी हजर झाले. माणसं औषधांनी बरी होतात, पण अशा माणसांच्या वृत्तीनं ती जिवंत राहतात. मला एकटं सोडायला नको म्हणून माझी सोबत करायला हा स्वतःचे कामधाम सोडून माझ्याबरोबर हेग्गोडूला ‘सत्यशोधक’ या कन्नड नाटकाच्या वेळेस दीड महिना आला. आज त्याच्या संगतीतले ते दिवस आठवले की डोळ्यांतून धाराच वाहू लागतात. किती मज्जा. आम्ही पहाटे झुंजूमंजूवेळी फिरायला जायचो. मग झापाच्या टपरीत लाकडी फळ्यावर मांड्या घालून काप्पी आणि केळ्याचे बन्स खायचो. कुमार कानडी पाट्या पाहायचा. शब्द गिरवायचा. मग तसे फटकारे मारून त्यानं तेव्हढ्या दिवसात ती भाषा आपलीशी केली. या काळात आम्ही फणसाचे गरे आणि बादली भरून आणलेल्या उकडलेल्या आठळ्या सर्व कलाकारांसोबत खाल्या. त्याचं या कानडी नटसंचावर भलतेच प्रेम जडलं. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या या तो पोरापोरींना गूळ, दाणे, भेळ, अंडी आणि मासे खायला घालत असे. त्यांच्यातील एका मुलीचं गाणं सुरू झालं की हा पाण्यानं डबडबलेले स्वतःचे डोळे पुसत राही. लताबाई, हृदयनाथ, ग्रेस ही त्याची तीन दैवतं होती. अनेक वेळा सांजसमयी आम्ही तिथल्या निळ्यासावळ्या तळ्याकाठी असलेल्या विस्तीर्ण वृक्षाच्या पायी बसून ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ या गाण्याचे बंगाली ‘दूरे आकाश शामियाना’ ऐकत असू. निःशब्दता आणि आसमंत. अशा वेळी कुमार खूप वेगळाच दिसे. एकटा, ठाम आणि स्वतंत्र.
कुमारसोबत मी दोन मोठ्ठे प्रवास केले. पहिल्या प्रवासात प्रसिद्ध मुखपृष्ठ आरेखनकार रविमुकुल होता. युथ हॉस्टेलचा ‘सारपास’ ट्रेक आम्ही केला. १४,५०० फूट. बर्फातून प्रवास. तंबूमध्ये राहाणे. सतत विनोद. हसून बेजार अशी धमाल. कुमारचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःच्या ठरवून अविवाहित राहण्यावर विनोद करे. कोणी केल्यास मुक्तपणे हसे. निर्बंध कसलेच नसायचे.
दुसरा प्रवास आम्ही इटली, फ्रान्सचा केला. त्याचा भाऊ राजन, वहिनी अंजली, मी, रोहिणी आणि आमची मैत्रीण साधना कुलकर्णी असा आमचा गट होता. चित्र, शिल्प, नाटक पाहणं हा मुख्य कार्यक्रम. तसंच त्या त्या गावात भटकून भाजी, फळं आणि वाईन आणणं ही कामं आमच्याकडे असत. आम्ही बर्‍याचदा रस्त्यात बसून वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असू. तिथं दिसणार्‍या माणसांची चेहेरेपट्टी, आवाज, हालचाली आपल्या गावातल्या माणसांशी जोडण्याचा मुख्य छंद असे. त्यात गप्पा तर अखंड. त्यात चावटपणा जसा ओतप्रोत असे, तसाच गंभीरपणाही असे. काही बाबतीत आमची मतभिन्नता होती. पण आम्ही दोघेही अशा विषयांवर दुसर्‍याचा आदर बाळगून बोलत असू. अशा वेळी आपण वेगळी मतं ऐकून शहाणेच जास्त होतो हे आम्हाला कळत असे. असा अवकाश मैत्रीत असणे सुंदर वाटे.
कुमारला कॅन्सर झालाय हे कळताच मी आतून खचलोच होतो. त्याच्या भावावहिनीपुतण्यांनी त्याची अफाट काळजी घेतली. १६ सप्टेंबरला राजननं कुमारच्या सांगण्यावरून आमच्या इटली गटाला घरी बोलावलं. ट्रीटमेंटमुळे तो पूर्ण वेगळा दिसू लागला होता. आपला मृत्यू समीप आला आहे हे त्याला उमजलं होतं. ते त्यानं सहज स्वीकारलं होतं. त्याची कसलीच तक्रार नव्हती. उलट जगून झालेल्या आयुष्याबाबत तो समाधानी होता. आम्ही सार्‍यांनी उसनं चंद्रबळ आणून गप्पा मारल्या. चक्क वाईन प्यायली. पिझ्झा खाल्ला. जणू ‘लास्ट सपर’. मी कौशल्य पणाला लावून सर्वांना हसवलं. इटली दौर्‍यातील नकला परत केल्या. वेगवेगळे आवाजही काढले… पण मधेच काही क्षण शांतता पसरे. पोटात खड्डा पडे. माझ्यातला विदूषक विषण्ण होई… एक क्षण असा आला की खोलीत अचानक आम्ही दोघे राहिलो. एकमेकांना बघत कसनुसं हसलो. आम्ही नकळत मिठी मारली. कुमार तर्जनी वर दाखवत म्हणाला की ‘आता वर भेटू’. मग लगेच सावरत त्यानं मला प्रकृतीची काळजी घ्यायची सूचना केली. काहीच न बोलता आम्ही ग्लास हलके किणकिणत ‘चिअर्स’ म्हणत वाईनचे घोट घेतले. मग रिते हसलो आणि निरोप घेतला. मी आणि रोहिणी घरी येऊन बांध फुटून रडलो. कुमारनं जगायचं कसं तर शिकवलंच पण मृत्यूला सामोरं कसं जायचं याचा आदर्श घालून दिला होता.
मग कुमार दवाखान्यात अ‍ॅडमिट झाला.
२७ सप्टेंबरला गेला.
२९ तारखेला आम्ही सारे टेकडीवर गेलो. तिथं एका स्टीलच्या डब्यात भरून आणलेल्या ओंजळभर अस्थी होत्या. आम्ही प्रत्येकानं त्या तिथल्या झाडांच्या मुळाशी सोडल्या.
माझ्या हातात डबा आला.
मी एकटा जरा बाजूला गेलो.
खुळखुळ आवाज होत होता.
मी झाडाची मुळं शोधत होतो.
एक झाड दिसलं.
मी वाकलो.
किणकिण नाद करणार्‍या अस्थी मुळांशी अर्पण केल्या.
‘झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया…’
मी नुसता राहिलो. डबा मिटला.
त्यानंतर मी टेकडीवर अजूनही गेलो नाही.
मात्र नव्यानं उगवलेल्या प्रत्येक झाडाकडं पाहून कुमार आठवत राहातो!

Previous Post

डेडलाइन सांभाळून, झपाटून काम करणारे नंदकुमार टेणी!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.